बंडया - गुंडी १३

Submitted by Pritam19 on 15 August, 2016 - 17:38

रंगवलय काय असते? विचारायला प्रश्न बंडयाच्या ओठांवर आलेला. तो गुमान गिळून तो गप्प बसला. मान खाली घालून उभा राहिला. त्याने इतर चौघांकडे नजर टाकली. आणि पहिल्यांदाच त्याच्या लक्षात आले. त्या चौघांच्याही हातात सप्तरंगी कडी होती. तशी तर त्याने गुंडीच्या आणि पंडीच्याही हातावर पाहिली होती. त्याला वाटले ती त्या दोघींची काही फॅशन वगैरे असावी.
“रंगवलय पाहिल्याशिवाय तुला मी कुठली आणि कशी पुस्तके देऊ शकणार?” बाईंनी सहानुभूतीने त्याला विचारले. “कुठे हरवलयस का कि घरी विसरलास? तुला तुझा क्रम माहित आहे ना? काय ठरवला होतास?”
“क्रम?” बाईंच्या सहानुभूतीमुळे बंडयाची समस्या त्याच्या ओठांबाहेर फुटली. आता मात्र वांडाला राहावले नाही. तो जागच्याजागी खुसुखुसु हसू लागला. कंटाही खुसुखुसु सुरू झाला. लगोलग तंटा. आपल्याला काहीच कळत नाही म्हणून बंडया खजिल झाला. शरमला. धुंडी उठून त्याच्या जवळ आला. वांडाने व तंटा, कंटाने त्याला खालीच दाबायचा प्रयत्न केला. तरी तो उठलाच.
आपले हातातले बंडयाला दाखवून त्याने बंडयाला समजावले, “हे बघ हे असे सात रंगाचे मणी असतात, त्यातला जो रंग आपल्याला जास्तीत जास्त आवडतो त्या क्रमाने ते ओवायचे आणि तो दोरा हातात बांधला कि झाले तुझे रंगवलय तयार.” मग परांजपे बाईंकडे वळून त्यांनाही धुंडीने समजावून सांगितले, “बाई तो पण माझ्यासारखा अदिक्षितांच्या शाळेतून इथे भरती झालाय. त्याला आपल्या अमुदि शाळेचे नियम माहित नाहीत. मी देऊ माझे रंगवलय त्याला?”
“नाही.”
“थोडा वेळ?”
“नाही. असे करता येत नाही. एकाचे दुस-याला चालत नाही.”
एवढयात बाहेर मोठ्ठासा गलका झाला. तेव्हा सारे बाहेर डोकावायला लागले. तिथे एक रडवेलीशी तरूण मुलगी लंगडत येत होती आणि तीच्यामागे एक दारूडा मोठमोठयाने बडबडत येत होता.
“चुक्कून धक्का लागला मिस्. च्युकलो म्हण्णतो ना मी. दोष माझ्झा कसला, गट्टारीऽऽ” करत त्याने एक जोरदार आराळी मारून दिली.
“आज गट्टारीऽऽ” करत परत एक जोरदार आरोळी मारली.
“माफ्फ केलं म्हणा, म्हणा नाऽऽ माफ केल्लं.” दारूडा परत त्या मुलीच्या अंगचटीला गेला. वाघ्या वागडेंनी आपल्या म्हाता-या शरीरात होतं नव्हतं तेवढं बळ एकटवून त्याला बाजूला ढकलला. तसे त्याने एकदम दोन्ही हात वागडेंच्या गळयात टाकून त्यांचा मुकाच घेतला जवळ जवळ, “आज्जोबा तुम्हाला हव्वी, हव्वी ही कोवळीऽ कोवळी काकडी.” त्या दारूडयाने मुलीच्या दिशेने हातवारे करत आळ घेतला. वाघ्या काका जाम चिडले, आणि त्यांनी झोडत झोडत त्याला दूर नेले.
