सेरेंगेटी - अनटेम्ड आफ्रिका, भाग-२

Submitted by आशुतोष०७११ on 6 August, 2016 - 09:13

सेरेंगेटी नॅशनल पार्क म्हणजे एरवी मागास असणार्‍या आफ्रिकेच्या भूमीवरचं अमूल्य जंगलवैभवच. आपल्या नैसर्गिक अधिवासात स्वच्छंदीपणे वावरणारणार्‍या इथल्या जंगली प्राण्यांनी स्थानिकांचं आणि पर्यटकांचं सहअस्तित्व निर्धोकपणे स्वीकारलं आहे. त्यामुळे सेरेंगेटीची सफारी हा एक अस्सल, जातीवंत अनुभव ठरतो.

भाग -१ http://www.maayboli.com/node/59019

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

दुसर्‍या दिवशी नाश्ता आटोपून ७ वाजताच आम्ही निघालो. वाटेत मसाई लोकांची वस्ती दिसली. वस्ती म्हणजे १०-२० बांबूच्या झोपड्या, गवतानं शाकारलेल्या आणि पूर्ण वस्तीला बांबूचंच साधारण ३ फुटी कुंपण. मसाई लोक गेल्या दोनशे वर्षांपासून उत्तर टांझानियाच्या मैलोगणती पसरलेल्या जंगलप्रदेशात आपली गुरं चरत आलेले आहेत. सरकार त्यांना पक्की घरं बांधून देतं. पण अजूनही बरेचसे मसाई जुन्या पद्धतीच्या घरांतच राहणं पसंत करतात. वुल्फगाँग वेळोवेळी माहिती पुरवण्याचं काम आनंदानं करत होता.

IMG_3545_MA_01_RS.jpg

आम्ही सेरेंगेटी नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. तिथल्या चेकपॉईंटला रीतसर एंट्री परमिट वगैरे सादर केलं. तिथे मागेच एक खडकाळ टेकडी दिसत होती, उंची जेमतेम १५-२० मीटर. स्वाहिली भाषेत या टेकड्यांना ‘कोपी’ म्हणतात. त्या कोपीला सिमेंटच्या पायर्‍या केलेल्या होत्या. आम्ही चढून वर गेलो, तर नजरेत मावणार नाही असं गवताळ माळरान समोर आलं. ‘सेरेंगेटी’ या शब्दाचा अर्थच तसा आहे- ‘नजर ठरणार नाही अशी अथांग पसरलेली गवताळ जमीन’. मसाई लोकांच्या ‘सिरिंगेट’ या शब्दावरून हे नाव रूढ झालं आहे. पुढे सेरेंगेटीमध्ये फिरताना पाहिलेल्या इतर कोणत्याही कोपीवर अशा बांधलेल्या पायर्‍या दिसल्या नाहीत. कोपींवर चढून बसलेले सिंह मात्र भरपूर दिसले. या कोपी दगडी असल्यामुळे तिथे थंडावा असतो. उन्हाच्या विरुद्ध दिशेला त्यांच्या पायथ्याशी सावलीत विसावा घेणं सिंहांना आवडतं. शिवाय कोपीवरून दूरवरची शिकार नजरेच्या टप्प्यात येते. शिकार करून ती कोपीवर आणून ठेवली की तरसांद्वारे लांबवली जाण्याचा धोकाही कमी होतो. त्यामुळे या कोपी म्हणजे सिंहांचं राहण्याचं अतिशय आवडीचं स्थान.

