बंडया - गुंडी १६

Submitted by Pritam19 on 15 August, 2016 - 18:21

“बंडया बाबा किती वाजलेत बघा जरा.” ईमारतीच्या रखवालदाराने बंडयाला बजावले आणि बंडया भानावर आला.
“किती वाजलेत?”
“रात्रीचे अकरा.”
बापरे! दिवस चांगला गेला, आता रात्र चांगली जाण्याची लक्षणे बरी दिसत नव्हती. आईबाबांना काय सांगायचे? निळया कपडयातल्या दारूडयाचा चिकणा चेहरा त्याच्या डोळयासमोर तरळला. त्याचा काही उपयोग होईल. नली पण त्याला दुजोरा देईल. बंडयाच्या जिभेवरचा काळा डाग चुरचुरू लागला.
घराकडे जाताना बंडयाची पाऊले जड होती. नेहमीप्रमाणे आजही आईबाबा उशिरा येणार असतील तर नेहमी प्रमाणे आजही त्याचे निभावणार होते. फोनच्या उत्तर देणा-या आणि निरोप नोंदणा-या यंत्रावर आईचा आवाज कोणताही खेद वा दुःख प्रगट न करता नेहमीच्या सहजतेने, त्या दोघांना बाहेर जायचे असल्याची, घोषणा करणार होता. कोणतेही कारण वा स्पष्टीकरण देण्याची औपचारीकता न पाळता. बंडयाचे आता कसे होणार? बंडया आता काय खाणार याची तमा न बाळगता. रोज मरे त्याला कोण रडे.
बंडयाला तेच ते शब्द नेहमी ऐकून असे वाटायला लागलेले की तो निरोपही कदाचित कायमचा रेकॉर्ड करून ठेवला असावा आणि आपल्या सचिवाला ती टेप घराच्या फोनवर वाजवून ऐकवायला सांगत असावी. ती आणि बाबा कामात इतके गर्क का असतात? त्यांना स्वतःच्या मुलाशी दिवसातून चार शब्द बोलण्याइतकी ही सवड का मिळत नाही?
बाबांनी त्याला अनेकदा जिमखान्यात दाखल होण्यासाठी सांगितले होते. म्हणजे त्याच्यासाठी घराकडे रात्री निरोपही ठेवावे लागले नसते. पण आईचे म्हणणे होते, बंडयाला जिमखान्यावरून घराकडे आणायची कटकट कोणी सांभाळायची? शिवाय संध्याकाळी ७ वाजल्या पुढे बंडयाच्या वयाचे कोणी जिमखान्यात नसते, थांबत नाही. बंडयाला एकटयाला तिथे रात्री उशिरापर्यंत ठेवले तर ते लोकांना फार विचित्र वाटेल. तीला आपल्या मुलाला काय वाटेल याची फिकिर नव्हती का? एखाद्या बंद दारावर किती डोके आपटले तरी आपलेच डोके रक्तबंबाळ व्हावे, तसे अश्याच अनेक कधीच उत्तर न येणा-या प्रश्नांनी बंडयाचे मन रक्तबंबाळ होऊन जात असे. त्याच्या मनात एरव्ही खूप सारी चीड, वैषम्य, निराशा दाटून येत असे.
आज आता आली नाही. उलट त्याला हायसे वाटत होते. रात्री ११ वाजता घराकडे येण्याचे त्याला स्पष्टीकरण वा समर्थन करता येणार नव्हते. बंडया दाजी किराणावाल्याच्या दुकानापाशी जरा थबकला. घराकडे खायला काही असेल याची खात्री देता येत नव्हती. त्याने नूडलचे एखादे पाकीट घेऊन जावे का? गेल्या तीन रात्री त्यातलेच वेगवेगळे स्वाद खाऊन तो आता कंटाळला होता. आज कदाचित कालच्या कुठल्याश्या पार्टीतून आईने आणलेली काही खाद्यपदार्थांची पाकीटे फ्रिजमध्ये असण्याची शक्यता होती. घरी जाऊन आधी पाहू तर खरे. काही नसले तर दाजीला फोन मारून त्याच्या घन्सू नोकराकरवी ते वर मागवता आले असते.