बंडयाने मनोमन निश्चय केला. आजपासून तो वाघ्याकाकांना वागडे आजोबा न म्हणता त्यांच्या आवडत्या नावाने हाक मारणार. ती मुलगी त्याच्या चांगल्या ओळखीची होती. त्याला राखी बांधणारी जोश्यांची नली. त्याने झटकन पुढे होऊन नलीला आधार दिला. जन्मापासून तीचा एक पाय दुस-यापेक्षा छोटा होता. त्यामुळे तीला लंगडत चालावे लागे. ओळखीचा आधार दिसताच तो जरी छोटा होता तरी नलीने त्याला घट्ट पकडून ठेवले. सगळी वरात मग बसमध्ये चढली.
बंडयाला चालता चालता गुंडीच्या कानात कुजबुजल्याशिवाय राहावले नाही, “पाहिलेस तुझ्या चिकण्याचे भारी पराक्रम.”
गुंडीने त्याच्या पाठीत एक हलकासा दणका घातला.
“कटू सत्य फार झोंबते.” बंडयाने अजून चिडवले. चंटीने त्याच्या पाठीत एक गुद्दा हाणला,
“फार थोडे लोक सत्य पचवू शकतात.” बंडयाने वर मखलाशी केली.
पंडीने त्याला गुपचुप जोरदार चिमटा काढला. “चूप नाटकाचे संवाद इथे ऐकवू नकोस.”
धावण्याच्या श्रमाने आणि भीतीने नलीची छाती अजून जोराने वरखाली धपापत होती. तीला घाम सुटला होता. परांजपे बाई तीला धीर देत होत्या. नली आक्रंदत म्हणाली, “त्याने माझा मुका घ्यायचा प्रयत्न केला.”
“त्याने तुझा मुका घेतला?” चंटीने लगेच चंटपणे विचारले.
“नाही,” म्हणत नली रडायला लागली.
“आता यात रडायला काय झाले?” बंडया वैतागाने म्हणाला.
“बिचारीची निराशा झाली रे,” चंटी हळूच जाणतेपणाने त्याच्या कानात कुजबुजली. ते ऐकू गेल्यागत नली मोठयाने विव्हळली, “त्याने माझा बूट मोडला. आता माझी शिकवणी चुकणार. मी कश्शी जाणार?”
बंडयाने नलीच्या पायात पाहिले. तीच्या पायांची उंची जुळवणारे बूट मुद्दामहून शिवून घेतले जात. त्यातला एक गायब होता. त्यांच्याशिवाय नलीला एकटीने चालत जाणे खरोखरच अवघड होते.
“मी शिकवणीला गेले नाही तर सर बाबांना फोन करणार. बाबा मला ओरडणार. आई मला रागावणार.” नलीचे रडगाणे संपत नव्हते, “आज नविन धडयाची सुरूवात. ती चुकली कि उद्या मला काही कळणार नाही. सर परत घेणार नाहीत. धड्याचे तीन गुण जाणार. आई म्हणणार मी मुद्दाम शिकवणी बुडवली. बंडया आईला सांग.”
अमुदि शाळेविषयी थापाथापी केल्यावर, आणि ती पकडली गेल्यावर पुन्हा जोशी पतीपत्नींसमोर उभे राहणे बंडयासाठी किती अवघड संकट होते याची नलीला काही कल्पना! एकदा का थापेबाज नाव झाले की आता बंडयाची प्रत्येक गोष्ट थाप वाटणार होती.
