पाउस ऐकताना

Submitted by सखा on 13 July, 2016 - 10:06

परवा रात्री आठच्या सुमारास अचानकच खूप पाऊस पडला. मी आमच्या बैठकी मधला दिवा बंद करून patio पाशी शांतपणे खुर्चीत बसून बाहेरचा पाऊस पाहू लागलो. मध्येच विजा लखलखत होत्या प्रचंड गडगडाट होत होता. नीट ऐकलं तर पावसाचे सुध्धा किती तरी नादमय आवाज असतात. झाडावर पडणारा ,रस्त्यावर,पत्र्यावर,पन्हाळी वर ठिबकणारा पाऊस, प्रत्येकाचा एक वेगळा नाद एक वेगळा स्वर. मध्येच अचानकच एखादी गाडी भर्रकन पाणी उडवीत जाणार. मनात आलं आज किती तरी दिवसांनी पाउस आपण ऐकतोय. ओशोच एक मस्त मेडिटेशन आहे त्या मध्ये ते डोळे मिटून फक्त बाहेरचे आवाज ऐकायला सांगतात. श्रवण भक्ती चा अर्थ जरा समजावून घ्याला हवा.लिसन मोअर talk लेस. खरय .
लहान असताना मेडिकल कॅम्पस मध्ये आमचे घर पहिल्या मजल्यावर होते. दुपारी पावूस पडला कि मी विजेच्या तारे वरती पावसाचे मोती ओघळताना बघत बसायचो. काही मस्तवाल थेंब वेगाने जावून दुसर्या थेंबाला टक्कर देत विलीन होत खाली पडत. एक मोती घरंगळला कि दुसरा तय्यार किती तरी वेळ हा खेळ चालायचा. पावसा सोबत बालपणीच्या काही आठवणी प्रत्येकाच्या जोडलेल्या असतात.पाऊस पडला कि मग आम्हाला मेतकुट घातलेले पोहे खावेसे वाटत. आज ही खावेसे वाटतात. आजी करून द्यायची. मग ते खात खात पावसाची मजा बघायची.
थोडा पाऊस कमी झाला वर्तमानपत्र, जुन्या मासिकाच्या पानांच्या कागदाच्या होड्या करायच्या. त्या वरून आठवलं त्या काळी एक वाफे वर चालणारी छोटी खेळण्यातली बोट पण मिळत असे. एक पणती सदृश दिवा त्यात लावला कि पीटर पिट पिट पिट असा आवाज करत टबा मध्ये फिरायची. मी मध्यंतरी एकदा साधी होडी आणि शिडाची होडी मुद्दाम करून बघितली आठवते का म्हणून. का कुणास ठावुक पण बोटीचं किवा रेल्वे च आकर्षण सगळ्याच लहान मुलां मध्ये असतं.
दळवींच्या बागेत आळूची पानं असायची. अळूच्या पानावर पाण्याचा थेंब पाऱ्या सारखा दिसायचा. पावसाचा सिझन आला कि मग पालक मंडळी मुला साठी रेनकोट आणायचे. मुलांचे रेनकोट एक रंगी तर मुलींचे फुला फुलांचे. नव्या रेनकोट ला एक प्रकारचा गंध येत असे. त्या काळी मिळणाऱ्या नव्या रेनकोट ची गुंडी यशस्वी लावणे हे एक जिकीरीचे काम होते. ते रेनकोट कुणा महाभागाने डिझाईन केलेले असत देवच जाणे. गुंडीचा आकार आणि काजे कधीच मेळ खात नसे बरं पुन्हा जोर लावला कि गुंडी सहज उपटून बाहेर येत असे कि खेळ खल्लास. पावसाळी प्लास्टिकच्या चपलाचे देखील काही विशेष वेगळे नसायचे. त्यांचे ही आयुष्य तसे अवकाळीच. प्लास्टिक च्या चपला घालून चटक पचक आवाज करत सगळीच एका वयाची आम्ही मुले शाळा टीवशन ला निघायचो. रस्त्यात डबक्यातल्या पाण्यात पेट्रोलची इंद्रधनुष दिसायची. लांबून बस दिसली कि रेनकोट, टोपी, दप्तर सांभाळत बस थांब्या कडे सुसाट धावत निघायचं. काही मोठी पोरं सायकल वर शाळेत यायची. सायकलच्या मागच्या टायरच्या मड गार्डला जर flap नसेल तर चालवणार्याच्या शर्टा वर पाठी कडे सुरेख नक्षी निघत असे. आजकाल छत्र्या मस्त मिळतात. काडी तुटण्याच्या बाबतीत त्या छत्र्या चष्म्याला सहज मात देत असत. पुन्हा त्या छत्रीला बरची म्हणून वापरता येईल असे एक भले मोठे टोक असे. कुणी तरी मला सांगितले होते कि वीज पडली तर बचाव होण्या साठी ते तसे असते.
खरे खोटे देव जाणे. कोण शहाणा टेस्ट करायच्या भानगडीत पडणार?

Group content visibility: 
Public - accessible to all site users