एक ओपन व्यथा ४

Submitted by चेतन.. on 28 June, 2016 - 00:21

एक ओपन व्यथा १ - http://www.maayboli.com/node/58699

एक ओपन व्यथा २ - http://www.maayboli.com/node/58731

एक ओपन व्यथा ३ - http://www.maayboli.com/node/58788

-----------------------------------------------------------------------------------------
.
.
.
"तू लॉ ला का अ‍ॅडमिशन घेत आहेस?"

" ………………"

"अरे तुला इतकेपण कमी नाहीयेत रे मार्क्स"

" ………………"

"जाऊ द्या ना सर…. तेव्हढं लायब्ररी कार्ड काढायचंय"

"ते तर देतोच आहे रे… पण स्टील यु नीड टू रीथिंक ट्वाईस"

"नाही सर…… माझा विचार झालाय…."

"माझी तुझ्या बाबांशी चांगली ओळख आहे… मी बोलू का त्यांच्याशी?"

"नको सर… मुळात त्यांना चांगलंच वाटतंय, पोरगं वकील होतंय म्हणून…. ते खुश आहेत"

"अरे पण…या इथे??"

"कार्ड सर…"

"येस… आय अ‍ॅम इश्यूइंग इट स्टील आय फील दि सेम…. प्लीज डू नॉट प्ले विथ युवर फ्युचर…"

"नाही सर…. मी आता ठरवलंय…. त्यात बदल नाही होणार" मी

अगदी केविलवाणी नजरेने आमचे लायब्ररीयन नितीन सरांनी माझ्याकडे बघितलं. किती सांगू आणि कसं सांगू, कोणत्या शब्दात ह्याला समजावू?. इथे फारसं भवितव्य नाही. जावं दुसरीकडे, काय ठेवलंय इथे? आणि ह्या कॉलेजात तर नाहीच नाही. सरांची अस्वस्थता त्यांच्या नजरेत आणि इतर हालचालीत प्रखर जाणवत होती. पण माझं निश्चित झालं होतं. सर्व बाजूंनी सर्व पर्यायांचा विचार करून शेवटी मी लॉ करायचं ठरवलं होतं. गाव सोडता येत नव्हतं. लहान असताना आपल्याला इंजिनीअरिंग शिवाय दुसरं काही डोक्यात नव्हतं. मुळात दुसर्या काही संधींबद्दल फारशी माहिती नव्हती. घरात कोणी फारसं शिकलेलं नव्हतं. म्हणून घरात मार्गदर्शन करणार्याची वानवा होती. मग साधं ग्रॅज्यूएशन करण्यापेक्षा लॉ काय वाईट आहे असं आम्ही ठरवलं. आणि मी लॉला ऍडमिशन घेतली. आणि माझं लॉला ऍडमिशन घेणं आमच्या नितीन सरांना अजिबात आवडलं नव्हतं. त्यांच्या दृष्टीकोनातून मला एव्हढेही कमी मार्क्स नव्हते कि मला कुठल्याच इतर इंजीनियरिंगच्या कॉलेजात ऍडमिशन मिळाली नसती. अर्थात मी काही त्यांच्या नं आवडण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.

तर.. लॉला ऍडमिशन घेतली. वर्गात आम्ही ४० - ५० विद्यार्थी होतो. मला जास्त मार्क्स होते म्हणून मी सीआर झालो होतो. वर्गात निम्म्या मुली होत्या. मलातर एकपण आवडत नव्हती. तसा मी त्या पातळीवर निराशच होतो. माझं कॉलेजचं वारं सार्थकी लागेल असं काही वाटत नव्हतं. सीआर आणि वासरात लंगडी गाय म्हणून थोडा फार मान मिळत होता. मला काही विशेष वाटत नव्हतं. दिवसांमागे दिवस जात होते. मी रेग्युलर कॉलेज करत होतो. पहिली सेमिस्टर झाली. पहिला आलो. तेही स्वाभाविकच होतं. फार काही विशेष वाटलं नाही. साधारण आयुष्य चालू होतं...

