बंडया - गुंडी १७

Submitted by Pritam19 on 15 August, 2016 - 18:38

आणि ही आई त्याच्यावर किती जोराने ओरडत होती, “बडी, कुठे लागला तुला ईतका वेळ? मी किती वेळ तुझी वाट पाहत उपाशी बसून आहे. माझा काही विचार?” नली तीच्या खालच्या मजल्यावरच्या खिडकीतून बंडयाकडे भिरभिरत्या अचंबित नजरेने बघत राहिलेली. “काय सॉलिड आवाज आहे रे तुझ्या आईचा?” आणि बाबांनी त्याला धरून सरळ बुकलायला सुरूवात केली होती. त्याला बजावत होते, घरातून मला विचारल्याशिवाय यापुढे पाय बाहेर टाकता कामा नये. मी बरोबर सारखे तुझ्यावर लक्ष ठेवून असणार आहे. तू काय करतोस, कोठे जातोस, कोणा कोणाला भेटतोस सगळया गोष्टी बरोबर मला कळल्या पाहिजेत. आल्याबरोबर ताबडतोब मला सगळं सांगितले पाहिजेस. कळलं? आणि मग बंडयाने घडाघडा सा-या गोष्टी बाबांना सांगायला सुरूवात केली. दरवेश्याच्या अस्वलाने खिजवल्यामुळे चंटीची कशी पाठ घेतलेली आणि पळापळीत तंटा कंटाच्या पायात पाय अडकून कसा पडला होता.. नि अस्वलाच्या गुदगुल्यांनी कस्सा खिदीखिदी खिदळत होता, ते सांगताना तर बाबांनाही चक्क हसू फुटत होते. ते दाबून त्यांनी त्याला पुन्हा सारे नीट नीट सांगायला डाफरले आणि बुक्यांचा त्यांनी टेबलावरच ढण, ढण ठेका धरायला सुरूवात केली. ढण.. ढण... ढण.
ठक.. ठक.. ठक बंडयाचे कान आवाज टिपत होते. स्वप्न नव्हे ते सत्य होते. बंडया सुखाच्या स्वप्नविलासातून जागा व्हायला तयार नव्हता. आवाजाची तीव्रता मात्र वाढतच होती. आळसावून अंमळ त्राग्याने त्याने डोळे उघडून पाहीले. खिडकी कडून आवाज येत होता. काहीतरी पांढरे तिथे होते आणि खिडकीवर टकटकत होते. अधांतरी एखादे भूत? कि एखादा पक्षी?
बंडयाची सारी झोप उडाली. धावत जाऊन त्याने खिडकी उघडली. पांढरीशुभ्र फडफड करत, ओल्या पंखातून पाण्याचे तुषार त्याच्यावर उडवत, त्याला गार गार पाण्याने शहारवत तो पांढरा पक्षी त्याच्या खोलीतल्या टेबलावर येऊन बसला. बाहेर पाऊस थांबला होता. जोशाकाकूंच्या कुंडयांमध्ये फुललेल्या रातराणीचा दरवळ उघडया खिडकीतून बंडयाच्या नाकाशी आला. खिडकीतून लावलेल्या आकाशी पडद्यांमधून बाहेरच्या प्रकाशाचे झोत रंगीत संगीत होऊन त्याच्या खोलीत पसरले होते. आसपासच्या एखाद्या घरात इतक्या रात्रीही कुठेतरी टिव्हीवरील बातम्या ऐकल्या जात होत्या. त्यांचा मंद आवाज येत होता. रस्त्यावरून जाणा-या चुकार वाहनांचा घरघराट. परत एकदा सुकविण्यासाठी पंखाचा फडफडाट करीत तो पक्षी बोलता झाला. [ Story by ss bagayatkar ]
“बाळ, मुळी भिऊ नकोस हो. कोणी तुला कुठे पाठवत नाही. आम्ही आहोत ना? सकाळी सरल येईल. तुझ्या आईबाबांना भेटेल. मग सारे यथास्थित होईल बरे. आताच येत होता. मीच म्हटले झोपलेल्यांची झोपमोड करणे पाप आहे.”
