द क्लाउड

Submitted by _सचिन_ on 17 June, 2016 - 09:49

तब्बल ५ वर्षांनंतर सतीश ला लंडन मधे भेटत होतो पण त्याच्यात वयानुसार आलेल्या थोड्याश्या पोक्तपणा शिवाय फारसा फरक पडला नव्हता. मला बघीतल्या बरोबर त्याने मिठीच मारली. खरतर त्याला ऑफीस मधे असं समोर बघुन मी थोडासा चमकलोच होतो, त्याचं तिथे असणं अनपेक्षीत अजिबातच नव्हतं पण तरी सुद्धा थोडा दचकलोच. त्याला कारण पण तसच होत.
६-७ वर्षांपुर्वी मी आणी सतीशने जवळपास एकाच महिन्यात आमचं लंडन ऑफीस जॉइन केल होत. दोघेही पुण्याचेच त्यामुळे सहाजिकच लवकर घट्ट मैत्री झाली. एक दीड वर्षानंतर मी जेव्हा लंडन सोडल त्या दिवशी तो सी-ऑफ ला नक्की येइल अस वाटल होत, सी-ऑफ तर जाऊदे पण ऑफीस ला पण नव्हता आला. त्याला फोन लावला तर फोन बंद. पुण्याला आल्यावर त्याला पोहोचल्याची मेल टाकली तर साधं उत्तर पण नाही, मेसेंजर वर पण सारखा ऑफलाइन. काहीतरी विचित्र नक्कीच घडल होत. काही दिवसांनी अचानक मेसेंजर वर दिसला, बर्याच शिव्या घातल्या पण फक्त "हाय" व्यतिरिक्त काहीच नाही.
काळाच्या ओघात ते प्रकरण थोडसं मागे पडलं आणि एक दिवस आमचा एक कॉमन मित्र पुण्याला भेटला.
"तुला माहितीये का ज्या दिवशी तू गेलास त्या दिवशी सत्या ला आत टाकला होता"
"म्हणजे?" कोणतीही अत्यंत धक्कादायक बातमी कळल्यावर जशी प्रतिक्रीया होइल तशीच माझी झाली होती
"म्हणजे त्याला पोलिसांनी उचलला होता"
"का?"
"ओरडू नकोस, कंपनीत कोणालाच हे माहिती नाहीये"
"ओके बाबा पण कारण तर सांग" मी शक्य तेवढ्या दबक्या आवाजात म्हटलो.
"मला नाही माहीत, मला पण हे बाहेरुनच कळलं"
आमची नंतर बरीच चर्चा झाली पण त्याला कारणच कळलं नव्हत. मी तर पार हादरलो होतो.
आम्ही लंडन मधे ज्या कंपनीत काम करत होतो ती युके मधे प्रचंड उलाढाल असलेल्या पहील्या १० मधे नक्कीच होती, त्यांच्या एमप्लॉईला हात लावणे म्हणजे नक्किच काहीतरी गंभीर प्रकरण होत. त्यात सतीश सारख्या अगदी सरळमार्गी व्यक्तीबरोबर हा प्रकार का झाला असावा, कळण्यास काहीच मार्ग नव्हता. तो लंडन मधेच होता आणि कधीतरी मेसेंजर वर पण दिसायचा पण अस डायरेक्ट विचारणं मला जमलच नाही.
आणि आज ५ वर्षांनतर परत समोर सतीश उभा होता. आमच्या बाकीच्या जुजबी गप्पा झाल्या नंतर अर्थातच डोक्यावरच ओझं उतरवण्याकरीता त्याला सरळच विचारलं
"अब बोल, उस दिन क्या हुआ था" सतीश तसा मुळचा हैदराबदचा त्यामुळे आमच संभाषण हिंदीतच असायच
"किस दिन?"
"अबे सिधा बोलेगा या लु खोपचे मे?"
"सांगतो सांगतो" थोडसं गंभीर होत तो बोलला.
पुढे जे काही त्याने सांगीतलं तो सगळाच धक्कादायक घटनांचा सिलसिला होता.
"ज्या दिवशी तु पुण्याला निघाला होता त्याच्या आदल्या रात्री जेव्हा कामाहुन मी घरी पोहोचलो तर आमच्या घरचा दरवाजा सताड उघडा होता आणी सगळ सामान अस्तावअस्ताव्यस्तं होतं. तुला तर माहीती आहे त्या वेळेस आम्ही ४ रुम पार्टनर राहत होतो."
"तु, अनंत, वैभव आणी म़झर."
"म़झर नाहीरे मझहर"
"हम्म्म"
"मी आणी मझहर मुळचे हैदराबाद्चे, अनंता चेन्नइ चा आणि बैभव लातुर चा"
"हो ते तु सांगीतले होतंस"
"माझी, वैभवची आणि अनंताची पुण्यातच ओळख झाली होती. आम्ही एकाच वेळेस लंडनला आलो आणि जागा घेउन रहायला लागलो"
"आणि मझहर?"
"तो थोड्या उशीराने इकडे आला. त्याला कुठेच जागा मिळत नव्हती म्हणुन मी अन्याला आणी वैभ्याला खुप रिक्वेस्ट केली आणि त्याला चौथा रुमपार्टनर म्हणुन घेतले"
"ह्म्म्म"
