अंड्याचा पुलाव

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 July, 2016 - 04:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६ किंवा आवश्यकतेनुसार अंडी (उकडून, साले काढून आणि काट्याने मध्ये मध्ये अलगद टोचे मारुन)
दोन वाट्या तांदुळ
दोन कांदे चिरुन
अर्धा वाटी दही
२ चमचे आल-लसुण पेस्ट
१ मोठा चमचा मसाला किंवा १ लहान चमचा तिखट
फोडणीसाठी तेल
चविनुसार मिठ

कोरडा मसाला:
१ चमचा जिर
१ चमचा धणे
दालचिनी १ ते २ तुकडे
३ वेलच्या
४-५ लवंग

क्रमवार पाककृती: 

मी रेसिपी करताना उकडलेली अंडी तशीच पुलावात टाकली आहेत. थोडासा वातडपणा आला पण खाण्यायोग्य होती. म्हणून मायबोलीकरांनी सुचविल्याप्रमाणे उकडलेली अंडी थोडी मसाल्यात फ्राय करून मग पुलाव झाल्यावर त्यात मिक्स करावी.

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते.

बरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे.

कोरड्या मसाल्याचे सामान तव्यावर थोडे भाजून मिक्सर मध्ये पुड करा. कुकर किंवा भांडे गॅसवर चांगले तापवून तेलावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवा. नंतर त्यावर आल-लसुण पेस्ट व कोरडा मसाला टाकुन परतवा. (आहाहा मस्त घमघमाट सुटलेला ह्या मिश्रणाचा)

त्यावर दही व मसाला घालून परतवा. (कलर कॉम्बीनेशन छान दिसत आहे ना?)

आता मिश्रण ढवळून त्यात अंडी घालून हलकेच परतवा.

आता तांदुळ आणि मिठ घालून मन शांत ठेऊन, कोणाचाही राग ह्या मिश्रणावर न काढता हलक्या हाताने सगळे परतवा. हा उपदेश अंड्याची चिरफाड होऊ नये म्हणून .

आता तांदुळाच्या दुप्पट किंवा तुम्ही नेहमीच्या अंदाजाने पाणी घाला. (हा माझा नविन मसाला आहे. कसा रंग आहे?)

जर कुकर लावत असाल तर थोडे कमी घाला. पुन्हा थोडे ढवळून कुकर लावा किंवा टोपात शिजू द्या. कुकरच्या तिन शिट्यात पुलाव तयार होतो. पातेल्यात करत असताना मधूनच एक-दोनदा अलगद परतत रहा.

झाला आहे तयार अंड्याचा पुलाव.

थोडा अजुन जवळून

प्राजक्ता म्हात्रे
कृपया रेसिपी शेयर करताना नावासकट शेयर करावी.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

घाबरू नका अंडी तुटली तरी आपल्याला खायचीच आहेत फक्त डेकोरेशन करता येणार नाही इतकच. त्यामुळे बिनधास्त.

हाच पुलाव मसाल्या ऐवजी आल-लसुण पेस्ट मध्ये मिरची घालूनही करता येतो.

रेसिपीखाली नाव मुद्दम टाकल आहे. कारण फेसबुकवर बहुतेक माशांच्या रेसिपीज नाव न टाकता चोरीला गेल्या आहेत. तसे हे नाव काढूनही चोरले जाऊ शकतात पण एक मानसीक समाधान स्वतःचेच. Lol

माहितीचा स्रोत: 
ढुंडते रह जाओगे.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा तों पा सु - आज मी पहिला Happy

कोणाचाही राग ह्या मिश्रणावर न काढता हलक्या हाताने सगळे परतवा >> Lol

सलाम !
[ बायकोला पुण्याला जावून नातवाला भेटायची तलफ आली .त्यामुळे सध्यां घरीं एकटाच आहे , दातांवर कोंरीमकाम झाल्याने चार-पांच दिवस नरमच खाण्याचा डेंटीस्टचा सल्ला आहे. नेमकी वेळेवर सुचवलीत ही रेसिपी !! धन्यवाद.]

खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते.>> हेच मी आजच सकाळी म्हणाले. बुध-शुक्र बुर्जी, अंडा मसाला नैतर कधी अंडा बिर्याणी.
पुलाव छान दिसतोय. करणार नक्की.

