स्नेहालय परिसस्पर्श -१

Submitted by विक्रम देशमुख on 30 July, 2016 - 07:46

http://www.maayboli.com/node/59543

दान मानव्याचे - लीला परदेशी

७ वर्षांपूर्वी पुण्यामध्ये ससून रुग्णालयाशेजारी रस्त्याच्या कडेला मी फार विचित्र अवस्थेत पडलेली होते. माझ्या अंगात कपडे नव्हते. घाणीने शरीर बरबटलेले. जागोजागी जखमा झालेल्या. त्यात मी गर्भवती होते. पाशवी अत्याचाराच्या असंख्य खुणा माझ्या सर्व शरीरावर दिसत होत्या. मी अखंड बडबड करीत होते. कोणी काही हातात दिले तर खात होते. लोक म्हणायचे हि वेडी आहे. रात्री सर्व शांत झाल्यावर थोडा वेळ मला बरे वाटायचे. मग हसू यायचे. माझ्यावर १३ व्या वर्षीपासून रोज कोणी ना कोणी अत्याचार केले. मला त्यांची नवे आणि आता तर चेहरेही आठवत नाहीत. अशा लोकांना कोणी वेडे म्हणत नव्हते. एक-दोनदा कोणीतरी वृत्तपत्राचे प्रतिनिधी येऊन फोटो काढून घेऊन गेले. कुठेतरी बातम्या आल्या. मनोविकलांग अत्याचारित स्त्री रस्त्यावर, असे काही तरी लिहिलेले होते. मग ससून हॉस्पिटलचे काही लोक येऊन खून शिव्या देऊन गेले. त्यांचे हॉस्पिटल उपचार द्यायला आहे भिकारी सांभाळायला नाही. मी कुठेही जाऊन मारावे, पण त्यांच्या रुग्णालयाच्या बाहेरील फुटपाथवरून उठावे, नाहीतर ...... असे दम मला अनेकदा मिळाले. मी म्हणायचे मला दुसरीकडे नेऊन टाका. माझी कुठेही चालत जाण्याची परिस्थितीच नाही. असेच बऱ्याचदा झाले. माझा सांभाळ करण्यासाठी सामाजिक अथवा सरकारी संस्था पुढे येत नव्हती. पुण्यातील एका संस्थेने माझी विचारपूस केली. पुण्यात माझ्यासारख्या बायकांना ठेवायला कुठलीच संस्था आणि जागा नाही असे मला सांगण्यात आले. माझी माहिती स्नेहालयात कळविण्यात आली. स्नेहालयाने माझा सांभाळ करण्याची जबाबदारी उचलली. वर्ष २००९ साली रात्री १० वाजता मी स्नेहालयात आले. मला माझे नावाचं पहिले ३ दिवस आठवत नव्हते. ते अचानक आठवल्यावर मी परिचारिकेला त्वरित ओरडून सांगितले, माझे नाव लीला, लीला परदेशी.

माझ्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. मला स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखविले. तपासणीनंतर लक्षात आले कि, मला एच. आय. व्ही ची बाधा झाली आहे. तसेच मी ७ महिन्यांची गर्भवती आहे. त्यानंतर मला एच. आय. व्ही बाधित लोकांसाठी कार्यरत असणाऱ्या स्नेहालयाच्या स्नेहदीप रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मी स्नेहालयमध्ये आले होते तेव्हा माझी मानसिक व शारीरिक स्थिती अतिशय खालावलेली होती. मी स्वतः:विषयी व इतरांविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. स्वतःचे शरीर, त्याची स्वच्छता याचे कुठलेही भान मला नसायचे. मलमूत्र विसर्जनासह सर्व गोष्टी जागेवरच होत्या. मला इतर कोणी बोललेले समजायचे नाही. स्वतःचे कुठलेही काम मला करता येत नव्हते. माझा कोणाला कसलाही उपयोग नव्हता. प्रत्येकाला फक्त माझा त्रासच सोसावा लागत होता. पण पूर्वी पुण्यात असताना लोक तोंडावर म्हणायचे की, ही बाई लवकर मरत का नाही, तसे इथे कोणी म्हणत नव्हते. महत्वाचे म्हणजे मला दररोज अंघोळ घालून स्वच्छ केले जाई. तसेच जितक्या वेळा मी नैसर्गिक विधी करत असे, तेवढ्या वेळा माझी स्वच्छता केली जाई. त्यामुळे मला मी माणूस असल्यासारखे वाटू लागले. त्यावेळची माझी अवस्था पाहून मी नीट होऊ शकेल आणि स्वतःची कामे स्वतः करू शकेल असा विश्वास कोणीही ठेवला नसता. स्नेहदीप रुग्णालय, समुपदेशक, डॉक्टर, परिचारिका, क्षेत्रीय अधिकारी या सर्वांसाठी मी एक आव्हान बनले होते.

