BANDYA - GUNDI 2

Submitted by Pritam19 on 8 August, 2016 - 05:48

हे कथानक हॅरी पॉटर पासून प्रेरणा घेऊन रचलेले आहे. हॅरी पॉटरच्या वाचकांना मिळणारा आनंद आणि थरार आमच्या मराठीतील वाचकांना त्यांच्या भाषेत, सभोवतालच्या वातावरणात, संस्कृतीच्या पठडीत मिळावा याचा मी प्रयत्न केला आहे. आपण वेळ व भेट दिल्याबद्दल आभार.
- समिर बागायतकर

“तू?”
“माझं मी बघून घेईन. तू काही काळजी करू नकोस.” गुंडीने त्याला पटकन तोडून टाकले.
बंडयाला राग आला. ज्याचं कराव भलं तो म्हणतो आपलं तेच खरं. हेच खरे. त्याला खरोखरचा उशीर झाला होता. पाऊस परत कधीही सुरू होऊ शकणार होता. आणि अरे बापरे! त्याला अंगात थोडी कणकण जाणवत होती. काल दिवसभर पावसात राहिल्याचा, पाण्यात फिरल्याचा परिणाम. ताप आता अंगात मुरत चालला होता. बंडया घरी परतला. तापामुळे चार दिवस बंडयाची शाळा चुकली. गुंडीची भेटही चुकली. चार दिवस आईबाबा गेले की तो घरात एकटाच झोपून राही. नेहमीप्रमाणे टि.व्ही वरची कार्टून्स त्याला विरंगुळा देत नव्हती.
भरीला त्याला कसली, कसली विचित्र स्वप्ने पडत होती. त्यामुळे तो जास्तच अस्वस्थ होत होता. उकळत्या पाण्याचे प्रवाह त्याच्या आजूबाजूला वाहताहेत. गरम गरम वाफेच्या झळा अंग भाजताहेत. वाफेतून बनणार्या धूसर आकृत्या त्याला भेडसावताहेत, घाबरवताहेत. तीच ती स्वप्ने परत परत पडत होती. पिंपळाच्या पानांची सळसळ त्याला ऐकू यायची. त्याच्यातून त्या गूढ साबरी भाषेतले काही बोल त्याला भासायचे. पिंपळाखालच्या सावलीत विचित्र हालचाल दिसायची. घरात त्याच्याभोवती अनेक काळे आकार वावरताहेत. त्याच्या अंगावर धावून येताहेत असे भासायचे. बंडया अगदी भेदरून जायचा. संध्याकाळी आईबाबा कामावरून आले कि बंडया त्यांना घट्ट बिलगायचा. सकाळी ते कामावर निघाले की त्याचा जीव कासाविस व्हायचा. त्यांनी जवळ राहावे म्हणून रडायचा. पण त्याच्या हट्टाचा काही उपयोग व्हायचा नाही. “बंडया हा काय वेडेपणा?” म्हणून ते त्याचे हात झटकून निघून जायचे. शेजारच्या हंसाकाकी अधूनमधून चक्कर मारून जायच्या. तेव्हा त्यांना तरी थांबवावे असे बंडयाला वाटे. जिथे बंडयाचे आईबाबा त्याच्यासाठी थांबत नव्हते, तिथे हंसाकाकी कितीवेळ थांबणार होत्या. एकटेपणाने बंडयाला अकाली समज आली होती.
मग त्याच्या मनात गुंडीचे विचार येत. गुंडीची ती वेगळी साबरी भाषा, ती वेगळी साबरी शाळा, ती वेगळी शाळेची बस आणि त्या कशाचीही माहिती दयायला तीने नकार दिला, म्हणून ताणली गेलेली उत्सुकता. गुंडीला तीची कुपी मिळाली असेल काय? ती पुन्हा भेटेल तेव्हा त्याला तीला खूप काही विचारायचे होते. तो आजारी आहे हे माहित पडले तर गुंडी त्याला भेटायला येईल काय? तीचे आईबाबा तीला पाठवतील का? कारण त्याला माहीत होते. जर त्याचा कोणी मित्र कधी आजारी पडला तर त्याचे आईबाबा त्याला कसेच त्या मित्रापाशी जाऊ देत नसत. त्यालासुद्धा या रोगाचा संसर्ग होईल या भीतीने.