बंडयाने डोळे मिटून घेतले. जर हे स्वप्न असेल तर ते कधीच तुटायला नको. तोच खळकन आवाज करत कुठेतरी काचा फुटल्या. आपोआपच त्याचे मिटले डोळे उघडले गेले. रावकाकांचा आवाज गर्जत गेला. समोरच्या सिंधुसरिता इमारतीतल्या त्या टिव्ही चालू असलेल्या खोलीची काच त्यांनी काहीतरी फेकून फोडली होती. ईतक्या रात्रीपर्यंत टि.व्ही.चालवून झोपमोड करित असल्याबद्दल अद्वातद्वा ते त्या टिव्हीवाल्याला शिवीगाळ करत होते. हे स्वप्न नक्कीच नव्हते. सत्य होते. बंडयाचा जीव ईतका खुशालून आला. आनंदाने, कृतज्ञतेने उचंबळून त्याच्या डोळयात पाणी आले. याआधी अशा आनंदाच्या अश्रूंचा सामना करायचा प्रसंग कधी त्याच्या आयुष्यात आला नव्हता. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्याला त्या अश्रूंची मोठी अपुर्वाई नवल वाटत होते. आनंदाचेही खरोखर अश्रू असतात तर!
त्या अश्रूंचा भर ओसरून गेल्यावर दुसरे मोठे नवल उरले. “पण तुला, तुम्हाला कसे कळले? बाबा काय म्हणाले ते?” बंडयाने विचारले.
तोच परत काचा फुटल्याचा खळकन आवाज झाला. आपोआप बंडया खिडकीत खेचला गेला नि अंदाज घेऊ लागला. सिंधुसरितामधल्या टिव्हीवाल्याने रावकाकांच्या खिडकीवर काहीतरी मारले होते. नेम चुकून व पल्ला न गाठता आल्याने त्या वस्तूने खालच्या मजल्यावरच्या राघवन लोकांची काच फोडली होती. लवकरच राघवन लोकांना जाग आली आणि ते शिवीगाळ व भांडाभांडीत सामील झाले.
मंजुघाषाने तीव्र नापसंती दाखवित मान वेळवली. काय बरे म्हणावे या माथेफिरू माणसांच्या जातीला! अशा अर्थाने. मग खांदे झटकावेत तसे पंख झटकले. आणि तो बोलता झाला. “बाळ, तुझ्या पुका-याच्या आर्ततेने सरलला कळले हो. भारी जीव आहे त्याचा तुझ्यावर. तुझ्या वडिलधा-यांनी तुला दूर धाडायचे ठरवले, याचे तुला जे तीव्र दुःख झाले आणि ज्या तीव्रतेने तू सरलची आठवण केलीस, त्यामुळे तुझ्या मनाची कळ त्याच्या मनाला जाऊन भिडली. तुमची मने जोडली गेली. तुझे विचार त्याला कळले. बरे, तुला मनोसंवादाची नीट जाण नाहीसे दिसते. सरलला त्याचे विचार झाले ना बाळ.”
बंडयाने मान हलवेपर्यंत आणि काही उत्तर देईपर्यंत खिडकी बाहेरचा गडबडाट आधीच्या दहापटींनी वाढला होता. म्हणजे इतर दहा घरे रात्रीच्या वेळी शिमगा घालणा-या त्या तीन घरांना गप्प करण्यासाठी त्यांच्या वरताण ओरडून प्रयत्नांची शिकस्त करत होती. मंजुघोषाचे बोलणे त्याला बरेचसे अस्पष्ट ऐकू आले होते. आता काही बोलायचे म्हणजे मोठयाने ओरडून बोलावे लागले असते. आईबाबा जागे झाले असते. आई बाबा जागे झाले असते की ते आधीच जागे झाले होते? त्याच्या खोलीच्या बंद दारापाशी आवाज येत होते. बंडयाने दाराला कान लावला.
“शितल, बॅडीच्या खोलीत कोण बडबडतेय?”
“ओह! हा मुलगा नेहमी रात्री झोपेत काही ना काही बरळत असतो. आज तो जरा नाराज असणार, तेव्हा जास्त बडबडणार.”
“ही मुलं म्हणजे एक कटकट आहे. मॉमच्या आग्रहाला बळी पडलो नसतो तर, हा मुलगा जन्मला नसता आणि हा प्रश्न निर्माण झाला नसता.”