IMG_4341_MA_02_RS.jpgIMG_4296_MA_03_RS.jpg

त्या कोपीवरून उतरून आम्ही पुन्हा जीपमध्ये बसलो आणि सेरेंगेटीत शिरलो. जीप रिसॉर्टवर न जाता एका आडवाटेला घुसली. आपल्याकडच्या जंगलांप्रमाणेच इथेही तुम्हाला जीप आखून दिलेल्या वाटांवरूनच न्यावी लागते. (नॅट-जिओ, अ‍ॅनिमल प्लॅनेट वगैरेंच्या कॅमेरा-क्रूच्या जीप्स कुठेही फिरू शकतात. अर्थात त्यासाठी त्यांना टांझानियाच्या सरकारला घसघशीत रक्कम मोजावी लागते.) जरा वेळाने एका ठिकाणी वुल्फगाँगनं जीप थांबवली. आम्हाला उतरायला सांगितलं. समोरच ४-५ सिमेंटचे बाक वगैरे टाकून एक छोटाशी विसाव्याची जागा केलेली दिसली. परिसरात भयंकर दुर्गंधी पसरलेली होती. वुल्फगाँग आम्हाला सरळ त्या दुर्गंधीच्या उगमापाशी घेऊन गेला. तिथे एका मोठ्या डबक्यात २५-३० पाणघोडे सुखेनैव डुंबत होते. पुन्हा आम्ही कॅमेरे सरसावले. पहिल्या दीड दिवसांतच ‘बिग-५’मधल्या तिघांनी आम्हाला दर्शन दिलं होतं!

IMG_3666_MA_04_RS.jpg

दिवस बुडल्यावर रिसॉर्टवर पोहोचून रीतसर चेक-इन केलं. जेवण झाल्यावर रात्री सगळे गप्पा मारत बसलो होतो. दिवसभरात दिसलेले प्राणी, कुणी कशी झकास पोझ दिली, सगळ्यात आवडलेला शॉट कोणता इथपासून ते पुण्यात कुठे चांगलं जेवण मिळतं इथपर्यंतचे चौफेर विषय साथीला होते. इतक्यात हॉटेल मॅनेजरने येऊन रुमच्या बाहेर गप्पा मारत उभे राहू नका’ असं बजावलं, कारण गेले दोन दिवस रिसॉर्टच्या आसपास बिबळ्या वावरताना दिसला होता. त्यामुळे आम्ही निमूटपणे आपापल्या खोल्यांत परतलो आणि आडवे झालो.

सकाळी नाश्ता उरकून करून जीपमध्ये बसलो. मुख्य रस्त्याला लागलो तेवढ्यात आमच्या जीप समोरून दोन सिंह पळत गेले. थोडं पुढे जाताच जंगली म्हशींचा एक भला मोठा कळप रस्ता अडवून उभा असलेला दिसला. आम्ही धडाधड फोटोसेशन उरकलं. पण कळप काही पुढे सरकायचं नाव घेईना. आम्ही वाट बघत थांबलो. कळपातले नर खुन्नस देऊन आमच्याकडे बघताहेत असं वाटत होतं. अखेर अर्ध्या-पाऊण तासाने त्यांचा लवाजमा तिथून हलला.

IMG_3699_MA_05_RS.jpg

मग आम्हीही निघालो. काही अंतर गेल्यावर एका ठिकाणी १०-१२ जीप्स थांबलेल्या दिसल्या. एका बाजूला वनराज आपल्या दोन राण्यांसह आराम करत बसले होते. आम्ही फोटो काढायला सुरूवातही केली होती. पण खर्‍या 'फोटो-मोमेन्टस’ पुढेच होत्या. त्यांतली एक सिंहीण उठून उभी राहिली आणि आमच्याकडे पाठ करून चालायला लागली. थोड्या वेळाने दुसर्‍या सिंहीणीने पण तेच केलं. त्या कोणत्या दिशेला जाताहेत हे आधी कळेना. सिंहिणींच्या समोरच तीन-चार विल्डबीस्टस् चरत होते. एका सिंहीणीनं अगदी अलगद त्यांचा पाठलाग चालू केला. बघताबघता दुसरी सिंहीणही पाठलागात सामील झाली. विल्डबिस्ट्स जिवाच्या आकांताने पळत सुटले. आम्ही श्‍वास रोखून पाहत होतो. पण वाघ-सिंह साधारण एक किमी अंतरापर्यंतच शिकारीचा पाठलाग करतात. त्यानंतर तो वेग टिकवून ठेवणं त्यांना शक्य होत नाही. तसंच झालं. थोड्याच वेळात सिंहीणींनी पाठलाग सोडून दिला. मात्र भेदरलेले विल्डबीस्टस् पळतच राहिले, पळतच राहिले! ‘जिवाच्या आकांताने पळणे’ म्हणजे काय हे त्या दिवशी खर्‍या अर्थानं दिसलं! हा सगळा थरार काही क्षणांतच घडला. कॅमेरात तो बंदिस्त करावा याचंही भान आम्हाला राहिलं नाही.

