‘वाद्यवृंद’ असतात तसे ‘खाद्यवृंद’ असते तर, मला कुठल्या वृंदात सामील व्हावे आणि कुठल्या नको असं झाल असतं. दिसायला वाईट दिसतं म्हणून, नाही तर, लोक बायोडेटा मधे शेवटी ‘हॉबीज’ लिहितात तिथे मी 'खाणे' ही हॉबी म्हणून लिहिली असती. पण इंटरव्यू मधे उगाच हास्यास्पद प्रसंग घडायचे म्हणून केवळ मी तसा 'छन्द मला आहे' असे लिहीण्याचे टाळले आणि ‘वाचन’ आणि ‘पोहणे’ वगरे असले टूकार काही तरी छन्द लिहिले. वाचता येतं आणि पोहताही येतं, खोट नव्हतं लिहिल नोकरी मिळावी म्हणून...पण खाताना जसा मला 'मोद' होतो ना तसा 'मोद' दुसर्या कोणत्याच आक्टिविटी मधे होत नाही, ही वस्तू स्थिती आहे.
अगदी रस्त्याकडेला मिळणार्या खारे शेंगदाण्या पासून, ते इंडिगो एअरलाइन मधे निळ्या गोंडस डब्यात देतात त्या सॉल्टेड कॅश्यूनटस् पर्यंत! किंवा, पावसाळ्यात घरी आणून, ती सोलून, कोळश्याची शेगडी नसली तर गॅसवर भाजून, त्याला मनसोक्त मीठ लाऊन खाल्लेल्या कणसांपासून, ते एनीव्हरसरी साठी कधीकाळी गेलेल्या महागड्या पण वर्थ अश्या बार्बेक्युनेशन मधे, वेटर टेबलावर आणून ठेवतात त्या कोळशयाच्या शेगडीवर आधीच मेरिनेट केलेले रेशमी किंवा सीख कबाब परत एकदा चटका बसेस्तोवर गरम करून खाण्यापर्यंत. जिव्हा आणि उदर ह्यांच्या गरजे नुसार (आणि स्वत:च्या ऐपती नुसार) खाण्याच्या सर्व गोष्टींवर मनसोक्त प्रेम कराव अशी विचारसरणी माझी ‘का?’ आणि ‘कधी?’ घडली असावी हे मला माहीत नाही. ते माहीती असणे तितके महत्वाचे ही नाही. त्या पेक्षा गरजेचे आहे ते 'काय?' 'कुठ?' आणि 'कधी?' योग्य दरात आणि उत्कृष्ट दर्जाचे मिळते ते माहिती असणे.
खाण्याच्या अत्यंत प्रिय अश्या असंख्य गोष्टींपैकी ‘मिसळ’ हा एक पुरोगामी महाराष्ट्रातला माझ्या अतोनात आवडीचा पदार्थ. मिसळ हा फक्त एक खाण्याचा पदार्थ नसून तो एक विचार प्रवाह आहे असं माझं प्रांजळ मत आहे. म्हणजे पहा, जसं संत-वाङ्मय असतं, तसं जर पदार्थ-वाङ्मय असतं तर संत-वाङ्मया मध्ये तुकोबाच्या गाथेला जे सामाजिक स्थान आहे, तेच स्थान कदाचित मिसळीला पदार्थ-वाङ्मयामध्ये लाभल असत. म्हणजे विठठल जसा मूळचा विष्णुच, पण बहुजनांचा होतो तेंव्हा त्या विष्णूचा विठठल होतो आणि त्या विठठलाला स्पर्श करून भेटायचा अधिकार सगळ्यांना मिळतो. अगदी तस्साच कामगार वर्गातील बहुजनांपासून ते बाइक वरुन कॉलेजला जाणार्या ( किंवा खरेतर कॉलेजला अजिबात न जाणार्या ) उच्चभ्रू कुलीन मुलामुलींपर्यन्त सामाजिक एकात्मतेचा आणि समानतेचा विचारप्रवाह ह्या मिसळीने कित्येक वर्षे पसरवलेला आहे. जागा वेगळी असेल, रेट्स वेगळे असतील, स्वछतेचि आणि हायजिनिकतेची मोजमापे वेगळी असतील पण, कुठेही खा मिसळ ही मिसळच राहणार. मासोळीची स्किन चमकावी तशी तैलकांती ल्यालेली चमकणारी तर्रि. कुणी 'कट' म्हणा, कुणी 