विचाराच्या नादात बंडया इमारतीच्या लिफ्टपाशी पोहोचला. बंडयाचे ही उशिरा येणे आता लिफ्टवाल्याच्या अंगवळणी पडले होते. लिफ्टमध्ये जर शेजार घरचे कोणी भेटले नाही तर बरे. बंडया फारसा सुदैवी नव्हता. त्याबद्दल तक्रार करणे त्याने सोडून दिले होते. पुढच्याच मजल्यावर जोशी काकू लिफ्टमध्ये शिरल्या. त्या वरती रावांच्या घरी कशासाठी तरी जात होत्या. पण त्या आता फार अबोल वागल्या. त्यांची नजरही बंडयाकडे किव करत बघत होती. बंडया आपल्या मजल्यावर उतरला. लिफ्टची जाळी सरकवून घेऊन त्या वर गेल्या. त्यांनी कसली चौकशी केली असती तर बंडयाने मनोमन वैतागायला हवे होते. उलट त्यांनी काही बोलू नये, याची त्याला विचित्रशी चुटपुट लागली. लॅचमध्ये चावी घालून त्याने फिरवली आणि दार लोटले. ते उघडले नाही. बंडयाचा श्वास वरच्यावर अडकला. दाराला आतून कडी होती. म्हणजे.. म्हंजे आईबाबा!
दाराची घंटी मारायचा धीर त्याला होत नव्हता. जितका वेळ तो बाहेर उभा असणार होता, उशिर आणि मिळणारी बोलणी वाढत जाणार होती. तो मनात वेगवेगळया कल्पना, थापा लढवून, पडताळून पाहत होता. किती वेळ झाला कोणास ठाऊक, जिन्यावर वरून खाली येणारा पायरव ऐकू येवू लागला. बंडयाने ताबडतोब हात उंचावून घंटी मारली. दुस-या कोणी घंटी मारून त्याला घरात घुसवण्यापेक्षा त्याने आपल्याआप घुसणे परवडले. दार उघडताच तोफेचा धडाका होऊन त्याच्या चिंधडया उडतील असे त्याला वाटले होते. तसे काही झाले नाही. शांतपणे त्याला घरात घेतले गेले. बाथरूममध्ये हातपाय धुवून जेवणाच्या टेबलावर तो जाऊन बसला. गरम मसाला डोश्याचा वास घमघमत होता. एका बाजूला पानात गुंडाळलेले सात आठ मेदूवडे होते. चटणीची थैली फोडण्यासाठी त्याने हात पुढे केला.
“तुझ्यासाठी टोमॅटोच्या सॉसची बाटली ठेवलीय.”बाबांच्या आवाजावरून पुढे काय वाढून ठेवलेय याचा बंडयाला अंदाज आला. अचानक सारी भूक मरून गेली. तोंड कोरडे पडले.
“मला आणि तुझ्या डॅडीला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचेय. त्यासाठी इतर महत्त्वाची कामे सोडून आज लवकर यावे लागले.” आईच्या आवाजात इतर कामे बुडल्याची तीव्र खंत होती.
“बॅडी, आधी खाऊन घे.” बाबांनी हुकूम सोडला. तो मोडायची हिंमत आतातरी बंडयामध्ये नव्हती. तोंडाची सारी चव तर गेली होती. त्याने हळूच चोरटया नजरेने आईकडे बघितले. ती शोधक नजरेने त्याच्याकडेच पाहत होती. बंडयाचा घास अडकला. त्याने एक मोठा ठसका काढला. त्याच्यासमोर पाण्याचा पेला ठेवण्यात आला. अर्थात त्याचा त्यानेच तो उचलून तोंडाला लावायचा होता. थोडया वेळाने परत थंड शांतता पसरली. आईबाबांचे खाऊन झाले. आईने टेबलावरची भांडी उचलली, तशी बंडयानेही आपली थाळी पुढे देऊ केली.
“वाईट सवय. जर तुला हे संपवायचे नव्हते तर इतके घेतलेस कशाला?”
“बॅडी ते सारे संपव.”
बंडयाच्या डोळयातून धारा आपोआप वाहू लागल्या त्यात भिजत भिजत उरलेले घास त्याने कसेबसे घशाखाली लोटले. मग आपली थाळी उचलून घासायच्या खटा-यात नेऊन ठेवली. बेसिनवर तोंड धुऊन तो आपल्या खोलीकडे निघाला.
