बंडया - गुंडी ८

Submitted by Pritam19 on 13 August, 2016 - 17:50

बंडयासाठी मोठ्ठंच काम सोडून गेली. ती रात्र गुंडीने झोपेत दवडली असेल, तर बंडयाने प्रत्येक हर संभव जुळणीने मंत्र बनवायच्या कारणी लावली. त्याच्या जुन्या शाळेच्या वहयांचा या जगात काहीतरी उपयोग झाला हे बघून त्याला नवल वाटले. सेंट कार सायकल स्कूलशी (बंडया मायकलचे नेहमी सायकल करी.) संबंधीत एखादया तरी गोष्टीचा त्याच्या आयुष्यात कधी काही उपयोग होईल हे पाच दिवसामागे त्याला कोणी सांगितले असते, तर त्याला त्याने वेडयात काढले असते. नितिनला तो वेडा मानतच होता. असो.
पुढचे चार दिवस एकामागून एक वहया हातात धरून तो सकाळी शाळेसाठी उभा असे व बस दिसली कि त्यातले जितके जुळवमंत्र वाचता येत, वापरून बघत असे. अहिभैरव, साबरी शाळाबसवाहक, त्याच्यावर काही फरक पडल्याचे बंडयाला दिसले नाही. एकूण जुळण्या काही कोटीमध्ये जाणार्या असत्या. ईतका धीर धरणे बंडयाला शक्य नव्हते. मंजुघोष, तो बुद्धीचा सागर यातून काही तोड काढू शकेल. मनोमन बंडयाने मंजुघोषाचे मोठेपण मान्य केले होते. पंडीने, गुंडीच्या अशाच एका अतितल्लख दिक्षित शाळा मैत्रीणीने, त्याच्यासाठी यावर तोडगा काढायला रमलशास्त्राचे एक पुस्तक पाठवून दिले होते. विचारा तुम्ही सांगतो आम्ही. सध्या वेळ घालवायला बंडया त्याचीच पारायणे करत होता. गंजिफांच्या पत्त्यावर आधारीत तो काहीतरी प्रकार होता. हे गंजिफा काय असते, कुठे मिळते हे बंडयाला ठाऊक नव्हते. हा सरलकाका तरी ईतके दिवस का लावत होता, कोणास ठाऊक!
भेटला एकदाचा सरलकाका बंडयाला. पुंडलिका भेटी जणू विठ्ठल आला. ईतकी वाट पाहायला लावून वीट आणला म्हणून त्याला विटेवर उभा करायची शिक्षा बंडयाने जरूर दिली असती. संत कार सायकलच्या विदयार्थ्याला विठ्ठल कुठला माहिती असायला! सरलकाकाने आल्या आल्या बंडयाच्या गळयात रूद्राक्षमाळ असल्याची खात्री करून घेतली. तशी झाली तेव्हा कुठे त्याला जरा हायसे वाटल्यासारखे दिसले. त्याचे डोळे सुजले आणि लाल झाले होते. गुंडीबरोबर भटकायचे सोडले तरी त्याची जागरणे तशीच चालू राहिलेली दिसत होती. त्याने बंडयाचे केस कुरवाळले आणि म्हटले, “बंडया त्या कुपीवाल्या जाडयापासून सावध रहा. तो कुठे दिसला तर त्याच्या नजरेस पडू नकोस. त्याच्यापासून लांब पळ. त्याच्या तावडीत सापडू नकोस.”
