स्नेहालय परिसस्पर्श -२

Submitted by विक्रम देशमुख on 6 August, 2016 - 09:02

वैराण आयुष्याचा आधार, मातृत्वाचा स्वीकार - रेणुका दहातोंडे

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात धानोरा नावाचे गाव आहे. येथे एका अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबामध्ये माझा दि. २८.५. १९८४ रोजी जन्म झाला. माझ्या आईचे आव द्वारका व वडिलांचे दिनकर कुटे आहे. माझ्या आई-वडिलांना त्यांच्या लग्नानंतर मी ७ वर्षांनी झाले. म्हणून त्यांनी जेमतेम परिस्थितीतही माझे खूप लाड पुरविले. आई-वडिलांनी माझे नाव रेणुका असे ठेवले. माझे आई-वडील शिकलेले नव्हते. ते रोज मजुरी करायचे. मी दोन वर्षाची झाल्यावर मला बहीण झाली. त्यानंतर माझा भाऊ झाला. भावानंतर माझी बहीण झाली. असे आम्ही चौघेजण भावंडे आहोत. मग मी ६ वर्षाची झाल्यावर माझ्या आई-वडिलांनी मला शाळेत घातले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा मध्ये मी ४थी पर्यंत शिकले. मी माझ्या बहीण-भावांचा सांभाळ केला. पुढे माझे बहीण भाऊ शाळेत जाऊ लागले. नंतर मी ५ वी ते १० वी जनता माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण केले. माझ्या आई-वडिलांची खूप इच्छा होती कि मी १० वी पास व्हावं. मला १० वीला ७२ टक्के मार्क पडले. माझ्या आई-वडिलांना खूप आनंद झाला. कारण त्यांनी माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले होते. नंतर माझे वडील तलावावर कामाला जायचे. मग त्यांनी ठरवले की, आम्ही नाही शिकलो पण आमची मुले शिकली पाहिजेत. मी १२ वी पर्यंत तरी शिकावे अशी त्यांची इच्छा होती. मी तयार झाले आणि तेथेच जनता उच्च माध्यमिक विद्यालय, धानोरा या महाविद्यालयात प्रवेश घेतला. मला खूप आनंद झाला. कधी-कधी खूप वाईट पण वाटायचे की, त्यांनी एवढे काम करून मला वह्या पुस्तके घेतली. मी महावियालयात जायला लागले. ते मला नेहमी सांगायचे की, आम्ही खूप कष्ट करू, पण तू चांगली शिक. पुढचे शिक्षण आमच्या कडून व्हायचे नाही, आम्हाला दुसऱ्या मुलांचे शिक्षण पण करायचे आहे. ते माझ्याशी वाईट बोलायचे नाहीत. मी समजूतदार होते, म्हणून माझी आत्या आणि आजी यांनी मुलगा बघितला पण माझे आईवडील तयार नव्हते. पण त्यांचे काहीच चालले नाही. आजीमुळे त्यांनी माझे लग्न जमवले. मला खूप वाईट वाटायचे. माझ्या भावंडांचा शिक्षणाचा खर्च, मध्येच माझे लग्न निघाले. साले वडगाव या ठिकाणच्या विश्वनाथ दहातोंडे या मुलाशी माझे लग्न १५.०२.२००१ या दिवशी झाले. माझ्या काका मावशीने खूप सहकार्य केले. मग मी सासरी गेले. १५ दिवसांनी माझे आईवडील आले व माझ्या सासू सासरे यांना म्हणाले तिला शाळेत पाठवा, आम्ही खर्च करतो, तरी पण त्यांनी मला शाळेत पाठवले नाही. नंतर माझ्या आईवडिलांनी विचार केला की, ११ वी चे पेपर देताना शिवण क्लास लावावा. मग मी शिवण क्लास लावला व पेपर पण दिले. माझे पती पेटी वाजवायचे व संगीत क्लास घ्यायचे. याच्या व्यतिरिक्त काहीच करत नव्हते. त्यांना पाच हजारापर्यंत महिना पडायचा. मी खूप आनंदी राहायचे. मी पण शिवणक्लास करायचे. असे करता करता १२ वीचे पेपर दिले. १२ वी पास झाले. माझ्या आई-वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट करून खर्च केला होता.

