बंडया - गुंडी ७

Submitted by Pritam19 on 13 August, 2016 - 17:33

- साबरी दिक्षितांच्या मायावी जगात आपले स्वागत असो. जादू आणि चमत्कार या जगातून संपलेले नाहीत. साहसवीरांच्या अदभुत कथा आजही घडताहेत. शोधा म्हणजे सापडेल. वाचा म्हणजे समजेल.
* अलख निरंजन.
हरवलेला परवलीचा
आकाशाचा निळा तुकडा सर्व ईमारतींच्या जंजाळातून थोडासाच बंडयाला दिसत होता. चौथ्या मजल्यावरच्या उंचीवरूनही दाट वस्तीच्या त्या भागात तेवढाच दाखविणे, त्याच्या घराच्या खिडकीला शक्य होते. सकाळची वर्दि देणारी कावळयांची कावकाव आणि चिमण्यांची चिवचिव चालूच होती. सात वाजले होते. नेहमीसारखे आई बाबा त्याला न सांगता कामावर निघून गेले होते. पावसाने न्हाऊन पुसून सगळा परिसर उन्हात लख्ख दिसत होता. बसला यायला उशीर होता. त्याचा नव्या शाळेत पहिला दिवस.
बरोबर काय घ्यावे त्याला कळत नव्हते. ना सरलकाका, ना मंजुघोष, ना गुंडीने, कोणी त्याला सांगितले होते. बंडयाने आपल्या रोजच्या दप्तरावरून हात फिरवला. मग थोडा विचार करून ते पुरे रिकामे केले. डबा, वॉटरबॅग आणि कोरी वही त्यात भरली. ते पाठीला लावले. दाराला कुलूप केले आणि तो लिफ्टच्या दिशेने निघाला. रोजच्या तुलनेत दप्तर इतके हलके भासत होते की तो उडत खाली पोहोचू शकला असता. आनंदाच्या भरात तो लिफ्टऐवजी खरेच जिने उतरून खाली आला. त्याच्या नकळत तो गाणे गुणगुणत होता. पहिल्या मजल्यावर त्याला जोश्यांची नली भेटली. ती नुकतीच एक शिकवणी वर्ग आटोपून परतत होती व दुसर्याला निघणार होती. तीचा कष्टी चेहरा पाहिल्यावर बंडयाला आज कष्टीपणा जाणवला नाही. हा तुमचाही भविष्यकाळ आहे, असे म्हणून दहावीतली नली, त्याला व नितिनला घाबरवून सोडत असे. पण आज बंडयाला जाणीव झाली की तो काहीतरी वेगळा आहे. त्याला स्वतःचा अभिमान वाटला. तो आता दिक्षित होता. इतरांना येणार्या अडचणी, काळज्या त्याच्या वाटयाला आल्या तर त्या जादूने छूमंतर करून टाकू शकणार होता. हवी तशी मजा करू शकणार होता. नितिन, राजन, बंटी त्याची रोजची दोस्तमंडळी त्याचा हेवा करणार होती. नितिनचा कॉम्प्युटर नाहीतर राजनचे व्हिडिओ गेम फिक्के पडणार होते. पण हाय ! बंडयाला आठवले साबरी शाळा तर गुपित ठेवायची होती. त्याला त्याच्यावर भाव खाता येणार नव्हता. छॅ ! लिमलेट खायची पण तीने रंगलेली जीभ मात्र कोणाला दाखवायची नाही. तर मग लिमलेट खाण्यात मज्जाच काय ? तसंच तर हे झालं.
बंडया त्याच्या नेहमीच्या थांब्यावर आला. अजून आसपासची दुकानेही उघडली नव्हती. नुकतीच उघडू लागली होती. आठ वाजता बस येणार म्हणजे तासभर तरी अवकाश होता. काहीतरी व्हावं. ती बस चटकन यावी आणि तीच्यात तो व गुंडी चटकन जावी. निदान नितिन येण्यापूर्वी तरी. म्हणजे नितिनचा आणि त्याच्या प्रश्नांचा बंडयाला सामना करावा लागणार नव्हता. बंडयाच्या लवकर खाली येण्याचे हेच ईंगित होते. अर्थात त्याच्या पदरात निराशा पडणार होती. बंडया लवकर आला हे कळून लवकर यायला साबरी शाळेची बस अंतर्ज्ञानी नव्हती. गुंडी आली तेव्हा तीचे स्वागत करायला बंडया तत्पर झाला. “ अलख.”