हँ! बंडयाच्या हुशारीची हीच का सरलकाकाने परीक्षा केली. या गोष्टी तर बंडयाने केव्हाच मनात पक्क्या करून टाकल्या होत्या. सरलकाकाच्या आवाजातली त्याच्याविषयीची काळजी त्याला जाणवली. सरलकाका जर त्याच्यापासून ईतके दिवस दूर होता तर त्याच्यासाठी काहीतरी करण्यासाठीच तो कुठेतरी धडपडत असणार होता. बंडयाचा रूसवा चटकन कुठच्या कुठे पळाला. बंडयाने आपली “परवलीचा”ची समस्या त्याला सांगितली. ती त्याला ठाऊक होती. सरलकाकाने बंडयाला सांगितले की जरी साबरी वर्गांना तो बसू शकला नसता तरी अमुदिंच्या वर्गांना जरूर बसू शकेल. “अदिक्षित मुले दिक्षितांची,” असा त्याचा विस्तार होता. सगळयाच दिक्षितांची मुले दिक्षा मिळायला पात्र ठरतात असे नाही. मग या वगळलेल्या मुलांसाठी सर्वसाधारण माणसांच्या जगातले व्यवहार शिकवणारी वेगळी शाळा होती. तिथे जादू, तंत्र, मंत्र तर नाही पण या लौकिक जगात उपजिवीका साधता येईल, असे शिक्षण दिले जात असे. कुलगुरू मंत्रप्रभुंच्या कार्यकालात तर दिक्षित विदयार्थीसुद्धा अमुदि वर्गात बसू लागले. त्यापुर्वीचे सर्व दिक्षित बहुधा उपजिविकेसाठी सिद्धवैद्याचाच धंदा करीत. उपजिविकेसाठी जादूचा वापर करायचा नाही शपथ आहे ना. पण आताशा अमुदिंबरोबर शिकून दिक्षित देखिल अनेक व्यवसाय करतात.
बंडयाला प्रश्न पडला. अदिक्षितांना साबरीविषयी कळू दयायचे नाही हे ठिक. पण आपले पोट भरण्यासाठी देखिल जादू वापरायची नाही? त्याने तर एका जादूच्या पोतडीची स्वप्ने बघितली होती. तीच्यातून आईस्क्रीम, चॉकलेट, बटाटेवडे, समोसे काढून मनमुराद खाल्ले होते. जादूने त्याच्या सगळया हाफ पॅन्टी फुल पॅन्ट करून टाकल्या होत्या. त्याची पेडलची सायकल मोटरसायकल बनवली होती. आणि काय, काय...
“फुर्र.” बंडयाच्या या अचानक आवाजाने सरलकाका दचकला आणि जरासा बिथरला.
“बंडया तू ज्या शपथा घेतल्यास त्यातली तुला एकही धड माहित नाही?”
“फुर्र “ नकारार्थी.
“मंजु म्हणतो ते बरोबर आहे तर. संस्कृत मंत्राऐवजी ज्याच्या त्याच्या मातृभाषेतून या शपथा दिल्या तर बरे.”
“फुर्र “ होकारार्थी.
“हां तर पहिली शपथ आहे साबरी विदयेचा साधक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, कोणत्याही फायदयासाठी, उपजिविकेसाठी वापर करणार नाही.”
“फुर्र.” निषेधार्थी.
“दुसरी शपथ आहे कोणा अदिक्षितासमोर साबरी विदयेचा उल्लेख व प्रयोग प्रदर्शनार्थी करणार नाही.”
“फुर्र.” पुढे अर्थी.
“तिसरी शपथ. काळया जादूच्या विरोधात साबरी साधकाने साबरी विदया वापरलीच पाहीजे.”
“फुर्र.” आश्चर्यार्थी.
“झाल्या. दिक्षेचा अर्ज भरतानाच घ्यायच्या शपथेचे हे तीन भाग आहेत.”
“सरलकाका शपथ मोडली तर काय होईल?”
सरलकाकाचे अंग शहारले, “फार भयंकर परिणाम होतील. ते फार कठोर शिक्षा देतात.”
“ते कोण? त्यांना कसे कळणार?”
“त्यांना कळते. आपोआप कळते, बंडयाचे हात हातात घेत सरलकाकाने आर्जविले, “बंडया, वचन दे. तू शपथ कधी मोडणार नाहीस.”
बंडयाने गुमान मान हलवली. खरेतर त्याच्यावर अणुबॉम्ब पडला होता आणि सारी सुखस्वप्ने बेचिराख झाली होती.
“काळी जादू काय असते?”