“आता पश्चाताप करून काय उपयोग आहे राहुल? जाऊ दे. लोकं आपल्याला वांझ म्हणण्यापेक्षा त्याच्यावर होणारा खर्च परवडला. उद्या त्याला बोर्डींगमध्ये पोहोचवला कि आपण सुटलो.”
“हो. तो त्याचं आयुष्य त्याच्या चालीने चालेल, आपण आपले.”
“तो बराच हट्टी आहे. सरळपणे ऐकणार नाही. खूप सारे तमाशे करून दाखवणार. अख्खी बिल्डिंग गोळा करणार. आपली लाज घालवणार.”
“शितल! कधीतरी जरा लोकं काय बोलणार? यापलीकडे आपण काय करणार, केलं पाहीजे याचा विचार करशील.”
“राहुल?”
“ठिक आहे. सॉरी. बाहेर भांडाभांडी चालू आहे. आता आपल्या घरात नको.”
बंडयाला त्याच्या डोक्यावरून मायेने फिरणारा मंजुघोषाचा पंख जाणवला. तो बंडयाच्या खांद्यावर येऊन बसलेला. बंडयाचे उजळलेले डोळे पुन्हा निस्तेज झाले होते. कोरडे गाल पुन्हा आसवांनी भिजायला लागले. “बाळ, म्हणूनच दुस-यांचे बोलणे असे आडून ऐकू नये म्हणतात हो. लोक अभावानेच कोणाविषयी मागे चांगले म्हणतात. लोकांची बोलणी आडून ऐकताना फायद्याऐवजी दुःख, तिरस्कार बहुशः वाटयाला यायचा बरे.”
“ते लोक नाहित. माझे आईबाबा आहेत.” बंडया मुसमुसत करवादला.
“आहेत खरेच.” मंजुघोषाला याऐवजी, खरेच आहेत? असे म्हणायचे असावे. थोडा वेळ गप्प राहून त्याने बंडयाचा उमाळा वाहून कमी होऊ दिला. “तू मुळी म्हणून काळजी करू नकोस सरल सकाळी सगळे ठिक करेल बरे. आता मी निघतो. येऊ मी?”
“तो कसे सगळे ठिक करणार? त्याला काहि कळतच नाही. त्याला वाटतेय अमुदि शाळेचे छान छान वर्णन केले की आईबाबा लगेच कबूल होणार. ते कसेच व्हायचे नाहीत.” बंडयाने छातीठोकपणे सांगितले.
“ते कसे ते तू त्यालाच विचारतोस का बाळ? तुला त्याच्याशी बोलायचेय का?” मंजुघोषाचा आवाज मिस्किल वाटत होता. बंडयाचे डोळे लकाकले.
“सरलकाकाने मोबाईल घेतला आहे का?” जरि तशी शक्यता फार अंधुक होती तरी बंडयाला आशा वाटली.
“मोबाईल?...फोन?.... नाही बरे! फोनची काय गरज जर आपल्याला सरळ त्याच्या मनात जाता येते?”
“फुर्र!” बंडयाने एकदम घोडयासारखे फुरुफुरुन मंजुघोषाला दचकविले. तो बंडयाच्या खांद्यावरून उडून परत टेबलावर जाऊन बसला.
“ते कसे? ही जादू आहे का?” बंडयाची उत्सुकता ताणली गेली होती.
“जादू कशाला? कोणीही करू शकते. कोणालाही जमू शकते हो बाळ.”
मग बंडयाला आजपर्यंत हे कसे जमले नव्हते? कोणी करताना त्याने कसे पाहिले, ऐकले नव्हते? जणू मंजुघोषाला त्याचा प्रश्न कळला.
“माणूस निसर्गापासून दूर गेला आणि आपल्या अनेक मुळ नैसर्गिक जाणिवा, शक्ती हरवून, विसरून बसलाय. त्यातलीच ही एक हो.”
“अशी कशी विसरेल?”
“पोहणे विसरतो तश्शी. जगातला प्रत्येक मानव प्राणी पोहू शकतो. जसे सगळे चार पायांचे प्राणी पाण्यात पडले की आपोआप पोहू लागतात तसे. पण माणसाच्या मनाची पक्की धारणा होऊन बसलेली असते, मी पोहायला शिकलो नाही, मला पोहता येत नाही आणि घाबरून तो पाण्यात बुडतो. किती बरे दुर्दैवी जीव असे हकनाक जीव गमावून बसलेत. अरेरे!”
