रिव्ह्यू

Submitted by फूल on 5 August, 2016 - 04:10

“एक मेड टिकत नाही घरात. प्रत्येकीबद्दल तुम्हाला काही ना काही problem असतोच. आता तर म्हणे काय ती वाकूनच केर काढत नाही, उभ्या उभ्याच झाडू फिरवून जाते. आता तुमच्यावेळी होत्या तश्या मिळणार आहेत का बायका? आणि बाबा मला सांगा... त्यावेळी होतात तरी का हो तुम्ही घरात बघायला? तुम्ही सदैव बँकेत.”, अवि भडाभडा आवाज चढवून बोलत होता.

“हो अरे, तेव्हा जर घरी कामवाली बाई बघत बसलो असतो तर तुझं शिक्षण कसं झालं असतं? तेव्हा मी दिवस रात्र राबलो म्हणून आता इंजिनिअर म्हणून नाकं वर करून फिरतोयस नाहीतर बसला असतास कुठेतरी खर्डेघाशी करत. आणि मला चूक दिसते तिथे मी बोलणार. मला पटलं नाही की मी बोलणार. मला बोलायची चोरी आहे का? कोण अडवणारे मला?”

“हो बोला नं अजून बोला. तुम्ही कधी कुणाच्या मनाचा विचार केलायत? जेवणाच्या ताटावर बसलं की सुरुवात. भाजी अंमळ खारटच आहे. आमटीत गूळच कमीये. आईलाही आयुष्यभर हेच ऐकवलंत आणि आता रेणूलाही ऐकवता. आम्ही दोघांनी कितीही केलं घरासाठी तरी पुरं पडणारच नाहीये तुम्हाला. काही तरी कारण काढून कुरबुर चालूच तुमची. तो पेपरवाला आता आपला पेपर शेजारी देउन जातो. का तर दार कसं वाजवायचं यावर त्याला तुम्ही लेक्चर देता. पोळ्या करायला रमा काकू येत होत्या त्या बंद झाल्या का तर तुम्हाला त्यांच्या हातच्या पोळ्या आवडत नाहीत. आता आज ही सुद्धा केर लादी करणारी मेड गेली. तुम्ही का problems निर्माण करता? आधीच कमी नाहीयेत. आणखीन वाढवू नका प्लिज.”

“हो का? बर बर, मी problems वाढवतोय का? ठीक आहे, मग जातोच मी निघून. शेजारच्या विंग मधल्या बापू कदमाला पाचगणीला ठेवलाय. मीही जातो त्याच्या सोबतीला. कुणाचा मिंधा नाहीये मी. पेन्शन मिळते महिना २०,०००. शिवाय बॅंकेत शिल्लक आहे माझी.”

“छान! बापू काकांना पोचवायला म्हणून पाचगणीला काय जाउन आलात एकदा. तेव्हापासून काहीही मनाविरुध्द झालं कि हे ऐकवता. वृध्दाश्रमाचा विषय निघाला की मी गप्प! माहितीच्ये तुम्हाल आता.”

“का का गप्प कशाला? सांग मला तसं. माझी अडचणच होतेय तुमच्या राजा राणीच्या संसारात. जातोच मी. तसेही माझे शाळेतले दोन मित्रही आहेत तिथे. बँकेतला तो करमरकर तोही भेटला तिकडे. आणि वृद्धाश्रम म्हणून काही ओंगळ वाटायला नकोय. फाईव्ह स्टार हाटेलसुद्धा तोंडात बोट घालील एवढा चकाचक आहे. पैसे भरले की झालं. आणि मला काय पैशाची कमी. जाईन तिकडेच. सुखात राहीन. मलासुद्धा तुझी रोजची कटकट नकोचये.”