"आमच्यात वैभ्या एकदमच ज्युनीअर होता तर अन्या एकदम वरच्या पोस्ट वर आणी मझहर कोडींग मधला कीडा होता"
"त्या दिवशी काय झाल ते सांग"
"तर, त्या दिवशी घरी पोहोचलो तर घरी कोणीच नव्हत. अन्या केंट ला गेला होत हे माहीत होत पण वैभ्या आणि मझहर घरीच असायला हवे होते. आम्ही कधीच अस घर उघड सोडत नाही. घरी सगळ नीट चेक केल तर आमचे लॅपटॉप गायब होते, पण पैसे आणि बाकीच सगळ सामान तसच होत. मी तडक त्यांना फोन लावला तर तिघांचेही फोन स्विच ऑफ"
"मग?"
"बराच वेळ विचार करत बसलो. रात्र झाली. पोलिसात जाऊन चौकशी करण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता. तुला तर माहितीये ईथे मायग्रेशन चा मोठा इश्श्यु आहे आणि पोलिस विजा नसेल तर बराच त्रास देतात"
"हम्म्म"
"मला तसलाच प्रकार वाटला"
"मग अन्या का फोन उचलत नव्हता?"
"तेच मला कळत नव्हत. शेवटी मी व्हेम्बली च्या पोलिस स्टेशन ला गेलो. तिथे त्यांनी सगळा डेटा चेक केला पण ह्यातले त्यांच्या कडे कोणीच नव्हते. मी परत घरी आलो तर शेजारचे सरदार अंकल दरवाज्यातच उभे होते"
"तेरे दोस्तोंको पुलिस उठा ले गयी बेटा"
"क्यों?"
"क्या मालुम"
"लेकीन मै तो अभी पुलिस के पास से आ रहा हु, वहा तो कोइ नही है"
"ऐसे कैसा हो सकता है? चल मेरे पहेचान के है वहा, वापीस पुछते है"
त्या रात्री परत १२ वाजता थंडीत कुडकुडत आम्ही स्टेशन ला गेलो. सरदाजीने त्यांना ठणकाऊन सांगीतल्या वर त्यांनी परत सगळा डेटा चेक केला. पण काहीच हाती लागलं नाही. मग कसली तरी शंका येऊन त्यांनी सरदारला पोलिसांचे वर्णन विचारले. ते ऐकतानाच त्या लोकल पोलिसांचा चेहर्यावरचा रंग उडत असलेला स्पष्ट दिसत होता.
"एक मिनिट थांबा, हा सगळा प्रकार खुप गंभीर दिसतोय, मी फोन करुन चौकशी करतो" सार्जंट टिपीकल इंग्लिश अॅक्सेंट मधे बोलला
बराच वेळ आम्हाला त्याने बाहेर बसऊन ठेवलं. जवळपास अर्धा तासाने बाहेर येऊन त्याने माझ्या कडे रोखत प्रश्न केला,
"तुझ्या मित्रांनी काही सीरीअस क्राइम केलाय का ईथे?
बराच वेळ आम्हाला त्याने बाहेर बसवून ठेवल. जवळपास अर्ध्या तासाने बाहेर येउन त्याने माझ्या कडे रोखत प्रश्न केला,
"तुझ्या मित्रांनी काही सीरीअस क्राइम केलाय का ईथे?
अजिबात नाही"
"त्यांना Serious Organised Crime Agency (SOCA) ने ताब्यात घेतलय"
"म्हणजे?"
"ही पोलिस एजन्सी खुप सिरिअस क्रीमिनल्स बरोबर डील करते"
"मग माझ्या मित्रांना का घेतल?"
"dont know"
"मी त्यांच्या बरोबर बोलु शकतो का?"
"I doubt, मी ट्राय करतो"
त्याने मग आमच्या समोरच तिकडच्या ऑफीसरला फोन लावला, दोन मिनिट बोलल्या नंतर फोन माझ्या कडे दिला
"what you want?" समोरून फोन वर अगदी कडक आवाज आला
"my friends with you?"
"yes"
"can I talk with them?"
"who are you and how you know them?"
"they are my room mates, we stay together" मी आ बैल मुझे मार केल होतं आणि मला ते कळल पण नाही
"can I talk with.." माझ वाक्य पुर्ण होण्याच्या आतच फोन कट झाला होता
आणि पुढच्याच सेकंदला समोर बसलेल्या सार्जंट ला फोन आला. फोन वर बोलताना तो मला न्याहाळतच होता. फोन ठेऊन तो मला काही सांगेल अस वाटत होत पण त्याने मोर्चा सरदार कडे वळवला
"you may leave now, we need to keep this fellow with us" सरदार आणी मी दोघंही हबकलो
"but why?"
"thats none of your business. we have orders." सार्जंट ओळख वगैरे बाजुला ठेऊन पुर्ण पोलिस खाक्या वर उतरला होता