“तू ऐकले नाहीस का, आम्हाला तुला काही विचारायचेय? इथे समोर येऊन बस.” बंडया गपगुमान आईबाबांच्या विरूद्ध बाजूला असलेल्या खुर्चित जाऊन बसला. बंडयाचा खटला सुरू झाला.
“तु जोशी काका आणि काकींना काय काय सांगितलेस?”बंडयाने मनात जोशी दांपत्याला शिव्यांची लाखोली वाहिली. चहाडखोरं. तरीच जोशीकाकू आज अश्या तोंड फिरवून वागत होत्या. तो गप्प बसला.
“गेले पंधरा दिवस तू शाळेत जात नाहीएस.” बाबांनी शाळेकडून बंडयाच्या नावे आलेलं चौकशीपत्र पुराव्यादाखल त्याच्यासमोर टाकलं.
“आज जोशी काकूंनी आम्हाला सांगितलं तेव्हा कळावे ना,” आईने मान उडवत दुखावल्या स्वरात विचारलं. जोशींना आपले गृहछिद्र कळावे याचे तीला मोठे दुःख झालेले दिसत होते.
“अगो बाई कमालच झाली. बंडया गेले दहा-वीस दिवस शाळेत जात नाही अन् तुम्हाला माहित नाही.” जोशीकाकूंनी किती खवचटपणे उदगार काढले होते आणि ते किती तीव्रतेने झोंबले होते. “तुम्ही कधी मुलाची वास्तपुस्त करित नाही का? नको नको त्या मुलांच्या संगतीत जाऊन की नाही बघा तोही त्यांच्यासारखा बदमाश झाला आहे. बाकी त्याला तरी काय दोष देणार? मुलांची जात. घराकडे कोणी वळण लावणारे असेल, तर ना घराकडे थांबणार? आमच्या निलेशने एकदाच कशी दोन दिवस शाळा बुडवल्यावर आमच्या सरांनी त्याला कसला मार दिला होता सांगू. पुन्हा म्हणून पाय वाकडा टाकायची कशी हिंमत नाही झाली. आणि मी तरी कसली वस्ताद. कायम डोळयात तेल घालून नजर ठेवली होती. चार, चार दिवसांनी शाळेच्या बाईंना भेटायचीच. आईवडीलांनी जबाबदारी नीट निभावली तर ना मुले नीट जबाबदार उपजणार.” हा टोमणा अगदि वर्मी लागेल असा जोशी काकूंनी मारला होता.
सासूबाई तर वर गेल्या पण हया दुस-या शेजार सासूला खालीच ठेवून गेल्या. बंडयाच्या आईने आठवणीने नाक त्रासले. बंडयाच्या आजीचे आणि जोशीकाकूंचे जमणारे गूळपीठ नेहमीच तीच्या डोळयात सलत असे. सुनांच्या चहाडया करायला,सांगायला, गायला त्यांची ही एकीबेकी आहे हे न कळण्याईतकी का ती बुद्धू होती? आपल्या कुशाग्र तीक्ष्ण नजरेने तीने बंडयाचे निरीक्षण केले. मान खाली घालून नजर चोरून तो उगी बसून होता. अपराधीपणाची सारी लक्षणे तर उघड होती.
“बडी खालचा रामसिंग सांगत होता, आताशा नेहमीच तू रात्री ८-९ च्या पुढेच परततोस म्हणून? शाळेत जात नाही, क्लासला जात नाही, मग हा अख्खा दिवस तू जातोस कुठे? करतोस काय?” आईने विचारले. त्यात कसलीही दटावणी नव्हती. एक सहज साधे कुतुहूल होते.
बंडयाने जोशीकाकूंपाठोपाठ रखवालदाराच्या नावे चार करकरीत शिव्या मनात मोजल्या. जर आजीने देवाघरी जाताना जोशीकाकूंना देखिल बरोबर न्यायला हवे होते, हा त्याच्या मनातला विचार आईच्या मनात देखिल चालू आहे, हे कळते तर त्याने कदाचित ताबडतोब तीच्या प्रश्नांना उत्तर दिलेही असते.