हे बाप लेकाचं चालू असतानाच रेणू मुलांना घेउन आली. दरवाजाच्या बाहेरच दोघांचे चढलेले आवाज ऐकून तिला काय तो अंदाज आलाच. मुलांनाही तसं हे नेहमीचच होतं. बाप लेकातलं हे भांडण खरतर सगळ्या बिल्डींगला माहित होतं. पण ते तेवढ्यापुरतं असतं हेही सगळ्यांना माहित होतं. एरवी तसं पाहता कुलकर्णी कुटुंब तसं सुखी कुटुंब.

दोन वर्षांपूर्वी आई गेल्या आणि ही वादावादी सुरू झाली. आई असताना बाबांचं सगळं सगळं त्याच बघायच्या. आई तश्याही जात्याच चतुर. आयुष्यभर नोकरी कधी केली नाही. पण अविला चांगलं वाढवलं. इतक्या वर्षांच्या संसारानंतर बाबांना कसं खूष ठेवायचं त्यांना चांगलंच अवगत झालं होतं. स्वयंपाक तर अगदी ए वन.

रेणू लग्न होउन आली तेव्हा असं कितीसं वय होतं तिचं? उलट अजून एक लहान मुलगीच घरात सांभाळायला आली. आईंना मुलीची उणीव होतीच. ती रेणूने भरून काढली. आईंनीही तिला अपार माया लावली. अवि आणि रेणूला दोन मुलं झाली. मोठी सायली आणि धाकटा चैतन्य, चीत्या, चित्तू. खूपच सुखी कुटुंब.

पण अचानक निरोपाची काडी ओढावी तश्या आई निघून गेल्या. पहिलाच हृदयविकाराचा झटका आणि तोच शेवटचा. भरल्या संसारातून, भरल्या कपाळाने आई निघून गेल्या. दवाखाना नाही, औषधं नाही. काही काही नाही. तसं सुखाचंच मरण. पण त्यानंतर मात्र कुलकर्ण्यांचं हे घरच पोरकं झालं.

मीठ कसं नसलं की जाणवतं पण असताना मात्र त्याचं अस्तित्त्व जाणवत नाही. तसंच आईंचही. त्या असताना कुणालाच जाणवलं नाही पण नसताना हळू हळू उमगायला लागलं. आई हाच अवि आणि बाबांमधला एकमेव दुवा. त्यांनी आयुष्यभर सांभाळून घेतलं, इतकं की त्यांच्याशिवाय बाप-लेकात संबंध कसे आहेत हे जाणून घ्यायची कधी कुणाला गरजच वाटली नाही. नाही म्हणायला अविवर बाबांचा फार फार जीव होता. एकुलता एक मुलगाच शेवटी. पण दोघं समोरासमोर आली की विसंवादच.

अवि अगदी बाबांवर गेलेला. उंची, बांधा, रंग, रूप शिवाय बोलणं, चालणं सगळं सारखंच. त्यामुळे तापट स्वभावहि त्यांच्यासारखाच. भांडायला लागले कि कोणीही मागे हटायचं नाही. रेणूने सुरुवातीला मध्ये पडायचा प्रयत्न केला. पण ”आम्ही बाप लेक आमचं आमचं काय ते बघून घेउ.” मग तिनेही त्यात बोलणं सोडून दिलं.

बाबांच्या थोड्या विक्षिप्त वागण्याचा तिलाही त्रास व्हायचा, नाही असं नाही. पण अवि इतका त्रागा करून घ्यायची नाही ती. तिला ठाउक होतं आई गेल्यापासून बाबाही एकटेच झालेत शिवाय म्हातारं माणूस या वयात थोडी चिडचिड व्हायचीच. पण मुलांना त्यांनी खूप लळा लावला होता. मुलांना आबाजी खूप आवडायचे. अवि आणि तिला कुठे वेळ मिळायचा मुलांबरोबर? आबाजी ती सगळी उणीव भरून काढायचे.