“काही दुष्ट लोक, स्वतःच्या फायदयासाठी, दुस-या लोकांना त्रास देतात, त्यांचा छळ करतात, त्यांना ठार मारतात. त्यासाठी ते जेव्हा जादूचा वापर करतात तेव्हा त्याला काळी जादू म्हणतात. आपण आपल्या वैयक्तिक फायदयासाठी जादू वापरतो तेव्हाही नकळत लोकांना त्याचा त्रास होतोच. जादूच्या पोतडीतून आलेले वडे कोणातरी टपरीवाल्याच्या गाडीवरून आलेले असतात. म्हणून आपल्याला स्वतःच्या फायदयासाठी जादू वापरायला मनाई आहे.”
बंडया आश्चर्याने थिजला. सरलकाकाला कसे कळले? त्याला पोतडीतून वडे खायचे होते. त्याचे विस्फारलेले डोळे बघितले आणि सरलकाका हसत हसत बोलला, “अरे माझीही शपथ घेण्यापूर्वी अशीच समजूत होती, जादूच्या थाळीतून लाडू खायला मिळणार. प्रत्येक लहान मुलाची अशीच समजूत असते. तुला वडे आवडतात, म्हणून वडे म्हटले. इतकेच.”
बंडयाने गपकन डोळे मिटून घेतले, वडे बिडे तर काही नाही उलट ही काळया जादूविरूद्ध लढाई फुकटची पदरात पडली. झक मारली आणि ही साबरी शाळा पत्करली. एका विचाराने त्याच्या पोटात गोळा उठला, “ते काळी जादूवाले लोक त्या कुपीवाल्या जाडयासारखे भयानक असतात का?”
सरलकाकाचा चेहरा एकदम कावरा बावरा झाला. तो बंडयाची नजर चुकवू लागला. बंडयाला वाईट वाटेल, दुःख होईल असे काही असले कि त्याची असे वागायची सवय बंडयाला माहित झाली होती. खरे उत्तर काय आहे ते जाणवून बंडयाच्या छातीची धडधड वाढली.
“जाऊ दे रे. तुला काही एवढयात कोणी लढाईला पाठवत नाही. येत्या गुरूपौर्णिमेपासून अमुदिचे वर्ग सुरू होतील. गुंडी बरोबर जा तू. तुला आवडतील ते. तिथे खूप धमाल असते. गुंडीला साबरी वर्गापेक्षा तेच जास्त हवे असतात. ती पंडी तुमची गटप्रमुख असेल. मस्त मुलगी आहे.”
“पंडी ! तीने मला एक पुस्तक पाठवलेय. परवलीचा शोधण्यासाठी.”
“पुस्तक ना, सरलकाका हसायला लागला, पुस्तकातच जगत असते ती. गेल्या जन्मी नक्की वाळवी असणार ती.”
“वाळवी?” बंडयाला काही बोध झाला नाही.
“अच्छा येतो मी. त्याने तुला गाठण्याआधी त्याला गाठला पाहिजे. अलख.” हसता हसता अनवधनाने सरलकाका बोलून गेला.
“कोणी?” बंडयाने विचारताच तो पुन्हा एकदा कावरा बावरा तोंड फिरवून चालू पडला आणि बंडयाला ते कळलेच.
“अलख.” बंडया मागून ओरडला. सरलकाकाने पाठमो-यानेच हात उंचावून त्याला अभिवादले आणि तो गेला. तो गेला तरी बंडया विचाराच्या नादात गर्क तिथेच उभा राहिला. तो ईतका गर्क होता कि शांताबाई भाजीच्या पिशव्या सांभाळत त्याच्यावर येऊन थडकल्या तरी त्याला कळले नाही.
“ए पोरा. दिसत नाही काय, आंधळा हैस कि काय? “ बंडया उत्तर न देताच घराच्या दिशेने चालू पडला.