“अगं पण आजचा धडा चुकला तर शिक्षकांना त्यांच्या फावल्या वेळात जाऊन भेट ना. ते देतील तुला व्यवस्थित शिकवून. नाहीतर मग दुस-या शिक्षकांचा वर्ग असेल ना त्या धडयावर, त्याला जाऊन बस.” परांजपे बाईंनी सोप्पी तोड काढली. एक शिकवणीचा वर्ग चुकल्याबद्दल ईतका आकांत कशाला करायला हवा त्यांना कळेना. नलीला देखिल त्या नेमके काय सुचवताहेत कळेना. शिकवणीचे सर एरव्हीच्या आपल्या फावल्या वेळेत वर्ग चुकलेल्या मुलांना कशाला शिकवायला बसलेत? शाळेचे शिक्षक देखिल तसे शिकवणार नाहीत. पुन्हा तोच धडा दुस-या एखादया शिक्षकांकडून कसा शिकवला जाणार? एकाच विषयाला दोन दोन शिकवण्या? थोडावेळ नली आणि परांजपे बाईंमध्ये विचित्र काथ्याक्कूट्ट झाला. नलीला अमुदि शाळेच्या शिक्षण पद्धतीविषयी काही माहित नव्हते, ना परांजपे बाईंना मराठी विद्यालयाच्या शिक्षण पद्धतींविषयी काही माहित होते. दोघींना एकमेकींच्या विचारांचे, प्रश्नांचे, उत्तरांचे संदर्भ कळत नव्हते. लागत नव्हते.
मग बंडया आणि धुंडी आपापल्या परीने दुभाष्यांप्रमाणे त्या दोघींना समजावून द्यायचा प्रयत्न करू लागले. दोन्ही शिक्षणपद्धतींमधले फरक. त्यामुळे गोंधळ अजून वाढला. धडयाचे तीन गुण गमावणे म्हणजे बाईंना कळेना. बाईंकडून अमुदिमध्ये कोणतीही परिक्षा आणि कोणतेही गुण, पास, नापास असा प्रकार नाही हे कळले, तेव्हा बंडया जागेवरून उडायचा राहिला. मग करायचा कशाला अभ्यास? त्याच्या डोक्यात विचार डोकावला. पण ते अभ्यास ज्याला म्हणतात तो करत तरी कुठे होते? ते तर रोज रोज नव्या, नव्या ठिकाणी जात होत, नव्या नव्या लोकांला भेटत होते, गप्पा मारत होते. त्यात कंटाळा करण्यासारखे काय होते? त्याला अमुदि लोक अभ्यास म्हणतात?
बाईंना देखिल कळेना. जर नलीला तो विषय आवडत नाही, तो धडा आवडत नाही, ते शिक्षक आवडत नाहीत तर ती त्या वर्गांना जातेय कशाला? तीचे आईवडील तीला अशी जबरदस्ती का करतायत? ते तीचे सावत्र आईवडील आहेत का? बाईंना अशा छळवादी आईबापांच्या तावडीत सापडलेल्या नलीबद्दल भारी अनुकंपा वाटली. आपल्यापरीने तीच्यावर थोडा अनुग्रह करायचे त्यांनी ठरवले. त्या तीला “सर्वांसाठी” लिहिलेल्या खणांपाशी घेऊन गेल्या. तिथे तीला आवडेल ते पुस्तक त्यांनी निवडायला सांगितले. तीचा शिकवणी वर्ग बुडल्यात जमा होता. त्या वेळेचा तीला असा सदुपयोग करता आला असता.
“अय्या!” म्हणत नलीने एक जलावतरणावरचे पुस्तक उचलले. अनिता सूदचे पोहोण्याचे अनुभव तीने त्यात लिहीले होते. परांजपे बाईंना नलीची दया आली. पण बंडयाला मात्र त्यांनी काही देऊ केले नाही. याचे मनोमन त्याला फार वाईट वाटले.
वाघ्याकाका परतले. आपल्या एका हवालदार मित्राच्या ताब्यात त्या पिसाटलेल्या दारूडयाला सोपवून ते आले होते. चोर म्हणतो कसा, म्हाता-या माणसावर आपण हात उचलत नाही म्हणून, थेरडया वाचलास.
“मी, मी म्हातारा?” थरथर कापत ते ओरडले. त्यांचे पुस्तकात दंग झालेल्या नलीकडे लक्ष गेले, “चल ग पोरी. तुला तुझ्या घरी पोहाचवून येतो. तो भामटा तर आत गेला पण पांडू हवालदार म्हणत होता, आज गटारीच्या दिवशी असली गटारातली डुकरे कुत्र्याच्या छत्रींप्रमाणे सगळीकडे उगवलेली असतात.”
