बंडया - गुंडी ११

Submitted by Pritam19 on 14 August, 2016 - 07:40

सर्वतोभद्र यक्ष
मैदानात दुपारचा कडाडा जाणवत होता. मध्येच वा-याने झाडांच्या पानांची जोरदार सळसळ होई. त्या येणा-या झळाही गरमच असायच्या. बंडया एकटाच शिवाजी मैदानात बसून होता. वर्ग कधीच संपला. जो तो आपापल्या घरीही गेला. पंडी आणि गुंडी अर्धा तास त्याच्यापाशी थांबल्या होत्या. खेळून खेळून दमलेल्या, शिणलेल्या, तहानलेल्या आणि भुकेल्या. बंडयाचा एकटयाचा डबा तिघांना पुरण्यासारखा नव्हता.
गुंडीकडे सरलकाकाने बंडयासाठी वाट पाहायचा निरोप दिला होता. तो अजून उगवला नव्हता. सरलकाका गेला उडत, म्हणत त्या घरी जाऊया म्हणून बंडयाच्या मागे लागलेल्या. बंडयाचा सरलकाकावर ठाम विश्वास होता. तो येणार म्हणाला म्हणजे येणार. त्यासाठी अख्खा दिवसभर वाट पाहायची त्याची तयारी होती. म्हटले तर अनुभवही होता. त्याने दोघींना घरी पाठवून दिले. इथे जवळच आपल्या बाबांचे कार्यालय आहे. तिथे आपण मग जाऊ, असे सांगून त्याने दोघींची बोळवण केली होती. आता तो एकटा होता. अगदि एकटा. जाडयासाठी उघडयावर पडलेली आयती शिकार. त्या विचाराने बंडया थरारला. कुपी तर जाडयाला मिळाली होती. मग तो बंडयाला कशाला गाठणार होता? बंडयाला दोघी गेल्यावर फार काळ जीव मुठीत घेऊन वाट पाहावी लागली नाही. लगोलग सरलकाका आला. दोघींची त्याच्याशी थोडीशी चुकामुक झाली. बंडयाला चुटपुट लागली.
“अरे मी कधीचा त्या दोघी टळतील म्हणून दडून वाट बघत होतो.” सरलकाकाने खुलासा केला आणि बंडयाला त्याला खाऊ कि गिळू असे झाले. सरलकाकाने नेहमीच्या सफाईने त्याचा राग शांत केला. कुत्रेवाल्याला पैसे देणारी व्यक्ति शांतपणे निघून गेली.
“आता आपल्याला खूप महत्त्वाचे आणि गुप्त काम करायचेय. हे कोणालाच कळता कामा नये. तुझ्यासाठी साबरी गुरूकुलाचे सगळे सामान घेतले पाहिजे. त्यासाठी पैसे जमवायचेत.”
“पैसे. मी बाबांकडून घेऊ?”
“नको.”
“मग आईकडून?”
“नको. ते पैसे साबरी जगात चालत नाहीत. आपल्याला सोन्या नाहीतर चांदीच्या मोहरा हव्यात.”
“बापरे. त्या आपल्याला कोण देणार?”
“यक्ष देणार. त्यांच्याकडे सोन्या चांदीचा, हिरे, मोती, रत्नांचा हवा तेवढा खजिना असतो.”
“पण ते आपल्याला कशाला देणार?”
“ते, ते झाडांना धरून.. अं. म्हणजे झाडावर राहतात असं समज. आपण त्यांना झाड तोडायची धमकी दिली की ते बेघर होणार. तेव्हा झाड तोडू नये म्हणून ते आपल्याला भरपूर बक्षिसे देतात. मागशील ते.”
“पण झाडं तोडायची नसतात ना?”
