अस्से पाहुणे सुरेख बाई

Submitted by सुजा on 25 July, 2016 - 03:17

हा आणि असा प्रसंग घरोघरी घडत असेल कदाचित. तोच माझ्या नजरेतून Happy

तर सुट्टीचा दिवस बर का . घरातले सगळे सुस्तावलेले . ( सुट्टीच्या दिवशी आणखी काय ? ) जरा आरामातच आणि आणि अचानक पाहुण्यांचा फोन येतो " आहात का घरी ? ( आत्ता सुटीचा दिवस . सकाळ सकाळी जाणार कुठे ? ) पाहुण्यांचा खुलासा "काय आहे कि जरा तुमच्या घराच्या जवळच येतोय कामाला. मग विचार केला तुमच्या घरी पण यावं . कसं काय ? येऊ ना ? नाही म्हणजे येतोच बर का एक तासाभरात" आत्ता म्हणजे "येऊ का ? "असं विचारत "येतोच" असं सांगितलं जात आणि सगळे खडबडून जागे होतात . आता हे पाहुणे म्हणजे काय चांगले मित्र . फक्त नातेवाईक नाहीत म्हणून पाहुणे म्हटलं.

माय गोड. तासाभरात येताय ?. डोळ्यावरचा आणि अंगातला आळस खाडकन उतरतो आणि "चला चला पाहुणे येताहेत" च्या हाकाट्या सुरु होतात. मग काय ? विजेच्या चपळाईने घर आवरल जात. दर्शनी खोली तर अगदी नीटनेटकी केली जाते . "कसला पसारा असतो घरात . काय हे ? शी. कोणी आवरायचा हा पसारा ? मीच ना ? माझ्याशिवाय दुसरं आहे कोण ? "असा उद्धार करत करत घाई घाईने बाहेरच्या खोलीतल्या काही गोष्टी बेडरूम मध्ये बेडवर फेकून दिल्या जातात. अगदी फेकाफेक नुसती. अगदीच घरच्या स्पेशल अवतारात असतो म्हणून पटापट बाहेरचे कपडे घातले जातात आणि पाहुण्याच्या स्वागताकरता तयार होत असतोच तेवढ्यात अगदी तेवढ्यातच पाहुण्यांची बेल वाजते . मनातल्या मनात "झाला का एक तास ? आले का ? "अस म्हणत दार उघडल जात. सुहास्य वदनानि वगैरे वगैरे. ( मस्ट आहे ते ) " या या या . अलभ्य लाभ- अलभ्य लाभ . किती दिवसांनी?/ किती महिन्यांनी?/ किती वर्षांनी? नाही का ?आमच्या या घरात आलाच नाहीत ना तुम्ही ? "वगैरे वगैरे नेहमीच्याच वाक्यांची फेकाफेक होऊन पाहुण्यांना स्थानापन्न केलं जात . स्थानापन्न झाले की मग काय गप्पांचा मोठ्ठा कार्यक्रम . किती त्या गप्पा . इकडच्या तिकडच्या / घरच्या -दारच्या अगदी जगाच्या बातम्यांच सुद्धा आदान- प्रदान होत. त्यानंतर घरात "आयत्या वेळी उपलब्ध असलेल्या पदार्थातून" पाहुण्यांचं रीतसर आदरतिथ्य होत. व्हायलाच पाहिजे. पाहुणे आहेत ते ( आयत्या वेळी उपलब्ध असलेल्या असं का म्हटलं कारण कधी पोहेच संपलेले असतात तर कधी रवा.. गेला बाजार घरी अचानक आलेल्या पाहुण्यासमोर ठेवायला चिवडा / चकल्या /शेव म्हणून जे काही खाद्यपदार्थ स्टोक मध्ये ठेवायची पद्धत असते तेही संपलेले असतात. त्यावरून घरातल्यांशी थोडीशी शाब्दिक चकमक पण झालेली असते )

या सगळ्या गडबडीत आपण अधून मधून किचन मध्ये जात असतोच . चहाच बघायला म्हणा किव्वा किचनमध्ये काही आवरायला म्हणा . त्याचवेळी पाण्याचा रिकामा ग्लास "किचन" मध्ये ठेवण्याच्या निमित्ताने पाहुणे "किचन" मध्ये येतात. खर तर आपल्याला पत्ताच नसतो. पण "किचन केवढी मोठी आहे ना तुमची? " असा पाहुण्यांचा प्रश्न येतो आणि पाठमोर्या असलेल्या आपल्याला समजत पाहुणे "किचन" मध्ये आलेत तर . आपण कसनुस हसून म्हणतो "हो ना ". किचनच्या शेजारीच लागून बेडरूम असते आणि आपल्या पोटात गोळा येतो. सर्रकन विचार येतो "अरे बापरे. आत्ता हे बेडरूम कडे वळणार नाहीत ना ? " तरी आपण पाहुणे यायच्या आधीच खर तर त्यांची बेल वाजते तेव्हाच चपळाईने बेडरूमच दार किंचित ओढून घेतलेलं असतच तरी सुद्धा ( अगदी तरी सुद्धा ) नाही म्हटलं तरी थोडेसे धास्तावतोच . आणि आणि " हि बेडरूम का ?" असा अगदी नको असलेला प्रश्न येतोच ( मनातल्या मनात . छान. अरे लबाडा . म्हणजे आत्ता तुम्हाला बेडरुममध्ये पण डोकावायच आहे तर ) . " जरा बघू का ? " अशा प्रकारचा त्यांच्या मनातला सुप्त उद्देश ओळखून आपण पण नाईलाजानी डोळे मिटून ( अरे देवा त्या बेडवर किती तो पसारा असा मनाशी विचार करत हळूच बेडरुमच दार उघडतो .) खोट खोट हसून " त्याच काय आहे आमची बेडरूम जरा अस्ताव्यस्त झालेय बर का" म्हणून सारवासारवीही करतो.