जगण्याला शक्यतेचं जेव्हढं पाठबळ असतं, तेव्हढ्याच प्रमाणात आपली जगण्याची आस दृढ होत जाते. अर्थात आपलं आयुष्य अशक्य वळणावर गेलं की लगेच कोणी आततायी पाऊल उचलत नाही. घडा भरावाच लागतो. सहन शक्तीचा कडेलोट व्हावाच लागतो. मग जेंव्हा घडा पूर्ण भरतो, तेंव्हा साध्या एका थेंबानेही तो उतू जातो. तेंव्हा कोणी असं म्हणू नये की काय यार साधा एक थेम्ब पडला आणि एव्हढा मोठा घडा उतू गेला. त्या थेंबाच्या आधी त्या घड्यात पडलेल्या अब्जावधी थेंबांचा तो प्रताप असतो. माझ्या बाबतीत सुद्धा अश्या असंख्य घटना आहेत. इथे ह्या पत्रात त्या सांगणं अशक्यच आहे. आणि तेव्हढा वेळही नाहीये माझ्याकडे. पण तरीही ज्या काही घटनांमुळे माझं आयुष्य बदलून गेलं, त्या काही घटनांचाच उल्लेख मी इथे करत आहे. बाकीचे संदर्भ मी हेतुपुरस्सर टाळत आहे.

तर, आमच्या गावच्या लॉ कॉलेजमधल्या पहिल्या वर्षी अगदी अपेक्षित निकाल लागला. मी पहिला आलो. अर्थात तेच वासरात लंगडी गाय शहाणी. पेपरात बाबांनी बातमीपण दिली होती. आई बाबांना त्यानंतर फोन पण आल्याचं आठवत आहे, अभिनंदनाचे. ते खूप खुश झाले होते. मलापण भारी वाटत होतं. कॉलेजमध्ये पण सगळे एक हुशार मुलगा म्हणून माझ्याकडे बघत होते. पण ह्याला एक अपवाद होता एक ग्रुप चा. अर्थात असे ग्रुप असतातच म्हणा प्रत्येक कॉलेज मध्ये. मी त्यांच्याकडे व्यवस्थित दुर्लक्ष करायचो. त्यांच्या फारसा.... फारसा म्हणण्यापेक्षा तोंडी लागायचोच नाही. कारण उगा कोण ह्या असल्याच्या तोंडी लागेल. मी येता जाता तो ग्रुप उगाच डोळे वटारायचा. येता जाता उगाच जिन्याच्या मध्ये उभा राहायचा, वाट अडवून.... खरं तर माझं असं कोणतंच वर्तन नव्हतं की कोणी दुखावलं गेलं असेल.

मला चुलत भाऊ वगैरे आहेत. एक तर गुंड अश्या कॅटेगरीत मोडणारा. एक पत्रकार. एकाची मोठंमोठ्या आमदारांसोबत उठबस. म्हणून मला त्यांचा कायमच आधार वाटत आलेला की, उद्या काही आपल्याला काही झालं तर ते राहतील आपल्या मागे भक्कम उभे.

मला आठवतंय, आमची चौथी सेमिस्टर होती, दुसरं वर्ष होतं. दुसर्या कॉलेजमध्ये आमचे नंबर्स आलेले होते. ते कॉलेज आमच्या कॉलेजपासून जरा लांब होतं. मी सायकलीवरून जात असे, येत असे.

दुसर्याSSSSSSS हो दुसराच पेपर होता. आकरा ते एक.... मी पेपर लिहीत होतो... मी पेपर लिहीत असताना कधीच डोकं वर काढत नाही. पुरवणी मागतानाच काढतो. बाकी कोण काय करतंय ह्याच्याशी मला काहीही देणं वा घेणं नसायचं. आपण कशाला कोणाकडे बघायचं? आपण आपला पेपर लिहावा, ही माझी मानसिकता... परीक्षेचे सीट नंबर्स ही आडनावावरून दिले जातात... कर्मधर्म संयोगाने माझ्या माझ्या मागे त्याच ग्रुपमधला एक मुलगा आला होता.
बहुधा पहिल्या टोलनन्तर, मागून काहीतरी टोचलं. मी दुर्लक्ष केलं... थोड्या वेळानं परत टोचलं... मी परत दुर्लक्ष केलं... शेवटी मी वैतागून मागे पाहिलं...

तर मागचा म्हणाला, "काय बघतोस?

"काही नाही" मी म्हणालो. मला पेपर लिहायचा होता.

परत थोड्या वेळाने पुन्हा काहीतरी टोचलं, पेन असावा. मी वैतागून मागे पाहिलं.

"आर, तू काय रं मागं बघतो सारखं?"

"नकोस ना टोचवू..." मी

"हां.... बघ पुढं"

काही मिनिटं शांत गेली. मला हायसं वाटलं... चला ब्याद टळली, असं वाटूस्तोवर परत एकदा जोरात पेनाचं टोक मागच्यांनं घुसवलं. मी मोठ्याने कळवळून ओरडलो.

"आर... काय लावलंय... बस की शांत... भाड़काव"

सगळे एकदम माझ्याकडे आणि नन्तर त्याच्याकडे बघू लागले. त्याला जरा ओशाळल्यासारखं वाटलं असावं. आणि लगेच डोकं माझ्या पाठीमागे लपवून तो हळू आवाजात मला दरडावत म्हणाला...