बंडया माळयावर उसकटत होता. गुरूपौर्णिमा म्हणजे आषाढी पौर्णिमा इतपत मार्गदर्शन गुंडीने केले होते. यापुढे “अहा रे बुद्धू ईतके पण माहित नाय. “ म्हणत हसली. तेव्हा आषाढी पौर्णिमा म्हणजे कुठला दिवस हे विचारायच्या भानगडीत तो पडला नाही. अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रमातील सक्रीय कार्यकर्त्यांच्या घरात फक्त कॅलेंडरे होती. दिनदर्शिका वा पंचांगे सापडणे फार कठिण गोष्ट होती. बंडयाच्या खोलीत पेट्रोलपंपावरून ढापलेले मस्त मस्त मोटारगाडयांचे एक मस्त मस्त कॅलेंडर होते. आईबाबांच्या खोलीत पोहणा-या कमीतकमी कपडयातील तरूणींचे कॅलेंडर होते. दिवाणखान्यात वेगवेगळया फुलझाडांचे कॅलेंडर होते आणि स्वयंपाकखोलीत केळी सोलून खाणारा गोरीला, नारळ फोडणारा हत्ती, ऊस मोडणारा कोल्हा आदी पशुपक्ष्यांचे त्याला पंगत देण्यासाठी एक कॅलेंडर होते. त्यातल्या आक्रोड फोडणा-या काकाकुवावर जरावेळ बंडयाची नजर खिळली. तो एकदम जिवंत व्हावा आणि त्याने उत्तर दयावे असे बंडयाला वाटून गेले. माळयावर तो आजीच्या जुन्या पोथ्या आणि पंचांग शोधत होता.
त्याच्या डोळयासमोर त्याची नऊवारी पातळे नेसणारी आजी आली. तीच्या कानात नेहमी मोत्याच्या कुडया असत, गळयात बोरमाळ आणि केसांच्या एवढयाश्या लिंबाएवढया आंबाडयात एखादे दुप्पट मोठे सुवासिक फूल. भारी हौशी होती ती. तीने बंडयाचे गाल कुस्करले की बंडयाही तीचे गाल कुस्करी. मेल्या माझे गाल ओढतोस होय, म्हणत ती खोटा कांगावा करी. आणि त्याच्या हातावर खडीसाखरेचे मोठे खडे ठेवी. तीच्या जोडीने देवपूजेला बसायला बंडयाला फार आवडे. ती त-हेत-हेची फुले, प्रत्येक देवाची खास आवड, चंदनाचा गोरोचनाचा घमघमाट आणि त्यापेक्षाही गुदमरून टाकणा-या सुवासाचे उदबत्तीचे पुडे. उफ! आजी गेली आणि बंडयाचे दप्तर वहया घमघमायच्या थांबल्या. कारण त्यांच्यात भरायला आता उदबत्त्यांचे खोके उरले नाहीत. आजीनंतर घरातली देवपूजा बंद झाली. माळयावरती एका रेशमी बासनात आजीचे देव आणि पुजेची तांब्या, चांदीची भांडी गुंडाळून ठेवलेली बंडयाला मिळाली. तिथेच कुठेतरी मलमलीत गुंडाळून ठेवलेल्या पिवळयाशार पडलेल्या पोथ्या. आजीकडे एक शंभर वर्षांची दिनदर्शिका होती. तीच्यातून दिवस कसे शोधायचे तीने त्याला शिकवले होते. बंडयाने आपल्या स्मरणशक्तीला ताण दिला. मग दोष दिला. पंचांगावरून निदान मराठी महिने, नक्षत्रे, तिथी, वार महात्म्ये आदी तरी त्याला कळली. त्यापेक्षाही खास म्हणजे आजीची आठवण सापडली. शाळा, शिकवण्या, टि.व्ही., व्हिडीओ गेमच्या नादात ती कुठेतरी हरवून गेली होती. कार्टून पात्रांची खोटी खोटी दुःखे आजीच्या नसण्यापेक्षाही जास्त दुःखदायी बनली होती. असे कसे झाले? बंडया त्याच्या आजीला विसरला.