आई गेल्यानंतर सुरुवातीला बारीक सारीक खटके उडायचे दोघांचे. पण आता गेल्या काही महिन्यांपासून भांडण शिगेला पोचत होतं. कारणं उगीच लहान सहान. पण पराचा कावळा व्हायचा. आजही तेच चालू होतं. मुलं बावरून बघत होती. तिने मुलांना आत पाठवलं आणि आपण स्वयंपाकघरात गेली. तरी बाहेरचे शब्द तिच्या कानावर पडतच होते.

“तुही सुखात रहा तुझ्या घरात. मला बोलायला परवानगी नसेल तर जातोच मी.” बाबा करवादून बोलले.

“मग जाच. तुमच्या या धमक्यांना मी भुलणार नाही. लक्षात ठेवा. जा पाचगणीला. मी स्वत: सोडायला येतो. निघून जा. आपण सगळेच सुखी होउ.”, अवि अजून वरच्या पट्टीत बोलला.

हे ऐकलं मात्र रेणू स्वयंपाकघरातून धावतच बाहेर आली.

“अविनाश काय बोलतोयस तू हे? बाबा तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. हे आपलं घर आहे सगळ्यांचं.” रेणूचा स्वर कातर होत गेला.

“रेणू तू मध्ये पडू नको. याला मी धडा शिकवणारच आहे आता. बघच तू. उद्या सकाळी माझी जागा बुक करून टाकतो तिथली.” बाबा अजूनच ठामपणे म्हणाले.

“त्यांना जायचं तर जाउ दे. मी अडवणार नाही.” अवि पायात चपला सरकवून खाली निघून गेला.

रेणूला आईंची खूप खूप आठवण आली. आईंनी हे घर कसं बांधून ठेवलं होतं. दिसायला गोवर्धन पर्वताला करांगुळीचाच आधार आणि खरंतर सगळा पर्वतच त्याच एका आधारावर. आपल्याला तसं जपता आलं नाही याचं तिला फार फार दु:खं झालं. तिनं बाबांकडे बघितलं. ते आपल्या निर्णयाशी ठाम होते. तसंही अविने तोंडावर जा म्हटल्यावर आता ते काही मागे हटणार नाहीत आणि अविही आता त्यांना परत थांबा म्हणायचा नाही.

बाबांनी दुसऱ्याच दिवशी ठरल्याप्रमाणे वृद्धाश्रमात फोन करून चौकशी केली. पुढल्या महिन्याच्या एक तारखेपासून रहायला जायचं ठरलं. मग त्या सगळ्या उस्तवाऱ्या, फॉर्म भरणं, इतर कागदपत्र बाबा अगदी उत्साहाने सगळं करताना दिसत होते. अविही मध्ये पडत नव्हता. दोनतीनदा तिने अविला समजवायचा प्रयत्न केलाही पण दोघंही आता इरेला पेटले होते. समोर आले की वाद आणि धमक्या हेच. ८-१५ दिवस असेच तणावात गेले. आणि अखेर जायचा दिवस उद्यावर येउन ठेपला.

रेणूने, “सोडायला येतो आम्ही तुम्हाला”, असं सांगितलं. अविही जवळच उभा होता. पण बाबा ऐकेचनात, “भाड्याने गाड्या आणि ड्रायव्हर चिक्कार मिळतायत. तुम्हाला उगाच कष्ट नकोत बापासाठी.” “ तसं नाही बाबा, मुलांनाही येता येईल बरोबर. आबाजी कुठे जाणारेत विचारतायत मुलं.” रेणूला रडूच फुटलं असतं पण हुंदका आवरला तिनं. कारण ती रडली असती तर अविने अजूनच चीडचीड केली असती. बाबा मग कसेबसे तयार झाले. तरी, “माझं काय तुझ्या नवऱ्याला विचार.” आता यावर अवि काही बोलू जाणार तोवर तिनेच त्याला आवरलं.