“फुर्रर्र!” यात काही तथ्य आहे खरे, अशा अर्थी.
“तशीच लहानपणापासून सा-यांची समजूत असते प्रत्यक्ष समोर असल्याशिवाय, बोलल्याशिवाय आम्हाला एकमेकांशी बोलता, संवाद साधता येणार नाही. ही धारणा ईतकी पक्की रूजते की प्रत्यक्ष तसा साधता येत असून देखिल, इतर कोणी आमच्या मनाशी संवाद साधायचा प्रयत्न केला, तरी माणसाचे मन त्याचा विरोध करते. त्याला बंदी करते. आपल्या मनात प्रवेश देत नाही. म्हणूनच सरलने तुझ्या मनाचे बोल स्वीकारले. तू मात्र त्याच्या मनाचे बोल स्वीकारू, समजू शकला नाहीस.”
“मला ऐकायचेयत आत्ता.” बंडयाने अधीरतेने म्हटले.
“सोप्पे आहे. तुझ्या मनाची धारणा हे शक्य नाही म्हणून आहे, ती बदलून टाकायची की हे शक्य आहे. आपोआप तुला त्याच्या मनाचे बोल ऐकू येऊ लागतील, बाळ.”
“हे शक्य आहे, हे शक्य आहे, हे शक्य आहे.” बंडया आपल्या मनाशी घोकत बसला. मंजुघोषचा हसल्यासारखा आवाज त्याला ऐकू आला.
“हे तुला घोकावे का लागते बाळ? म्हणजे तुझ्या मनाचा विश्वास नाही असेच समजते हो.”
बंडयाचा चेहरा गोंधळात पडला. हे काय अजून अतरंगी. म्हटले तर कितके सोप्पे, म्हटले तर कसेच जमत नाही. असाच बराच वेळ गेला. बंडयाने मनाची धडपड करणे सोडून दिले. मंजुघोषही शांत खिडकीवर बसून होता. बंडयाला अचानक नवल वाटले. यावेळी मंजुघोषाच्या मनात काय विचार चालू असतील. त्याची बहीण घराकडे एकटी होती आणि त्यामुळे घराकडे लवकर पोहाचण्याची मंजुघोषाला चिंता वाटत होती. बंडयाच्या मनात जणू अचानक साक्षात्कारांचा लखलखाट झाला. तो आपोआप मंजुघोषाला कळला. मंजुघोषाचे मनही बंडयाच्या जाणीवांनी सुखावल्याचे बंडयाला कळले.
“अलख.” म्हणत मंजुघोषाने बंडयाचा निरोप घेतला आणि बाहेरच्या शाब्दिक चक्रिवादळातून तो लगबगीने सुटका करून बाहेर उडाला. त्यापुढे मात्र त्याच्या मनाशी बंडयाला संवाद साधता येईना. आपल्याच नादात बंडयाला त्याला मनोसंवादातला अलख देखिल कळवता आला नाही. बंडया खिडकी बंद करून बिछान्यात विसावला. बाहेरच्या धुम्रश्चक्रिशी त्याला काही देणे घेणे नव्हते. मनातले धुमशान थंड झाले होते.
बंडया अजून नीट झोपेतून जागा झाला नव्हता, की दारावरची घंटी जोरजोरात वाजली. बंडयाच्या घरची घंटी फार अभावाने वाजे. ईतक्या सकाळी सकाळी तर कधीच नाही. बंडया ताडकन अंथरूणातून उठला. धावत आपल्या खोलीचे दार उघडून बाहेर आला. तो मुख्य दाराकडे पोहोचण्याआधी आईबाबांच्या खोलीचे दार उघडले गेले.
“बॅडी आधी बाहेर कोण उभे आहे ते विचार,” बाबांनी बंडयाला थांबवण्याचा प्रयत्न केला.