'रस्सा'. शाब्दिक वर्णद्वेषात अडकणारी आमची मिसळ नव्हेच. समोरच्या छोट्याश्या आयताकृती ताटली मधे ओसंडून वाहणारे फरसाण आणि त्यामधे हळूच अधून मधून डोकावणारे कोरड्या तळलेल्या खमंग चवीचे हवेहवेसे वाटणारे उसळीचे तळलेले दाणे. कांदा आणि कोथिंबीरीची एक नितांत सुंदर मैफिल. आणि त्या मैफिली मधला अत्युच्य क्षण म्हणजे 'छोट्याने' किंवा 'बारक्याने' त्या स्टीलच्या ठराविक आकार असलेल्या भांड्याच्या कानाला धरून मुक्तपणे डिश मधे ओतलेल्या तर्रिचा चटकदार वास आपल्या नाकपूड्यान्शि जाऊन हितगुज करतो तो अनोखा क्षण. गरम गरम रश्याच्या वाफा चोफेर पसरतात. तुमची नजर ईकडेतिकडे आजुबाजूच्या डिश मधे आपल्या डिशशी तौलनिक अभ्यास करण्याच्या दृष्टीने भिरभिरते. पटकन, "अरे!, लिंबू राहिला की आपल्या ताटलित...". मग ती पिवळसर हिरवी कांती लाभलेली बारिक्शी रसरशीत लिंबाची फोड येते. ती तर्जनि नि अंगठा या दोन्हीच्या मधे पकडायची आणि मस्त पैकी लिंबाच्या रसाचा शेवटचा थेंब डिश मधे निखळेस्तोवर पीळायची. या सगळ्या भानगडीत कधीकाळी आठवड्या दोन आठवड्या पुर्वी चुकुनशा कापलेल्या बोटाच्या अर्धवट भरून आलेल्या आणि अर्धवट न भरलेल्या जखमेत तो लिंबाचा रस शिरतो आणि एक सणसणीत चरचरणारी कळ तुमच्या जिवाला भिडते. पण तिच्या कडे दुर्लक्ष करत आता पुढचा मिसळी चा 'उठाव' किंवा मिसळीचे 'बंड' आपल्याला हाका मारत असते. पुढचे दहा पंधरा मिनिटं मग तहानभूक हरपून आपण त्या डिश मधल्या मिसळीचेच होऊन जातो. मिसळ हा एक पंथ आहे हे त्या मिसळीच्या पहिल्या घासा पासून ते शेवटच्या घासाबरोबर रुमालाने कपाळावरच्या टिपलेल्या थेंबा बरोबर आपल्याला उमगत जाते. आपण त्या मिसळ नामक पंथाचे पान्थस्थ बनून तिच्या अमूर्ततेत हरवून जातो.
मिसळ खाताना कोणते एटिकेट्स पाळावेत आणि कोणते नाहीत? ह्या विषयी अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन संदर्भ उपलब्ध आहेत. सगळे संदर्भ इथे देणे शक्य नाही. काही जे शक्य आहेत तेव्हडेच देतो.
शक्यतो मिसळ खायला गेल्यावर हॉटेल मधे, 'बिस्लरी' मागू नये. तुम्ही मिसळ नावाच्या आखाड्यातले नवखे आणि कच्चे खेळाडू आहात, ते मान्य करण्याची ती एक खूण आहे. लाल मातितला लालचुटूक लंगोट बांधलेला कुस्तीगीर आणि सिन्थेटिक मॅट वरचा मल्ल ह्यात जो फरक आहे, एग्ज़ॅक्ट्ली तोच फरक मिसळ खाताना बिस्लरी पाणी पिणे आणि हॉटेलातल्या लडबडणार्या टेबलावरती उभ्या असलेल्या जगातलं पाणी, पोचे आलेल्या ग्लासातून पिणे ह्या दोन क्रियांमधेही आहे. त्यातही तुम्ही जर ग्लासात पाणी बीणी न ओतत बसता, दीड दोन लिटरचा आक्खा जगच डाव्या हाताने उचलून आणि मान वर करून डायरेक्ट त्या जगानेच पाणी प्यायला लागलात घटा-घटा, तर तुम्हाला लोक एखादा हिंद केसरी कडे पाहावा तशा आदराने तुमच्या कडे पाहु लागतात.