“बॅडी, जर तू घराकडे नीट राहू शकत नसशील, तर तुला बोर्डींग स्कूलमध्ये पाठवावे लागेल.” बाबांनी निर्णय घेऊनही टाकला. सगळयात जलद निर्णय घेणारा, परिस्थिती झटक्यात नियंत्रणात आणणारा तडफदार संचालक म्हणून कार्यालयात त्यांची ख्याती होती. जर बंडया कसलेही उत्तर देत नसेल तर उगाच चौकशीची लांबडवण लावणे त्यांना निरर्थक वाटत होते. बंडयाने मध्ये इतके दिवस काय केले ही गोष्ट त्यांच्या नियंत्रणात नव्हती. त्याने पुढे काय करावे याचे नियंत्रण ते करणार होते. ते त्यांच्या हातात होते. तेव्हा मागे काय झाले याचे चर्वितचर्वण करणे बेकार होते.
“मी... मी एका दुस-या शाळेत जातो.” बंडयाने घाईघाईने उत्तर दिले. त्याला बोर्डींग स्कूलमध्ये अजिबात जायचे नव्हते. कल्लनसारखे अजिबात मरायचे नव्हते. कल्लन करुपण्णचा भाऊ, सत्यभासा मावशीचा मुलगा. गेल्या वर्षी बोर्डींगमध्ये घातल्यावर आत्महत्या केलेला. त्याच्या डोळयासमोर बारीक केस कापलेली टकलू कल्लनची छबी तरळली आणि पुन्हा डोळयात पाणी. ते पाहून आई वैतागली.
“बडी तुला सारखे सारखे डोळयातून पाणी काढायची काही गरज नाहीय. इथे कोणी तुला रागावत नाहीय. कोणी मारत नाहीए. आम्ही तुला साधे प्रश्न विचारतोय आणि तू त्याची सरळ खरी उत्तरे द्यावीस अशी अपेक्षा करतोय.” आईने त्याला सुनावले.
इतर आई बाप आपल्या मुलांचा जसा छळ करतात तसा आपण कधीच करत नसताना, परत सारेजण आपल्याला वाईट आईवडील का म्हणतात हे तीला कळत नसे. बंडयालाही त्याचे आईवडील इतर आईवडलांसारखे का नाहीत हा प्रश्न नेहमी छळत असे. नितिन, नलीला साधा तास अर्धा तास घरी जायला उशीर झाला, तर त्यांचे आईवडील त्यांना कित्ती बोलणी सुनावित. त्यांचा कसला झणझणीत, मागच्या पुढच्या बेचाळीस पिढयांचा उद्धार करीत. तो त्याने स्वतः आपल्या कानांनी, कितीतरी वेळा ऐकला होता. जोशी काकू जेव्हा नलीवर ओरडत तेव्हा त्यांच्या पहिल्या मजल्यावरचा आवाज बाराव्या मजल्यापर्यंत सहज ऐकू येई. बंडया तर जेमतेम चौथ्या मजल्यावर होता. तर राजन, बंटीला मागे एक दिवस शाळा चुकवल्याबद्दल राव काकांनी बुकलून बुकलून काढले होते. बंटीने आपल्या गालावर उठलेली माराची पाचही सणसणीत बोटे बंडयासमोर मिरवली होती. “आमच्या बाबांसारखा कडक हात दुस-या कोणाचा नाही, माहितीय?” तो आपले शरीर बळकट करून घेण्यासाठी मुद्दामहून बाबांच्या खोडया काढून मार मिळवतो असे त्याचे म्हणणे होते. त्याने कुठल्याश्या जॅकी चॅनच्या चित्रपटात त्याला लहानपणापासून मार देऊन देऊन घट्ट करतात असे बघितले होते. सध्या आपले शरीर किती घट्ट झाले आहे, हे दाखवण्यासाठी बंड्याला देखिल दोन, चार रट्टे लगावले होते. लगावून वर विचारले होते. खरे तर पहिल्याच रट्टयात त्याचे हात जॅकी चॅन पेक्षा कडक आहेत, बंडयाने मान्य केले होते. पण बंडयासारख्या आतल्या गोटातल्या मित्राला फक्त आडव्या हाताच्या फटक्याचा नमुना चाखायला देणे त्याला चुकीचे, अपुरे वाटले होते. म्हणून उभ्या मागच्या आणि तिरप्या हाताचा फटकाही नमुना बंडयाला आजमावायला दिला होता. मग बंडयानेही लवकरच आपण आपले हात बळकट करून आपले नमुने त्याला पेश करू, असे वचन दिले होते.
