बा विठ्ठलाने तरी काय करावे?

Submitted by मयुरा on 19 July, 2016 - 07:22

आषाढी एकादशीची महापूजा झाल्यापासून आपला सावळा विठ्ठल फारच चिंतेत सापडला आहे. तो भक्ताच्या मनीचा भोळा भाव जाणणारा. बिलंदर राजकारण्यांची लबाडी त्याच्या कुठली ध्यानी यायला? त्यामुळे वर्षानुवर्षे राज्याचे प्रमुख त्याला आपले वेठीला धरतात. राज्याच्या कल्याणाची, शेतकर्‍यांच्या खुशीची, पाऊस पाडण्याची जबाबदारी त्याच्यावर ढकलून पुढचे राजकारण करायला मोकळे होतात. याहीवर्षी तसेच झाले आणि सावळा विठ्ठल पुन्हा एकदा संकटात सापडला. यंदाही राज्यात सुखसमाधान, शांतता नांदू दे. शेतकर्‍यांचे भले कर..भरपूर पाऊस पाड...दुष्काळाला पळवून लाव...असे साकडे प्रमुखांनी घातले आणि त्यांचे विमान भुर्रकन उडाले.
हे सारे आपण करायचे तर मग ज्यांच्या हाती सत्ता त्यांनी नेमके काय करायचे? या चिंतेने विठ्ठल बिचारा हतबुद्ध झाला.
राजकारणी भलते हुशार. त्यांनी विठ्ठलाला जनतेचे भले कर असे साकडे घातले खरे पण ते तर त्यांनीच अशक्य करून ठेवलेले. म्हणजे अगदी शब्दश: सहकुटुंब सहपरिवाराने स्वत:च्या तुंबड्या भरत राहायचे. जमेल तसा आणि जमेल तिथे हात मारायचा. सरकारी तिजोरीला भगदाड पाडत राहायचे. सत्तेचा पुरेपूर उपभोग घ्यायचा. बरे यांची भूक पण बकासुरीच. कितीही खाल्ले तरी पोट काही भरत नाही. सात पिढ्या बसून खातील इतके कमावले तरी ढेकर काही देत नाहीत. कितीही खाल्ले तरी यांना अपचन कधीच होत नाही. पैसे तर खातातच पण शासनाच्या योजनाही खातात. मोठी धरणे गायब करतात. छोटे-मोठे तलाव, विहिरी, भरणपोषणाच्या योजना, जनहिताचे अनेक निर्णय यांचे नामोनिशान ठेवत नाहीत. कामे केली तरी लाभार्थी फक्त आपलेच सगेसोयरे असतील याची काळजी घेतात. हे करून वेळ उरलाच तर ‘संगीत खुर्ची’चा खेळ खेळतात. खुर्ची आपल्यालाच मिळावी यासाठी जीवतोड मेहनत घेतात. यांना शक्य झाले असते तर यांनी निवडणूक कायमची रद्द केली असती आणि खुर्चीला कायमचा डिंक लावून टाकला असता.
खरे सांगा, आता राजकारण्यांनी हे सारे करायचे तर मग जनकल्याणासाठी वेळ मिळेल का त्यांना?
गेली अनेक वर्षे धरणांमध्ये, साठवण तलावांमध्ये, पाटबंधार्‍यांमध्ये फक्त पैसाच वाहिला. मग नदी बारमाही वाहणार कशी? विहिरींना पाझर फुटणार कसा? पाणी अडणार तरी कसे आणि कुठे? मग दुष्काळ पडेल नाही तर काय होईल? जनतेला काय लागते उगाच बोंबाबोंब करायला आणि राजकारण्यांच्या नावाने बोटे मोडायला? ते तर फक्त ‘पैशाचा पाऊस’ पाडण्यासाठीच प्रसिद्ध. उगा आपले त्यांच्याकडून नाही त्या अपेक्षा करायच्या आणि स्वत:चेच हसे करून घ्यायचे.