आणि अखेर बाबा वृद्धाश्रमात दाखल झाले. त्यांना सोडून घरी येताना, गाडीतली त्यांची रिकामी जागा, घरी आल्यावर त्यांची रिकामी खोली सगळं सगळं टोचत राहिलं रेणूला. अविलाही त्रास होतंच असणार, अपराधीही वाटत असेल पण बोलून दाखवायचा नाही. मुलंही शांत शांतच होती. आबाजी तिकडे का राहतात? बाबा त्यांना सांगत का नाही? आबाजी परत का येत नाहीत? मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देताना तिला नाकी नउ यायचे आणि त्याचबरोबर आईंची आठवण.

पण दिवस सरतच होते. ते एक चांगलं आहे. काळ थिजत नाही म्हणून अश्या काळज्या, चिंता, दु;खं भिजत पडत नाहीत. माणसं पुढे चालू लागतात. एकाच वळणावर थांबून राहता येतच नाही. काळ पुढे सरकत होता हीच काय ती जमेची बाजू. बाकी घराला घर म्हणायला चार भिंती तेवढ्या होत्या. घरातली चार तोंडं चार दिशेला असल्यासारखंच झालं.

अवि आणि तिला रोज घरी यायला उशीर व्हायचा. घरात मुलं एकटीच, खाली खेळून खेळून किती खेळणार? मग टीव्ही नाहीतर गेम. स्तोत्र, गोष्टी सगळं बंद झालं होतं. अभ्यासही जेमतेम व्हायचा. बायका घरात येउन स्वयंपाक करून जायच्या पण मुलं कधी खात असत कधी नाही. परवडच चालू होती मुलांची. अविच्या हे लक्षात येत नव्हतं असं नाही पण कुणी बोलून दाखवत नाही तोवर सगळं आलबेलच असं समजायचं. हा त्याचा नेहमीचाच युक्तिवाद.

“मुलं काही तोंडाने सांगतायत का? आबाजी हवेत म्हणून? आबाजी सुद्धा म्हणत नाहीत मला परत यायचंय वगैरे. तू कशाला उगाच डोक्याला ताप करून घेतेस. आता हे असंच चालणार. वृध्दाश्रमाचा विषय मी नाही काढला. त्यांचीच इच्छा होती. आणि काही नाही मस्त सुखात राहतायत ते त्यांच्या मित्रांबरोबर. प्रत्येकजण या जगात त्याला काय हवं ते करायला मोकळा आहे. पैसा आहे करू देत की enjoy. परवा फोन केला तर मला म्हणाले सुखात आहे मी इथे. चित्तू सायलीची चौकशीही केली नाही साधी त्यांनी.”

“अरे पण मी फोन केला तर माझ्याकडे भरभरून बोलले. दोघांबद्दल खूप विचारत होते. मला काय वाटतं अवि ते जाउन आता झाले २ महिने. एकदा आपण त्यांना बोलावून बघूया का? तू बोलावलंस तर येतील ते परत.”

“मला तशी गरज वाटत नाही. आत्ता तरी. आणि आपण जातोय नं त्यांना दर १५ दिवसांनी भेटायला. त्यांना वाटलं तर सांगतील ते मला पण घेउन जा बरोबर म्हणून. इथे यायची काही बंदी नाहीये त्यांना.”

रेणूला कळेना याला कसं समजवायचं? बाबा म्हातारे झालेत, वयानं तुझ्या पेक्षा मोठे आहेत, शिवाय म्हातारपणी इगो अजूनच हळवा होतो. तू त्यांना जा म्हणून सांगितलंसं. आता तूच त्यांना या म्हणून परत बोलवायला हवंस. तरंच ते येतील. पण हे सगळं जर ती सरळ बोलली असती तर वादच झाला असता.