“का?” बाबांनी विचारले.
बंडया गोंधळला. “काय का?” त्याच्या विचाराच्या भोव-यात तो बराच दूर जाऊन भरकटला होता.
“तू दुस-या शाळेत जातोस. का?” बाबांनी त्याच्या चेह-यावरचा गोंधळ वाचून विचारले.
बापरे , या का? ला किती, किती म्हणून उत्तरे होती. सेंट कार सायकल किती वाईट आणि कंटाळवाणी आणि छळवादी शाळा होती, हे तिथल्या कोणीही विदयार्थ्याने अगदि सहज खुलासेवार सांगितले असते. प्रत्येक विद्यार्थ्याकडून छळ केले जाण्याचे नवनवे प्रकार नोंदले गेले असते. ते ऐकताना कान किटून गेले असते. पण सेंट सायकल किती वाईट शाळा होती याचे बखान करण्यापेक्षा अमुदि शाळा किती आनंददायक आहे. चित्तथरारक अनुभवदायिनी आहे, ते सांगायला बंडयाला मनापासून आवडले असते.
नव्हे सरलकाकाने त्याचीच रसभरीत वर्णने ऐकवायला सांगितले होते. बंडयाच्या आईवडीलांकडून कधीना कधी ती शाळा सोडली जाण्याबद्दल आणि ही शाळा चालू करण्याबद्दल उत्तर, खुलासा मागितला जाणार याची त्याला कल्पना होती. साबरी शाळेविषयी मात्र अवाक्षर उच्चारायचे नव्हते. सरलकाकाला वाटत होते की अमुदि शाळेत वेगवेगळया ठिकाणी केलेल्या गंमती जंमती ऐकून बंडयाचे आईबाबा हरखून जातील. बंडयाला अशा मस्त शाळेत प्रवेश मिळाल्याबद्दल त्यांना कदाचित त्याचा हेवाही वाटेल. ते सरलकाकाचे न थकता परत परत वाकून आभार मानतील. हं! किती सरळ मनाचा होता सरलकाका. त्याने ज्या आई वडलांबरोबर पुरी आठ वर्षे काढलीत त्या बंडयाचे, त्यांना पुरते ओळखणा-याचे वेगळे मत होते.
“आम्ही शिवाजीच्या पुतळयापाशी मैदानात भेटतो. म्हणजे जमतो आणि तिथून रोज वेगवेगळया ठिकाणी... वेगवेगळया दुकानदारांना... अं! माणसांना... अं! म्हणजे... पुष्कळ, पुष्कळ जागी जातो नी तिथल्या माणसांना भेटतो. म्हणजे...” बंडयाला सांगण्यासारखं तर खूप होतं, पण नेमकी सुरूवात कुठून, कशी करावी कळेनासे झाले.
“शीतल, उद्या दोन वाजता तुला कुठली अपॉईन्टमेन्ट आहे का? बघ जरा काही ऐडजस्ट कर. डॉन फियास्कोचे रेक्टर कोण आहेत? फादर फजिकल म्हणालेली ना सत्यभासा?” बाबांनी बंडयाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आईशी पुढच्या हालचाली नक्की करायला सुरूवात केली.
“अं नको! मला वाटतं आपण श्रीमंतांच्या इन्टरनॅशनल अकादमी मध्ये घालुया त्याला. हर्षाचा मुलगा वेलू तिथेच आहे. सत्यभासाने सुद्धा तीच्या मुलाला कल्लनला तिथेच हलवलय. गेल्या वर्षीच्या त्या...” आईने वाक्य तोडले. तीचे बंडयाकडे लक्ष गेले.
“हं! त्याची काळजी करू नकोस. त्याला माहित आहे ते. गेल्या वर्षी त्याने शब्द दिला होता. घराकडे नीट राहीन. कसले उपदव्याप करणार नाही. म्हणून गेल्यावर्षी ते राहिलेले. त्याला संधी देण्यात आली होती. त्याने ती पाळली नाही. बॅडी सॉरी डियर. तुला बोर्डिंगमध्ये जावे लागेल.” बाबांनी थंडपणे फैसला सुनावून टाकला. बहुतेक ते अश्या एखाद्या संधीची वाट पाहत असावेत. बंडयापासुन सुटका करून घ्यायची संधी.