आता मला सांगा, हे सारे साधायला, जनतेला टोपी घालायला, लुच्चेगिरी करायला का कमी बुद्धिमत्ता लागते? वेळ का थोडा लागतो? मग यांनी कधी बरे जनकल्याण करायचे? मग ते साधा, सोपा, सरळ आणि बिनखर्चाचा (म्हणजे शासकीय खर्चाचा हो) मार्ग शोधतात. दिनांचा कैवारी, दु:खितांचा सोयरा अशा विठ्ठलाचे पाय धरतात. त्यालाच साकडे घालून सुसाट सुटतात.
राज्याच्या कल्याणाची जबाबदारी जनता मोठ्या विश्‍वासाने कोणाच्या ना कोणाच्या हाती सोपवते. कधी या पक्षाच्या तर कधी त्या पक्षाच्या. कधी या पुढार्‍याच्या तर कधी त्या पुढार्‍याच्या. दरवेळी तिलाही ‘सारे एकाच माळेचे मणी’ याचा साक्षात्कार होतो पण त्याला उशीरच झालेला असतो. मग तीदेखील आपले सारे भलेबुरे परमेश्‍वराच्या हातात सोपवून निवांत होते.
ज्यांनी हे सारे करायचे ते आपल्याला साकडे घालतात. ते काम आपण करायचे तर मग नेमके त्यांनी काय करायचे? हा प्रश्‍न विठ्ठलाला पडला. त्याचे उत्तर विचारण्यासाठी त्याने पंढरपुरात फेरफटका मारायचे ठरवले आणि चंद्रभागेच्या वाळवंटात धाव घेतली. तो काय, ‘खेळ मांडियेला’ म्हणत ते सारे वारकर्‍यांनी फुलून गेले होते. ‘नामाचा गजर..गर्जे भीमातीर’ अशी भारल्यासारखी अवस्था झालेली होती. रामकृष्ण हरी..पांडुरंग हरीचा गजर टिपेला पोहोचला होता. टाळांचा आणि मृदुंगांचा आवाज आसमंतात भरून उरत होता. निष्काम भक्तीचा मळा फुलला होता. मुक्तहस्ते बुक्क्याची उधळण होत होती. एवढ्याशा पंढरपुरात गर्दीचा महापूर आला होता. गर्दी म्हटले की गैरसोय आलीच. पण ती तर कोणाच्याच गावी नव्हती. तक्रारीचा सूर शोधून पण सापडत नव्हता. सार्‍यांना एकच आस होती. सारे भूक-तहान विसरून गेले होते. कैक किलोमीटर चालल्याची खूण कुठेच सापडत नव्हती. जणूकाही ‘विमानानेच’ ते इथे आले असावेत असाच भाव दाटला होता. कोणाचेच विठ्ठलाकडे काही मागणे नव्हते. ‘सुखालागी करिसी तळमळ | तरी तू पंढरीसी जाय एकवेळ | मग तू अवघाचि सुखरुप होसी’ अशीच भावना मनात दाटली होती.
भक्तीचे हे निरामय रूप पाहून सावळा पांडुरंग क्षणभर स्वत:ला देखील विसरला. खरे तर त्याने यावर्षी राजकारण्यांना चांगलाच धडा शिकवायचे ठरवले होते. त्यांनी घातलेले साकडे कानाआड करायचे ठरवले होते. पण आपण असे केले तर आपले हे भोळे भक्तच वेठीला धरले जातील, त्यांनाच त्याचे परिणाम सहन करावे लागतील हे त्याच्या लक्षात आले. मग भक्तांसाठी वाळवंटात धाव घेणार्‍या, वेळप्रसंगी जनाबाईसंगे दळणकांडण करणार्‍या, तुकोबारायांना विमान धाडणार्‍या, नामदेवांचे कीर्तन ऐकणार्‍या, सेना नाव्हींची धोपटी सांभाळणार्‍या, गोरोबांसंगे माती कालवणार्‍या सावळ्याला भक्तांचेच कल्याण दिसणार. यात नवल ते काय? त्यामुळेच त्याने आपले मनीचे गुज बाजूला ठेऊन भक्तांच्या हाकेला ओ दिली. मुक्तहस्ताने पावसाची उधळण केली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users