दुसरा आणि तितकाच महत्वाचा एटीकेट म्हणजे, तुम्ही मिसळ खाताना कोणते विषय घेऊन बोलता हे फार महत्वाचे आहे. म्हणजे तुम्ही जर उगीचच 'ब्रेक्सिट' किंवा ' क्रुडओईल बॅरल रेट' असे विषय घेऊन चर्चा सुरू केलीत तर तुमचा 'मिसळ' हा विषय कच्चा आहे हे तुम्ही जगाला दाखवून देता. मिसळ खाताना बोलायचे सहज सोपे विषय, म्हणजे एखाद्या पीच्चर ची स्टोरी सांगणे. त्या पीच्चर च्या हीरोइन चा बांधा आणि एकन्दर तिची सौदर्य स्थळ ह्याची वर्णनात्मक गुंतवणूक असलेले विचारधन ती ष्टोरी ऐकणार्यास उपलब्ध करून देणे. "काय माल लका" (सैराट स्टाइल) वगेरे वर्णन करण्याच शब्दचातुर्य तुमच्या कडे असल तर मग उत्तमच. अधून मधून 'बारक्या'ही मग तुमच्या कडे आदराने, 'कट आणू...? पाव, अजुन एक जोडी?' असे आग्रहाने आणि आपुलकीने विचारून जातो. बाकी पीच्चर बिच्चर चा कंटाळा आला असेल तर, लोकल पातळीवरचं राजकारण, निवडणुका, कामाच्या ठिकाणची ‘बॉस’ आणि ‘अकाउंट्स संभाळणारी बाई’ ह्यांची लफडी हे विषय एकदम चपलख. अजुन एक महत्वाचा एटीकेट म्हणजे "ए तू नाही हं...बिल मी देणार...तू थांब" असा बालहट्ट करण्याची जागा म्हणजे मिसळीचे हॉटेल नक्कीच नाही. तुम्ही तुमच्या मित्रा बरोबर खाल्लेल्या दोन प्लेट मिसळीचे बिल तुम्हाला स्वत:लाच भरावे लागणे हा तुमचा व्यावहारिक कमकुवतपणा दर्शवणारा स्वभावगुण आहे. तेंव्हा “रव्या...शंभर आहेत..का? पगार नाही झाला राव अजुन...” अस अगदी सहजगत्या बोलण्यामधे काही अपमान आहे असं मानणार्यांनी मिसळ खाण्याचा नैतिक अधिकार कधीच गमावलेला असतो.
पुर्वी फक्त 'टपरी'वजा हॉटेलात कष्टकरी कामकरी वर्गाला जेवणाला पर्याय म्हणून शोषित दुर्लक्षित असं तीच अल्पस आयुष्य जगणारी मिसळ, आधुनिक काळात आताशा चक्क प्रीयकर-प्रेयसीन्नि एखाद्या पावसाळ्यात भिजून, त्यानंतर एकांता मधे जाऊन घेतलेल्या पहिल्या वाहिल्या चुंबना प्रित्यर्थ केलेल्या सेलीब्रेशनचा भाग झालीय. म्हणजे, ‘तिला’ त्याच्या मिठीमधून सोडवणूक करून घेतल्यावर, सेलिब्रेशन साठी “चल डॉमीनोजचा थीन क्रस्ट डब्बल चीज' पीझा: खाउ” अशी हुक्की न येता, "ए चल नं...मिसळ खाऊ कुठेतरी मस्त पैकी" अशीच हुक्की का येते? ह्याला तार्किक पातळीवर पटेल असं उत्तर अजुन तरी सापडलेल नाही.
