तो

Submitted by सचिन पगारे on 14 August, 2016 - 13:17

परिस्तिथीने गांजलेला तो आपला लंगडा पाय फरफटत धुळीने माखलेल्या रस्त्याने चालला होता. पोटात भुकेने आगडोंब उसळला होता.तहानेने घसा कोरडा पडला होता. धुळीने कपडे माखले होते.पिंजारलेले केस, घाणेरडा अवतार त्याला स्वतःचीच घृणा येऊ लागली.

जरी तो भिकारी असला तरी स्वच्छ राहणं त्याला मनापासून आवडायचे.दादरला एका मंदिराच्या इथे बसून तो भीक मागायचा चांगली कमाई व्हायची. त्याला बालपण असे आठ्वत नव्हते. एका दुकानाच्या फळीवर त्याची आई किंवा बाप त्याला सोडून गेले. तेव्हा ह्या मंदिराच्या बाहेर भीक मागणाऱ्या राधा भिकारणीने त्याचा सांभाळ केला. त्यात ह्याचा एक पाय पोलियोने बाद झालेला त्याचा वापर राधा भिकारणीने करून चांगलाच पैसा केला. जसे समजू लागले तश्या त्याच्या आठवणी ह्या फक्त भीक मागण्याशीच संबंधित होत्या.भीक मागून जगण्याची सवय त्याला आता झाली होती. इतर भिकार्यांप्रमाणे चित्रविचित्र हातवारे करून भीक मागणे त्याला आवडत नसे. त्याऐवजी देव नामाचा जप करत तो बसत असे. समोरच्या गोधडीवर लोक आपोआप पैसे टाकत.

भिकारी असंला, परिस्थितीने गांजलेला असला तरी त्याची देवावरची श्रद्धा अफाट होती.सकाळी सारी आन्हिक आवरली की तो देवाच्या मूर्ती पुढे तासभर ध्यान लावून बसे. राधा भिकारीण त्याच्या ह्या सवयींवर जाम वैतागायची. हा तासभर ध्यान लावून बसतो त्यामुळे तासाभराचा धंदा खराब होतो असे तिचे म्हणणे असे. कधीकधी तिचा राग अनावर झाला की ती वहाणेचा असा काही रट्टा ह्याच्या पाठी घाले की तो ध्यान वैगरे विसरून जाई त्याचे ध्यान फक्त पाठीच्या दुखण्यावरच केंद्रित होई.नंतर राधा भिकारीण गेली नि तो ध्यान लावायला मोकळा झाला.एकदा परेलला एक बकरे बाबाचे प्रवचन होते .त्याने हे ऐकले नि त्याच्या अंगात अध्यात्माची गोड शिरशिरी आली तो तसाच उठला टॅक्सि पकडली आणि परेलला गेला .

बकरे बाबा यायला तासाभराचा अवधी होता तेवढ्या वेळात त्याने त्याची गोधडी जमिनीवर अंथरली नि देवाचे स्मरण करत बसला थोड्याच वेळा त बरीचशी चिल्लर जमा झाली. ती घेऊन शेजारच्या हॉटेलात जाऊन त्याने सुग्रास जेवणावर ताव मारला व स्पेशल कॉफी मागवली. त्याच्या बाजूच्याच टेबलवर मघाशी त्याला रुपयाची भीक टाकणारा व्यक्ती कटिंग चहा आणि अर्धा प्लेट कांदाभजी खात बसला होता ह्याची ऑर्डर नि स्पेशल कॉफीची ऑर्डर बघून उरलेला भजा तसाच ताटात टाकून कटिंग चहाचा घोट घेत तो लगबगीने बाहेर निघाला . ह्याच्या चेहर्यावर हसू फुलले.असे प्रसंग वारंवार येत ह्याला रोज रुपयाची भीक देणारा एक जण बसने लटकून प्रवास करत होता तेव्हा टॅक्सित बसलेल्या ह्याला पाहून त्याचा हात सटकता सटकता राहिला होता. तेव्हाही ह्याच्या चेहऱ्यावर असेच स्मित दाटून आले होते.

