आवाज इतिहासातल्या सोनेरी पानांचा

Submitted by vt220 on 2 August, 2016 - 06:40

कलर्स मराठीवर ही मालिका सुरू होऊन आता खरे तर ४-५ आठवडे अधिक होऊन गेलेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ३ अतुल्य व्यक्तिमत्वांचे दर्शन मर्यादित भागांच्या मालिकेत सोमवार, मंगळवार रात्रौ ९:३०-१०:३० दाखवणार आहेत. ज्ञानेश्वरांची कथा आधीच संपलीय. कालपासून (१ ऑगस्ट) महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांची कहाणी सुरू झाली.
कालचा भाग छान वाटला. कुमारवयीन ज्योती साकारलाय प्रफुल भालेरावने आणि सावित्री साकारलीय मृण्मयी सूपल हिने. पहिल्या भागात माळी समाजात जन्मलेल्या ज्योतीला कुमार वयात असलेली शिक्षणाची ओढ आणि समाजातल्या पददलितांवर केलेल्या अत्याचाराने व्यथित झालेला ज्योती दाखवला. तशातच आपल्या शाळेतल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात माळी समाजातला म्हणून त्याची स्वत:ची झालेली उपेक्षा ह्याने क्रोधीत झालेला ज्योती प्रफुलने छान साकारला. त्या वयातही ज्योतीला जाणवते की अन्याय तर होतोय, पण तो अन्याय सहन करणे हे देखील चूकच. आणि मग ह्या अन्याया विरोधात तो तर उभा राहीलच पण बाकीच्यांनी पण उभे राहिले पाहिजे. हे कळण्यासाठी त्यांच्यासाठी ज्ञानाची दारे उघडी केली पाहिजेत. तो आणि त्याचा ब्राह्मण मित्र (नाव मी मिस केले) प्रण करतात की आपण समाजातल्या तळागाळातल्या उपेक्षित लोकांना शिक्षण देऊ. आजपासून वयात आलेले ज्योतीराव साकार करीत आहेत प्रसाद ओक आणि सावित्रीबाईंची भूमिका केलीय "का रे दुरावा" मधल्या नेहा जोशीने. नेहाला कधीच अशा रुपात मी पाहिले नाहीय, त्यामुळे तिच्याबद्दल उत्सुकता आहे.

ह्या आधी झालेले ज्ञानेश्वरांचे भाग मी जाता येता बघितले. ते इतके भावले नव्हते. एकतर सौरभ गोखले ज्ञानेश्वर म्हणून डोक्यात काही केल्या बसत नव्हता. आणि पार्श्वसंगीतात करूणरस जरा जास्तच भरलेला. त्या तुकारामांच्या तू माझा सांगाती मध्ये पण करूण रस ठासून भरलाय. म्हणजे आता हे लिहिताना मला सहज वाटतेय मा‍झ्या डोक्यात भक्तिरस अन करूणरस ह्यात गल्लत तर होत नाहीय ना? पण पं. भिमसेन जोशींची अभंगवाणी ऐकताना मनाला जी शांतता वाटते ती नक्कीच तू माझा सांगाती चे पार्श्वसंगीत ऐकताना वाटत नाही. असो...
तर केवळ सौरभ हेच कारण नाही पण एरवी पण ज्ञानेश्वरांच्या काही सर्वपरिचित ओव्या ज्या प्रसंगात गुंफल्या ते मला आवडले नाही. उदा. ज्ञानेश्वरांची बालपणीची मैत्रीण लग्नानंतर गावी परत येते आणि तोवर बऱ्यापैकी समाजमान्य झालेल्या ज्ञानेश्वरांना भेटते आणि मोगऱ्याची फुले देते. त्यांचे संभाषण चालले असताना तिचे वडील येतात. ते अजूनही ज्ञानेश्वरांचा दुस्वास करीत असतात. मग तिघांमध्ये बोलणे होते आणि ते तिला रागावून घेऊन जातात. ते गेल्यावर ज्ञानेश्वर मोगऱ्याची फुले हातात घेऊन बघतात आणि "मोगरा फुलला, मोगरा फुलला" ही ओवी म्हणतात. मला काही हे झेपले नाही.
उंच माझा झोका मध्ये न्यायमूर्ती रानडे झालेला विक्रम गायकवाड ज्ञानेश्वरांचे बाबा झालेला. तो मात्र अशा भूमिकेत खूप छान दिसतो. न्या. रानडे म्हणून मला तो आवडायचा आणि आता ह्यात देखील छान वाटला.

तर सध्या सुरु झालेला महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचा भाग बघायला विसरू नका. झीवर चला हवा येवूद्याचा गोंधळ बघण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा कलर्सने चांगला उपक्रम केलाय. बघायला हवी ज्योतिबा आणि सावित्रीवरची. नाही बघितली. हे संपल्यावर अहिल्याबाई होळकर आहे. उर्मिला कानेटकर असणार आहे त्या रोलमधे.

ज्ञानेश्वर पहीला भाग फक्त बघितला.

सावित्रीबाईंचा शेणाचा मारा सहन करुन गेल्या मंगळवारी झाला. शाळा सुरू झालीय. आता दुसरी मुलींची शाळा चालु होतेय... आता ९:३० कलर्स मराठीवर...

आज रामोश्याकडून हल्ला होणार आहे.

छान मालिका असणार ही,

भारत एक खोज मधे पण महात्मा फुलेंवर एक भाग होत. त्यात बघुतेक सदाशिव अमरापूरकर आणि सुप्रिया मतकरी होते.

