तरही- नुकतीच पावसाला सुरवात होत आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 August, 2016 - 21:34

ओळीबद्दल बेफिजींचे आभार !

आभास चातकाचा माझ्यात होत आहे
( नुकतीच पावसाला सुरवात होत आहे )

झाकोळल्या मनाला वरदान कोसळाचे
अश्रूतुनी फुलांची बरसात होत आहे

बोलायचेच होते मनमोकळे कधीचे
शब्दात राहिलेले स्पर्शात होत आहे

मृदगंध जीवघेणा अफवा अशी उडवतो
कोणीतरी कुणाचे निमिषात होत आहे

माझ्या मनास आहे शिवला विचार त्याचा
रूपांतरीत कातळ लेण्यात होत आहे

डेबीट होत जाते एकेक वर्ष तरिही
क्रेडीट अनुभवांचे खात्यात होत आहे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users