अजून जखम ओलीच आहे याची, आत्ताच खपली काढायला नको. अजून काही दिवसांनी विषय काढून बघू. म्हणून रेणू गप्प राहिली. निरांजनातल्या तेल आणि वातीपेक्षाही महत्त्वाचं असतं ते ज्योती भोवतालचं आवकाश. सतत तोच तोच विषय काढला तर नुसताच त्रागा होणार. अविला थोडी मोकळीक द्यायला हवी. कदाचित त्याचा तोच परतून, फिरून येईल माझ्या पानावर. आई गेल्यापासून तोही सैरभैर झालाय. त्याचंही अंगण हरवलंय. शिवाय घरातल्या वाढत्या जबाबदाऱ्या. कुठेतरी वाट शोधत हा तणाव बाहेर पडणारच. आणि तो आपल्याच माणसाकडे वाट शोधत येणार.

दिवस असेच जात होते. बाबा रेणूला फोन करून मुलांशी रेणूशी भरभरून बोलायचे पण अविशी मात्र तुटकच. रेणूला कळत होतं त्यांनाही परत यायचं होतं पण कसं जुळवून आणायचं ते कळेना.

बाबा रेणूशी आणि मुलांशी भरभरून बोलतात पण अविशी जेवढ्यास तेवढंच याचा अविला जास्तच राग यायला लागला. दोघंही आपापल्या परीने एकमेकांकडे चालायच्याच प्रयत्नात होती पण वाटाच विरुद्ध दिशेला सरकत होत्या त्याला ती दोघं तरी काय करणार? कित्ती केविलवाणी स्थिती ही. कसला अहं हा. रेणू हे त्रयस्थपणे पाहू शकत होती. पण भूलभूलैयातली वाट कशी? वरतून बघणाऱ्याला स्वच्छ दिसते पण त्यातून चालणाऱ्याला स्वत:च हुडकावी लागते. तसलाच हा प्रकार नै?

रेणूने वेळ पाहून पुन्हा एकदा विषय काढायचं ठरवलं. त्यादिवशी अविही जरा खुशीत होता. पुढले दोन दिवस सलग सुट्टी होती. मुलं आज मामाकडे night out ला गेली होती. बऱ्याच दिवसांनी दोघं एकत्र बाहेर पडले. मूव्ही बघितला. अविच्या आवडत्या restaurant मध्ये जेवले आणि खूप उशीरा घरी आले.

रेणूने मुद्दामच बाबांचा विषय काढला नाही पण घरी आल्यावर मात्र रेणूने सहज म्हणून अविला विचारलं, “पुढल्या आठवड्यात बाबांचा ७५ वा वाढदिवस आहे. तर त्यांना भेट म्हणून त्यांच्याच लग्नातला त्यांचा आणि आईंचा black and white photo colour करून देउया? तुझा तो मित्र आहे नं पक्या, मध्ये म्हणत होतास त्याने नवीन photo lab सुरू केलीये. आणशील त्याच्याकडून करून? हा बघ फोटो. अविने तिच्या हातातून फोटो घेतला आणि बघत राहिला. “आई किती सुंदर दिसतेय नं या फोटोत?” “हो नं आणि बाबा अगदी तुझ्याचसारखे दिसतायत.” रेणू त्याच्या शेजारी बसत म्हणाली. “असेच कुरळे केस, सरळ कुलकर्णी छाप नाक कपाळातून थेट निघालेलं, काळे डोळे, उंची, रंग, सरळ खांदे.... you know… tall, dark and handsome types…”. “हो? अजून?? अजून काय काय similarities आहेत?“ अविच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू होतं. “अजून काय... अजून काही नाही... चावटपणा पुरे...” अवि मनमोकळा हसला. खूप दिवसांनी. “आणतो, कलर करून आणतो. देउया बाबांना” “अवि, सगळं करतोस त्यांच्यासाठी. त्यांची बँकांची कामं करतोस, वेळेवारी औषधं पोचती करतोस, त्यांची मासिकं, त्यांनी सांगितलेली पुस्तकं आठवणीने घेउन जातोस. तुलाही वाटतंयच नं रे त्यांच्याबद्दल तर का नाही बोलवायचं त्यांना घरी?” अविने एक दीर्घ श्वास घेतला आणि रेणूच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, “रेणू, त्यांना वाटलं पाहिजे स्वत:हून, मी वाट बघायला तयार आहे, ते स्वत:हून आले तर मी नाही अडवणार, त्यांनी यावच, हे घर त्यांचच आहे. पण मी आपणहून त्यांना सांगायला जाणार नाही. आणि आता प्लिज आपण दुसरं काहीतरी बोलूया? I don’t want to spoil my mood.” रेणूने विषय सोडून दिला.