ज्या क्षणी तीला भेटायची तीव्र उर्मी त्याच्या मनात निर्माण झाली. त्याक्षणी ती त्याच्या घराच्या दाराबाहेर उभी होती. गुंडीबरोबर एक उंचसा माणूस देखील होता. त्याचे डोळे घारे पिंगट होते. त्याची त्वचा ईतकी गोरीपान होती की त्याच्या नील धमन्या त्यातून दिसत होत्या. त्याने अंगात सदरेवजा डगला घातला होता. खाली पैरण आणि पायात कोल्हापुरी चपला. त्याने तलवार कट मिशी ठेवली होती. त्याची अर्धवट उगवलेली दाढी हिरवट दिसत होती. त्याचे डोळे खोलवर गेलेले होते. त्यामुळे उंचेलेसे पोपटनाक अजूनच मोठे वाटत होते. त्याच्या कपाळावर व मानेवर त्याचे लांब, सरळ केस विखुरलेले होते. शिडशिडीत बांध्याचा तो माणूस तसा तरूणच वाटत होता. त्याने हात वर करून दरवाज्याची घंटा मारली. बंडयाने कोण आहे त्याची विचारून खातरजमा करून घेतली. गुंडीचा आवाज ऐकताच घाईघाईने दार उघडले. सगळयात आधी त्या माणसाच्या गळयातली रूद्राक्षांची माळ बंडयाच्या नजरेस पडली. मग तो माणूस आणि मग त्याच्या बाजूला उभी असलेली धीट गुंडी.
“तुझी मी दोन तीन दिवस वाट पाहत होते. तू दिसला नाहीस म्हणून मी तुझ्याबरोबर असतो तो ढापण्या,” गुंडीने जीभ चावली, “तो नितिन रे, त्याच्याकडे तुझी चौकशी केली. तो तुमच्याच इमारतीत राहतो ना. त्याने मला सांगितले की तू आजारी आहेस. तेव्हा तुला बघायला आले.” गुंडीने एका दमात धाप न लागता भडाभडा सांगुन टाकले.
बंडयाचे लक्ष मात्र तीच्याबरोबर आलेल्या माणसाकडे लागलेले. त्या माणसाची प्रेमळ नजर त्याला आवडली. तो माणूसही. त्या माणसाने बंडयाच्या डोळयातले भाव ओळखून म्हटले, “मी सरलनाथ विजयकर. गुंडीचा काका. आता तुझी तब्येत कशी आहे बाळ?” त्याने प्रेमाने बंडयाच्या डोक्यावर हात ठेवून ते हलकेच कुरवाळले. बंडयाचे डोळे भरून यायला एवढे प्रेम पुरेसे होते. ते बघून गुंडीच्या चेहर्यावर त्रासिक भाव उमटले, “ए रडू नकोस. मुलगा असुन रडतोस? मी कधी रडते का? ताप आला तर काय मोठ्ठसं! एकदा मला किनई एकशे आठ ताप आला होता. तरी मी गुपचुप बाहेर जाऊन कुल्फि खाऊन आली, माहिताय.” बंडयाने बघा, बघा कश्शी लपेट मारतेय या अर्थाने काकाकडे पाहिले. सरलकाकाने फक्त खांदे उडवले. एकशे आठ ताप किवा चोरून कुल्फि खाणं, गुंडीच्या बाबतीत काहीही शक्य आहे या अर्थाने.
“ए तू काय आता अख्खा दिवस अंथरूणात पडून राहणार आहेस. चल आमच्याबरोबर. आपण त्या जाडयाला शोधून काढू.”
“तुला अजून तो जाडया आणि तुझी कुपी परत मिळाली नाही?” बंडयाचे डोळे मोठ्ठे झाले. गुंडीने हताशपणे मान हलवली.
“मी त्याचा चेहराच विसरले. तुला आठवतो?” बंडयाने होकारार्थी मान हलवली. एक बन्डे आपल्या दुश्मनांचा चेहरा कधीच विसरत नाही. खासकरून त्याला चिखलात लोळवून पायाखाली चिरडू पाहणार्या दुश्मनांचा तर सात जन्मात नाही.
“व्वा!” म्हणून तर मी सरलकाकाला तुझ्याकडे घेऊन आले. “आता सरलकाका तुला काही चेहरे दाखवील, त्यातला तू बरोबर ओळख हां. “ बंडयाने परत हो म्हटले आणि तो सरलकाका फोटो दाखवतोय का याची वाट पाहायला लागला. पण तशी काही हालचाल करताना सरलकाका दिसला नाही. उलट तो डोळे मिटून अगदी ढिम्म बसला. बंडयाने प्रश्नार्थक नजरेने गुंडीकडे पाहिले. गुंडीने हात दाखवून त्याला जरा धीर धर सुचविले. म्हणता म्हणता पाच मिनिटे गेली. सरलकाका आपला ढिम्मच!