बकरे महाराजांजे प्रवचन सुरू झाले. तोही भक्तिभावाने प्रवचन ऐकू लागला.रसाळवाणीने आणि कमावलेल्या आवाजाने बकरे महाराज श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होते.हा तर अगदी मंत्रमुग्ध झाला होता. महाराज म्हणाले," अरे, एका जागी बसून देव भेटत नाही. त्यासाठी परिभ्रमण करावे लागते, नवे नवे मुलुख बघावे लागतात, तेव्हा कुठे देव भेटतो. साधू बनून लोक उगचग नाही हिमालयात जात.देव भेटण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात कष्ट". महाराजांच्या ओघवत्या वाणीने तो मंत्रमुगध झाला. आवेशाने उभा राहत म्हणाला, 'मी ,करेल परिभ्रमण भेटेल देवाला.तसाच तो तडक तेथून निघाला, ओला कॅब बुक केली नि दादरला ज्या झोपडीत राहायचा तेथे आला. आपलली ब्याग त्याने भरली देवाच्या शोधार्थ तो निघाला.

सार आयुष्य मुंबईत गेलं तरी त्याने सार्वजनिक वाहनातून प्रवास असा केला नव्हता त्याला फिरण्याची मुळात आवड नव्हती त्यात पाय अधू त्यामुळे तो आपला दादर हा भाग सोडून सहसा कुठे जात नसे. आरामात उठायचे देव पूजा करायची, भीक जमली की चांगले चुंगले कपडे घ्यायचे,चमचमीत खायचे, एसी ओला कॅब नाहीतर उबेरमधून फिरायचे नाही तर आहेच आपली काळीपिली टॅक्सी. असे त्याचे आयुष्य मजेत चालले होते. भीक मागताना तो स्पेशल कपडे घालत असे.इतरवेळी त्याचे कपडे पाहून त्याला कोणी भिकारी म्हंटले नसते.त्याच्याकडे एक महागडा मोबाईल हि होता पण तो धंद्याच्या टाईमला चुकूनही बाहेर काढत नसे. तो स्टेशनवर आला त्याने नाशिकला जाण्याचे ठरवले. तिकीट काढले नि तो फ्लॅट क्रमांक एक वर येऊन दाखल झाला.

स्टेशनवर तुंबळ गर्दी झाली होती. दहा मिनिटे झाली तरी गाडीचा पत्ता नव्हता तेवढ्या माइकवरून मंजुळ आवाजात उद्घोषणा झाली फ्लॅट क्रमांक एकवार येणारी गाडी हि फ्लॅट क्रमांक पाच वर येत आहे. स्टेशनवर लोकांचा गोंधळ सुरू झाला जो तो फलाट क्रमांक पाच कडे जाऊ लागला. फलाट क्रमांक पाचला जोडणारा जो पूल होता त्याच्यावर माणसांची झुंबड उडाली जो तो घाई करू लागला. ह्या गडबडीत तोही ब्रिज चढत होता लोकांचे धक्के खाऊन खाऊन बेजार होत, दोनदा पडण्यापासून वाचत तो कसाबसा फलाट क्रमांक पाचवर घामाघूम अवस्थेत जाऊन पोहोचला. एक धिप्पाड गाड्याच्या ब्यागेचा फटका त्याच्या तोंडावर लागला तर एक म्हातारबुवांची काठी त्याच्या निकामी पायावर संकावून बसली. देव भेटणे दूर पण त्याला देव जरूर आठवला पंधरा मिनिटे झाली ट्रेनचा पत्ता नव्हता. गर्दी क्षणाक्षणाला वाढत होती.साऱ्या फलाटावर माणसाचा महासागरच जणू अवतारलंय असे त्याला वाटले होते.