सरदारजी ला निघण्या पासुन पर्यायच नव्हता. मला एका बंद खोलीत बसविण्यात आल, माझा फोन काढुन घेतला गेला.

रात्र प्रचंड दबावात गेली. कसलाच कशालाच मेळ लागत नव्हता. घरच्यांची, मित्रांची आठवण वेड लावत होती. कशाला झक मारली आणि भारत सोडला असं झालं होतं.
३-४ तास असेच तणावात गेले आणि अचानक बाहेर सायरन चा आवाज आला. १० मिनिटांनी माझा दरवाजा उघडला आणि मला एका पोलिस व्हॅन मधे बसवल गेल. सोबत २ सशस्त्र पोलिस होते पण कोणीच कोणाशी बोलत नव्हत. ३०-४० मिनिटाच्या प्रवासा नंतर शहराच्या बाहेर कोणत्यातरी रीमोट एरीया मधल्या इमारती समोर आमची व्हॅन थांबली आणी मला उतरायला सांगीतलं गेले. बाहेर प्रचंड थंडी होती. हात पाय थरथरत होते. तरी पण हात घामाने पुर्ण ओला झाला होता. बाहेर लिखापडीचे सोपस्कार करुन मला एका खोलीत नेलं गेलं.
समोर वैभ्या, अन्या आणि मझहर तिघेही बसले होते. वैभ्याचे डोळे रडुन पुर्ण सुजलेले दिसत होते. अन्या शांत होता पण आतुन प्रचंड चिडलेला स्पष्ट दिसत होता. मझहर मात्र पुर्ण निर्विकार दिसत होता. पोलिस तेथुन गेल्याबब्रोबर मी तिघांना कारण विचारल

"कोणालाच माहीत नाहीये" अन्या चिडूनच बोलला
"पण तुला कस काय उचलला?" ..मझहर
"मी तुमची चौकशी करायला पोलिस स्टेशन ला गेलो होतो"
मझहर ने ते ऐकुन कपाळाला हात मारुन घेतला. "तुला त्रास नको म्हणुन पोलिसांना आम्ही तिघच रहातो अस सांगितलं होत"
"अन्या तर केंट ला होता ना?"
"त्याला तिकडे जाउन पोलिस घेउन आले"
"मग तस तर मला पण ते कालच ऑफीस मधे पकडू शकले असते", माझ्या ह्या प्रश्नावर सगळेच विचारत पडले. पण कोणालाच मेळ लागत नव्हता
थोड्यावेळाने आम्हाला बटर आणि कडवट चहा दिला गेला आणि मग ते वैभ्याला एकट्याला घेउन गेले. जाम टरकलेला वैभ्याचा चेहरा बघवत नव्हता
मग तो परत आमच्या खोलीत आलाच नाही, २-३ तासांनी अन्याला बोलवणे आले. मग मझहर. परत तोच प्रकार. शेवटी माझा नंबर लागला