नलीची काही ताबडतोब निघण्याची ईच्छा दिसेना. गुंडीने अनिता सुदवाले आपल्या खात्यावर द्यायला सांगून तीची सोय केली. तरीही नलीला तिथून पाय काढवत नव्हता. ईतक्या विषयांवरची ईतकी सचित्र पुस्तके तीने पाहिली नव्हती कधी. वेगवेगळे पशु पक्षी त्यांच्या फोटोसकट आणि त्यांचे आवाज काढणा-या बटणांसहीत असणारी संगीतमय पुस्तके तिथे होती. पान उलगडता, उलगडता त्यात वर्णिलेली दृश्यवर्णने, प्रसंग त्रिमितीत साकार करणारी कारागिरीमय पुस्तके होती. फार काय आज तीचा जो धडा चुकला होता त्याची भुमितीमधली प्रमेये सहज, सोप्पी समजावून देणारे पुस्तक तीला सापडले होते.
“मी परत ईथे आले तर चालेल.” नलीने भीत भीत विचारले.
“अरेरे! गरिब बिच्चारी छळ सोसणारी पोर.” परांजपे बाईंनी क्षणाचाही विलंब न लावता तीला परवानगी देऊन टाकली. वाघ्याकाका नलीला घेऊन निघेपर्यंत बाईंना बंडयाची आठवण झाली.
“जरा पहा या मुलाचे काय करायचे ते वाघ्याकाका. याचे रंगवलय नाही आहे. तुम्हीच सांगा नियमांबाहेर जाऊन मी तरी कशी त्याला पुस्तके देऊ.”
“ओहोहो!” ओशाळवाणेपणे हसत वाघ्याकाका बोलले, “आजकाल अधीमधी कधी ही स्मरणशक्ति अशी दगा देऊन जाते बघा. आर्या पशुमित्रांनी त्याचे रंगवलय मणी माझ्याकडे आधी देऊन ठेवले होते. त्याला द्यायचे विसरूनच गेलो साफ. वयाचा परिणाम!” आणि त्यांनी पटकन जीभ चावली. स्वतःच्याच तोंडाने स्वतःचीच कबुली. त्यांनी स्वतःचे खिसे चाचपायला सुरूवात केली. असे करता त्यांनी स्वतःच्या अख्ख्या शरीराची तपासणी सुरू केली.
“मला वाटतं माझ्या निळया डगल्याच्या खिशात राहिले. अरेरे! बंडया बुवा नाराज नका होऊ माझ्यावर. उद्या सकाळी नक्की तुला तुझ्या घरी आणून देतो बघ.”
बंडयाने गुमान मान डोलवली. वाघ्याकाका, नली गेले. परांजपे बाईंनी बंडयाकडे सहानुभूतीपुर्वक पाहिले.
“बंडया तुझ्या मित्रांचे आटोपेपर्यंत तू इथे बसू शकतोस बाई. पुढच्या खेपेला तुझे रंगवलय आणलेस ना की मी किनई अगदी स्वतः जातीने तुला सर्वोत्तम पुस्तके काढून देईन.” बंडयाला त्यांच्या मानभावीपणाचा राग आला. नली अमुदित दाखलही झाली नाहीय. तीला खुश्शाल पुस्तक घरी नेऊ दिले आणि त्याला पुस्तके बघायलाही देत नाहीयत. तो आशाळभूतपणे त्या पुस्तकांकडे पाहत राहीला. गुंडीने चार, पाच पुस्तके ईकडची तिकडे केली. ती कंटाळली आणि उठली. रानडुक्करे निरक्षर असतात.
“बाई माझे आटोपले. मी बंडयाला घेऊन जाते.” तीने पटकन परांजपे बाईंचा निरोप घेतला. एक नजर पंडीकडे टाकली. पुस्तके जिच्यासाठी प्राणवायू आहेत, ती हाकलल्याशिवाय तिथून बाहेर पडेल हे शक्य नव्हते. बंडयाच्या खांद्याभोवती हात टाकून गुंडी म्हणाली, “चल दोस्त.” तीच्या असल्या पुरूषी वागण्याकडे परांजपे बाईंनी नापसंतीचा एक तीव्र कटाक्ष टाकला. त्यांची पर्वा न करता दोस्तांची जोडगोळी बसबाहेर पडली. रस्त्यावर आली.