त्या दोन दिवसात रोजच्या रामरगाड्यात निसटलेले अनेक क्षण दोघांनी एकत्र शोधले. त्या दोन दिवसांनंतर अविही थोडा खुललेला वाटला तिला. हरवेलेलं माणूस पुन्हा सापडल्यासारखं. मुलांच्यातही तो शिंग मोडून मनापासून मिसळायला लागला. आई असताना वागायचा तसा.

रेणूला जाणवलं, बाबा आणि अवि, दोन आयुष्य एकत्र सरूनही कायम समांतरच राहिलीयेत. या दोन समांतर आयुष्यांना आईच छेदत राहिल्या कायम. पण आता ती छेद देणारी रेषा नाहीशी झाली आणि समांतर रेषा समांतर असल्याचं प्रकर्षाने जाणवतंय. त्या दोघांनाही फक्त आई माहितीयेत. त्या नाहीत तर ही दोघं एकमेकांना अनोळखीच. पण आता या दोन समांतर रेषाच समांतर न राहता एकमेकींना कुठेतरी छेदल्या पाहिजेत. हे समांतर जगणंच थांबायला हवं.

एकदिवस संध्याकाळी रेणू लवकरच घरी आली. दुसऱ्या दिवशी बाबांना सगळेच भेटायला जायचं ठरलं होतं. त्याचीच तयारी चालू होती. बाबांना आवडतात म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या घेउन जाणार होती. घरी आली आणि बघते तर चित्तू विडिओ गेम खेळत बसला होता. तिला माहित होतं दोन्ही मुलं संध्याकाळी खाली खेळायला जातात आज हा घरी कसा काय? “काय रे चित्तू काय झालं आज खाली नाही गेलास?” “नाही, मी मागच्या आठवड्यापासून जात नाही खाली खेळायला.” रेणू आतून हलली. गेल्या आठवड्यापासून हा खाली जात नाही आणि आपल्याला आत्त्ता कळतंय? “अरे पण काय झालं?” “मागच्या आठवड्यात मी क्रिकेट खेळताना पहिल्याच बॉलला आऊट झालो तर सगळे मला चिडवायला लागले. सायलीताईसुद्धा. मग मी घरी निघून आलो आणि त्यांना सांगितलं आता येणार नाही परत कधीच तुमच्यात खेळायला. मग ताई पण म्हणाली, नाही तर जा. बस एकटाच घरी.” रेणूला वाईट वाटलं. संध्याकाळचं लेकरू एकटं घरात बसतं. तिने बाल्कनीतूनच सायलीला हाक मारली आणि ताबडतोब वर बोलावलं.

अवि आज उशीराच येणार होता. ती संपूर्ण संध्याकाळ तिने मुलांबरोबरच घालवली. त्यांनीही तिला करंज्या करायला मदत केली. मुलं आज कित्येक दिवसांनी खुश दिसत होती. मुलांना त्यांच्या आवडीचं करून जेउ घातलं. मग तिघांनी आईस्क्रीमही खाल्लं एकत्र.

रात्री झोपताना तिने दोघांनाही समजावलं, तुम्ही दोघं बहिणभाउ कायम एकमेकांना धरून रहायला हवं. कुणालाही एकटं सोडू नका कधीच. ती बराच वेळ त्यांच्या खोलीत होती. अवि घरात आलेला कळलंही नाही तिला.