मुंबईतला असल्याने गर्दी त्याला नवी नव्हती पण तो त्या गर्दीचा भाग कधीच झाला नव्हता. आपली झोपडी नि भीक मागायचा कोपरा ह्या शिवाय त्याला जग नव्हते. पण देवाच्या भेटीच्या प्रचंड ओढीने नि बकरे महाराजांच्या प्रवचनाच्या प्रभावित होऊन तो देव शोधायला परिभ्रमण करायला निघाला होता. त्याला कोणीच मित्र नव्हते त्यामुळे तो स्वतःशीच मनात बोलत राही.इतर भिकाऱ्यात मिसळणे त्याला आवडत नसे. भिकारी त्यांचा गलिच्छ अवतार त्याला अजिबात आवडत नसे तो मनात बोलू लागला, "मला देव भेटणारच. मी देवासाठी परिभ्रमण करायला बकरे महाराजांच्या प्रवचनाने प्रभावित होऊन चाललो आहे' मनाशी त्याचा वार्तालाप सुरू असतानाच रेल्वेवरच्या माइकमधून मंजुळ आवाजातली पण याच्या अंगावर काटा आणणारी उद्घोषणा झाली. फलाट क्रमांक पाच वर येणारी कसारा लोकल काही तांत्रिक कारणाने प्लॅटफॉर्मनंबर एक वर येत आहे, प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. त्याला दिलगीर ऐवजी खुश आहोत अशी घोषणा आहे असे वाटू लागले. लोक शिव्या घालत फलाट क्रमांक एकच्या दिशेने पळू लागली. तोही हताश होऊन उठला नि लोकांच्या लोंढ्याबरोबर धक्के बुक्के खात फलाट क्रमांक एक वर पोहोचला. फलाटावर येताच त्याने तिथेच खाली बसकण मारली. ह्या वेळी मस्त जुन्या चित्रपटातील गाणी एकत बियर पीत मस्तपैकी झोपडीत बसलो असतो असा त्याच्या मनात विचार आला. पण झटक्यात त्याने तो विचार मनातून काढून टाकला. देव भेटण्यासाठी कष्ट करावेच लागतात हे महाराजांचे वाक्य त्याच्या कानी घुमू लागले. त्याच्यात आत्मविश्वास आला. तो उठून उभा राहिला. त्याच्या नजरेत एकप्रकारचा करारीपणा आला. तोच उद्घोषणेचा माईक खरखरला पुंन्हा उद्घोषणा होणार हे कळल्यामुळे त्याचा धीर खचला नजरेतला करारीपणा जाऊन तो पुंन्हा खाली बसला. तोच उद्घोषणा झाली गाडी थोड्याच वेळात फलाटावर येणार आहे असे सांगण्यात आले ते एकूण त्याचा जीव भांड्यात पडला .

जशी गाडी फलाटावर आली तास लोकांचा लोंढा जो उसळला, जी हातघाई झाली त्या तुंबळ हातघाईत आपण कसे गाडीत आलो तेच त्याला आठवेना.त्याने एक कोपरा धरला समोरच एक दांडगोबा त्याला चिरडत होता . दांडगोबाचे कोपर ह्याच्या खांद्यात रुतून रुतून एक प्रकारचा बधिरपणा त्याच्या खांद्याला आला. गाडीत शिरून आत मस्तपैकी बसून देव नामाचे स्मरण करत प्रवास करू अशी त्याची अपेक्षा होती ती अगदीच फोल ठरली. प्रवासाला निघताना केलेला इनशर्ट आता बाहेर आला होता एक दोन बटनही तुटली होती. ह्या गोंधळात त्याने त्याची ब्याग मात्र गच्च धरून ठेवली होती. अरे बापरे हा असा प्रवास हे लोक रोज कसे करतात असा त्याला प्रश्न पडला.पुढच्या स्टेशनला अजून गर्दी वाढली 2 माणसे उतरली तर 20 माणसे चढली. त्याला मुंडीही इकडे तिकडे फिरवत येईना हात पाय फिरवायचा तर प्रश्नच नव्हता. तेवढ्यात बाजूचा काटकुळा माणूस त्याच्यावर खेकसला, 'ये तुम्हारा ब्याग लगता है उपर रख दो'. ब्याग वर ठेवायला द्यावी की नाही ह्या संभ्रमात तो असतानाच समोरच्याचे खेकसण्याचे प्रमाण वाढले तसे त्याने त्याची ब्याग बाजूवाल्याकडे दिली ती पास होऊन शेवटी वरच्या रॅकवरस्थिरावली. अनेक लोकांच्या ब्यागा तिथे होत्या. आपण चांगल्या कामासाठी चाललोय आपले चांगलेच होणार अशी त्याची श्रद्धा होती.