“बडी, आज घरापासून दूर जाताना तुला थोडे वाईट वाटेल. लवकरच तु तिथे रूळशील. आम्ही करतोय ते तुझ्या भल्यासाठी होते हे तुला मोठे झाल्यावर कळेल.” बंडया जन्माला येताना मोठा बनून का आला नाही, याची खंत तीच्या आवाजात प्रकटलेली. ती उठली आणि टिव्ही पाशी जाऊन तीने रिमोट उचलला.
“राहुल, आज किती दिवसांनी टिव्ही बघतेय रे मी? “ आढ्यतेने सोफ्यावर रेलत ती म्हणाली. “प्लिज जरा डिशवॉशरमध्ये भांडी घासशील ना?”
बाबांनी खुर्चिवरून उठताना बंडयाकडे एक ओझरता कटाक्ष टाकला. त्याला विजेचा झटका बसला असावा असा, डोळयांच्या पापण्या न फडफडवता स्तब्ध एका जागी खिळला होता. बाबांनी ते पाहून स्वतःशीच बेपर्वा खांदे उडविले आणि ते डिशवॉशरपाशी खरकटया भांडयांच्या ढिगापाशी गेले.
बंडया भानावर आला तेव्हा आईबाबा त्यांचे सारे आवरून त्यांच्या झोपायच्या खोलीत जाऊन झोपी गेले होते. तोही खचल्या चालीने आपल्या खोलीत गेला. झोपायचे कपडे सदरा पायजमा बदलून तो अंथरूणात शिरला. सवयीने त्याने दिवे बंद केले. तसे खिडकिच्या पलिकडे काळया तावदानातुन बाहेरचे जग जणू जिवंत झाले. जोरदार पाऊस चालू होता आणि बंद काचांवरून मोठे थेंबोळे पघळत खाली जात होते.
बंडयाची उशी आसवांनी ओली झाली. ती भिजवायची ही सवय झाली होती. सवयीने मग तीची सुकी बाजू बदलून त्याने डोक्याखाली केली. तो खूप घाबरून गेला होता. आपल्या आईबाबांना आपण नको आहोत याची कधी नव्हे तितक्या प्रखरतेने त्याला जाणीव झाली होती. आईबाबांनी आपल्याला टाकलं तर मग कोणाला आपण हवे असणार? असाही एक दिवस कधीना कधी येणार, हे सरलकाकाने त्याला साबरी शाळेत भरती होण्यासाठी सांगितले तेव्हा पासून त्याच्या मनात आत कुठेतरी डाचत होते. आईबाबा साबरी शाळा कधीच कबूल करणार नव्हते. साबरी शाळा किंवा आईबाबा, कोणातरी एकाची निवड करायची होती. याच भीतीने गुप्तगंगेच्या काठावर बारा पिंपळाजवळ शपथ घेताना तो त्याच्या शाळेत परतला होता. पण पुत्रंजीव देवतेने त्याला ओढून साबरी जगात नेले होते. तो सुखाचा भास ते अमुदि शाळेचे आनंदि स्वप्न आता संपणार होते. बाबा जे ठरवतात ते करतात. त्याची लवकरात लवकर या घरातून उचलबांगडी होणार होती. ही कदाचित येथली शेवटची रात्र. बंडया टक्क डोळयांनी खिडकी बाहेरून येणा-या प्रकाशाच्या कवडश्यात त्याची परिचित खोली डोळयांत साठवून घेत होता.
सरलकाकाची आशा विश्वास खोटा होता. तो म्हणत होता. आपण चुटकिसरशी तुझ्या आईवडीलांना पटवू. आता कुठे होता तो? उद्या संध्याकाळी त्याला ईथून नेण्यात येईल. गुंडी, पंडीशी त्याला परत कधी संपर्क साधता येईल का? सरलकाकाची परत कधी भेट होऊ शकेल का? मंजुघोषाला आकाशात उडताना कधी त्या बोर्डिग स्कूलमधला बंडया दिसेल का? बंडयाचे काय झाले त्यांना कधी कळेल का? बंडयाच्या मनात विचारांची, भावनांची आवर्तने चालू होती. परत परत घुमवून फिरवून तेच ते वाईट विचार, वाईट प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users