जेवायला बसताना अविने विचारलं, “काय आज एवढा वेळ काय चालू होतं माय लेकांचं?” “अरे काही नाही रे, काहीतरी भांडण. गेल्या आठवड्यात खालच्या मुलांनी चित्तूला चिडवलं क्रिकेट खेळताना लग्गेच आऊट झाला म्हणून. हा चिडून वर येउन बसला. आता मी खेळणारच नाही म्हणाला त्यांच्यात. तिथे त्यांच्यामध्ये ताई पण होती चिडवणारी. म्हणून मग तिच्यावरही राग. आज घरी आले तर एकटाच बसला होता गेम खेळत. तर कळलं कि गेल्या आठवड्यापासून जातच नाहीयेत साहेब खेळायला आणि सायलीनेही बोलावलं नाही त्याला. म्हणाली मी नव्हतं सांगितलं त्याला येउ नको खाली. त्याचं त्यानेच ठरवलं. मग सांगितलं त्यांना. म्हटलं, आपल्या माणसाला आपणच समजावून घ्यायचं असतं. त्याने सांगितलं पाहिजे असं नाहीये. तुला कळत होतं नं तो एकटा घरात बसतो मग तू का नाही म्हणालीस त्याला चल खाली म्हणून? तो लहान आहे, त्यावेळी चिडून म्हणाला असेल पण आपला आहे नं तो? आणि त्यालाही बजावलं अश्या छोट्या छोट्या गोष्टींचा एवढा राग धरून बसायचं नाही. तुझेच मित्र आहेत नं सगळे. तू गेलास तर काय येउ नको म्हणणार आहेत का खेळायला? असं दोघांनाही समजावून आले रे. म्हटलं आता सोमवारी जाताना दोघं एकत्र खाली खेळायला जा. समजूतदार आहेत रे मुलं. लग्गेच कबूल झाली. सायली लग्गेच म्हणाली, “मला पण कंटाळा यायचा चित्तू नव्हता तर” आणि चित्तूही म्हणाला, “मला घरी बसून बोअर व्हायचं.” दोघं हात मिळवून झोपली सुद्धा.

रेणू स्वयंपाकघरात पटापट ओटा आवरत अपडेट दिल्यासारखं अविला सगळं सांगत होती, “शेवटी काये नं? प्रत्येक निर्णयाचा review घ्यायला हवा. त्राग्यात एखादा टोकाचा निर्णय घेतला जातो माणसाकडून पण काळानुरूप मतपरिवर्तन होउच शकतं नै का? आणि आपल्या माणसासाठी घेतली थोडी पडती बाजू तर कुठे बिघडलं? हेच मी जरा सोप्या शब्दात मुलांना सांगितलं रे.”

जेवण झालं पण अवि तसा शांतच होता. जेवला आणि बाहेर जाउन टीव्ही बघत बसला. रेणू त्याला लवकर झोपायला ये असं सांगून झोपायला निघूनही गेली.

टीव्ही वरच्या एकाही कार्यक्रमात त्याचं लक्ष नव्हतं. मगाशी रेणूच्या बोलण्यात आलेल्या विचाराने त्याच्या मनाची पकड घेतली, “काय म्हणत होती रेणू? review.... review व्हायला हवा... कसला? एखाद्या निर्णयाचा? त्राग्यात टोकाचा निर्णय घेतला जातो... माणसाकडून... मग त्याचा review कुणी करायचा? त्या स्वत: माणसाने... की... मी...? निर्णय खरोखरच फ़क्तं बाबांचाच होता का? ’जा.. निघून जा... जाता तर.. मीच येतो सोडायला..’ हा घाव कुणी घातला? चुकलंच माझं. आता review मीच करायला हवा.. मी लहान आहे.. लहानपण घेऊन त्यांचं मोठेपण राखायला हवं...” अविने टीव्ही बंद केला आणि स्वत:शीच म्हणाला... “बोलवायला हवं बाबांना.”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

छान आहे.