"ये आता, निघ आता बाहेर... आईघाल्या... दाखवतो तुला... ये" असं म्हणून तो पेपर द्यायला उठला. आणि रागात माझ्याकडे बघत बाहेर गेला.

मी दुर्लक्ष केलं. मला पेपर लिहायचा होता. आणि मुळात माझी चूकच नव्हती. म्हणून मला घाबरायचं कारण नव्हतं. मी अजिबात घाबरलो नव्हतो. बघू पेपर झाल्यावर काय बघायचं ते, आधी पेपरतरी लिहू असा विचार करून मी पेपर लिहायला सुरुवात केली. नंतर काही टोचलं नाही. पेपर छान गेला. मी समाधानी होतो. पेपर कितीही पानी लिहा, जर मनापासून समाधानी असाल तर तेव्हढा थकवा जाणवत नाही. सगळा थकवा पळून जातो. त्या फ्रेशनेस मध्ये तर मी विसरून पण गेलो होतो ती पेनाची टोचवा-टोचवी. माझी बॅग घेतली. मित्रांसोबत चर्चा करत म्हणजे कोणी काय लिहिलंय असं साधारण बोलत आम्ही बाहेर बोलत चाललो होतो. मी सायकल काढली. काढून बाहेर येणार एव्हढ्यात जवळच्या जवळच्या झाडाखाली काही मुलं जमली होती, तिथून हाक आली. मी बघितलं. त्या पोरात माझ्या मागच्या मुलगा होता. आणि एकदम क्लिक झालं, पोरगं चिडलं असंल असा विचार करून मी "जाऊ दे, आपणच सॉरी म्हणू" असा विचार करून सायकलीवरूनच तिकडे गेलो... पेपर चांगला गेला होता. उगा कशाला मूड खराब करा...

मी गेलो. सायकल बाजूला लावून आता त्याला सॉरी बोलणार... एव्हढ्यात ..... ..... .....

खाड्ड.....

करून माझ्या कानाखाली वाजली....

जोर्रात.......

झण्ण्ण्ण्ण्ण....

मी सटपटलोच...लगेच, माझ्या नाकातोंडातून गरम वाफा निघू लागल्या. डोळे पाण्याने डबडबले. क्षणभर अंधारीपण आली होती. पाय लगेच लटपट कापू लागले. थरथर अंगात भरली. सगळं त्राण गेलं. वाटलं खूप चक्कर येत आहे. आजूबाजूचं सगळं फिरू लागलं. तोंडातून लाळ पण गळू लागली. आधीच मी पाप्याचं पितर, आणि ज्याने मला मारलं तो म्हणजे दणकट. आधीच कानाखालचा भाग नाजूक असतो आणि बेसावध क्षणी, कुठलीही कल्पना नसताना जर त्यावर वार झाला तर ते सहन होत नाही... खूप मोठा झटका होता तो माझ्यासाठी. जीव खाऊन दिला होता तो, मारणार्याने...

"भेन्चोद XXXXX (आमची जात)... माजलास होय" मी अजून त्या झणझणीत अनुभवातून बाहेर आलोच नव्हतो. तसाच झिंगत होतो.

"वर्गात थोबाड उचकटायला काय झालं होतं रे, आयघाल्याSSSSSS.... " म्हणून तो अजून एक देणार होता . तेंवढ्यात त्याला त्याच्या मित्राने अडवलं बहुतेक. माझी केविलवाणी अवस्था पाहून त्याला दया आली असावी. मी.. अजून.. झिंगतंच....

"चडडीत राहा.......मादरचोत... नाहीतर फाडायची कशी माहितीये मला... चल रे...." म्हणून तो त्यांच्या मित्रांसोबत निघाला. आणि जाताजाता जोरात माझ्या सायकलीला लाथ मारून हसत गेला.