गाडी कल्याण ला बऱ्यापैकी खाली झाली त्याला बसायला ही एक जागा सापडली. मस्तपैकी खिडकीच्या शेजारची जागा. बाहेरचा वर अंगाला झोंबू लागला नि तो देवनाम मुखी घेऊन नामस्मरण करू लागला.तशातच त्याला झोप लागली. स्वप्नात खुद्द देवाने त्याला दर्शन दिले. पुष्पक विमानात बसवून स्वर्ग लोक फिरवून आणले. स्वर्गाचे विलोभनीय रूप त्या ला दिसू लागले. 'धन्य आहे मी मला स्वर्ग दिसला, देवाचे दर्शन झाले. धन्य आहे मी धन्य आहे मी' असे तो झोपेतच मोठमोठ्याने पुटपुटू लागला. त्याच्या चेहऱ्यावर झोपेतच अध्यात्माचे तेज आले. त्याने डोळे खोलले गाडीत आता मोजून दहा ते बारा लोक होते. सांसारिक जीवनासाठी हे शूद्र मानव किती त्रास भोगतात असा विचार त्याने केला नि आपल्या अध्यात्मिक तेज लाभलेल्या दृष्टीने सर्वांवर हसतमुख नजर फिरवली.पण ही दृष्टी रॅककडे जाताच त्याचे डोळे नेहमीपेक्षा दुपटीने मोठे झाले. चेहऱ्यावरचे अध्यात्मिक भाव जाऊन भेदरल्याचे भाव आले. वरती त्याची ब्याग दिसत नव्हती.तो आरडा ओरड करू लागला माझी ब्याग चोरीला गेली म्हणून रडू लागला. एक सहप्रवासी म्हणाला, 'अरे, भाऊ प्रवासात आपल्या सामानाकडे लक्ष द्यायचं असत. चोर लोक गर्दीचा फायदा घेतात नि ब्यागा, पाकीट लांबवतात.आता तुम्ही पोलिसांकडे तक्रार करूनही काही फायदा नाही, देव तुमच्यापाठीशी असेल तरच तुम्हाला तुमची ब्याग भेटेल. हा हताश होऊन खाली बसला. तोच त्याला समोरच्या बाकड्याखाली त्याची ब्याग दिसली. त्याने झपाट्याने ती ब्याग घेतली नि ओरडला देव माझ्या पाठीशी आहे माझी ब्याग मिळाली. सारेजण त्याचे कौतुक करू लागले प्रवासात गायब झालेल्या ब्यागा परत मिळत नाहीत पण ह्याला मात्र पाचच मिनटात ब्याग मिळाली होती. त्याने देवाचे आभार मानले डोळ्यात पुंन्हा अध्यात्माचे तेज आले. ब्याग बाजूला ठेवून डोळे मिटून देवाचे आभार मानले. पण ह्यावेळी तो सावध होता डोळे लगेचच उघडले.ब्याग मांडीवर घेतली तर त्याच्या ध्यानात आले की ब्याग फारच हलकी लागतेय.त्याने थरथरत्या हाताने ब्याग उघडली तर ब्याग पूर्ण रिकामी. देवाच्या कृपेने ब्याग तर मिळाली पण आतले कपडे, महागडा मोबाईल, पैसे सारे गायब झाले होते. तो पुंन्हा धाय मोकलून रडू लागला . अहो ब्याग तर मिळाली आता कशाला रडता एक म्हातारा उद्गारला . ह्याची कहाणी ऐकल्यावर सारे गपगार झाले.

तेव्हड्यात टिसी आला ह्याच्याकडचे तिकीट ब्यागेतल्या पाकिटात होते. ह्याने तासाला ब्याग हरवल्याचे सांगितले. तरीही टिसी ह्याच्या मानगुटीला धरून त्याच्याबरोबर खाली उतरला. ह्याच्या कडे काही पैसेही नाही आणि ह्याच्या कडे काही पैसेही नाही आणि उपजीविकेचा व्यवसाय भीक मागणे आहे हे ऐकल्यावर त्याचा ह्याच्यातील रस संपला. बाजूला हवालदार क्रिकेटची म्याच पाहत होता. भारत हरल्याने तो संतापाने नुसता पेटला होता. टीसीला त्याने विचारले का हो ह्याला का धरले. टीसी म्हणाला, "अहो विना तिकीट, त्यात खिशात दमडीही नाही, ह्यांना आत टाकून ह्यांच्याच जेवणाचा बंदोबस्त करा कोणी सांगितले एवढे". भारत हरल्याने संतापलेल्या हवालदाराने सारा राग ह्याच्यावर काढला. भारतीय फलंदाजांना जी फटकेबाजी जमली नव्हती ती त्याने ह्याच्यावर केली .
अर्ध्या तासाने फाटलेला शर्ट, सुजलेले गाल घेऊन खुरडत खुरडत तो तेथून निघाला. थोड्या अंतरावर त्याला एक मंदिर दिसले . त्याच्याबाहेर बसून त्याने भीक मागणे सुरु केले. तिकिटापुरते पैसे जमताच त्याने तिकीट काढून पुंन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला.

आज तो मस्तपैकी झोपडीत बसून बियर पीत होता. तेवढ्यात बाहेर रिक्षातून भोंगा लावून काही लोक फिरत होते. आपल्या शहरात प्रवचन संध्याकाळी चार वाजता गोल मैदानात या. ह्याने ते ऐकले नि बियरचा एक मोठा घोट घेऊन झोपडीचे दार बंद केले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तय

'बकरे' ह्या नावाच्या महाराजांचा तो भक्त असल्यानेच ट्रेन मध्ये कुणीतरी त्याला 'बकरा' बनविला असावा. Happy