स्फुट १६ - तुझ्या मुलीलाही देत नाहीस

Submitted by बेफ़िकीर on 30 June, 2016 - 10:51

दावणीला बांधली गेली आहेस
हे तुला समजतंय
पण झुगारून देता येत नाही आहे परिस्थिती
इतकंच काय
आता तर मनच गुंतलंय ह्या सगळ्यात

डान्स
योगा
जिम
मेंदी
पार्लर
भिसी
टपरवेअर
गायन
शॉपिंग
साड्या
सोने
मेक अप
अ‍ॅक्सेसरीज
हॉटेलिंग
सहल
गॉसिप

तसे छंद खूप जोपासतेस
पण स्वच्छंदी नाहीस तू

छंदही अनेकदा मिळालेल्या पैश्यातून
किंवा अनेकदा कमवलेल्याही
पण परवानगीची गरज भासतेच तुला
दोन्हीपैकी काहीही असले तरी

तुलाही समजत असतं
हे सगळं खोटं आहे
मी ह्यात गुंतलेली आहे म्हणून
हे मला हवं आहे
पण हे नसतंच
तरी, मी असतेच

पहाट
डबे
शाळा
नोकर्‍या
तणाव
चौकश्या
उत्तरे

काळ कसा आणि कुठे उडतो
समजतच नाही तुला

सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र
सगळे प्रहर बांधलेली असतेस तू

अधूनमधून महान वगैरे ठरतेस
तेवढाच काय तो बरा क्षण

स्पर्धा
आजारपणे
प्रवास
अपकीप
ह्या सगळ्यांत
तुझी भूमिका सर्वात महत्वाची
पण हे फक्त तुलाच मान्य
बाकीच्यांसाठी ते एक नगण्य गृहीत

तू ह्याची
त्याची
तिची
ह्यांची
त्यांची
सगळ्यांची कोणीतरी
कोणीतरी खूप महत्वाची

फक्त तू तुझी नव्हेस

तुझ्यात
आई
बहिण
मैत्रीण
प्रेयसी
बायको
मुलगी
सून
आणि
एक लपलेली व्यक्ती

त्या लपलेल्या व्यक्तीला
ह्यातले काहीच नको आहे

त्या लपलेल्या व्यक्तीला
उडायचे आहे पंख आहेत की नाही हे तपासायला
फिरायचे आहे जग कसे आहे हे बघायला
हसायचे आहे एखाद्या तरी खर्‍या विनोदावर
रडायचे आहे 'लोक रडतात कशाला' हे समजण्यासाठी
सुंदर दिसायचे आहे, स्वतःची इच्छा म्हणून
नाचायचे आहे बेभानपणे

स्वयंपाक करायचा आहे छंद म्हणून
मुलांना शाळेत सोडायचे आहे 'वेळ आहे' म्हणून
वाट बघायची आहे अधिक स्वातंत्र्याची
अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, स्वामिनी ठरण्यासाठी
झोपायचे आहे उठावेसे वाटेपर्यंत
जागायचे आहे डोळे मिटेपर्यंत

प्राप्त परिस्थितीत
आनंद मानणे
आणि
आनंदी असणे
ह्यातला फरक
तुला क्षणोक्षणी जाणवतो

पण पिढ्यापिढ्यांचे संस्कार
आड येतात

'असेच का'
ह्या प्रश्नाच्या असफल उत्तरात
आयुष्य संपते तुझे

मग तू होऊन उरतेस
एक 'कोणाचीतरी कोणीतरी'
ह्यापलीकडे तुझी ओळख नाही

जे जग
तू प्रसवलेस
ते जग
तुला वस्तू मानते

संस्कार सांगतात
माया कर
माया कर जग प्रसवू शकतेस ह्यावर
आणि माया कर 'वस्तू' मानले जाण्यावरही

कोणत्याही भूमिकेत
प्रत्येक परिस्थितीत
तू फक्त देणगीदार असतेस
आणि जग लाभार्थी

आणि गंमत अशी
की हे नाकारण्याचे
वय असते वीस, बावीस
किंवा अठरा, वीस
जेव्हा तू सगळी स्थळे नाकारावीस

पण तेव्हा तुझ्यात धमक नसते
तीच धमक
जी तू तुझ्या मुलीलाही देत नाहीस
========================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users