“सरलकाका” आधी गुंडीने अगदी दबक्या आवाजात हाक मारली. मग थोडी मोठयाने, मग थोडी अजून मोठयाने, आणि तीने पंधरावी हाक तर एवढया मोठयाने मारली की शेजारची हंसाकाकी धावत दारापाशी आली. “झालं काय? काय झालं? “ म्हणून विचारायला लागली.
अनोळखी माणसं बघून तीच्या चेहर्यावर संशय दाटला. तसे बंडयाने सरसावून दडपून सांगून दिले की त्याची शाळेतली वर्गमैत्रीण व तीचा काका त्याची आजारपणात चौकशी करायला आलेत. हंसाकाकीच्या आवाजासरशी सरलकाकाने डोळे उघडले होते. गुंडीने व सरलकाकाने साळसुदपणे हंसाकाकीला हसून दाखविले. गुंडीने निरागस छोटया मुलीसारखी पापण्यांची भिरभिरती उघडझाप केली. ठिक ठिक म्हणत, मान वर खाली हलवत हंसाकाकी गेली.
“सरलकाका बंडयाला चेहरे दाखव ना. “ गुंडीने विनवले.
“कसे दाखवणार? शपथ. शपथेचे काय? “
“हां ! शपथ.. ..शपथ. मी विसरलेलेच.”
“शपथ. शपथेचे काय? कसली शपथ? “
“ते तुला नाही कळणार बंडया. जाऊ दे, चल आम्ही निघतो.” गुंडी म्हणाली. बंडयाला काहीच कळले नाही. पण बिचारा गप्प बसला. सरलकाका आणि गुंडी जायला वळले. तोच सरलकाकाला बंडयाच्या चेहर्यावरची भीती जाणवली. गुंडीलाही कळले.
“काय झाले बंडया? “ सरलकाकाने बंडयाला विचारले.
बंडयाने सरलकाकाचा हात हाताने घट्ट धरला आणि म्हणाला, “मला एकटयाला भीती वाटते. मला एकटे टाकून जाऊ नका ना. आई बाबा कोणीतरी येईपर्यंत थांबा ना जरा.”
“कसली भीती वाटते तुला बंडया?” सरलकाकाने हळूवारपणे विचारले. बंडयाच्या हाताला सुटलेला कंप, घामाने आलेला ओलसरपणा सरलकाकाला जाणवला. सरलकाकाने बंडयाला नीट न्याहाळले. जेमतेम नऊ दहा वर्षाचा पोर, तापाने खंगल्याने अजूनच किडकिडीत वाटणारे अंग, सावळी त्वचा फिकुटलेली, केस विस्कटलेले, मोठे डोळे खोल गेल्याने निस्तेज झालेले. त्यात दाटलेले आर्जव.
“मला स्वप्नांची भीती वाटते. त्यात त्या काळया सावल्या हलतात. ते कुजबुजतात माझ्याकडे बघून. माझ्याकडे रोखून पाहत असतात. मला त्यांच्या नजरेची भीती वाटते. ते माझ्या अंगावर धावून येतात. ते माझ्या अगदी जवळ येतात.” जणू आता या क्षणी ते जवळ असल्यासारखा बंडयाच्या अंगावर काटा फुलला. जीभेला कोरड पडली.
“कोण ते रे?” गुंडीला त्यात रस निर्माण झाला.
“मला माहित नाही.” बंडया म्हणाला. पण ते उच्चार उमटलेच नाहीत. त्याचा आवाज मारला गेला. नुस्ते ओठ हालले.
सरलकाकाने आपल्या गळयातली रूद्राक्षांची माळ काढली आणि ती बंडयाच्या गळयात घातली. बंडयाला आपल्यात एकदम काहीतरी मोठ्ठा बदल झालाय असे वाटले. कसलातरी प्रकाश त्याच्या अंगावर उजळत गेलाय आणि काळोखाची भुतावळ, सावल्या पार कुठे गायब झाल्यात. त्याला अचानक खूप बरे, बरे वाटायला लागले. डोक्यात दुखत होते ते थांबले. अंगाचा कंप थांबला आणि सारी भीती नाहीशी झाली. त्याने पाहीले गुंडी आ वासुन त्याच्याकडे व सरलकाकाकडे आळीपाळीने पाहत होती.
“सरलकाका तू तुझी रूद्राक्षमाळ बंडयाला दिलीस? “
“हो आता ती त्याच्याकडेच राहिल.”
“सरलकाका ही माळ मी, मला ठेवू.” बंडयाने चाचरत विचारले. सरलकाकाने होकारार्थी स्मित केले.
“सरलकाका तू ती त्याला कायमची दिलीस? “ गुंडीने एक प्रकारच्या हेव्याने परत विचारले.
“हो कायमची दिली.”