“आपण खरोखर कुठे तोडणार आहोत. नुसती धमकी देणार आहोत. “
आता बंडयाने सरलकाकाला पुन्हा एकदा नीट न्याहाळून घेतले. तो खाकी रंगाच्या गणवेषवजा कपडयात होता. खाकी डगला आणि खाकी चड्डी, खाकी टोपी देखिल होती आणि खांदयावरच्या बोचक्यात लांब लांब दांडयाचे काही होते. बहुतेक कु-हाड. पूर्ण जय्यत्त तयारीनिश्शी आला होता तो. बंडयाने एक नजर आसपास टाकून चांगदुष्टाची रिक्क्षा कुठे दिसतेय का पाहीले.
“आपण आता नक्षत्रवनात जायचं?” बंडयाने उत्साहाने विचारले. त्याने लावलेल्या झाडांचे काय झाले बघायला त्याला आवडले असते.
“तिथे कशाला, झाड तर इथेच आहे.”
“इथ्थे?” बंडयाच्या शब्दात अविश्वास मावत नव्हता. इथे शहराच्या ऐन मध्यात. ईतक्या दाट वस्तीमध्ये. दिवसरात्र होणा-या गोंधळ गजबजाटात? आणि अजून ते कोणाला दिसले कसे नाहीत? बंडयाने मैदानाच्या कडेने लावलेल्या त्या वीस पंचवीस मोजक्याच उरलेल्या झाडांकडे पाहिले. जास्त करून गुलमोहर आणि सोनमोहराची झाडे होती. काही पाऊस पडल्यावर वा अंधारल्यावर पाने मिटून घेणारी जुनी अवाढव्य विलायती शिरीषाची झाडे. दुपारची त्यांच्याखालच्या दाट सावलीत काही माणसे झोपा काढत असलेली त्याला दिसली. यातले कुठले बरे झाड? त्याने नवल केले.”
“ते तिथे आहे ते, घसरगुंडीच्या जवळ.”
हि दुपार होती ते ठीक, संध्याकाळी तिथे मुलांची व त्यांच्या आयांची घे म्हणून गर्दी आणि दे दणादण मारामारी असणार असती.
“तुला कसे कळले?”
“कोकीळेच्या घरटयावरून.”
बंडयाला ब-याचश्या गोष्टी माहित नव्हत्या हे ठीक. पण ईतकाही येडा नव्हता की कोकीळा घरटे बांधत नाहीत, माहित नसावे. “त्या तर कावळयाच्या घरटयात अंडी घालतात. “
“यक्षाच्या झाडावर अंडी घातली तर त्यांची पिल्ले यक्ष सांभाळतात. फारच चांगली काळजी घेतात. ते असतात गायन वादनाचे शौकीन वेडे. त्यांच्यासाठी कोकीळ जरा वेळी अवेळी ताना घेतात. बस्! यक्ष खूष होतात. यक्षाच्या झाडावर या गाणा-या पक्षांची मैफिलच असते जणू. बुलबुल, मैना, नकला करणारे पोपट, कोतवाल. तर कावळे, टिटव्या आदी कर्कश्श आणि दुष्ट पक्ष्यांना पूर्ण मज्जाव.” बंडयाने समजले अशी मान हलवली.
“तू ते कसे शोधलेस?”
“मी? मी कशाला, आपला मंजु आहे ना.” आपला मंजु म्हटल्यावर बंडयाच्या डोक्यात पूर्ण प्रकाश पडला. ही सगळी अक्कल सरलकाकाची नाही, मंजुघोषाची असणार. ते दोघे त्या झाडापाशी पोहोचले. सरलकाकाने बंडयाला थोडया अंतरावर थांबवले. तिथून देखिल मंजुघोषाची सुरेल किलबिल बंडयाचे कान तृप्त करत होती. लुटीपूर्वी सावजाला पूर्णपणे बेसावध केले जात होते.