IMG_4477_MA_06_RS.jpgIMG_4480_MA_07_RS.jpgIMG_4497_MA_08_RS.jpgIMG_4487_MA_09_RS.jpgIMG_4148_MA_10_RS.jpg

दिवसभर भरपूर भटकलो. पुन्हा एकदा साक्षात अ‍ॅनिमल प्लॅनेटनं आमच्यासाठी जणू पायघड्याच अंथरलेल्या होत्या. जिराफ, हत्ती, शहामृग, तरस, झेब्रा, कोल्हा (गोल्डन जॅकल), जंगली म्हशी असे कित्येक प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातावरणात स्वच्छंदीपणे फिरताना दिसले! सेरेंगेटीतला दुसरा दिवस सार्थकी लागला.

IMG_3867_MA_24_RS.jpgIMG_3564_MA_11_RS.jpgIMG_3554_MA_19_RS.jpgIMG_4594_MA_13_RS.jpg

तिसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट उरकून जीपमध्ये बसतानाच वुल्फगाँगला म्हटलं, ‘आता सिंह खूप बघून झाले. आज बिबळ्या आणि चित्ता दाखवल्याशिवाय परत यायचं नाही.’ त्यालाही बहुतेक हेच अपेक्षित होतं. त्याने हसून मान डोलावली आणि म्हणाला, ‘येस, आधी सकाळी बिबळ्या, दुपारी चित्ता.’ जणू त्यांच्या घरी आम्हाला जेवायचंच आमंत्रण होतं! आम्हीही उत्साहात निघालो.

वुल्फगाँगने आज वेगळ्याच रस्त्याने जीप दामटली. जाता जाता म्हणाला, ‘आपण आता सेरेंगेटीच्या ज्या भागात जातोय, ते ठिकाण ‘लेपर्ड लँड’ म्हणून प्रसिद्ध आहे.’ साधारण ५-६ किमी पुढे गेल्यावर एका झाडाजवळ तीन-चार जीप्स उभ्या असलेल्या दिसल्या. ते सगळे पर्यटक झाडाकडे बघत फोटो काढत होते. येस्! तिथे नक्की बिबळ्याच होता झाडावर. वुल्फगाँगने जीप अलगद पुढे काढून आम्हाला अगदी व्यवस्थित बिबळ्या दिसेल, फोटोसाठी छान अँगल येईल अशा रीतीने उभी केली. फांदीवर बिबळ्याची मादी अगदी टिपिकल पोझमध्ये बसली होती. किमान तासभर तरी आम्ही तिथे होतो. तेवढ्या वेळात बिबळ्याची मादी एकदा झाडावरून खाली उतरली, परत वर चढली, त्याच फांदीवर वेगळ्या पोझमध्ये जाऊन बसली. फोटोग्राफर्ससाठी ही पर्वणीच! अखेर वुल्फगाँगने उशीर होईल असा इशारा देत आम्हाला तिथून हलवलं.

IMG_3734_MA_14_RS.jpgIMG_3799_MA_15_RS.jpg

पुढे दुपारी १२.३०पर्यंत आम्ही चित्त्यांचा शोध घेत फिरत होतो. वुल्फगाँगने मध्ये एका तळ्याच्या काठाशी जीप थांबवली. तिथे भरपूर फ्लेमिंगोज दिसत होते. तळ्याच्या दुसर्‍या बाजूला सिंहीणी दोन बछड्यांसमवेत किंचित ओलसर जमिनीवर बसल्या होत्या. बछडे ७-८ महिन्यांचे असावेत. आमची एकमेव जीप त्यांच्या समोर उभी होती. सिंहीणींनी आमच्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. दोन्ही बछडे मात्र आमच्यावर बारीक नजर ठेवून होते. त्यांचे फोटो काढून तिथून निघालो. पुढे एका झाडाच्या आडोश्याला जीप थांबवून आम्ही जेवणाचे डबे उघडले. जेवणानंतर ‘मिशन चित्ता’ हे एकमेव लक्ष्य ठेवून निघालो. ( पुढे लेक मन्यारा परिसरात चित्ता दिसणार नव्हता. लेक मन्याराची खासियत म्हणजे झाडावर चढू शकणारे सिंह.)