“मग तुला काय? “
सरलकाकाने खांदे उडवले. बंडयाच्या लक्षात आले की, रूद्राक्षमाळ म्हणजे मोलाची गोष्ट आहे. आई बाबांनी त्याला बजावलेले कि कोणाकडून काही फुकट भेट घ्यायची नाही. तो ती माळ काढायला लागला. त्याला सरलकाकाने थांबविले. गुंडीने बंडयाला समजाविले. “बंडया सरलकाकाने ती तुला आपण होऊन दिलीय. ती परत करायची नसते. कोणी आपणहून भेट दिली तरच ती लाभते.” बंडया सरलकाकाच्या या भेटीने भारावून गेला.
“बंडया तुला कसली स्वप्ने दिसतात?” सरलकाकाने विचारले. आता बंडयाला ती स्वप्ने डोळयासमोर आणायला भीती वाटेनाशी झाली. त्या भेडसावणार्या सावल्या आणि काळया आकारांचे त्याला काहीच महत्व उरले नाही. ते सर्व नाहीसे झाले होते. त्यापलिकडे अजून काही होते.
“ती स्वप्ने परत परत दिसतात. पिंपळाची झाडे, ती सळसळतात. गरम पाण्याचे प्रवाह माझ्या आसपास वाहतात. भाजतात. ज्यात वाफेतून काही आकार उमटतात. ते काहीतरी खुणावतात. पानातून वारा वाहिला की आवाज येतात.”
“कसले आवाज येतात? “ सरलकाका बंडयाला कवेत घेत बोलला.
“मला ती भाषा माहीत नाही. गुंडी त्यादिवशी काहीतरी बोलत होती. तशा भाषेतले वाटतात.”
“गुंडीची भाषा? कसली? “
“साबरी. साबरी म्हणाली होतीस ना तू गुंडी? “ गुंडीने मान हलवली व चपापून सरलकाकाकडे पाहिले.
“मी शपथ मोडली नाही. मी आपल्याशीच बोलत होते. “
“मला माहित आहे. तू शपथ मोडली नाहीस. नाहीतर त्यांना ते कळले असते.” सरलकाकाने तीला आश्वस्त केले. त्यांना ते नेहमीच कळते. कसे कळते? त्याला व गुंडीला माहित नव्हते. सरलकाका व गुंडीने एकमेकांचे विचार कळल्या पटल्यासारखे, एकमेकांकडे पाहून सुस्कारा टाकला. सरलकाका थोडा विचारात पडला. बंडयाकडून असल्या उत्तराची त्याने अपेक्षा केली नव्हती. त्याने स्वतःला तरी ऐकू येईल की नाही अशा अस्फुट आवाजात विचारले, “बंडया तुला ती झाडे मोजता येतात का? किती आहेत? “
बंडयाच्या डोळयासमोर पुन्हा एकवार ते दृश्य साकार झाले. आता त्याला अजिबात भीती वाटत नव्हती. “बारा” त्याने मोजून सांगितले. त्याबरोबर सरलकाका विजेचा झटका बसावा तसा सरळ झाला.
“काय बारा? “ तो अस्वस्थपणे पुटपुटला.
“बारा अश्वत्थाचा पार, “ गुंडी न राहवून बडबडली.
“आणि त्या गरम पाण्याच्या कुंडीत एक झाडाची फांदी आहे.”
“तीला पाने आहेत? “
“हो आहेत, हिरवीगार.”
“फांदीला पाने फुटली. फांदीला पाने फुटली.” एकदम गुंडी टाळया पिटत आनंदाने नाचायला लागली. सरलकाकावरचा ही सगळा ताण एकदम नाहीसा झाला. सरलकाका उठला “बरे आहे बंडया. आता आम्ही जातो. उदया सकाळी तुला पुन्हा भेटू. आपण उदया शाळेत प्रवेशासाठी अर्ज भरायला जाऊ. तेव्हा सकाळपासून काही खाऊ नकोस. उपवास कर.”
“शाळेत कुठच्या? माझी शाळा तर चालू आहे.”
“साबरी आश्रम शाळा.” तू पाहिलेली स्वप्ने हे त्या शाळेचे तुला बोलावणे आले आहे. तुला आवडेल ना त्या शाळेत जायला? “
बंडयाच्या डोळयासमोर गुंडीची पिवळी जादूबस आली. त्याची त्या बसमध्ये चढायची फार पूर्वीपासून इच्छा होती.
“पण आईबाबा? “ सरलकाका यावर फक्त हसला.
“पण उदयापर्यंत माझा ताप बरा झाला नाहीतर? “
“तू अजून आजारी आहेस का? “
बंडयाने नकळत रूद्राक्ष माळेला हात लावला. त्याला जाणवले, त्याचा आजार कधीच दूर पळालेला होता

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users