सरलकाकाने आता पिशवी खाली जमिनीवर टाकली आणि कु-हाड बाहेर काढली. एखादा घाव त्याने घातलाही असेल नसेल, एक लहानसा बुटका, जाडा, लांब केसांचा न् तुळतुळीत चेह-याचा माणूस धावत झाडामागून आला आणि त्याच्याशी वाद घालू लागला. तसे इतर बघे देखिल कसली वादावादी म्हणून पाहायला जमले. सरलकाकाने पिशवीमधून कसली कसली कागदपत्रे आणि परवाने वगैरे काढले. त्यांना दाखवायला सुरूवात केली. सरकारी काम आहे, सरकारी माणूस आहे आणि सरकारी झाड आहे, म्हटल्यावर कोणाला काय साधणार,फायदा सुटणार? जो तो आपापल्या वाटेने चालू पडला. फक्त तो बुटका काही मागे हटायला तयार होईना. आधी तावातावाने भांडणारा तो आता रडत भेकत सरलकाकाच्या गयावया करू लागला.
छे! दयामाया बाळगली तर ती सरकारी माणसे कसली. आपल्या लहानपणापासून हे झाड वाढताना आपण पाहात आलो. आपले त्याचे अगदि जीवाचे लागेबांधे आहेत असे म्हणून तो रडू लागला. सरकारी माणसाला भावना नसतात. हे लक्षात आल्यावर सरकारी माणसावर चालू पडणारे हुकमी शस्त्र त्याने बाहेर काढले. त्याने रडणे बंद केले आणि शांतपणे खिशातून पाकिट काढून नोटा मोजण्यास सुरूवात केली. त्या त्याने सरकाकाच्या खिशात बळेबळे कोंबल्या. सरलकाकाने त्या परत बाहेर काढल्या आणि त्याला दिल्या. बंडयाला जवळ बोलावले.
“हया मुलाच्या साबरी गुरूकुलातील खर्चासाठी हजार सोन्याचे होन पाहिजेत. हारीतीपतीचे.” सरलकाकाने त्याला सांगून टाकले. तसा तो भयंकर खवळला. त्याच्या डोळयात जसे रक्त उतरून ते लाल झाले. त्याचे जाडे काळे ओठ किंचित विलग झाले. त्यातले भयानक सुळे बाहेर पडले. रागाने काही वेळ त्याला बोलताच येईना. नुस्तेच हातवारे करीत राहीला.
“तुम्ही माझी फसवणूक केलीत. झाड न तोडण्याच्या बदल्यात मी वचन दिले आहे ते मी पाळीन. पण माझी अट पुरी केल्यावर. ही यक्षराज हारीतीपती कुबेर महाराजांची संपत्ती आहे. कोणा सोम्यागोम्याला देता येणार नाही. या मुलाने आपली लायकी सिद्ध केली पाहिजे. माझ्या कूटप्रश्नाचे जर याने योग्य उत्तर दिले नाही, तर तुम्हा दोघांच्याही डोक्याची शंभर शकले होऊन पडतील. बोला अट मान्य आहे.” यक्षाचा गंभीर आवाज बंडयाचे काळीज चिरीत गेला.
“हो मान्य आहे.” सरलकाकाने बिनधास्त होयही म्हणून टाकले. बंडयाच्या छातीचे ठोके रेसर कारच्या ईंजिनाच्या वेगाने धडाडू लागले.
“तर मग मुला हो तय्यार.” यक्ष गरजला, “तुला गणपती आवडतो?”
बंडयाला विचार करायला देखिल संधी मिळाली नाही. त्याची मान नुसतीच हलली. बळी दयायला नेलेल्या जनावराप्रमाणे.
“मग सांग, षोडशोपचारे पूजा केली. पंचामृताची वाटी दिली, गणपतीला भारी आवडली, रस त्याने घेतले, तर शिल्लक काय उरते?”
पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर यांचे मिश्रण असते. हे आजीच्या कृपेने बंडयाला माहीत होते. त्यातल्या पाण्याचा सगळा भाग काढून घेतला तर उरणा-या चोथ्याला काय म्हणतात त्याला आठवेना. डोकं फुटायच्या भीतीने तो जाम घाबरून गेला. सरलकाका काही बोलेल या आशेने तो त्याच्याकडे पाहू लागला. त्याने बंडयाची नजर चुकविली. याचा अर्थ बंडयाला कळला. तशाही परिस्थितीत त्याला सरलकाकाचा जाम राग आला. खड्डयात गेल्या त्या हजार मोहरा. स्वतःबरोबर बंडयाचाही जीव पणाला लावायची काय गरज होती? यक्ष त्या दोघांच्या प्रतिक्रिया बारकाईने निरखित होताच.
“तुला पाहिजे तर तुझ्या छली, कपटी साथीदाराची मदत घेऊ शकतोस मुला.”
या क्षणाची वाट पाहात असल्यासारखी एकदम पांढरीशुभ्र फडफड त्यांच्या पुढयात झाली.
“मंजुघोष” बंडया चित्कारला.
“भरपूर उरले, बरे बाळ. आपल्या तिघांना पुरून उरेल हो. सांग एक उसळ, दोन भाज्या, तीन कोशिबीरी, चार चटण्या आणि पाच पक्वान्ने.”
बंडयाला कसलाच बोध झाला नाही. पण सरलकाकापेक्षाही त्याचा जास्त विश्वास मंजुघोषावर होता. तो चुकू शकणार नाही. त्याने उत्तर दिले. आणि डोके फुटायची वाट पाहू लागला. ते फुटले नाही. प्रथमच यक्षाच्या चेह-यावर हळूहळू हसू फुटत गेले. तो प्रसन्न हसला. एक हात वर करून तो उद्गारला, “तथास्तु.”
यक्ष झाडाच्या मागे फेरी मारून आला. तेव्हा त्याच्या हातात केळीचे एक मोठे पान होते. त्यात वर उल्लेख केलेले सारे खादयपदार्थ. ते त्याने बंडयाच्या हातात ठेवले. बंडयाने निमुट घेतले. चारोळीची पखरण केलेले श्रीखंड आणि केशराने रंगवलेल्या चंद्रकला. त्या सुग्रास सुमधुर वासांनी त्याची इतका वेळ दबली गेलेली भूक एकदम उफाळून वर आली.
“विद्वान सर्वत्र पूज्यते, न लभ्यंते अमोदिनी.” असे म्हणत यक्षाने मंजुघाषाला नमस्कार केला. मंजुघोषानेही सरलकाकाच्या खांदयावरून आपल्या पंखांनी त्याला नमस्कार केला.
“आपल्यासारख्या बुद्धिश्रेष्ठांच्या छत्रछायेत हा मुलगा नक्कीच उत्तम प्रकारची कार्ये करेल आणि जगाचे कल्याण करील अशी माझी खात्री आहे. या धनाचा त्याच्या विदयाभ्यासासाठी योग्य उपयोग करावा.” असे म्हणत त्याने एक मोठ्ठी थैली मंजुघोषाच्या चोचीत दिली. मंजुघोषाकडून ती सरलकाकाने घेतली. मग बंडयाकडे वळून यक्ष म्हणाला, “आयुष्मान भव.” लागोपाठ झाडापाठी जाऊन गायब झाला.
तो जाताच बंडयाने सभोवताली एक चोरटी नजर टाकली. आसपासची बहुतेक सारी माणसे दुपारच्या डुलक्या काढीत होती. त्या तिघांनी आनंदाने त्या केळीच्या पानावर पुख्खा झोडला. भरपेट खाणे झाल्यावरच बंडयाला शंका काढायचे सुचले. बंडयाच नव्हे सरलकाकाला सुद्धा कोडे आणि उत्तर समजले नव्हते. तोही ते जाणून घ्यायला उत्सुक होता. मंजुघोषाने त्यात काय मोठ्ठेसे, सोप्पे तर आहे, अशा भावात सांगून टाकले. ही जुन्या काळातली एक अंक मांडायची रित आहे.
“षोडोशोपचार म्हणजे सोळा आणि पंचामृत म्हणजे पाच, सोळा अधिक पाच किती?”