मला घेउन गेले ती एक छोटीशी रुम होती ४ खुर्च्या आणि १ टेबल. एका खुर्चीवर अत्यंत उर्मट दिसणारा ६ फुटी उंच ऑफीसर बसला होता, दुसर्या खुर्चीत एक्दम सड्सडीत बांधा असलेला जाड भिंग घातलेला ऑफीसर सिविल ड्रेस मधेच बसला होता. बाजुला अजुन एक ऑफीसर, चेहर्या वरुन तरी भारतीय वाटत होता.
"hey kid you understand English?"
टिपीकल स्कॉट अॅक्सेंट मधे तो ६ फुटी गरजला. खरतर त्याचे हेव्ही अॅक्सेंट कितपत झेपतील त्या बदल साशंकता होती पण मी हो सांगुन टाकल. मग त्याने एकेएक बेसीक प्रश्न माझ्यावर आपटायला सुरवात केली. बाजुला बसलेला इंडीयन ऑफीसर त्याच्या लॅपटॉप मधे डोक खुपसुन बहुतेक मी दिलेली माहीती व्हॅलीडेट करत होता.
पहिलीच्या सिलॅबस पासुन चालु झालेली त्याच्या प्रश्नाची पातळी हळुहळु पदवी च्या पातळी वर जाउन पोहोचली.
"तु इंग्लंड ला नक्की कशा साठी आला आहेस" आत्ता पर्यंत दहा वेळा वेगवेगळया पद्धतीने विचारलेला हा प्रश्न त्याने परत रीपीट केला. मी परत आधीचेच उत्तर देणार तेव्हढ्यात पहिल्यांदाच त्या चष्म्यावाल्या ऑफीसर ने हाताने इशारा देत दुसर्या ऑफीसर ला थांबायचा इशारा केला.
"लुक सन, आम्ही तुझ्या सगळ्या अॅक्टीव्हीटी कॅमेरा मधे टॅप केलेल्या आहेत, तुझ्या सगळ्या फोन चा डेटा आमच्या कडे आहे. तुझ्या चुकीच्या उत्तराची तुला किंमत चुकवावी लागेल" त्याचा आवाज अत्यंत मवाळ पण गंभीर होता
"पण सर माझी चुक..."
"तुला संधी देण्यात येइल तेव्हाच बोलायचं" त्याने माझ्या प्रश्नाचा प्रवास तेथेच थांबवला
"जसा तुझा डेटा आमच्या कडे आहे तसा तुझ्या मित्रांचा डेटा पण आमच्या कडे आला आहे"
हा सगळाच प्रकार माझ्या कळण्या पलिकडे होता
"आपण आता सरळ मुळ मुद्द्यांवरच येउयात. तु कोणत्या ग्रुप साठी काम करतो?"
त्याने मला प्रश्न विचारला होता पण मी त्याला उत्तर देण अपेक्षीत होत की नाही तेच कळत नव्हतं
"स्पष्ट्च विचारतो, तु कोणत्या माफीया किंव्हा टेरेरीस्ट ग्रुप शी निगडीत आहेस?"
संपुर्ण शरीर घामाने भरलेल होत. डोकं पुर्ण बधीर झालंं होतं. काहीही उत्तर न देता मी बावळटा सारखा त्याच्या कडे बघत बसलो. पोलिसांचं अस आम्हाला उचलून आणण्याचा आता किंचीत उलगडा होत होता. पण हा उलगडा अजुनच पेचात टाकत होता. काहीतरी भयंकर गोंधळ झाला होता
"नाही, कसल्याच ग्रुप शी नाहिये" मी कसाबसाच बोललो
"तुझ्या मित्रांच्या चौकशीत बरच काही कळल आहे"
"काय?"
"ब्लडी! यु टेल अस" गोरा आता लाल झाला होता
"?"
"मझहर आणि अनंत ला तु केव्हा पासुन ओळखतोस"? "लंडन ला जॉब सोडुन ते कोणत्या अॅक्ट्व्हीटीज चालल्या होत्या?" "तु जर बाकीच्यांची व्यवस्थित माहीती दिली तर आम्ही ह्यातुन बाहेर पडायला मदत करु"
....