IMG_3950_MA_22_RS.jpg

वाटेत काही कोपी लागल्या. अशाच एका कोपीच्या टोकावर वनराज झोपले होते. अजून चित्ता मात्र हुलकावणी देत होता. इथल्या सगळ्या जीप्समध्ये रेडिओ असतो. त्यामुळे सगळे ड्रायव्हर्स एकमेकांशी आणि फॉरेस्ट रेंजर्सशी संपर्क साधू शकतात. जेवून निघाल्यावर वुल्फगाँगचं इतर ड्रायव्हरांशी सतत बोलणं चालू होतं. फिरता फिरता एका ठिकाणी त्याने जीप थांबवली. समोरच ‘बॅट इअर फॉक्स’चं कुटुंब बसलेलं होतं. यांसारखे काही प्राणी म्हणजे अस्सल आफ्रिकन खासियत होते! या कोल्ह्यांचे कान वटवाघळाप्रमाणे असतात. शिवाय सर्वसाधारण कोल्ह्यांपेक्षा हे आकारानेही बरेच लहान असतात.

IMG_4712_MA_16_RS.jpg

त्यांचे फोटो काढत असताना एकीकडे वुल्फगाँगचं रेडिओवरचं संभाषणही कानावर पडत होतं. भाषा कळत नसली तरी एका क्षणी त्याच्या बोलण्यातला बदललेला सूर माझ्या लक्षात आला. मी किंचित प्रश्‍नार्थक चेहरा करून त्याच्याकडे पाहिलं. त्यावर त्यानेही हसून थम्सअपची खूण केली. मी ओळखलंं, की याला चित्त्याबद्दलची काहीतरी माहिती मिळाली असणार.

त्याने जीप तिथून हलवली आणि पुढे एका किंचित पाणथळ जागेजवळ नेऊन उभी केली. तिथे समोर चित्त्याची मादी आपल्या दोन पिलांसमवेत पहुडलेली दिसली. त्यांच्यात आणि आमच्यात तसं बरंच अंतर होतं. इतक्यात पाऊस सुरू झाला. दुपारनंतर आकाश जरा भरून आलेलं होतंच. मार्चमध्ये तसाही टांझानियात पाऊस सुरू होतो. तिन्ही चित्ते आमच्या समोरच पावसात भिजत बसले होते. वुल्फगाँगने सफाईने जीप अजून थोडी पुढे नेऊन उभी केली. साधारण तासाभरानं पाऊस थांबला. दरम्यान आमचं फोटो काढणं सुरू होतंच. तेवढ्यात चित्त्याच्या एका पिल्लाचं लक्ष बॅट इअर फॉक्सकडे गेलं. त्याने लगेच त्याचा पाठलाग चालू केला. चित्त्याची ती प्रसिद्ध दौड! असा वेग, इतकी झेप, एका झेपेत पार केलेलं इतकं-इतकं अंतर - सगळी माहिती होतीच. त्याचा प्रत्यक्ष आविष्कार आता श्‍वास रोखून नजरेत साठवत होतो. त्या एका दिवसात बिबळ्या, चित्त्याचं कुटुंबं आणि चित्त्याची प्रसिद्ध दौड असं सगळं पदरात पडलं होतं. समाधानाने रिसॉर्टवर परतलो.