तर पाहुणे लगेच म्हणतात " अहो काही हरकत नाही हो .आमच्या घरी पण असच असत."
प्रचंड आनंद. गुदगुल्या बिदगुल्या . अगदी तेवढ्यापुरता महा आनंद . काय सांगता काय ? ( मनातल्या मनातं )
अगदी खर सांगायचं तर " खर कि काय ? द्या टाळी. " असं म्हणून मला पाहुण्यांकडे टाळीच मागावीशी वाटते. पण महत प्रयासाने तो विचार बाजूला सारला जातो . यथावकाश पाहुणे जसे येतात तसेच थोड्याच वेळात जातात पण आणि "हुश्श "होत .पाहुणे गेल्यानंतर किचन मधल आवरता आवरता मी तो बेडरूमचा प्रसंग घरातल्या सगळ्यांना अगदी हावभावासकट सांगते आणि अख्ख घर हास्य कल्लोळात बुडून जात. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख. प्रत्यकाच्या आयुष्यात एकदातरी आलेला प्रसंग Happy

आणि ते खाण्याच्या सामानाबद्दल तर अगदी अगदी.

Happy हो, अशी धावपळ, त्रेधातिरपीट होतेच.
आता जास्त मनावर न घ्यायला मी तरी शिकलोय.

आमच्या घराजवळ सगळी दुकानं, स्टॉल्स आहेत. फरसाण, इडली दोसा, मिठाई सगळं हाकेच्या अंतरावर त्यामुळे अचानक पाहुणे येत असतील किंवा सरळ दत्त म्हणुन दारातच उभे टाकले तरी स्वागत सोहळा उरकुन गप्पा मारायला बसल्यावर न कचरता "आमच्याइथली इडली काय मस्त मिळते, आणि सांबारपण लाजवाबच,तुम्ही खाउनच बघा!" असे म्हणुन आणायला त्यांनाच सोबत घेउन जाण्याइतपत मी निर्ढावलो आहे.

आमच्याकडे फार पसारा वगैरे नसतो पण ऐन जेवणाच्या वेळी हे 'पाहूणे' हजर होतात....आणि त्या दिवशी हटकून भेंड्याची किंवा वांग्याची भाजी असते.. Lol
आणखी एक म्हणजे चहाला दूध संपलेले असताना येणारे पाहूणे. उन्हाळ्यात सरबतावर भागवता येते पण इतर वेळी मात्र चांगलीच फजिती होते.

छान लिहीलय.... घरोघरची व्यथा... Happy

>>>> असे म्हणुन आणायला त्यांनाच सोबत घेउन जाण्याइतपत मी निर्ढावलो आहे. <<<< व्वा.. हे ब्येस..!