एकंदरीत प्रश्नांवरुन काही गोष्टी लक्षात येत होत्या. मुख्य म्हणजे ह्यांचा टारगेट मी नव्हतो. बहुतेक वैभ्या पण नव्हता. मझहर आणि अनंत ची माहीती काढण्या साठी आमचा उपयोग करत होते, पण त्यांच्या शेवटच्या प्रश्नावरुन अजुन गोंधळ वाढला
"हे बघ, मझहर ने कन्फेस केलय त्याच्या बरोबर तुही सहभागी होतास, आता तु सगळ व्यवस्थित सांग"
मी त्यांच्या कोणत्या कृत्यात बरोबर होतो? मझहर ला खुप वर्षापासुन ओळखत होतो
त्याचे वडील प्रोफेसर होते आणि हा अभ्यासात नेहमीच पुढे. त्याला बॉलीवुड ची पण प्रचंड आवड होती पण तो कधीही वाइट संगतीत दिसला नव्हता की त्या बद्धल तस कधी बोललं गेलं. धार्मिक होता हे मात्र खर
पण साला त्याने कन्फेस केल म्हणजे नक्की काय केल? मला पण अडकवला! नसती बुद्धी झाली आणि त्याला खोलीत रहायला जागा दिली, आणि तो अन्या? तो तर एकदम प्रोफेशनल होता. घरी बोलताना पण एवढासा असा तसा शब्द नाही, आणि तो कसल्या कारनाम्यात सामील झाला?
२-३ तास झाले असतील, प्रश्नांचा भडिमार चालु होता, त्यांचा माझ्यावर आणि माझा पण माझ्यावर. उत्तर नव्हतंच. ३ तासांनी मला बाहेर थांबायला सांगितलं, अर्धा तास तसाच गेला आणि तो इंडियन ऑफीसर बाहेर आला, माझ्या कडुन रजिस्टर वर साईन घेतली आणि मला घरी जायला सांगण्यात आल. घर आणि ऑफीस सोडुन कुठे जायच नाहि आणि पोलिस बोलवतील त्या वेळेस हजर व्हायच. माझा मोबाइल परत देण्यात आला, घरी जाण्यापुरते पैसे देउन मला सोडण्यात आल
बाकीच्यांचे काय? अर्थातच असल्या प्रश्नाला मनाई होती
घरी उस्शिरा पोहोचलो तेव्हा वैभ्या घरीच होता, माझ्या अगोदर नुकताच आला होता. मला बघुन लहान मुला सारखा रडू लागला. बोलण्यातून जाणवलं त्याला पण जवळ पास तेच प्रश्न विचारण्यात आले होते
रात्रभर अन्या आणि मझहर चा पत्ता नव्हता. त्यांच काय झाल? कोणाला विचारायच, त्यांच्या घरी काय सांगायच काहीच कळत नव्हत. आम्हा दोघांनाही एव्हाना त्यांची चांगली चीड आली होती. हे प्रकरण आम्हाला कुठपर्यंत नेणार ते कळत नव्हत, त्यात वैभ्या मझहर ला मी घरात घेतल म्हणुन शिव्या घालत होता. चिडचिड, राग हाच प्रकार चालु होता
दुसर्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे तब्बल ३ दिवसांनी त्यांच आगमन झाल
दोघांचेही लाल आणि खेचलेले डोळे त्यांच्या जागराणाची कल्पना देत होते. त्यांच स्वागत कस करायच ते पण कळत नव्हत. पण अन्या नेहमी प्रमाणे शांत होता आणि मझहर तर हासतच होता. आम्ही दोघे अवाक !
क्या हुआ बे? मुह क्यो लटकाया है दोनोने, मझहरचा आम्हालाच प्रश्न
एकंदरीत बोलण्यावरुन लक्षात आल की पोलिसांनी २ दिवस त्यांची कसुन चौकशी केली होती. त्यांना दुसरी कडे पण नेण्यात आले. बरेच सिनिअर ऑफीसर्स नी त्यांची हजेरी घेतली. पण बहुतेक हाती काहीच लागल नव्हत म्हणुन सोडुन दिल.
"पण तु तर काहीतरी कन्फेस केल होत?"
"हो हो" बैभ्या ने मला साथ दीली. तिथले पोलिस म्हणाले तसे