IMG_4815_MA_17_RS.jpgIMG_4900_MA_17_RS.jpg

उद्या सफारीचा शेवटचा टप्पा - लेक मन्यारा.सकाळी निघून लेक मन्याराच्या रिसॉर्टवर पोहोचलो. तिथे सामान टाकून, जेवून मग भटकायला बाहेर पडलो. सेरेंगेटीच्या तुलनेत लेक मन्याराचं जंगल वेगळं वाटलं. सेरेंगेटी म्हणजे मैलोनमैल पसरलेला गवताळ प्रदेश, तर लेक मन्याराचं जंगल हिरवंगार. दुपारभर जंगलात भटकलो. जिराफ, ब्लू-मंकी दिसले; हॅमर हेडेड हॅरॉन दिसला. माळरानावर न आढळणारे इतरही अनेक पक्षी दिसले. मन्यारा तलाव आटत चाललेला दिसला. पण पावसाळा तोंडावर होता. पुढल्या काही दिवसांत तिथला पाणीसाठा वाढेल असा आशावाद मनाशी बाळगत आम्ही रिसॉर्टवर परतलो. आजची रात्र टांझानियातली शेवटची रात्र होती. लेक मन्याराच्या सिंहानं दर्शन दिलं नाही म्हणून मनोमन आम्ही जरा खजील झालो होतो.

IMG_3574_MA_25_RS.jpgIMG_3502_MA_18_RS.jpgIMG_3622_MA_26_RS.jpgIMG_3711_MA_27_RS.jpgIMG_3671_MA_20_RS.jpgIMG_5073_MA_23_RS.jpgIMG_3677_MA_21_RS.jpgIMG_3688_MA_22_RS.jpgIMG_5105_MA_28_RS.jpg

सकाळी नऊ वाजता बाडबिस्तरा आवरून निघालो. आरुषात दुपारचं जेवण करून तिथूनच सरळ किलीमांजारो विमानतळ गाठायचा होता. आमची किलिमांजारो-नैरोबी फ्लाईटही प्री-पोन झाली होती. सगळेजण त्याच विचारात होतो. इतक्यात वुल्फगाँगने अचानक ब्रेक दाबला. जीप थांबली. पाहतो तर समोर एक अजस्र सिंह उभा! पूर्ण वाढ झालेला, मस्त मोठी आयाळ असलेला, आमच्याचकडे बघत होता. आश्‍चर्याच्या धक्क्याचे दोन क्षण ओसरल्यावर जाणवलं की आमच्या कुणाच्याच हातात कॅमेरा नव्हता. खाली उतरून डिकीतून तो काढणं अशक्य कोटीतलं होतं. कोणाकडेच मोबाईल कॅमेराही नव्हता. वनराजांनी नेमकी वेळ साधली होती. इथे जीप्ससमोर जनावर आडवं आलं, तर चालक थांबतात. जनावरांनी वाट मोकळी करून दिली की मगच आपण पुढे जायचं. बराच वेळ जनावर हटतच नाहीये असं वाटलं, तर मग नाईलाजास्तव अलगद वाहन बाजूनं काढायचं. हा अलिखित नियम इथे सर्वचजण पाळतात. त्यामुळे तो सिंह तिथून कधी निघून जाईल याची वाट पाहणं इतकंच आता आमच्या हातात होतं.

मला अचानक एक जुना किस्सा आठवला. रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये फिरत असताना तिथल्या जुन्या जाणत्या सीताराम नामक गाईडने मला सांगितलं होतं, ‘साहब, मौत और टायगर कभी बताके नही आते’। त्याच वाक्यात ‘टायगर’च्या जागी ‘लायन’ टाकून आफ्रिकन विधान करता आलं असतं; वुल्फगाँगला ते ऐकवलं असतं तर त्यानंही बहुधा त्याला होकारच भरला असता.

सेरेंगेटी सफारीचा समारोप असा भन्नाट होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं!

त.टी. - हा लेख मुशाफिरी दिवाळी २०१५ अंकात प्रसिद्ध झाला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा, मस्त सैर घडवलित. फोटोसहित इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
(चित्ता अन बिबळ्यात फारसा फरक वाटत नाही, असे खरोखर असते का? चित्ताच्या नाकाभोवतुन दोन रेषा तितकाच फरक वाटतो , आकारमानात, शरिर ठेवणीत फरक असतो का? प्लिज करेक्ट मी...)