भारत एक खोज, फार सुंदर होती. परत पहिल्यापासून बघायला आवडेल तेव्हा शाळेत असताना बघितली आहे.

आवाज आज नाही बघता आली मला. उद्या रिपीट बघायचा प्रयत्न करते नाहीतर voot वर बघेन. तिथे सलग बघता येईल.

भारत एक खोज मराठीमधे गुरुवार किंवा शुक्रवारी दुपारी ४ किंवा ४:३० ला सह्याद्रीवर असतो. एखाद/दोन महिन्यापूर्वी बघितलेले तेव्हा नुकतेच सुरु झालेले. आता कदाचित गौतम बुद्ध वगैरे चालले असेल.

लहानपणी पौराणिक कथांवर आधारित सिनेमे टीव्हीवर दाखवायचे तेव्हा कर्मठ ब्राह्मण ही व्यक्तिरेखा नेहेमीच "लाउड" बघितलेली आठवतेय. तेव्हाचे सगळे सिनेमे आता जुनाट वाटतात. पण ऐतिहासिक सिनेमे आणि मालिकांचे सध्या पुनरुज्जिवन होतेय. आणि कर्मठ ब्राह्मण अजुनही तितकेच "लाउड" दाखवले जात आहेत.
खरेच असे होते असतील का??

DD किसानवरपण मागे सावित्री हि मालिका होती, दीर्घ होती, बालपण जास्त दाखवलं पण त्या मालिकेला पुढे एक्सटेन्शन मिळालं नाही तरी बरेच भाग झाले.

ज्योतिबा- सावित्रीबाई यांच्यानंतर महाराष्ट्रात स्त्री शिक्षण आणि विधवा-विवाह ह्याबाबतीत महर्षी कर्वे यांनीपण फार मोठे कार्य केले.

काल ज्योतिबांनी ब्राह्मण विधवांच्या (खरेतर सर्वसाधारण सगळ्या) अनौरस बेवारशी मुलांसाठी अनाथालय काढले. काशीबाईंच्या (त्यांनी आधार दिलेल्या अशाच एका पिडित विधवेच्या) मुलाला दत्तक घेतले. त्याआधी सावित्रीबाईंच्या वडिलांनी सुचविलेला दुसर्या लग्नाचा प्रस्ताव धुडकावुन लावला. तेव्हाचा नेहाचा अभिनय थोडा जास्तच "underplay" वाटला.

न्या. रानडे यांना दुसरा विवाह तोदेखिल ९ वर्षाच्या मुलीशी केले म्हणुन झापले. तो संवाद छान झाला.

हळुहळू धर्माची अडचण वाढायला लागली आहे. वडिलांच्या श्राद्धाला त्यानी ब्राह्मणांना जेवण घालण्याऐवजी गरिब लोकांना जेवण देणे आणि पाट्या-पुस्तके वाटण्याला प्राधान्य दिले.

आजच्या भागात सत्यशोधक समाजाची स्थापना होईल.

आजच्या भागात केली स्थापना, सत्यशोधक समाजाची.

आज प्रसादचं काम जास्त आवडलं मला. काल न्या. रानडे आणि ज्योतिबा संवाद मलापण आवडला.

जवळपास दीडशे वर्षे होत आली, फुल्यांनी सत्याचा शोध घेत डोळसपणे जगणारा समाज निर्माण व्हावा हे स्वप्न पाहिले... अजूनही अंधकार हटलेला नाहीय... Sad

नेहा जोशी फारच सुंदर काम करतेय.
मी काल रिपीट एपिसोड्स पाहिले. जोतिबांनी घरी आसरा दिलेल्या गरोदर विधवा बाईला मुलगा होतो, जोतिबा त्याला दत्तक घेण्याचा मानस जाहीर करतात, तेव्हाचा नेहा जोशीचा अभिनय एक नंबर होता!! मान गये !!

अरे वा! कलर मराठी वरच्या मालिकेवर धागा! मला वाटलेले माबोवर फक्त झी चेच प्रेक्षक आहेत! Wink

मी आवर्जुन पाहिलिये ही मालिका! थोडक्यात पण छान आहेत...

पुढले भाग अहिल्याबाई होळकर ह्यांच्यावर आहेत असं प्रोमोजवरून दिसतंय. इथली चर्चा वाचून पहायचं धाडस करतेय. Happy

सध्या होळकर कथेत शरद पोंक्षे आणि अश्विनी एकबोटे मस्त काम करतायत. श.पों.चं सून अहिल्याबाईला हाक मारतानाचं 'स्यूनबै...' बेस्ट!

छोट्या अहिल्येचं काम करणारी मुलगी पण चुणचुणीत होती.

अहिल्याबाईंचे यजमान मल्हाररावांइतके कर्तृत्ववान नव्हते असं एकंदर दिसलं.

राघोबादादा पेशवे आणि अहिल्याबाईंच्या सैन्यात लढाई झाली होती आणि त्यात अहिल्याबाईंची सरशी झाली होती असं शाळेच्या इतिहासात वाचल्याचं आठवतंय. ते कसं आणि काय काय दाखवतायत याची उत्सुकता आहे.

मी ही मालिका पहात नाही, पण अहिल्याबाईंचे पती तरुणपणीच धारातीर्थी पडले असं वाचल्याचं आठवतं.
तसंच राघोबादादाशी लढण्यासाठी अहिल्याबाईंनी बायकांची पलटण उभी केली असं वाचल्याचंही आठवतं.
अहिल्याबाईंनी आपल्या एका मुलाला अपराधाई शिक्षा म्हणून हत्तीच्या पायी दिलं होतं असंही ऐकलंय.