"तुम्ही मोठे केव्हा होणार रे" अन्या चा नेहमीचा प्रश्न "तुमच्या कडुन माहीती मिळवण्या साठी पोलिस असल्या तंत्राचा वापर करतात. आम्हाला पण एकमेकांसंबंधात बरंच विचारण्यात आलं. मला तर ह्या मझहरच्या गर्ल्फ्रेंड बरोबर चिटकवण्यात आलं"
"मग लॅपटॉप आणि फोन कुठय?"
"तो त्यांनी ठेउन घेतला"
"का?"
"नाही माहित"
"पण आपल्याला नेलच का"
"आणि तुम्हाला जास्त दिवस का आत ठेवलं?" वैभ्या पण ओरडला
"काहीच माहीत नाही, पण आता आपण मोकळे आहोत आणि लेट्स सेलेब्रेट इट"
त्या नंतर आम्ही परत तो विषय काढला नाही. ८ दिवसात आम्ही वेगळे झालो. वैभ्या आणि मझहर भारतात परतले, अन्या त्याच्या कझीन कडे राहायला गेला आणि मी एकटाच येथे. पण हे सगळ करताना अर्थात प्रत्येक वेळेस आम्हाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागत होती
सतीश ने बोलण संपवलं होत. आणि मी आपला माझ्या पात्याच्या घासची वाट बघत बसलो होतो
"म्हणजे? तुला कळलच नाही का नेल ते?" माझ्या अपेक्षीत प्रश्नावर तो गुढ हसला
"नाही, त्यावेळेस नाही"
"मग?"
"मला ते २ वर्षांपुर्वी कळल"
"कसकाय" सतीश उगाचच माझी उत्सुकता ताणत होता
"त्या दिवशी जे माझ इंट्रोगेशन करत होते त्यातला इंडीअन ऑफीसर मला २ वर्षांपुर्वी येथेच एका बार मधे भेटला"
त्यानं मला सुरवातीला ओळखल नाही पण मी ओळख दाखवल्यावर लगेच बोलता झाला.
"I will never forget you guys" त्या दिवशी म्हणजे ज्या वेळेस आम्हाला उचलल गेल त्या दिवशी तो त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करणार होता पण आमच्या मुळे त्याला सुट्टी कँसल करुन अर्जंट ऑफीस ला जाव लागल होत
"मग कशाला आला ऑफीस ला, नाहीतरी आम्हाला तसच सोडलच की" मी त्याला मुद्दाम उचकावला
"तुम्हाला माहीतिये त्या पेक्षा बरच सिरीअस प्रकरण होत ते"
"म्हणजे?"
"ज्या दिवशी तुम्हाला ताब्यात घेतलं त्याच्या काही तास अगोदर लंडन मधल्या दोन मोठ्या रीटेल फुडमॉल्स जायंट च्या सीइओ ना मेल गेली होती"
"कसली?"
"'तुमच्या मुळे आम्हा लोकांच खुप नुकसान झाल आहे, आम्ही तुमच्या सगळ्या मालात पॉयझन मिसळत आहोत, आता परिणाम भोगा' अस काहीसं लिहिलेलं होत. तीच मेल यु.के. च्या फुड मिनिस्ट्री पर्यत पोहोचली. नुकत्याच झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे अॅललर्ट झालेल्या यंत्रणा लग्गेच कामाला लागल्या"
"हो पण त्यात आमचा काय संबंध?"
"मुर्खा! ती मेल तुझ्या मित्रांच्या लॅपटॉप वरुन आणि त्यांच्याच आयडी वरुन आली होती"
आता मात्र मी पुर्ण हबकलो होतो. इतक्या दिवस चाललेल्या ह्या प्रकरणावर आत्ताशीक थोडासा प्रकाश पडला होता
सतीश ने बोलणं परत थांबवल
"म्हणजे ती मेल मझहर ने?????"
"नाही रे बाबा" सतीश परत बोलता झाला.
त्या दिवशी त्या ऑफीसर बरोबर सविस्तर बोलल्या नंतर मी घरी येउन तडक मझहर ला फोन लावला आणि सगळ प्रकरण समोर आल