एड्सची काळी सावली

मी सालेवडगाव, ता. आष्टी, जि. बीड येथे माझ्या गावी खूप आनंदी जगत होते. अज्ञानांत सुख असते याची अनुभूती माझी जणू वाट पाहत होती. आयुष्यात आता फक्त आनंदच उरला असे मला वाटायचे. स्वप्नात मी जगत नाही अखंड डुंबत होते. अचानक एकदा माझे पती खूपच आजारी पडले. बऱ्याच रुग्णालयामध्ये त्यांना दाखवले. आधी गंडा-दोरा-कोंबडा कापून झाला. मग डॉक्टरांनी सांगितले कि त्यांना टॉयफॉईड झाला आहे. मग आम्ही त्यांना अहमदनगर येथील डॉ. हेमंत देशपांडे यांच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले कि, त्यांची रक्त तपासणी करावी लागेल. जेव्हा तपासणी केली, तेव्हा त्यात ‘ते’ भयंकर निदान आढळले. डॉक्टरांनी मला सांगितले की, तुम्हाला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. प्रदीर्घ समुपदेशनानंतर त्यांनी सांगितले की, ‘तुमच्या पतीला एच. आय. व्ही. ची लागण झाली आहे.’ हा आजार तर कधीच ऐकला नव्हता. कधीच त्याचा रुग्ण पाहीला नव्हता. मी डॉक्टरांना विचारले कीं, ‘हा आजार नक्की काय आहे?’ माझ्या पती समोर डॉक्टरांनी विस्तृत माहिती देऊन सांगितले की, हा आजार एकदा झाल्यावर पूर्ण बरा कधीच होत नाही. याच्यावर अद्याप तरी उपचार नाही. माझ्या पतीने एच. आय. व्ही. हा शब्द ऐकला. त्यांना या आजाराची पुरेशी माहिती व कल्पना असावी. नव्हे होतीच. कारण आजाराचे निदान उघड झाल्यावर ते लाजेने प्रचंड घाबरले. एकदम अबोल झाले. सर्वांना टाळू लागले. एक प्रकारच्या अपराधी भावनेने त्यांना पुरते घेरले. आपले आणि माझे कसे होणार, अशी बडबड ते करायचे. “हाय खाणे” हा काय प्रकार असतो, हे तेव्हा मला कळले. माझ्या आयुष्यात अनिश्चिततेचे भयावह वादळ घोंघावत आले. एका महिन्याने माझे पती मरण पावले. माझ्या पतीचे निधन झाल्यावर माझी पण रक्त तपासणी करायचे मी ठरवले. डॉ. हेमंत देशपांडे यांनी मला तसा सल्ला दिला. माझी तपासणी मात्र मी पुण्यात जाऊन केली, आणि मी म्हणाले, बापरे मलाही तोच एड्सचा आजार झाला. माझे डोळे वाहू लागले. आता मी जगू शकणार नाही, असा विचार माझ्या मनात येई. त्या विचारानेच मला थंडी-ताप आला. मला माझी सासरची मंडळी कोणीच बघायला तयार नव्हते. त्यांच्या मुलामुळे मला बाधा झाली. पण ते मलाच दोष द्यायचे. माझ्याशी बोलायचे नाहीत, शिवायचे नाहीत. संडास-बाथरूम वापरू नको म्हणायचे. उगाच भ्यायचे. माझा भाऊ मला भेटायला आला. तेव्हा मी आजारी बघून खूप रडायला लागला. तेव्हा मला माझी बहीण व भाऊ खूप समजावयाचे, आत्मविश्वास द्यायचे. तरी पण माझे मन मला बोलायचे नवऱ्यासारखीच मी आता मरणार. वडिलांनी नगरला तपास केला. एम. आय. डी. सी. येथे स्नेहालयाचे एक रुग्णालय आहे. येथे एड्स रुग्णांना प्रेम-माया व उपचार दिले जातात. मला इथले वातावरण छान वाटले. नंतर डॉ. मार्सिया वॉरन यांनी तपासले. मला औषधाच्या नव्या गोळ्या चालू केल्या. नंतर काही काळाने मी खूप आजारी पडले. तेव्हा मला अनिल गावडे आणि स्नेहालयातील स्नेहदीप रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी खूप मदत केली, दोन महिने मी आजारीच होते. खाटेवर पडून होते. आजारपणानंतर मला खूप नैराश्य आले. वाटले, जीव द्यावा. कारण अशा एड्सग्रस्त आयुष्याचे जीणे लाजिरवाणे होते. मी अनिल गावडे सरांना भेटले. खूप खूप रडले. सर मला एकच शब्द बोलले की, बघ इथले मुले मुली एड्स असूनही किती छान राहतात, खेळतात आणि तू रडतेस? तू तर मोठी आहेस. त्यांच्या या शब्दांमुळे माझे नवीन जीवन सुरु झाले. आधी मी भोजन शाळेत काम केले. तेव्हा मुले अंगा-खांद्यावर बागडू लागली. मला कोणी ताई, भीड चेपल्यावर आई, म्हणू लागली. एक वर्षभर मी सर्वांचा स्वयंपाक केला. स्वयंपाक करणे, भांडे घासणे, स्वच्छता करणे अशी कामं ४ वर्ष केली. नंतर माझे काम बघून अनिल सरांनी माझी बदली छोट्या मुलांमध्ये गृहमाता म्हणून केली,. मुंबई येथे टाटा इन्स्टिटयूट आणि उम्मीद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बालविकास पदविका अभ्यासक्रमासाठी माझी निवड झाली. हा अभ्यासक्रम १ वर्षाचा होता. ६ महिने प्रशिक्षण झाल्यानंतर ६ महिने प्रत्यक्ष कार्य. मला वाटले कि मी एवढा मोठा अभ्यासक्रम करू शकेल की नाही? मला सर नेहमी म्हणायचे की, होईल. होत असते व जेवढे होईल तेवढे कराच. तब्येतीची काळजी घघेऊन काम शिका. अनिल गावडे यांनी माझी मुंबई येथील प्रेरणा संस्थेमध्ये राहण्याची व्यवस्था केली. सर्वात जास्त मला एका व्यक्तीने घडविले, मदत केली. कोणाचा भाऊ एवढे करणार नाही, एवढे माझ्यासाठी, बहिणीसाठी करणारे माझे भाऊ म्हणजे चंद्रकांत शेंबडे. अनिल आणि चंद्रकांत सर यांनी माझी प्रशिक्षणातली प्रत्येक अडचण सोडवली. मी मनात एक निर्धार केला. जिद्दीने हा सी. डी. ए. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. ७३ टक्के गुण पडले. सगळे खूप आनंदी झाले. माझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरु झाले. अनिल सरांनी माझा स्वभाव आणि आई म्हणून काम करण्याची तीव्र इच्छा पाहून माझी नेमणूक स्नेहआशा विभागातील छोट्या मुलांमध्ये गृहमाता म्हणून केली. याशिवाय मी अग्रकर्मी हस्तक्षेप केंद्रात शिक्षिका म्हणून काम करते. अनेक मुला-मुलींचे एड्सने माझ्या समोर मृत्यू झाले. त्यांना मृत्यू समोर दिसत असताना सतत माझी आठवण होत होती. ‘आई’, तू आमच्याजवळच थांब. कुठे जाऊ नकोस असा म्हणत ते माझा हात हातात घट्ट धरून ठेवत. बेशुद्ध असतानाही तोंडावरून हात फिरवला की, कसे कोण जाणे पण खुदकन हसत. मला बिलगत. माझ्याच कुशीत शेवटचा श्वास घेताना त्यांना आईच्या कुशीत असल्याचे समाधान मिळायचे. एवढा विश्वास माझ्यावर माझे कुणीच नसलेल्या स्नेहआशा विभागातील मुलामुलींनी ठेवला. एवढ्या विश्वासाचे धनी झाल्याने मला तर मी खूपच श्रीमंत वाटते. एड्सची बाधा झाल्याने अश्रू ढाळत मृत्यूची वाट पाहणाऱ्या २० ते ३५ वयोगटातल्या अनेक मुली महिला आहेत. स्नेहालयात त्या भेटतात. त्यांना मी सांगते की, कोणीच अमरपट्टा बांधून नाही आलेले. एड्स झालेले, ना झालेले सर्वजणांना शेवटी या जगाचा निरोप घ्यावाच लागतो. मग प्रत्येक क्षण अर्थपूर्ण-आनंदाने जगायला काय हरकत आहे?