“अलख.” गुंडीने सुस्मित मुद्रेने म्हटले. बंडया कालची नक्षत्रवन आणि गुप्तगंगेच्या काठची कहाणी सांगायला उतावीळ झाला होता. ती बारा पिंपळाच्या गुप्त संदेशापर्यंत आली आणि पिवळी बस रोरावत आली. गुंडीने लगेच आपला परवलीचा ओठातल्या ओठात पुटपुटला. बंडयाला तो त्याच्या कानात स्पष्ट ऐकू आला. बसचे दार गुंडीच्या पुढयात येऊन उघडले. ती आत चढली. बंडयाही तीच्या मागोमाग चढू लागला. काय होतेय ते कळायच्या आत त्या लालभडक डोळयाच्या व जिभेच्या बसवाहकाने त्याला खाली ढकलून दिले. बसचे दार खाडकन् बंद केले आणि जोरात थाप वाजवली. बंडयाला भान येईपर्यंत बस निघूनही गेली होती.
झालेल्या अपमानाने बंडयाच्या डोळयात अश्रू जमा झाले. दाजी किराणा दुकानवाला दुकानातून त्याच्याकडेच राखून पाहत होता. नव्हे सारे जगच त्याच्या पडापडीकडे पाहते आहे आणि हसते आहे असे त्याला वाटत होते. ते पुरेसे नव्हते म्हणून नितिन धावत तिथे आला. त्याने बंडयाला मदतीचा हात दिला. बंडयाला त्याची मदत नको होती. पण मिजासी साबरीवाल्यांपेक्षा त्याचा कालचा मित्रच त्याच्या उपयोगी पडत होता. बंडया नितिनच्या मदतीने उभा राहिला. नितिनने बंडयाच्या मागच्या बाजूला लागलेला चिखल झटकायचा प्रयत्न केला.
“येडबंबूच आहे तो बसवाला. ढकलून काय देतो सरळ? नाय तर नाय बोल ना!” नितिनने बंडयाची बाजू घेतली. तेव्हा बंडयाला जरा बरे वाटले. त्याच्या गळयात गळा घालावासा वाटला.
“पण तू त्या बसमध्ये कशाला चढत होतास?” नितिनने विचारले. आता बंडयाला त्याच्यापासून दूर पळावेसे वाटले. तो ज्या गोष्टींना, प्रश्नांना भीत होता, ते जास्तच टोकदार बनून आता येणार होते.
“मी तीला बसमध्ये चढायला मदत करत होतो.” बंडयाने अस्पष्ट तोंडातल्या तोंडात पुटपुटले.
“मदत?” नितिनला प्रश्न पडला, पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न त्याला बंडयाला विचारायचा होता, “तू काल शाळेच्या बसमध्ये का चढला नाहीस?”
हा प्रश्न येणार हे बंडयाला कालपासूनच माहित होते. बंडयाने उत्तरही ठरवून ठेवले होते. पण झालेल्या प्रसंगाने त्याचे स्पष्टीकरण फार अवघड झाले होते.
“मी... मला दुसर्या शाळेत घातलेय.”
“तुला दुसर्या शाळेत घातलेय?.... अं .. त्या?”
“त्याच?” नितिनच्या चेहर्यावर त्रासिक भाव आले कि त्याच्या आक्रसलेल्या नाकावरून त्याचा चष्मा घसरून पडे. तो बोटाने लगेच सावरत नितिन बडबडला. “मग त्या येडबंबूने तूला खाली का ढकलले?” बंडयाने हात उडवले. खरोखरच त्याला उत्तर माहीत नव्हते.
“पण तू त्या शाळेत कशाला गेलास?”
बंडयाला हा प्रश्नच खरा टाळायचा होता. नशिबाने तेवढयात नितिनच्या शाळेची बस आली आणि त्याला पळावे लागले. आता ती बंडयाच्या शाळेची बस राहीली नव्हती.
“त्याने दुसर्या शाळेत प्रवेश घेतलाय.” नितिनने दिलेले उत्तर बंडयाच्या कानावर आले. चमकून बंडयाने तिथे बघितले. त्यांच्या बसवाहकाने प्रसन्नाने त्याच्याकडे बघून हात हलविला आणि बंडयाचा निरोप घेतला. तो किती छानसा हसला.
दोन्ही शाळांच्या बस येऊन गेल्या. आता तिथे नुसतेच उभे राहून बंडया काय करणार होता? तो घरी पोहोचला. संध्याकाळी तो गुंडीला भेटायला गेला नाही. गुंडीदेखील त्याला भेटायला आली नाही. चार दिवस सतत रोज ती बसमध्ये चढली की त्याच्या तोंडावरच बसचे दार बंद होत होते आणि ती त्याला कोणतीही मदत देऊ करत नव्हती. सकाळी ती जेमतेम बसच्या वेळेवर धावत घाईघाईने येई. दोघांमध्ये चारपाच वाक्यांची देवाणघेवाण होईपर्यंत बस येई, तीने निघूनही जाई.