“गुंडी, हे रंगवलय कशाला हवे असते?” बंडयाला गुंडीकडून फारशा व्यवस्थित उत्तराची अपेक्षा नव्हती. ज्ञानसाधनासाठी ती एक फारसे चांगले साधन नव्हती. पंडीने त्याच्या सगळया शंका व्यवस्थित फेडल्या असत्या.
“काय माहित?” नेहमीचे बेपर्वा उत्तर आले. “ते लोक सांगतात म्हणून आम्ही ते घालतो. पंडी म्हणते त्याच्यामुळे आपल्याला आपल्यासारखे लोक, शत्रू आणि मित्र ओळखता येतात. ज्याचा रंगमण्यांचा क्रम आपल्या सारखा असतो ते मित्र आणि नसतो ते शत्रू.”
“मग तुझा आणि पंडीचा कुठे सारखा आहे. तुझा पहिला मणी लाल आहे आणि पंडीचा निळा. उलट वांडाचा पहिला मणी लाल आहे. त्याच्याशी तू नेहमी भांडत असतेस.” बंडयाने रंगवलय प्रकाराचे बरेच निरीक्षण केलेले दिसत होते. ते एकूण सात रंगाचे मणी होते. म्हणजे त्यांचे वेगवेगळे क्रम करून पाच हजारच्या वर क्रमवारी बनणार असती. परवलीचासाठी असली क्रमवारीची गणिते करण्यात बंडया पटाईत झाला होता.
“ऊँ! मग तसे नसेल. तू कशाला एवढी फिकीर करतोस. तुला उद्या सकाळी वागडे आज्या आणून देणार आहे ना रंगवलयाचे मणी.”
“हो, पण मी क्रम काय ठरवू? तुझा ठेवू कि पंडीचा?”
गुंडीने त्याच्याकडे ती नेहमीची “अडाणी रे अडाणी” वाली नजर टाकली. याचसाठी तीला कसली शंका, आगाऊ सावधगिरी, सूचना वगैरे काही विचारायचे बंडयाच्या मानी स्वभावाला अतिशय कठीण जात असे. मग त्याचा आज उडाला तसा फज्जा उडत असे.
“माझा आणि पंडीचा कशाला हवाय तुला? तुझा तू ठरव ना.” त्याची किव करत गुंडीने म्हटले. “त्याच्यावरून आपला स्वभाव, कल, आवड, निवड त्यांना कळते आणि तशा ते आपल्याला वस्तू वगैरे देतात. सरलकाका मला एकदा असं म्हणाला होता.”
बंडया मनोमन तीच्यावर चांगला उखडला. हेच तर मगाशी तो विचारत होता ना? सरलकाकाचा विषय निघाला त्यावरून त्याला आठवले.
सरलकाकाने त्याला पाच हारितीपतीच्या मोहरा खर्चाला दिल्या होत्या. त्या कशा खर्च कराव्यात त्याला ठरवता येत नव्हते. दाजी किराणावाला असल्या मोहोरा रोजच्या रूपयां, नाण्यांऐवजी चालवून घेणार नाही. त्यात एक चॉकलेटची मोठी वडी येणार नाही. तर त्यांचा काय उपयोग? दिक्षित कुटुंबातल्या गुंडी, पंडीला त्यांचा उपयोग चांगला माहीत असायला हवा. गेले काही दिवस हे गुपित कोणाला सांगावे त्याला ठरविता येत नव्हते. गुंडीला नाहीच नाही. त्याने ठरवले.
“चल मी तुला आईस्क्रिम देते. त्या विद्याधरकडे सिताफळाची कुल्फि मस्त मिळते.” गुंडीने त्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठया आईस्क्रिम केंद्राकडे वळवले.
“नैसर्गिक शुद्ध आईस्क्रिम मिळण्याचे एकमेव दुकान” अशी पाटी त्यांनी लावलेली. तीच्यावर कोप-यात “विदयाधर यांचे” कडे बंडयाचे यापूर्वी कधी लक्ष गेले नव्हते. आईला सुट्टी असली कि तिकडे ती दोघे येत. बंडयाने आपली माहिती पुरवली, “तिथे डाळींबाचा फालुदा पण मस्त मिळतो.”
“चालेल. तुला आवडतो तर आपण फालुदा खावूया.” गुंडीचे डोळे येऊ घातलेल्या रसाळ मेजवानीसाठी चकाकले होते. फालुदा बराच महाग होता. गुंडीचा चेहरा जरा पडला. तीने खिशातुन एका बाजूला पैसे काढून मोजले. तीच्या गणितात कच्च्या डोक्याने काही हिशोब केला आणि ऑर्डर दिली, “एक फालूदा डाळींबाचा आणि एक लिंबू सरबत.”
“लिंबू सरबत कोणासाठी?” बंडयाने खवचटपणे विचारले.
“माझ्यासाठी.”
“का? आपण दोघेही फालुदा घेऊया.” बंडयाने मुद्दाम तीला टोचले.
“अं. मला डाळींब आवडत नाही.” ती मऊ आवाजात म्हणाली.
“मग तुला कुल्फि घे ना सिताफळाची.” तीच्याकडे पैसे कमी आहेत याचा अंदाज बंडयाला आला होता. ती नेहमीच पैशाच्या चणचणीत असे. तीच्याकडे सहसा मोठया नोटा नसत. बव्हंशी नाणी असत. चिल्लर खुर्दा. खर्चाला मात्र तीचा हात आखडता नसे. तशी ती फार उदार होती. धुंडीने जर हलवायांच्या दुकानातल्या, रस्त्यावरल्या गाडीवाल्यांकडे, घसीटाराम कराचीवाल्याकडे काही वेगळया चवी व पदार्थ आयुष्यात पहिल्यांदा चाखले असतील तर गुंडीच्या मेहेरबानीमुळे. याऊलट द्वाड चंटी. मिठेलाल प्यारेमोहनच्या दुकानात तीने एकटीने सर्वांसमोर बदामी हलवा घेऊन खाल्ला होता. तीचे बगलबच्चे तंटा, कंटाला सुद्धा हलवा फार चिकट आहे रे, तुकडा पडत नाहीये, असे सांगून अजिबात वाटणी न करता खाल्ला होता.
“नको, नको.” गुंडी अवघडत म्हणाली.
“लवकर सांगा जरा, नक्की काय ते.” सरबराईदाराने आढयतेने मुलांना फर्मावले.
“आपण दोन सीताफळाच्या कुल्फ्या घेऊ. तेवढे जमेल ना?” बंडयाने तीची फार परीक्षा न घेता तोड काढली. याचा परिणाम उलटा झाला.
“तुमच्याकडे किती पैसे आहेत तेवढे आधी गल्ल्यावर जमा करा, बिल होणार तेवढे.” सरबराईदाराने त्यांना तुच्छतेने दरडावले. गुंडीचा असा अपमान व्हावा अशी बंडयाची इच्छा नव्हती.
“गुंडी आपण जाऊ या.” बंडया उठत म्हणाला. फेकून मारायला त्याच्या खिशात देखिल पैसे नव्हते. होत्या फक्त मोहरा.
