"त्या"...

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 July, 2016 - 06:14

"त्या"....

उघड्या-बोडक्या माळरानाचा
इंच-इंच व्यापून राहिलेले गवताचे तण
उफाड़याचे पिक घेण्यातील व्यत्यय म्हणून
निर्दयतेने उपटले जातात
तश्याच कवडीमोल "त्या" !
सुसंस्कृत समाजाला लागलेली किड म्हणून
वाळीत टाकल्या जाणाऱ्या
मात्र उपटसुंभ गवताच्या तणांमुळेच
जमिनीची रोखली जाणारी झिज
जाणुन-बुजुन दुर्लक्षित करणारे एहसान फरामोश आपण !
दिवसाढवळया उजळमाथ्याने
राजरस्त्यावरील पायघडयावरुन
छातीफुगवत मिरवणारे ....जेव्हा
लपत छपत तोंड काळे करण्यासाठी
सराईतपणे त्यांची माड़ी चढ़तो तेव्हा
नपुसंकत्वाला पुरुषत्व बहाल करण्याच्या व्यर्थ खटाटोपित
क्षणाक्षणाने कणाकणाने झिजणाऱ्या त्या
चावून चोथा झालेल्या मुर्दाड ओठांना रंगवतात लालभडक
मागचाच्या दातांचे बिभत्स व्रण लपवण्यासाठी !
नुकतेच अंगभर उठलेले ओंगळवाणे काळे निळे डाग
लपवण्याची तसुभरही तोशीस न करता
दिवसातुन अगणितवेळा
कुठल्याही मोसमात अंगावर ओतून घेतात
भडाभड थंडगार पाणी
जळत्या सिगरेटच्या लसलसत्या ताज्या जखमांवरचे
रामबाण औषध म्हणून !
पोटाच्या मुठभर खळगीत उसळलेला
भुकेचा आगडोंब शमवण्यासाठी
तारुण्याने मुसमुसलेलेल्या शरीरांची आहुती देवून
आकाशाला भिडणार्या वासनांचे लोळ विझवणाऱ्या....
अग्निशामक दलाचे बंब
किंवा...
गावभरचा कचरा गोळा करून
वेशीबाहेर कार्यरत असलेला
कंपोस्ट ख़ताचा प्रकल्पही
त्यांच्यापुढे फिकाच......!!

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users