हल्ली म्हणे मिसळचे 'व्हेरीयंट्स' निघालेत. म्हणे 'उपासाची मिसळ', चायनीज मिसळ, डाएट मिसळ, हे असे खर्या खुर्या मिसळी चे 'कैवल्य' भ्रष्ट करणारे, मिसळ परिवारातील 'चुलत' आणि 'सावत्र' पदार्थ म्हणजे खरतर नैतिक पातळीवर सुरू असलेला एक भ्रष्टाचारच होय. खरा मिसळप्रेमी ह्या असल्या कोणत्याच मिसळीच्या 'उप-पंथाच्या' "आहारी" जात नाही. कोलेस्टरॉलची काळजी करणार्यांनी मिसळ 'न' चाखलेलीच बरी. सुदैवाने “आमच्या इथे सर्व पदार्थाचे कट 'रिफाइंड' तेलातले दिलेले असतात”, अश्या पाट्या अजून तरी पुण्यातल्या पेठेत लागलेल्या दिसत नाही. ज्या दिवशी मिसळी च्या “कटा” ला रीफाइंड तेला च ग्रहण लागेल त्या दिवशी मिसळ ही 'साबूदाण्याच्या खिचडी इतकीच सोवळी बनेल' आणि तीचं 'उफाडे'पण आणि 'टंच'पण संपून ती एखादी सकाळ संध्याकाळ पदर संभाळणारर्या गृहिणी सारखी लागू लागेल चवीला. ज्यांना हाय कोलेस्टरॉल आहे, त्यांनी फारतर महिन्यातुन तीन वेळा न खाता, तीन महिन्यातुन एकदा खावी...पण 'कट' घेताना मात्र शेवेची आणि फारसाणची एक अन् एक कडी अगदी तृप्त पणे त्या ‘कटात’ भिजेल याची दक्षता घ्यावी. जर कुणी साध्या सरळ रांगड्या मिसळी विरुद्ध 'डाएट' मिसळ बीसळ बनवून विकण्याचा 'कट' करत असेल तर तो खर्या मिसळी च्या प्रियकारांकडून नक्की उधळव्वून लावण्यात येणार ह्यात दुमत नाही.
मिसळ पावसाळ्यात खावी. मिसळ उन्हाळ्यात खावी. मिसळ थंडीत खावी. मिसळ कोणत्याही ऋतुत खावी. मिसळ ‘भर’ ऋतुत खावी, दोन ऋतूंच्या मधे खावी. मिसळ बसून खावी, उभ्या उभ्या खावी. “चला आज भरपूर वेळ आहे” म्हणून मिसळ खावी, किंवा आज आजिबात वेळ नाही म्हणूनही मिसळ खावी. आज काहीच 'विशेष' नाही म्हणून मिसळ खावी. किंवा आज 'कूच खास बात है म्हणत' मिसळ खावी. मिसळ खाताना कोणतेच नियम पळायाचे नाहीत हाच फक्त पाळण्याचा एक नियम.
माझ्या सारख्या मिसळी वर ‘जिव्हा’-पाड प्रेम करणार्याची ध्यासपन्थी पाउले एखाद्या टपरी सदृश मिसळपंढरीकडे वळू लागली आणि रट-रट असा आवाज करत ‘कट’ उकळणार्या भांड्यात अव्याहतपणे हात हलवत असलेल्या 'बारक्या' कडे नजर गेली की “कर-कटा" वरी चा एक वेगळाच अर्थ ऊमजून जातो.
चारूदत्त रामतीर्थकर
पुणे, 6 जुलै 16
छे! मॅगे, मी कोपुकरांच्या
छे! मॅगे, मी कोपुकरांच्या नावावर कलंक आहे.
दक्षिणा, फडतरे पण खाल्ली
दक्षिणा, फडतरे पण खाल्ली नाही?????????
fb वर हा लेख एका प्रायव्हेट
fb वर हा लेख एका प्रायव्हेट फुड ग्रुप मधे धनेश जोशी या नावाने वाचला. खाली तुमचंही नाव होतं क्रेडिट ला.
दोन्ही तुम्हीच का?
फेसबुक वर शिळोप्याच्या ओसरीत
फेसबुक वर शिळोप्याच्या ओसरीत एकांनी टाकला होता. त्यांना तुमचे नाव टाकायला सांगितले. त्यांनी मान्य करून टाकलेही आहे.
मस्त.... पण तुमचि ही प्रेयसी
मस्त....
पण तुमचि ही प्रेयसी whats app वर तुमच्या नावाच्या कुन्कवाशिवाय फिरते आहे
लोकांना फक्त लिंक शेअर करायला
लोकांना फक्त लिंक शेअर करायला काय होतं?
तसेही मोठे लेख व्हॉट्सॅपवर बहुतेकजण TL;DR करतात.
छोटे असो वा मोठे, लिंक शेअर करणेच उचित.
कडक!!!!!
कडक!!!!!
गरवारे समोरचे काटा किर्र आता
गरवारे समोरचे काटा किर्र आता पंच तारांकित आणि computerised झाले आहे आणि शिफ्ट होऊन वर नळ stop कडे पण कलमाडी शाळेसमोर ११ की १२ नंबर गल्लीत आलेय. चव चांगली आहे
या प्रेयसी मुळे गॅस होतो .
या प्रेयसी मुळे गॅस होतो . आसमंत दणाणून उठतो आणि प्रेयसी कृपेने सुवासाचा घमघमाट पंचक्रोशीत पसरतो.
मस्त...!
मस्त...!
Pages