सर गॅरी सोबर्स @ ८०

Submitted by रिव्हर्स स्वीप on 28 July, 2016 - 20:33

क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये ६ सिक्सर्स मारणारा बॅट्समन कोण असा प्रश्न आजच्या २०-२० च्या जमान्यात विचारला तर ८०% लोक नाव घेतील ते युवराज सिंगचं. उरलेल्यांपैकी बर्‍याच जणांना हर्शल गिब्जही आठवेल आणि मेंदूला जास्तं ताण दिला तर कदाचित रवी शास्त्रीही. परंतु युवराज-गिब्ज यांचा जन्म होण्यापूर्वीच आणि शास्त्री जेमतेम ५ वर्षांचा असताना हा पराक्रम करणारा पहिला बॅट्समन होता तो म्हणजे गारफिल्ड सोबर्स! ३१ ऑगस्ट १९६८ या दिवशी नॉटींगहॅमशायरसाठी खेळताना सोबर्सने ग्लॅमरगनच्या माल्कम नॅशवर एका ओव्हरमध्ये ६ सिक्सर्स खाण्याची वेळ आणली. त्याआधी दहा वर्षांपूर्वी १९५८ मध्ये त्याने लेन हटनचा ३६४ रन्सचा विक्रम मोडीत काढत इनिंग्जमध्ये ३६५ रन्स फटकावल्या होत्या. (सोबर्सचा हा विक्रम पुढे ब्रायन लाराने मोडला).

वासिम अक्रम (की अ‍ॅलन डेव्हीडसन?) हा सर्वोत्कृष्ट लेफ्ट हँड बॉलर तर ग्रॅहॅम पोलॉक (की नील हार्वे?) हा सर्वोत्कृष्ट लेफ्ट हँड बॅट्समन पण पोलॉकचा सहकारी असलेल्या बॅरी रिचर्ड्सने मोस्ट कंप्लीट बॅट्समन म्हणून गौरवलं ते सोबर्सलाच. खुद्दं डॉन ब्रॅडमनने सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून सोबर्सचंच नाव घेतलं आणि आपल्या ११ जणांच्या संघात त्याला स्थान दिलं. वेस्ट इंडीजचा कॅप्टन म्हणून सोबर्सची कामगिरी दैदीप्यमान आहेच, त्याचबरोबर क्रिकेटमधील कामगिरीसाठी सरदारकी बहाल करण्यात आलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी तो एक आहे.

असा हा अवलिया क्रिकेटर आज २८ जुलैला वयाची ८० वर्ष पूर्ण करत आहे. ब्रॅडमननाही न जमलेली किमया त्यानी करावी आणि वयाची शंभरी गाठावी एवढीच बाप्पाकडे प्रार्थना आणि शुभेच्छा!

हॅपी बर्थडे सर गॅरी सोबर्स!

माल्कम नॅशला मारलेल्या सहा सिक्सर्स

ऑस्ट्रेलिया विरुद्ध रेस्ट ऑफ द वर्ल्ड या सिरीजमध्ये डेनिस लिली प्रभृतींची धुलाई करत ठोकलेल्या २५४ रन्स

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोबर्स याना मनःपूर्वक शुभेच्छा.
सोबर्स यांचा खेळ म्हणजे नजाकत व रुबाब याचं एक लोभस मिलनच ! क्रिडाक्षेत्रातल्या जातीवंत प्रतिभेचा एक सुंदर, दुर्मिळ अविष्कार ! आणि सर्वस्व पणाला लावून खेळतानाही, क्रिकेट हा आनंद घेण्याचा व देण्याचा एक खेळच आहे याचं सदैव भान राखणारा, म्हणूनही मला खूपच भावलेला असामान्य खेळाडू !
मला पक्कं आठवतं कीं - १] आपण पाहिलेली ही क्रिकेटमधली सर्वोत्तम खेळी आहे, असं डॉन ब्रॅडमन यांनी सोबर्सच्या त्या २५४च्या खेळीबद्दल म्हटलं होतं २] सोबर्सने ज्या बॅटने ती खेळी केली , ती बॅट त्याने नंतर गावसकरला बक्षिस म्हणून दिली होती.