स्फुट २३ - मी, एक मिटलेली कळी

Submitted by बेफ़िकीर on 31 July, 2016 - 10:40

बराच वेळ लागला,
एकेका गोष्टीचा अर्थ कळायला,

आजोबांना नमस्कार केल्यावर
पाठीवरून फिरणारा आशीर्वादाचा हात,
शेजारच्या काकांनी घेतलेली प्रेमळ पापी,
पीटीच्या शिक्षकांनी
कवायतीदरम्यान केलेले सहाय्य,
गणेशोत्सवासाठी
नृत्य शिकवणार्‍या सरांचे
बेताल, अनियंत्रित मार्गदर्शन,
शाळेच्या व्हॅनमध्ये बसवताना,
ड्रायव्हरने केलेली मदत,
सगळे किती मायाळू,
किती मदत करणारे

आणि मग एक सामान्य घटना,
पण मनात विस्फोट घडवणारी,
उलथापालथी करणारी,
सगळे संदर्भ पालटवणारी,
घटना काय?
तर लाडक्या मामाचाही एक,
तसाच स्पर्श!

'जपायचं असतं' वगैरे शिकवणी
निरर्थक ठरलेल्या,
घरात, दारात, शाळेत, बसमध्ये,
सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री,
कुठेही, केव्हाही, कोणीही,
हपापलेले, ललचावलेले!!

हे समजल्यापासून,
कैक दशके उलटली असतील,
पण हे सावट,
अखंड पाठलाग करत राहिलं!!

आजची मी,
हे पांढरे केस,
सुरकुतलेली त्वचा,
थकलेली गात्रे,
क्षीण नजर,
कानासाठी यंत्र,
कंबरेला जाड पट्टा,
हातात काठी
आणि तरीही,
भिरभिरत पाहत असते,
आजूबाजूला कोणी गिधाड तर नाही?
अधाशीपणे टपून बसलेले!!

देहाची स्थित्यंतरे....
निसर्गनियमाप्रमाणे झाली खरी
पण,
मनातील निरागसतेची कळी,
कधी फुलली नाही,
'मी, एक मिटलेली कळी'च राहिले

=======================

-'बेफिकीर'!

(एका उपक्रमाअंतर्गत रचलेले स्फुट)

Group content visibility: 
Public - accessible to all site users