“तुला मग सांगते.” “मग सांगते.” “मग. म...”चौथ्या दिवशी तीला शब्द पूरा करायलाही वेळ मिळाला नाही. फक्त तीचा परवलीचा त्याच्या कानात स्पष्ट खणखणे. त्याचा स्वतःचा नसला तरी तीचा त्याला चांगला पाठ झाला होता.
नितिन तिथे असे. तो तसा फारसा चौकस नव्हता. दोन तीन दिवसांनी त्याने त्याच्यामते तोड काढली कि बंडयाने त्याच्या बाबांना शाळेकडे बसवाल्यांची तक्रार करायला सांगावे. बंडयाला त्याही परिस्थितीत जरासे हासू आले, “त्याचे बाबा साबरी शाळेत?”
बंडयाच्या लक्षात आले. या शाळेत जायचे त्याने ठरवले होते. आईबाबांचा त्यात संबंध नव्हता. कोणा मोठयाचा आग्रह नव्हता. ही सर्वस्वी त्याची स्वतःची अक्कल होती. त्याची ईच्छा होती. म्हणजे शाळेचे येणारे सारे तिढे, प्रश्न त्याचे त्याला सोडवायचे होते. त्याचा तोच पालक होता. गैरहजर असल्याबद्दल त्याला बाबांकडून चिठ्ठया न्याव्या लागणार नव्हत्या. प्रगतीपुस्तकातील शेरे बाबांपासून दडवण्यासाठी हिकमती लढवाव्या लागणार नव्हत्या. गृहपाठाच्या वहयांवरचे माफीनामे लिहून देताना आईच्या खोटया सहया कराव्या लागणार नव्हत्या. मधल्या सुट्टीत घरी पळून येण्यासाठी पोटदुखी आणि डोकेदुखीची नाटके करावी लागणार नव्हती. तो शाळेला दांडी मारत नव्हता. उलट शाळाच त्याला दांडी मारत होती. या विचाराची त्याला ईतकी गंमत वाटली कि चार दिवसांचा राग,वैताग, दुःख चटकन कुठल्या कुठे पळाले. मनावरचे खिन्नतेचे, निराशेचे मळभ दूर झाले. त्याला नवा हुरूप आला. हया शाळेचे सारे काही वेगळेच असणार आहे. त्याने स्वतःला समजावले. ते आपणच समजावून घेतले पाहिजे. त्यासाठी गुंडीला वा सरलकाकाला गाठलेच पाहिजे.
संध्याकाळी गुंडीला भेटायचे ठरवल्यावर बंडयाला अजिबात धीर धरवेना. दिवसातून शंभरवेळा तरी त्याने घडयाळात जाऊन चार वाजले का तपासले असावे. इतक्या वेळा त्याने जर त्याचा परवलीचा तपासून बघितला असता तर त्याच्यावर ही वेळ न येती. गुंडीने भेटल्यावर उलगडा केला. दिक्षितांच्या जगात या परवलीचाचा ओळखपत्र म्हणून अतिशय महत्त्वाचा आणि अत्यावश्यक उपयोग होता. अदिक्षितांपासून दिक्षित वेगळा ओळखला जाण्यासाठी. आपण आपला मंत्र तोंडातल्या तोंडात पुटपुटायचा. जर समोरचा दिक्षित असेल तर आपोआप त्याच्या कानात तो पुटपुटला जाणार. तसाच दूर कोणी स्वतःशीच पुटपुटलेला आपल्याला ऐकू येतो.
“मग मी तुझा पुटपुटू. मला पाठ झालाय.”
“अहा रे बुद्धू. आपला पुटपुटला तरच समोरच्याला ऐकू जातो. माझा तु पुटपुटला तर कोणाला कसा कळणार?”
“ओ म हूँ सौं फ ट क्लीं ऐं फ्रे हः र्ह श्री.”
बंडयाने त्याला आठवले तसे त्याला कळलेले खुणांचे उच्चार बोलून दाखवले. म्हणजे तोंडातल्या तोंडात पुटपुटले आणि वेडया अपेक्षेने तीच्याकडे पाहिले. गुंडी हसायला लागली, “तू एवढया मोठयाने पुटपुटतोयस कि तुझ्या त्या ढापण्या..च् ... त्या मित्रालासुद्धा ऐकू येईल. ते उच्चारायचे नसतात. नुसते म्हटल्यासारखे करायचे असते. ते कुणाला असे सरळ सांगू नकोस पुन्हा.” गुंडीने त्याला बजावले, “नाहीतर अदिक्षित त्याचा फायदा घेतील.”