बंडयाने दाराच्या जाळीदार भोकातून पाहीले. त्याला वाटलेच होते. सरलकाका बाहेर उभा होता. बंडयाला एकदम कसेसेच झाले. आता बाबा नक्कीच सरलकाकाला हाकलून देणार होते. त्याचा अपमान करणार होते. हे बंडयामुळे घडले तर, परत बंडया त्याला कसे तोंड दाखविणार होता? सरलकाकाला बाहेरच्या बाहेर परत जा सांगायचे का? बंडयाला फार वेळ विचार करता आला नाही. सरलकाकाने पुन्हा जोरजोरात घंटी बडवायला सुरूवात केली. घरातल्या लोकांना जागे करून भेटल्याशिवाय तो परतणार नव्हता. बंडयाने भीत भीत दार उघडले.
एक प्रसन्न घमघमाट आणि वा-याची झुळुक आत शिरली. सरलकाकाचा पांढरा स्वच्छ कलाबुती काम केलेला सदरा, सुहास्य चेहरा आणि त्यावर लावलेला केशर कस्तुरीचा टिळा लगेच नजरेत भरत होता. आई बाबांचे लक्ष सरलकाकाकडे गेले.
“हे गुंडीचे सरलकाका.” बंडयाने ओळख करून दिली.
“रूद्राक्षमाळ वाले?” म्हणताना बाबांचे डोळे आक्रसले. बंडयाने गुपचुप मान होकारार्थी हलवली. ती रूद्राक्षमाळ गळयातून काढली जावू नये म्हणून आईबाबांसमोर त्याला किती आकांड-तांडव, आक्रोश करावा लागला होता. बंडयाला आठवले. शाळेच्या बाबतीत तसला आक्रोश काही कामाचा नव्हता. बंडया आईबाबांना पुरेपुर ओळखून होता. सरलकाकाला त्याने त्याची पूर्वी पुरेपुर कल्पना द्यायचा प्रयत्न केला होता. तरी सरलकाका ते काम अगदि सहज सोप्पे समजत होता.
“बंडया जरा आत जा.” सरलकाकाने बंडयाला फर्माविले. त्या मोठया माणसांच्या काही खास गोष्टी असणार होत्या. बंडयाला अशा वेळी काय करायचे असते, बंडयाला स्वानुभवाने चांगले माहित होते. दाराआड उभे राहिले की सगळयांच्या नजरेआड सगळयांचे सगळे छान व्यवस्थित ऐकू येते. बाहेरच्या खोलीत कॅमे-याचा फ्लॅश पडतो तसा भरपूर चकचकाट झाला असावा. मग सरलकाकाचा आवाज ऐकू येऊ लागला. सरलकाका अमुदि शाळेत जाण्याचे फायदे त्याच्या आईबाबांना सांगत होता. बंडया तिथे भरती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत होता. याविषया संबंधी गुप्तता बाळगायला बजावत होता. बंडयाला आई बाबांचा एकही शब्द, प्रश्न, शंका ऐकू आली नाही. कसला वाद नाही. कसली अडवणूक नाही. कसला नकार नाही. सरलकाका त्याला जादू येत नाही म्हणाला होता. तरी त्याने काहीतरी जादू केली. नक्की केली. नाहीतर त्याचे आईबाबा? चक्क त्याचे आईबाबा इतक्या सहज राजी झाले? आणि परत तो फ्लॅशचा चकचकाट झाला. बंडयाला हाक मारून बाहेर बोलावले गेले.
बंडया बाहेरच्या खोलीत येऊन पाहतो तो सरलकाका दाराबाहेर पडत होता. बंडया धावत त्याच्यापाशी पोहोचला. सरलकाका भिंतीचा आधार घेऊन लिफ्टची वाट पाहत थांबला. त्याचा श्वास खूप फुलला होता. त्याची छाती जोरजोरात वरती खालती होताना दिसत होती. एक एक शब्द उच्चारायला त्याला खूप प्रयत्न करावा लागत होता. एखादे खूप ताकदिचे काम केल्याने थकल्यासारखा सरलकाकाचा आवाज अस्फुट येत होता. तो घामाने पार भिजला होता. त्याचा गोरा रंग लाल लाल झाला होता.
“बंडया. .तुझे. काम. झाले. मग. भेटू. ..अलख. “

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीर बागायतकर यांनी लिहलेल्या दुनिया-ए-साबरी ह्या कादंबरी ची ही कथा आहे...छान आहे...पन पोस्ट करत रहा तिवढीच वाचायला भेटते...