>>>> पण इतर वेळी मात्र चांगलीच फजिती होते. <<<< फजिती की काय हे तुम्ही काय मानता यावर अवलंबुन आहे, अन "आमच्यात' पाहुणा काय "मानेल" यावर स्वतःची फजिति ठरवावयाची पद्धतच नाही....
आता नाहीये, दूध, संपल असेल, उतू गेल असेल, मांजरीने प्यायले असेल, नासले असेल, शेजारच्या मंग्याच्या आईने नेले असेल..... काल महिना अखेर, तर रोख पैका नसल्याने काल खाडाच केला असेल.. काहीही कारण असू शकते,
तर आत्ता दुध शिल्लक नाही, आणांव लागेल हे व्यक्त/उघड करायला मला लाज का वाटली पाहिजे ? अन कुणाची?
का म्हणून आमच्या घरी अगदी सगळी "सुबत्ता" आहे हो हे दाखवायची नाटके करीत बसायची? अन कुणाला दाखवायला?
ऐनवेळेस दुध संपले/साखर-चहा पावडर संपली तर का म्हणून मी "ओशाळे" व्हायचे? कुणासमोर? का? मी ओशाळे झालो तर माझ्या घरचे रेशन ते भरु लागणार आहेत का? कैच्याकैच....
इकडे दिवसा आड पाणी येतय, आदले दिवशी भरुन ठेवलेल पाणी दुसरे दिवशी दुपारपर्यंत कटानकट पुरते आंघोळी/धुणी - संडासबाथरुम अन पिण्याकरता.... ! आता कधी हा अंदाजही चुकतो, प्यायला-शिजवायला अगदी एखादे पातेलेभर पाणी शिल्लक असते.... ! मग काय त्याकरताही ओशाळे व्हायचे? आता नै येत आमच्याकडे २४ तास पाणी, नाहीयेत आमच्याकडे हजारबाराशे लिटारच्या टाक्या, नाहीये अंडरग्राऊंड/छतावरिल टाक्या अन पम्प, मग काय मी लाजुन, स्वतःस गुन्हेगार समजुन पाहुण्यांपुढे काय उठाबशा काढाव्यात काय?
आता हल्लीचे बरेच पाहुणे आल्या आल्या हाशहुश्श करु लागतात, अन कित्ती बै उकडतय, एसी नै का तुमच्या कडे? आता अशा पाहुण्यांसमोर काय लग्गेच लाजुन लालेलाल व्हाव का की असा कसा नाही एसी माझ्याकडे....!
अशा हाशहुश्श करणार्‍या पाहुण्यांना मग अगदी गारेगार पाणी हव लागतं..... आम्ही पुढे करतो माठातील पाणी..... नाहीये फ्रिज आमच्याकडे, पण मग म्हणून काय लगेच पाहुण्यांपुढे शरमुन जावे की काय?
शरम/लाज त्याची बाळगावी, तो देव, ज्याच्यामुळे आज आपण पृथ्वितलावर अजुनही जिवंत आहोत. बाकी कुणाची ही लाज बाळगायची गरज नाही, फजिती झालीये असे वाटून घ्यायची गरज नाही.
व आम्हीही कसे तुमच्याच "तोलामोलाचे' आहोत याचे प्रदर्शनही करण्याची गरज नाही, असे आपले बोवा मला वाटते, बर का !

पाहुण्या आलेल्या उपद्रवी कार्ट्यांबद्दल कुणीच कसे काहि नाही लिहिले?
जिथेतिथे ज्या त्या वस्तुंना हात लावत उचकापाचक फेकाफेक पळापळी करीत धुमाकुळ घालणार्‍या लाडाच्या कोडांच कुणीच कस लिहिल नाहीये?
एखादा धागा येऊद्या त्यावरही...... का ऋन्मेषला सांगू धागा काढायला? Wink पण तो काढेल का असल्या गृहस्थाश्रमी जीवनावरचे धागे? Proud

मस्त लिहिलय.

एकदा असच झंझावाती आवरा आवरीत घराच कुलुपच कुठे टाकल ते आठवेना. खूप शोधशोध करावी लागली रविवारी रात्री तेव्हा सापडल.

लिंबू लहान मुलाबद्दल अगदी अगदी. आमच्या घरातलाच एक असाच होता उपदयापी .
अशा लाडा कोडाच्या धुमाकुळ घालणार्‍या उपद्रवी कार्ट्यांबद्दल ऋन्मेषलाच सांगा धागा काढायला ? Wink
दिनेश Happy

छान लिहिलंय. वाचता वाचता आमचेच घर डोळ्यासमोर ठेवता आले आणि सगळे रिलेट झाले.
फरक ईतकाच की माझी आई पसारा आवरताना आली आणि तो माझ्यामुळे झाल्याने मला शिव्या घालताना आली. एवढेच नव्हे तर मी घरच्या बनियानवर बेडरूममध्येच बसायचे की शर्ट चढवून पाहुण्यांना चेहरा दाखवणे गरजेचे आहे हे सुद्धा आमच्याकडे तीच ठरवते. अश्यावेळी चेहरा दाखवणे गरजेचे आहे क्याटेगरीतले पाहुणे आले की डोक्याला शॉट लागतो. तसेच बेडरूमपर्यंत जे पाहुणे पोचतात त्यांना आपण शॉर्ट घालून अस्ताव्यस्त पसरलेले दिसायला नको म्हणून पटकन ल्यापटॉप मांडीवर घ्यावा लागतो. अश्या अवघडलेल्या स्थितीत त्यांना स्माईल देणे दिव्य असते. वर ल्यापटॉप बघून त्यांना पोरगा कामकाज काय करतो हा प्रश्न साहजिकच पडतो. त्याचेही उत्तर द्यावे लागते. अश्यावेळी मग एवढा मोठा लग्नाचा घोडा झालाय पण शॉर्ट आणि बनियानवर घरात फिरतो असे त्यांना वाटत असेल असे आपल्याला उगाचच वाटते. कहर म्हणजे मध्येच ते द्रुश्य पाहून माझ्या आईला माझे कौतुक करायची हुक्की येते आणि ती पाहुण्यांना त्या ल्यापटॉपबद्दल एक स्फोटक माहीती पुरवते.. तो ना, काही ना काही लिहित असतो, लिहायची आवड आहे त्याला.. मग खेळ खल्लास, काय कुठे कसल्या प्रकारचे लिहितो हे समजावणे कठीण होते.