ही ७ महिन्यांची गरोदर एका बाळाची काळजी कशी घेणार, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता. माझे मलमूत्र साफ करण्यापासून ते मला रोजच्या ए. आर. टी.च्या गोळ्या देणे, हि सर्व कामे माझ्याकरिता स्नेहालय परिवार करी. बऱ्याच जणांनी मला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला माझ्या तोंडावरच दिला. परंतु माझ्या समोरच अशा प्रस्तावांना ठाम नकार मिळायचा. रक्तवाढीची औषधे मला उपयोगी पडली. मला खजूर, हिरव्या भाज्या आणि फळे मिळायची. माझ्यातील बदल मलाच जाणवत होता. मी पहिल्यासारखी स्वतःशीच बोलणारी, बोलताना कसलाच विचार न करणारी, कोणी जोरात बोलल्यावर संरक्षणासाठी अंगावर धावून जाणारी लीला राहिलेली नव्हते. स्वतःचे जेवण मी स्वतःच घेऊ लागले. जेवणात उष्टे टाकलेले चालत नाही, हे माझ्या लक्षात आले. माझे ताट मीच स्वच्छ करू लागले. मला माझे पूर्वायुष्य हळूहळू आठवू लागले. लहानपणापासूनच गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे वयात येण्यापूर्वीपासून सुरु झालेले लैंगिक अत्याचार, पळून जाऊन केलेले लग्न, पतीकडूनच सुरु झालेला प्रचंड छळ, या छळास कंटाळून एके दिवशी घरातून चालून जाणे आणि नको तिथे पोहोचणे, हे सर्व आठवले. त्यानंतरचे अनुभव शहारे आणणारे होते. कारण घर सुटलेल्या मुली आणि महिला जेथे नेल्या जातात, त्याठिकाणी मला फसवून नेण्यात आले. येथे येता येते, पण परत समाजात किंवा घरात
परतता येत नाही. नाइलाजाने लैंगिक शोषण आणि अत्याचार सोसून पोटाची खळगी भरत राहिले. दरम्यानच्या काळात एच. आय. व्ही. आणि गर्भधारणा अशी दोन संकटे अंगावर आली. मग मला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करून माझे शरीर विकणारे बेपत्ता झाले. तेथून आठवड्यानंतर माझ्या हातात डिस्चार्ज कार्ड देऊन बाहेर ढकलण्यात आले. तेव्हा पासून ससूनच्या दारात मी पडले होते. माझ्याकडे बघून लोक मला वेडसर म्हणू लागले.

दुर्दैवाने माझे बाळ मृतावस्थेत जन्मले. प्रसूतीनंतर योग्य काळजी रुग्णालयात घेण्यात आली. त्याच एक दीड महिन्याच्या काळात मला क्षय रोगाची लागण झाली. मला या गोळ्यांचा खूप त्रास व्हायचा. तरीही स्नेहदीपचे काळजीवाहक रोज माझ्या गोळ्या गुळामध्ये पावडर करून देत. मला राग येत असे. त्या गोळ्या त्यांच्याच अंगावर मी फेकत असे. काळजीवाहकांनी माझा क्षयरोगाच्या गोळ्यांचा कोर्स पुरा करून घेतला. मी सर्व गोळ्या नंतर व्यवस्थित घेऊ लागले. मी स्वतः स्नेहदीप रुग्णालयांमध्ये येऊन झाडणे, स्वतःचा बिछाना, कपडे धुणे इ. कामे करू लागले. मला नवीन कपडे घातले, वेणी घातली तर ती मी सर्वांना दाखवते. माझे सर्वांनाच कौतुक वाटते. मला चहा खूपच आवडतो. मी दिवसातून ३ वेळा ना चुकता चहा घेते. सर्वजण म्हणतात मी स्नेहदीप रुग्णालयातील सर्वात चांगली सिस्टर आहे. माझे काम प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. मी म्हणते, माझी घाण स्नेहलयातील लोकांनी किळस न करता साफ केली. मला नवे जीवन दिले. मग मलाही इतर अशाच महिलांसाठी हेच काम करायला नको का? स्नेहालयात यायला बराच उशीर झाला, एवढेच दुःख. पण अगदी थोडे भाग्यवान माझ्यासारखे मृत्यूपूर्वी स्नेहालयात पोहोचतात. त्यामुळे पुढच्याच क्षणी मला माझे भाग्य थोर वाटते.

ई-मेल: feedback@snehalaya.org

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<स्नेहालय म्हणजे सोलापुर च्या सिंघवी सरांची संस्था
खुप मोठा माणुस>>

स्नेहालय हि संस्था अहमदनगर येथे गिरीश कुलकर्णी यांनी २६ वर्षांपूर्वी स्थापन केली आणि सुवालालजी शिंगवी हे सध्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. स्नेहालयाच्या अनेक शाखा सोलापूर तसेच इतरही अनेक ठिकाणी कार्यरत आहेत.