स्फुट १५ - हे तुझे छान वगैरे दिसणे!

Submitted by बेफ़िकीर on 22 June, 2016 - 11:08

हे तुझे छान वगैरे दिसणे!

त्यातलं फारसं काही कळत नाही
पण
ती केशरी रंगाची काठापदराची साडी की शालू
जे काय असेल ते
ज्याचा घोळ सावरतानाच्या तुझ्या हालचाली
त्याही अगदी नैसर्गीक
उगीचच सौंदर्याच्या विशिष्ट व्याख्या प्रस्थापित करणार्‍या
ती नक्षी, तो झळाळ
तुझ्या चेहर्‍यावर आपसूकच आलेले अवघडलेपण
जे स्त्रीजातीच्या पाचवीला पूजलेले असल्याने
चांगले वाटणे वगैरे
तुझ्या देहबोलीवर
आपोआपच आलेल्या मर्यादा
ज्यांना शालीनता मानण्याची जगाला असलेली सवय
आणि
तुझ्यावर झालेल्या सक्तींचा तर विषयच कोणाच्या डोक्यात नाही

वेणी झाकणारी फुलांची वेणी
केसांत चमचमते ठिपके
कानांत दोन दोन कानातली
मोगर्‍यावर गुलाब मढवलेले

चेहर्‍यावरचा तो थर
समारंभापुरती लकाकी देणारा
काजळ, पापण्यांसाठी काहीतरी
डोळ्याखाली काहीतरी
पापण्यांवरती काहीतरी
सगळ्यांमुळे डोळ्यांतले मूळ भाव लपलेले
गाल कृत्रिम गुलाबी
ओठ कृत्रिम डाळिंबी
नाकातली नथ
हनुवटीवर नक्षी
हे सगळे म्हणजे काय
तर तुझे मन जगाला दिसू न देणारी आच्छादने
तुझ्या मनात भलतेच विचार
भलत्याच काळज्या, भलतीच भीती
लग्न नीट पार पडेल की नाही ह्याची

व्यक्तीमत्व बंदिस्त करणारे अंगभरचे दागिने
डोक्यापासून पायाच्या करंगळीपर्यंतचे
जणू
सौभाग्यकांक्षिणी अशीच दिसायला हवी

लोक काय म्हणतील
ह्या चिंतेने तू तशी दिसतेसही
जशी दिसायला हवीस इतरांना

पण तुझ्या मनातले विचार
कार्यालयात मावणार नाहीत इतके

हा चिडतोय का
ती रुसतीय का
भांडणे होतील का
खुसपटे निघतील का
मानपान पसंत पडतील ना
सगळे आनंदी राहतील ना

त्यातच
कोणी तुझी थट्टा करणारे
कोणी तुझे केस सावरणारे
कोणी तुला आधार देणारे
कोणी मुंडावळ्या बांधणारे
सगळ्यांना दिसायचंय फोटोत

तुझी आई
मनावर दगड ठेवून हसत फिरतीय
तुझे वडील
तुझी नजर चुकवत आल्यागेल्यांचं बघतायत
तुझा भाऊ
तुझी थट्टा करताना अश्रू लपवतोय
नुसती प्रेशर्स

नव्वद टक्के लोकं अशी
ज्यांना घेणंदेणंच नाही विधींशी
त्यांचे स्वतःचे नेटवर्किंग जोमात

यच्चयावत नजरा तुझ्यावर खिळलेल्या
तुझी नजर शालीन
झुकलेली
नजरांमुळे नव्हे
ताणामुळे

लग्न म्हणजे फक्त तुझे लग्न नाही
सगळ्यांसाठी असलेली संधी
स्वार्थ साधण्याची
महान भासण्याची
झळकण्याची
नवी 'व्यावसायिक' नाती जुळवण्याची

पण लग्न म्हणजे फक्त
तुझेच लग्न
तुझ्याचकडून अपेक्षा
तुझ्याच वागण्याची शहानिशा
तुझ्या दिसण्याचे मूल्यमापन
मानसिक भार पेलण्याच्या तुझ्या क्षमतेची परिक्षा

का गं असं?
का म्हणे असं?

तुझे वय जास्त असले
नसलीस तू ऐश्वर्या राय
जोडू शकत असलीस अनेक मने स्वबळावर
कमवू शकत असलीस
नवरा म्हणतो म्हणून नव्हे
आईबापांनी शिकवले म्हणून
छंद जोपासण्याची इच्छा असली तुला
नीट वागणार्‍यांशी नीटच वागता येत असले तुला

तर!!!!

हा 'तर' फार महत्वाचा आहे

तर मग का तू घाबरावस?
कोणाला आणि कशाला?
का कमीपणा घ्यावास?
तू आणि तुझ्याकडच्यांनी?

लग्नात अडकलीस
की अडकलीस आयुष्यभर

एकच पुरुष बोहल्यावरून पळाला
तो आजवर पूजला जातो

तू एकदाच पळ

कोणीही तुला पूजणार नाही

पण अख्खे जग जळेल तुझ्यावर!

========================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< कोणीही तुला पूजणार नाही
पण अख्खे जग जळेल तुझ्यावर! >> लई भारी, बेफिकीरजी !!
<< मी म्हणून जातच नाही लग्न कार्याला जाम बोअर होते मला. >> +१

एकदम मस्त...
नववधूचे वर्णन एकदम मस्त झाले आहे..एकदम मनाला भावले...
खरंच
<<<<तर मग का तू घाबरावस?
कोणाला आणि कशाला?
का कमीपणा घ्यावास?
तू आणि तुझ्याकडच्यांनी?>>>

लग्न ही दोनजीवांची आयुष्यभराची गाठ असते... आणि आपण मुलगी देतोय म्हणजे एक प्रकारे सासुरवाडीला एक नवजीवन, चैतन्य देतोय, ही भावना असावी आणि तो सढळपणे मनात कोणतेही किल्मिष न ठेवता स्वीकारण्याची तयारी असावी... त्यामुळे कोणाच्याही मनात अशी भावना नसावी..

तुझी आई
मनावर दगड ठेवून हसत फिरतीय
तुझे वडील
तुझी नजर चुकवत आल्यागेल्यांचं बघतायत
तुझा भाऊ
तुझी थट्टा करताना अश्रू लपवतोय
नुसती प्रेशर्स+++++++++++++++१११११११११