माझ्या सायकलीच्या काही तारा तुटल्या होत्या. मी सायकल घेतली, थरथरत. पायातले त्राण गेले होते. पाय लटपट लटपट करत होते. डोळे टच्च भरले होते, इतके की आजूबाजूचं अस्पष्ट दिसत होतं. मी बसलो. सायकल पण नीट चालवता येत नव्हती. मी शेवटी सायकल स्टॅन्डला लावली. जवळच्या एका बाकावर बसलो. डोकं गच्चं धरून. संताप संताप होत होता. आयुष्यातली पहिली कानाखाली बसली होती जिथे माझा काहीच दोष नव्हता. मी त्या ग्रुप मध्ये नव्हतो कदाचित हा असेल. पण हा विचार करण्याएव्हढा वैचारिक पोच माझ्याकडे नव्हता, तेंव्हा. काही काही गोष्टी दिसत होत्या. सगळ्यात आधी प्रकर्षाने जाणवली माझी जात. दोन प्रकारचे परिणाम असतात ना... एक्स्प्रेस्ड आणि इम्प्लाइड. एक्स्प्रेस्ड परिणाम जाणवत होते पण असा इम्प्लाइड परिणाम पहिल्यांदा भोगत होतो. अर्धा तास बसलो तसाच, शून्यात नजर लावून. तेंव्हा मोबाईल नव्हता माझ्याकडे. आईचा विचार आला. काळजीत असेल, म्हणून उठलो. टाकीवर जाऊन तोंड धुतलं. फ्रेश झालो, दाखवायला. घशाला चांगलीच कोरड पडली होती. अधाशासारखं घटाघटा पाणी पिलो. चांगला पेपर लिहिल्याचं सारं समाधान क्षणार्धात गायब झालं होतं आणि त्याच्या ऐवजी एक विचित्र अश्या विषादाने मन भरून गेलं होतं. सायकलच्या तुटलेल्या तारा तश्याच गुंडाळल्या. सायकल तरीही चालवता येईना. आउटपण निघालं होतं. कशीबशी सायकल ढकलत गेट पाशी आलो. सायकल दुरुस्त करायला टाकली. तिथून चालत घरी जाण्याची शक्ती अजिबात नव्हती.

मी रिक्षा केली. गावातल्या गावात केलेली ही माझी पहिली आणि शेवटची रिक्षा.

घरी गेलो.... आईला बघताच बांध फुटला... आईच्या कुशीत जाऊन ढसाढसा रडलो.... आई घाबरली. एक तर उशीर झाला म्हणून तिला काळजी वाटत होती आणि त्यात मी तिला पाहिल्या पाहिल्या गळ्यात पडल्याने तिच्या काळजात खड्डाच पडला असेल. बाबापण आले होते. मी सांगितलं सगळं रडत रडत. नेमकं त्याच दिवशी दुकानातला गडी आला नव्हता म्हणून बाबा दुकान बंद करून जेवायला आले होते. बाबा पण खूप संतापले. त्यांनी मला विचारलं की त्याचा पत्ता माहितीये का मी म्हणालो हो. आम्ही लगेच त्याच्या रूम वर गेलो. तो नव्हता. आम्ही परत आलो. बाबा दुकानात गेले चरफडत. नन्तर कोणाला तरी सांगून माझी सायकल घरी त्यांनी घरी आणली.

आल्यावर मी जेवण केलं, थोडंफार. रात्री बाबा आल्यावर परत आम्ही त्याच्या रूम वर गेलो. बाबांनी त्याला बाहेर बोलावून कानफाडलं. तो सॉरी म्हणाला. पण आम्ही वळताच त्याच्या चेहर्यावर ते तसलं खलनायकी स्मित मला दिसलं.

आम्ही परत आलो. मध्यंतरात माझ्या एक भावाला मला मारलेलं कळालं तो लगेच दोन दांडगी मुलं घेऊन घरी आला. मला म्हणाला बस गाडीवर. मी बसलो. आम्ही परत त्याच्या रूमवर.
"का रे, आईघाल्या... मोगलाई चालवतोस काय" म्हणून त्याला दोन तीन कानाखाली वाजवल्या. तो प्रॉपर घाबरलेला दिसत होता. परत त्याच्याकडे बघशील तर कोणाला तोंड दाखवायच्या अवस्थेत राहणार नाहीस अशी धमकी त्याने दिली. मला खूप आधार वाटला माझ्या भावाचा. सगळा ताण निघून गेला. खूप छान झोप लागली त्या रात्री.
दुसर्या दिवशी भाऊ आला कॉलेजवर. मला मारणार्याने मला सॉरी म्हटलं. मी दुर्लक्ष केलं. तोही पेपर चांगला गेला... परत अपेक्षितरित्या त्याही वर्षी मी पहिला आलो. पुन्हा ते पेपर मध्ये नाव येणं... आईबाबांना अभिनंदनाचे फोन वगैरे... मला भारी वाटणं.. रिपीट झालं... ते मला मारलेलं, त्यावर माझ्या भावाने त्याला मारलेलं ह्या सगळ्यावर धूळ बसली.... फक्त माझ्याकडून.
.
.
.
.
.
.
दुसर्या वर्षी माझ्याकडून त्याला झालेली मारहाण ही मला पुढच्याच वर्षी खूप हॉरिबल अवस्थेत नेणार होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users