स्फुट २० - गंगा डोंबारीण

Submitted by बेफ़िकीर on 17 July, 2016 - 09:35

सिग्नलच्या कडेला
फूटपाथवर
धाकटा भाऊ आणि धाकटी बहिण
आईच्या मांडीवर सोपवत
एक रिंग घेऊन
सैरावैरा पळत
ती येते थांबलेल्या गाड्यांच्या समोर

इन मीन पंचावन्न सेकंद असतात तिच्याकडे

त्यातले पंचवीस वापरते ती
रिंगमधून शरीर आरपार न्यायला
दोन हातांवर शरीर तोलायला
शरीराची कमान करायला

पाठीच्या कण्याची उंचसखलता
फ्रॉकमधून स्पष्ट दिसते
राठ झालेल्या जटा
तुकतुकीत चेहरा
गोंदवलेले कपाळ
लकाकते डोळे
असंबद्ध रंगाची सलवार
कंबरेला बांधलेली ओढणी
मनगटातले कडे

कसरत स्त्रीच्या पाचवीला पूजलेली असते
हे दाखवत ती स्वतःचा कणा वाकवते
सतरा वेळा, पंचवीस सेकंदात
भिरभिरते डोळे पाहत असतात
वैभवशाली वाहनांमधून
तिच्यावर रोखले गेलेले
अनेक प्रकारचे डोळे
कुतुहल दाटलेले
तिरस्काराने भरलेले
दुर्लक्ष करणारे
मृतवत नजरेने बघणारे
अधाशी
संतापून हॉर्न वाजवणारे
खिसे चाचपणारे

सव्विसाव्या सेकंदाला तिचे ठरलेले असते
पहिल्यांदा संतापलेल्यांकडे नाणी मागायची
अजीजीने
त्यांच्या तुच्छतेवर तिची अजीजी
अधिकच उठून दिसते
आणि मग दयाळू लोक देतात जास्त भीक
ठरवल्यापेक्षा

पंचावन्न सेकंदात जमवते ती
तीन रुपयांपासून पंधरा रुपयांपर्यंत काहीही

किंचाळणार्‍या हॉर्न्समधून वाटा काढत
परत पोचते आईपाशी
काही पैसे तिच्यासमोर टाकत
उरलेल्यातून घेते एक क्रीमरोल
आणि कोंबते बारक्याच्या मुठीत

क्षणभर स्वतःच असूयेने पाहते बारक्याच्या सुखाकडे

पुन्हा वळते आणि येते थांबलेल्या वाहनांसमोर

तिला रोग होत नाही
इन्फेक्शन नाही
प्रदुषणाचा त्रास नाही
भूक लागत नाही
तहान जाणवत नाही

तिला इतकेच माहीत असते
की तिच्या आईला अशी कसरत आता जमत नाही
आणि धाकट्या बहिणीला कसरत शिकायला वेळ आहे
आणि रात्री पडणारा बापाचा मार वाचवायचा आहे
आणि दोन घास खायचे आहेत
आणि ....
.... आणि रुसायचे नाही, रडायचे नाही
पाय किंवा कंबर लचकू द्यायची नाही
लचकली तर सांगायचे नाही, वगैरे!!!!

तिला एकदा पळून जायचंय
एखाद्या आलिशान वाहनात हळूच बसून
एखाद्या गुबगुबीत टेडी बीअरला मिठी मारून
आणि एखाद्या सिग्नलला
ती आलिशान गाडी थांबल्यावर
रस्त्यात कोणी कसरत करणारी लहान मुलगी दिसली
तर ते गुबगुबीत टेडी बीअर
देऊन टाकायचंय त्या मुलीला
आणि बघायचेत तिचे हावभाव

बास!!!! एवढेच स्वप्न आहे तिचे!!

मात्र,
तिचे तळहात कायम याचकाच्या भूमिकेत
डोळे कायम लाचार
बंद काचांवर टकटक करणारी बोटे कायम विवश
काळ्या काचांआडचे चेहरे
काचांना चेहरा लावून
दोन्ही हातांनी प्रकाश झाकून बघताना

तिला ती स्वतःच दिसत राहते काचेत
काळवंडलेली
घामेजलेली
आतला आक्रोश लपवणारी

आणि एखादीच काच सरसर सरकते खाली
तिच्या डोळ्यांमध्ये आशा ओसंडू लागते
आणि आतून डोकावतो एक चेहरा
हिंस्त्र, मोबाईल कानाला लावलेला
डोळ्यात संताप आणि तुच्छता
आणि त्या चेहर्‍याचे ओठ हालतात
आणि तिला ऐकू येते एक शिवी
आणि पाठोपाठ एक हुकुम
"ऐ, चल आगे, मरना है क्या?"

======================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी ,तुम्ही ईतके संवेदनशील आहात ,तसे लिहीताही संवेदनशील.मग त्या भाजपाच्या व भक्तांच्या नादाला लागुन मागच्या चार वर्षापासून मायबोलीवर जे काही करत आहात त्याचा पुनर्विचार करावा.

तिला ऐकू येते एक शिवी >>

बाकीचे सगळे अप्रतिम लिहिले आहे, पण इथे थोडे थांबलो. किमान मुंबईत तरी मी अशा लहान मुलांना शिव्या दिलेल्या पाहिलेले नाही. अपवाद असु शकतो. पण तेही ऐकावेसे वाटत नाही.

पुण्यात मनपाच्या बसस्टँडवर एकदा तळेगाव-ढमढेरे च्या बसची वाट पाहत असताना असाच प्रसंग समोर दिसलेला..
तिथे छोटी मुलगी नव्हती बस एक ३०शी कडली पोरगी जिच्याबरोबर दोन लेकरं होते अशी कसरत करत होती.. Sad

पुन्हा एकदा वास्तव समोर आणले. कितीवेळा हा प्रसंग आपल्या समोरच होत असतो पण त्या जीवाची घालमेल समजून घेण्या इतपत माणुसकीच नाही उरली आता ....... खिडकीची काच खाली करून मोबाईल वर बोलत बोलत तोंडातून मावा किंवा गुटखा खाऊन थुंकण्यापुरता क्षीद्र पणा उरला आहे .
मनाला खिन्न करणाऱ्या या आपल्या अवती भावतीच्या गोष्टी आपण सहजच दुर्लक्षित करतो पण तुमच्या या स्फुट मुळे मनाला एक खिंड पडली आहे- आतापर्यंत आपण किती सहजच दुर्लक्ष केलं याकडे . इथून पुढे नक्की ......................................
बदल घडेल .........................................