गुंडीने त्रासिक मुद्रेने पाहिले. मग सरबराईदाराकडे रागाने. ती आता त्याला एखादा ठोसा मारून देते की काय, अशी भीती बंडयाला वाटली. एका लहान मुलीच्या मर्यांदांची तीला पुरेशी जाणीव असावी. तसे काही न करता फक्त मुठी आवळून ती दुकानाबाहेर पडली. सरबराईदार अवाक होऊन दोघांकडे पाहत राहिला. दोन चिल्लर पिल्लर त्याला असा सणसणीत टोला हाणतील, त्याला अपेक्षा नव्हती. नकळत त्याने एक कटाक्ष गल्ल्यावरल्या मालकाकडे टाकला. दारापलीकडे गेलेल्या नाराज गि-हाईकांवरून तिथे बसलेल्या मालकाने आपल्या उद्धट नोकराकडे एक तीव्र कटाक्ष फेकला. हुँ! आजकालची ही कार्टी आईबापांच्या लाडाने फारच शेफारून गेलीत. ईवलासा जीव न त्याचा मानपान केवढा. मालकापासून चेह-यावरल्या आठया लपवून सरबराईदार दुस-या गि-हाईकांकडे वळला.
बंडया मनोमन चांगलाच खजिल झाला होता. एवढया मोठया मनाने ती आपल्याला फालुदा खिलावायला निघालेली, तर आपण तीच्यावर असला अपमान ओढवला. हां, वागते कधी कधी ती आडमुठेपणाने, पण मुद्दाम तर नाही ना. तीची भरपाई नेमकी कशी करावी त्याला कळेना, “गुंडी...” त्याने साद घातली.
“बंडया,” ती विचारांतून भानावर आली, “चल आपण गोळेवाल्याकडे कालाखट्टा खावूया.” तीने झाले गेले विसरून जाऊया अशा पद्धतीने म्हटले.
“मला एक गंमत दाखवायची होती.” बंडया कुजबुजला.
गुंडीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितले. तीची उत्सुकता चाळवलेली दिसली. बंडया खिशात हात घालून नाण्यांशी चाळा करत होता. त्यातले एक नाणे बाहेर काढून तीच्या हातात ठेवत, त्याने तीची मुठ बंद केली, “गुपचुप बघ.”
गुंडीने बंद मुठीत काय असेल स्पर्शावरून अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. मग मुठ डोळयांपाशी आणून किलीकिली करून आत काय असेल पाहायचा प्रयत्न केला. हळूहळू मुठ एवढी उघडली कि बंडयाला मोहोर स्पष्ट दिसली. तोच तीने मुठ एकदम गच्च आवळली व दुस-या मुठीने बंद करून घेतली.
“तुला ही कुठून मिळाली?” ती कुजबुजली. तीच्या आवाजातला थरार लपत नव्हता. बंडयाला नेमके काय सांगावे कळेना. त्याचा गोंधळ उडाला.
“सरलकाकाने दिली.”
“त्याला कुठून मिळाली?”
“त्याच्याकडे असतात.” एवढेच मोघम बोलून बंडया गप्प बसला.
गुंडीने थोडा विचार केला, “तु याचे काय करणार?”
“मी काय करणार? तूच ठरव.”
“आपण ही खर्च करूया का?”
“हो. खर्च करायला तर दिल्यात.”
“दिल्यात म्हणजे अजून आहेत? किती?” गुंडीचे डोळे नुसते लखलखत होते. मोहोरांसारखे.
“पाच.”
गुंडी बंडयाचा हात धरून तरातरा निघाली. ते पुन्हा विद्याधरांच्या आईस्क्रिम केंद्रावर आले होते. गुंडीला त्या सरबराईदाराचा वचपा काढायचा असावा. असे बंडयाला वाटले. ती तडक त्याला घेऊन गल्ल्यावरल्या मालकाकडे गेली.साबरी दिक्षितांच्या मायावी जगात आपले स्वागत असो. जादू आणि चमत्कार या जगातून संपलेले नाहीत. साहसवीरांच्या अदभुत कथा आजही घडताहेत. शोधा म्हणजे सापडेल. वाचा म्हणजे समजेल.
* अलख निरंजन. *साबरी दिक्षितांच्या मायावी जगात आपले स्वागत असो. जादू आणि चमत्कार या जगातून संपलेले नाहीत. साहसवीरांच्या अदभुत कथा आजही घडताहेत. शोधा म्हणजे सापडेल. वाचा म्हणजे समजेल.
* अलख निरंजन. *

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users