वर्ष २०१५ मध्ये ३ मोठ्या घटना मला आनंद देऊन गेल्या. दैनिक लोकसत्ताच्या चतुरंग या महिलांसाठीच्या पुरवणीत नवरात्रात नवदुर्गा या नावाचा विशेष अंक काढण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील आयुष्याचा हिमतीने मुकाबला करणाऱ्या ९ महिलांची निवड करण्यात आली. त्यात माझा समावेश होता. सर्व महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव माझ्यावर झाला. दुसरे म्हणजे मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनेलवरून माझी विस्तृत मुलाखत आणि जीवन कहाणी प्रसारित झाली. शारदाताई मानकर प्रतिष्ठान, पुणे यांच्या तर्फे शामदादा मानकरांनी ११ हजार रुपयांचा सेवा पुरस्कार दिला. यातील काहीच मी मागितलेले किंवा अपेक्षिलेले नव्हते. स्नेहालय इंग्लंडच्या वर्ष २०१६च्या अहवालात मुखपृष्ठावर त्यांनी माझे छायाचित्र वापरले. जगभरातून लोक विचारतात कोण ही मुलगी? आणि मिरांडा हडसन उत्साहाने माझ्या विषयी सांगू लागतात. स्नेहालय नसते तर माझ्या या पृथ्वीवरील अस्तित्वाची कोणतीच दाखल घेतली गेली नसती.
ई-मेल: feedback@snehalaya.org

http://www.maayboli.com/node/59543

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रमदा,

शक्य तसे लवकर भाग टाका.
हा लेख पण सुंदर आहे. कार्यकर्ते खरेच किती मोठे काम करत आहेत.

हा लेख वाचताना अचानक जाणीव झाली की शिर्षकामध्ये तुम्ही वापरलेला परिसस्पर्श हा शब्द किती समर्पक आहे.

हा लेख वाचताना अचानक जाणीव झाली की शिर्षकामध्ये तुम्ही वापरलेला परिसस्पर्श हा शब्द किती समर्पक आहे.+ १