फोटो मस्त दिसतोय.

मी कांद्याबरोबर टोमॅटॉही परतते, आणि शाही बिर्याणी मसाला वापरते.

तुझं नाव आणि फोटो शेअर करण्यासाठी वाक्य लिहिलं आहेस ते पाककृतीच्या मध्यातच लिही. पाकृ वाचताना जरा रसभंग होईल, पण कॉपी पेस्टचा शॉर्टकट मारणार्‍यांची थोडीशी तरी पंचाईत होईल.

जागु डिअर, थांकु गं थांकु!:स्मित: नवर्‍याला भात जास्त आवडतो, व तो नॉनव्हेज प्रेमी असल्याने ही अप्रतीम पाकृ आता नवर्‍यासाठी राखीव ठेवते.:फिदी: सारखच ऑम्लेट, भुर्जी आणी अंडाकरी किती वेळा करणार? बदल नको का? आणी कुकरमध्ये करता येतेय म्हणल्यावर माझा आनंद गगनात मावेना, कारण मसालेभातातला भात माझ्या हातुन नेहेमी गुरगुट्याच होतो. तेव्हा ह्यो पुलाव करणारच!

बाकी फोटु रसरशीत आणी खमंग आलेत.:फिदी: लय भारी!

मस्तच लागतो हा पुलाव! मी नेहमी बनवते याच पद्धतीने...
फक्त शिजवलेली अंडी मधून चिरून, तव्यावर थोडेसे तेल, हळद्, मीठ, तिखट टाकून फ्राय करते आणि मग भाताच्या मिश्रणात टाकते... छान लागतात
फोटो तोंपासू...

नितिन, हिम्स्कूल, संजय, भाऊ, साधना,सस्मिता, संशोधक, नताशा, रश्मी, निसर्गा, हेमदिप धन्यवाद.

मंजुडी मधून पण एडीत करता येईल.

जबरदस्त..

आजच ही रेसिपी करायची ह्या गोष्टीवर आम्हा उभयतांचे एकमत झालेले आहे!

जागू अंड्यांकडे वळली म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या माशांच्या , कुठल्याही तर्‍हेच्या
चविष्ट रेसिपीज सांगायच्या आतां जगांत उरलेल्या नाहीत !!!
aathi.JPG

अभिरूप, सस्मित, मुग्धानंद, पलटी, वर्षूताई धन्यवाद.

भाऊ मस्त.
नाही हो अजुन आहेत प्रकार. पण त्यातले काही मी खात नाही आणि काही मिळाले नाहीत अजून.

जागू एक सुचवावंस वाटतय, ती मसाल्यावर परतून घेतली की, अंडी बाहेर काढून ठेवावी. भात कुकरमधे न शिजवता सुटा शिजवावा म्हणजे अर्धा भात शिजल्यावर वरुन अंड्याचे दोन काप करुन भाताच्या वर ठेवावेत आणि वाफ द्यावी. असं आम्ही वडाभात करतो तेव्हा करतो. म्हणजे अंड्याची तुटफुट पण टाळता येईल आणि सजावटही छान दिसेल Happy

अर्थात हे सगळं जेव्हा घाई नसेल तेव्हाच करता येईल. घाईघाईत असले लाड करणे शक्य नाही. बाकी रेसीपी / फोटो नेहमी प्रमाणे छानच Happy

वाह! एकदम तोंपासु रेसिपी आणि फोटोसुध्दा कातील आलाय. झटपट आणि जास्त खटपटीची नसल्यामुळे लवकरच करण्यात येईल.

>>शिजवलेली अंडी पुन्हा कुकरात शिजुन वातड नाही ना होणार >>> सेम प्रश्न माझापण.

पण पुलाव दिसतोय लय भारी.

अंड्याऐवजी काय वापरु? >>> Lol तरीच म्हंटलं हा प्रश्न अजुन आला कसा नाय Proud

शिजवलेली अंडी पुन्हा कुकरात शिजुन वातड नाही ना होणार.....हा मलाही पडलेला प्रश्न होता.मग विचार केला की १ वाफ आल्यानंतर अंडी बाहेर काढून ठेवावी आणि पुलाव झाल्यानंतर त्यात परत घालावी.असो.
मस्त रेसिपी.

Pages