<< प्रत्येक निर्णयाचा review घ्यायला हवा. त्राग्यात एखादा टोकाचा निर्णय घेतला जातो माणसाकडून पण काळानुरूप मतपरिवर्तन होउच शकतं नै का? आणि आपल्या माणसासाठी घेतली थोडी पडती बाजू तर कुठे बिघडलं? >>

खरंय!

मला उगाच आपली भिती वाटत होती की मुला बिलांना आजारी पाडून इमोशनल झालेल्या आजोबांना भावनेच्या भरात घरी बोलावताय की काय?

पण नाही, तुम्ही माझ्या भितीला अनाठायी ठरवत अगदी यथायोग्य आणि समर्पक शेवट केलात.
अश्या निर्णयप्रक्रियेतून झालेले निर्णय हे भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयापेक्षा दीर्घकाळ टिकणारे असतात.

सो, कथेत जसं घडलंय ते अगदी योग्यच म्हणायचं!

खुप छान. आवडली Happy
समतोल आहे कथेत. साधीसोपी, तर्क्य आणि कमीजास्त फरकानं आपल्या सगळ्यांचीच. प्रत्येक व्यक्तिरेखेचा विचार केलाय, ते स्केचमधे दिसतंय. शेवटाकडे येईपर्यंत शीर्षकाचा संदर्भ लागत नव्हता, शेवटी तो संदर्भ आल्यावर मजा आली. एकदम समर्पक शीर्षक.

छान शैली आहे तुमची Happy

'अगदी अगदी' झालं हे वाचताना. रिव्ह्यू व्हायलाच हवा निर्णयांचा.. विशेष्तः त्राग्यापोटी.. किंवा भावनिक रोलरकोस्टरवर आरूढ असतानाचे निर्णय. आणि त्यातही जेव्हा लहान मुलांचा नासमजपणा किंवा वडिलधार्‍यांचा स्वाभिमान गुंतलेला असतो तेव्हा आवश्यक ते मोठेपण किंवा धाकुलेपण घेऊन आपणच ते जुळवून घ्यायला हवं...

कित्ती नाती सुखी होतील फुला, तुझी ही गोष्टं वाचली, मनावर घेतली तर...
मस्तं फुलवलयस तो छोटुकला विचार.

(सध्या तुला भारी म्हणजे भारीच वेळ मिळतोय असं दिसतय.. एका मागोमाग एक सुंदर लेख येतायत. असच राऊ दे.. मायबोलीवर आवर्जून वाचावं अशातलं लिखाण आहे तुझं)

छान लिहलय आवडली कथा.
“शेवटी काये नं? प्रत्येक निर्णयाचा review घ्यायला हवा. त्राग्यात एखादा टोकाचा निर्णय घेतला जातो माणसाकडून पण काळानुरूप मतपरिवर्तन होउच शकतं नै का? आणि आपल्या माणसासाठी घेतली थोडी पडती बाजू तर कुठे बिघडलं? +१

दिसायला गोवर्धन पर्वताला करांगुळीचाच आधार आणि खरंतर सगळा पर्वतच त्याच एका आधारावर. >>>>> क्या ब्बात!!!

मस्त कथा Happy

अतिशय सुंदर कथा..
रेणू पण सासुबाईंसारखी बॅलन्स्ड वाटली.
सासु हे पात्र अध्याहृत असूनही खूपच ठळकपणे जाणवतेय कथेत.

छाना कथा. आवडली.
मला उगाच आपली भिती वाटत होती की मुला बिलांना आजारी पाडून इमोशनल झालेल्या आजोबांना भावनेच्या भरात घरी बोलावताय की काय?>>>>>>> मलापण असंच वाटत होत.
पण शेवट आवडला.

अप्रतिम!!
<<<शेवटी काये नं? प्रत्येक निर्णयाचा review घ्यायला हवा. त्राग्यात एखादा टोकाचा निर्णय घेतला जातो माणसाकडून पण काळानुरूप मतपरिवर्तन होउच शकतं नै का? >>> खुप सुरेख लिहिलेय.