शुक्रवारी मझहर ला ऑफीस मधे खुप महत्वाच काम आल आणि काम सोमवारी पुर्ण करुन हवं होत. शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या कामाने वैतागलेल्या मझहरने विकएंड ला घरुन काम करायच ठरवल. कंपनी चा लॅपटॉप उचलुन घरी नेला खरा पण घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आल
चार्जर ऑफीस मधेच राहिलाय आणि बॅटरी पुर्ण डाऊन झालीये. परत ऑफीस मधे जायचा पण कंटाळा आला होता
मग त्याने एक शक्कल लढवली आणि तेथेच सगळा घोटाळा झाला. टेकनोलोजी मधे नेहमीच किडे करना-या मझहरने नुकतेच क्लाउड कॉम्पुटिंग शिकले होते. ऑफीस च काम ऑफीस च्या लॅपटॉप वर न करता त्याने अन्या च्या लॅपटॉप वरुन करायचा निश्चय केला. अन्या केंट ला गेला होता त्यामुळे त्याचा लॅपटॉप रिकामाच होता. खरतर कंपनीच्या अकांउन्ट मधे कंपनी च्या लॅपटॉप सोडुन लॉग्-इन चा प्रयत्न पण न करण्याच्या कंपनीच्या स्पष्ट सुचना होत्या. पण डोक्यात किडे वळवळणार्या मझहरला ते सगळ गौण वाटल. त्याने अन्याचा लॅपटॉप वापरुन क्लाउड टेक्नोलोजी वरुन कंपनीच्या VPN ला कनेक्ट करायचा प्रयत्न केला. त्याला त्या प्रयत्नात पुर्ण अपयश आल, लोग्-इन तर करता आल नाही पण नकळत त्या १ मिनिटात त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली
त्याचवेळेस दूर कोठेतरी टपूनच बसलेल्या हॅकर्स च्या हातात आयतं कोलीत आलं. त्याचा आइपी अॅड्रेस, कंपनीच्या मेल चे लॉगिन डीटेल्स अलगद सगळे उचलले गेले. तेच डीटेल्स वापरुन त्याच्या पेक्षा बर्याच हुशार असलेल्या हॅकर्स ने त्याच्याच मेलबॉक्स वरुन रीटेल्स जायन्ट्स ना ती खोडसाळ धमकीची मेल पाठवली. लॅपटॉप अन्याचा चा आणि अकाउंट मझहर च त्यामुळे दोघ काहीही गुन्हा नसताना गोत्यात आले. अर्थात पोलिसांना त्यांच्या इंटेलिजन्स एजन्सी कडुन २-3 दिवसात हे निर्दोष असल्याचा रीपोर्ट मिळालाच. ८-१० दिवसांत पोलिसांनी खर्या गुन्हेगारांना नेस्तानाबुत केल. ती मेल पण शेवटी एक पोकळ धमकीच ठरली. पण ह्या किड्या मुळे सगळ्यांचच नुकसान झाल.
सगळ्यात मोठ नुकसान अर्थात मझहर च झाल. पोलिसांकडून क्लीन चीट मिळाली तरी युके च्या कंपनी च्या सिक्युरिटी ऑफीसर ला मझहर च्या किड्याचा सुगावा लागलाच आणि सिक्युरिटी ब्रीच मुळे त्याला तडक भारतात डीपोट करण्यात आल. वैभ्या ला खुप मोठ्ठा मानसीक धक्का बसला आणि तो भारतात परतला. अन्याने यु़के सोडलं आणि युएस मधे सेटल झाला

सतीश ने त्याचं बोलणं संपवलं होतं. दुपारपासुन आलेलं आभाळ न बरसताच आता पुर्ण स्वछ झालं होतं आणि चक्क रात्रीच्या साडेआठ वाजताच्या लख्ख सुर्यप्रकाशात अख्ख लंडन न्हाऊन निघालं होतं.

त.टी.: लेखन शुद्ध करून दिल्याबद्दल आदिती चे विशेष आभार Happy

rsz_1rsz_img_2856.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा... छोटीशि चुक...आयुष्य भर लक्षात राहिल अशी शिक्षा Happy

आवडली

मस्तय हे Happy

टिने, तुझा प्रश्न नाही कळाला मला. मला वाटतं या कथेमधे मुळ नायक असा कोणीच नाहीये. त्या वेळेला घडलेल तो प्रसंग हाच या कथेचा नायक बहुदा!

प्रतिसादा साठी सर्वांचे धन्यवाद.
टीना, ही एक सत्यघटना आहे. मी त्यात कमीतकमी ढवळाढवळ केली आहे