“एकवीस,” बंडया म्हणाला.
“म्हणजे गणपतीचे आवडते. हा त्याने दुजोरा दिला आणि त्यातून सहा रस, म्हणजे चवी काढल्या तर उरले किती? एकवीस वजा सहा?”
“पंधरा.”
“आता एक उसळ, दोन भाज्या, तीन कोशिंबीरी, चार चटण्या आणि पाच पक्वान्ने मिळून होतात किती?”
“पंधरा.” बंडया टाळया पिटत ओरडला.
सरलकाका मात्र करवदला, “नऊ रत्ने, पंच धातू आणि एक मणीपद्म म्हणायला तुला काय झालेले?”
“हुं,! हिर्या, मोत्यांनी का पोट भरते? आमच्या बाळाला किती भूक लागली होती, त्याचा काही विचार!”
“धन्य हो महाराज. सर्वतोभद्र यक्षाने तुम्हाला हात का जोडले ते आता मला कळले. असली निस्संगता आम्हा पामरांकडे कुठली?” सरलकाकाने मंजुघोषाला चिडवले.
आता केळयाचे पान चाटून पुसून लख्ख होते आहे, तोच झाडावरून एक घरटे येऊन खाली पडले आणि एक कोकीळ कर्कश्श आक्रोश करत घिरटया घालू लागली. बंडयाच्याने तो आक्रोश सहवेना.
“हा यक्ष किती दुष्ट आहे. आपल्यावरचा राग त्याने कोकिळेच्या घरटयावर काढला.” बंडयाही आक्रोश करू लागला, “अरेरे! आपण यक्षाला लुटले नसते तर त्याने या अंडयांना खाली ढकलून फोडले नसते.”
सरलकाकाने आणि मंजुघोषाने एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मग मंजुघोषाने बंडयाचे सांत्वन करण्यासाठी पुढाकार घेतला. “बंडया, तू व्यर्थ ज्याच्यासाठी शोक करू नयेस त्याच्यासाठी करतो आहेस. करावे तसे भरावे असा जगाचा नियम आहे. तू ज्या कोकिळेसाठी हा शोक करतोयस तीला मी ओळखतो. आतापावेतो तीने अशीच कावळयाची सत्तावन्न अंडी घरटयाखाली पाडून फोडली आहेत. आज ते दुःख काय असते त्याची उमज तीला पडेल. यक्षाला लुटण्याचा दोषही तू व्यर्थ आपल्या कपाळी घेतो आहेस. यक्ष हे संपत्तीचे मालक नव्हेत. ते संपत्तीचे केवळ रक्षक विश्वस्त आहेत. समाजाच्या कल्याणासाठी व योग्य गरजूंच्या मदतीसाठी त्यांनी आपणहून ही संपत्ती विनियोग केली पाहीजे. तसे न करता ते ती दडवून ठेवतात. म्हणजे खरे तर तेच समाजाचे दोषी आहेत. चोर आहेत. जे श्रीमंत पैशाचा वापर न करता तो कुजवत ठेवतात खरे दोषी ते आहेत. आपण आपलाच हक्क वसूल केला हो, बाळ.”
मंजुघोषाने बंडयाला बाळ बाळ म्हटले, याचा आता बंडयाला राग नाही आला. त्या बाळ म्हणण्यामागे किती खरीखुरी माया आहे, किती मोठे त्याग आहेत त्याला माहीत झाले होते. मंजुघोषाला निरोप देताना अलख म्हणायला तो विसरला नाही. सरलकाका त्याला घरापर्यंत सुखरूप पोहोचता करण्यासाठी आला.
आकाशात ढग दाटून आले होते. कोणत्याही क्षणी धुवाँधार पाऊस सुरू होणार असता. बंडयाला कोणत्याही परिस्थितीत यापुढे एकटे कुठे जायचे नाही, परत परत बजावून सरलकाकाने बंडयाचा निरोप घेतला. “अलख.”

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users