सामान्य भाषेत सांगायचे तर बिबळ्या/ बिबट्या अंगाने भरलेला असतो, तो स्वभावाने क्रूर असला तरी लाजरा, बुजरा असतो. स्वसंरक्षणासाठी वा भुके साठी तो कोणावरही हल्ला करु शकतो. चित्ता त्या मानाने लवकर माणसाळु शकतो. चित्ता, शक्यतो सिंह/ वाघ यांच्या नादी लागत नाही, पण बिबट्या मात्र वेळ पडली तर टक्कर घेऊ शकतो. जगामध्ये चित्ते, संख्येने फार कमी झालेत, बिबटे मात्र नाही. बिबट्या त्याची शिकार झाडावर नेऊन ठेवतो, चित्ता मात्र बिबट्या सारखी मोठी शिकार करत नाही.

वेगामध्ये मात्र चित्ता बिबट्या आणी अन्य प्राण्यांना चांगलीच मात देतो. चित्ता म्हणजे कमनीय बांध्याची सुंदरी आहे.

लिंबुदा,

बिबळ्या आणि चित्त्याच्या आकारमानात बराच फरक असतो. बिबळ्या हा आकाराने काहीसा स्थूल असतो. वाघ, सिंहाप्रमाणेच बिबळ्या फार वेळ पळु शकत नाही. फारतर ताशी ३० किमी. वाघ, सिंहाप्रमाणेच भक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ जाउन शिकार करण्याची पद्धत. बिबळ्या धूर्त असतो.

IMG_3142_MA.jpg

बिबळ्या लीलया झाडावर चढु शकतो, वाघ, सिंहांना झाडावर चढता येत नाही,चढलेच वाघ/सिंह झाडावर तरी फारसे उंच जाउ शकत नाहीत. बिबळ्या वाघ, सिंहांप्रमाणे नखं पंजात घेउ शकतो, चित्त्याची नखं कुत्र्याप्रमणे पंजाबाहेर असतात.

चित्त्याच्या शरीराची ठेवण ही किंचित मांजरासारखी असते. डोकं लहान असतं, डोळ्याजवळुन दो काळ्या रेषा असतात. वेगाच्या बाबत चित्ता वाघ, सिंहांना मागे टाकतो. चित्ता ११०-११५ ताशी वेग गाठु शकतो. पण हा वेग तो जास्तीत जास्त दोन मिनिटे टिकवू शकतो. चित्ता बिबळ्यापेक्षा उंच पण सिंहांपेक्षा किंचित बुटका असतो.

IMG_2837_MA.jpg

रश्मी, आशुतोष, सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद Happy

>>> चित्ता म्हणजे कमनीय बांध्याची सुंदरी आहे.<<<<
रश्मी, चित्यास "सुंदरी" ची उपमा चपखल .. Happy

लय भारी ट्रीप झालीये तोषा. मागच्या वर्षीचा मुशाफिरी भारीच होता म्हणायचा. पण मी मागच्या वर्षी कुठलेच दिवाळी अंक घेतला नव्हता. ब्येस काम केलंस इथे देऊन हा लेख.

चित्ता आणि विबळ्या यातला मला आठवणारा फरक म्हणजे बिबळ्याच्या अंगावरचे ठिपके (इतक्या मोठ्या आकारांना ठिपके का म्हणतात ते मला कधी समजले नाहीये) पोकळ असतात तर चित्त्याच्या अंगावरचे भरीव असतात. तोषाने दिलेल्या फोटोतही हा फरक दिसून येतोय.

वर झाडावर बसलेल्या बिबटोबाचे जे दोन फोटो आहेत, त्यातल्या पहिल्या फोटोत तो कसला भेदक दिसतोय. आमच्या शेजारच्या काकांकडे एन जी सी चे मासिक यायचे, त्यात मी जग्वार ( काळ्या बिबट्या) चे फोटो बघीतले आणी जाम टरकले होते. अर्थात त्यावेळी मी काहीतरी तिसरी-चौथीत होते. त्यामुळे मनात जास्त दहशत होती त्या फोटोची.

लिंबु भा॑ऊ, चित्ता चालतांना सुद्धा कसला मोहक दिसतो.

Pages