बंडया आजी विषयी विचार करत राहिला. त्याला भरपूर वेळ होता. ना शाळेची घाई ना शिकवण्यांची गर्दि. आजीच्या गोष्टी एकामागून एक त्याला आठवू लागल्या. बंडयाच्या आजीचे त्याच्या आईशी नसले तरी नलीच्या आईशी फार चांगले सूत जुळत असे. कधी कधी ती जोशीकाकूंबरोबर रिक्क्षाने विठ्ठलाच्या देवळात प्रवचनांना सुद्धा जाऊन येई. जोशीकाकूंकडे नक्कीच गुरूपौर्णिमेची तारीख सांगणारी दिनदर्शिका असणार. बंडया लगोलग त्यांच्याकडे धावला. त्याला तारीख तर मिळाली, पण काकूंच्या हजार प्रश्नांना उत्तरे देता देता पुरेवाट लागली. ही नविन शाळा कशाला? कुठे आहे? काय शिकवतात? बरोबर कोण कोण आहे? भरीला आज जोशीकाका सुद्धा तब्येत बरी नसल्याने घरीच होते. ते एका मराठी शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या प्रश्नांच्या तोफखान्यापुढे तर खरोखर आपण खिडकीतून बाहेर उडालो तर बरे होईल असे बंडयाला झाले.
बन्डे लोकांनी संत कार सायकल सारख्या प्रथितयश, नावाजलेल्या शाळेतून काढून बंडयाला दुस-या एखादया शाळेत घातले म्हणजे, त्यांच्या मते ती शाळा एक जब्बर प्रकरण असणार होते. संत कार सायकलहून भारी. त्यांची ही उत्सुकता तशीच न शमविता कोरडी ठेवणे बंडयाला कसेचेच, विचित्र वाटू लागले. बंडयाच्या जीभेवरचा काळा डाग चुरचुरू लागला. बंडयाला माहीत होते जोशींना कसे थंड करावे. त्याने त्यांचे शिक्षक हे अमेरिकेतून आणि युरोपातून येतात म्हणून सांगितले. हया शिक्षक लोकांची विमाने जशी येतात तसे त्यांचे वर्ग होतात, सध्या काही विमाने उशिराने येतायत. म्हणून त्यांना काही तास माफ झालेत, पण नंतर ते दुप्पट तास घेऊन त्याची भरपाई करणार आहेत, वगैरे वगैरे थापांचा सपाटा लावला. बंडया आई बाबांबरोबर वातानुकूलित हॉटेलात गेला होता. तिथल्या वातावरणाची निर्मिती त्याने शाळेच्या ईमारती व खोल्यांसाठी केली. बाबांच्या कार्यालयासमोरच एक नवीन अख्खी काचेची इमारत उभारलीय त्याला आठवले. बस्! शाळेचा पत्ताही तयार झाला. जुन्या शाळेच्या कारकूनबाई फर्नांडिस मॅम नेहमी आपल्या अमेरिकन जावयाचे च-हाट बोलत असायच्या. झाले. मुख्याध्यापकाचे नावही मिळाले. पिएरे सॅम्प्रे. त्याचा फोटोही बंडयाने फर्नांडिस बाईंच्या टेबलावरच्या काचेखाली बघितला होता. त्यांचे छातीपर्यंत रूळणारे केस आहेत आणि ते जांभळया रंगाचा बो-टाय वापरतात. बंडया करीत असलेली वर्णने जोशी पती पत्नी ज्या विस्मयातिरेकाने अरेबियन परिकथा ऐकाव्यात तशी ऐकत होती.
“आणि माहीत आहे का? आमच्या वर्गात माझ्याबरोबर कोण शिकतो? दुस-या कोणाला सांगू नका हं. प्लीज. ते ना गुपित आहे. बिग बीचा नातू, म्हणजे बिग ए चा मुलगा. नुसता मुलगा नव्हे काही, सख्खा मुलगा.”
जोशी पती, पत्नींना तसेच आ वासलेले सोडून बंडया मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन आपल्या घरी वर सटकला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users