बंडयाने ही कानउघाउणी मुकाटपणे सहन केली. तो तीच्यापासून थोडा दूर गेला. आणि त्याने तोंडाची हालचाल केली. मग तीच्याकडे उत्सुकतेने पाहिले. तीने नकारार्थी मान हलवली. अहं!
मग बंडया आपला वेगवेगळया क्रमाने ती अक्षरे पुटपुटत राहिला. त्यातला कुठलाच क्रम चालला नाही. फार काय त्याने आधी कुठले क्रम वापरलेले ते त्यालाच नंतर आठवेनासे झाले. भारी बुवा गोंधळाचे काम. तो गोंधळ त्यानेच घालून ठेवलेला. त्यालाच निस्तारायला हवा. पण त्याला हे कोणी आधी सागितले असते तर... त्याची जरा तयारी करून घेतली असती तर...
गुंडीने ओठांचा चंबू करत त्याचे म्हणणे मान्य केले. तीने फेर्या वेळेत पुर्या करता याव्यात म्हणून सतत तीन महिने धावायचा सराव केला होता. तीच्या आईने तीच्याकडून वेगवेगळया खूणा आणि त्यांचे उच्चार आधीच घोकून घेतले होते. तरी तीला पाच फेर्याच पुर्या करता आल्या. गुंडीने आता बंडयाकडे बघत नवल केले.
“तुला कशा पहिल्याच खेपेत बाराच्या बारा फेरे पुरे करता आले?” तीच्या नजरेत आश्चर्य आणि आदर दोन्ही होते. बंडयाची छाती अभिमानाने फुलून आली. तीला त्याने दिव्य सुगंध आणि पुत्रंजीवाबद्दल काही सांगितले नाही.
“मग तुला काय वाटलं, माझा नेहमी शाळेत शर्यतीमध्ये पहिला नंबर येतो.” फुशारकी मारताना बंडयाला खात्री होती, गुंडी कधी त्याच्या शाळेत खात्री करायला जाणार नाही. गेली असती तर त्याने वाक्याला एक ठिगळ जोडले असते, “शेवटून.”
गुंडीचे डोळे बंडयाच्या कौतुकाने हे अस्से मोठ्ठे झाले. बंडयाने हेरले कि आता गेल्या चार दिवसात तीने त्याची खबर घेतली नव्हती, त्या चुकिचे माप तीच्या पदरात घालायची योग्य वेळ आली आहे.
“मी काय करणार? सरलकाका म्हणाला, बंडया नको. त्याला जाडयापासून धोका आहे.”
“त्या जाडयाच्या बैलाला ढोल.” कौतुकाने बंडया शेफारला असला तरी जाडया नजरेत कुठे नाही, याची बंडयाने आधी खात्री करून घेतली. “तू सकाळीसुद्धा मला भेटत नव्हतीस?”
“अरे बाबा, त्या जाडयाचा तपास लावायला मी आणि सरलकाका रात्री उशीरापर्यंत फिरत होतो. रात्री ईतकि उशिरा झोपायचे ना की सकाळी जागच यायची नाही. आई मला जबरदस्ती उठवून शाळेत पाठवायची नायतर शाळेत...”
जातोय कोण, काय? बंडयाने दात ओठ चावले. तो स्वतः शाळेत जाण्यासाठी इतका तळमळत असताना ही गुंडी खुश्शाल शाळेला टांग मारायला निघालेली. बरे तीने शाळेत काय केले? आज काय शिकवले? या सगळयाविषयी बोलायला तीची नाराजी दिसली. जाडयामागे एवढया रात्री जागवून त्याचा तरी पत्ता काढला का? तर नाही. आणि सरलकाका. तो कुठाय? या गुंडी भटकभवानी बरोबर भटकत फिरायला त्याला वेळ होता. पण खचलेल्या निराश बंडयाची खबर घ्यायला सवड नाय?
“तो मंजुघोषला भेटायला गेलाय. आज जाडयाचं काय करायचं ते ठरवणार आहेत.”
अरे कोण कुठचा तो रेडा, जाडया. त्याच्यासाठी ईतकी तडफडतायत आणि बंडया, जिगरी दोस्त ईथे आत्महत्येचा विचार करतोय, त्याला कोणी विचारत सुद्धा नाय. बंडयाने तोंडाने जोरात घोडयासारखे फुर्रर् केले. त्या आवाजाने गुंडी एकदम दचकली. जराशी बिथरली.
“ए जा तू आता आणि मंत्र जुळवत बस्. मला चार रात्रीची झोप पुरी करायची आहे.” गुंडीने पुढे एक मोठी जांभई दिली. ती निघून गेली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान