स्फुट १४ - इसिसचा एक निष्ठावान कार्यकर्ता

Submitted by बेफ़िकीर on 16 June, 2016 - 10:54

इसिसचा एक निष्ठावान कार्यकर्ता
धोब्याचे ऐकणारा राजा राम
कर्णाच्या शौर्यामुळे धर्माच्या नावाखाली अधर्माचे समर्थन करणारा कृष्ण
नियतीच्या नावाखाली बायकोला द्युतात लावणारा युधिष्ठिर
मरा मरा म्हणत चुकून भक्त ठरणारा वाल्मीकि
गोष्टींना धक्कादायक वळणे देणारा नारद
जखमांमध्ये मश्गुल असलेला अश्वत्थामा

कधीच शत्रूच्या रक्ताने बायकोची वेणी न घालू शकलेला भीम
कधीच पत्नीची फिकीर न बाळगणारा लक्ष्मण
कधीच भाळलेल्या बायकांना आपलेसे करू न इच्छिणारा भीष्म
कधीच रामासाठी आपण का राबलो हे न कळलेला हनुमान
कधीच बोहल्यावरून न पळालेला रामदास
कधीच पुष्पक विमानावर विश्वास न ठेवणारा तुकाराम
कधीच वयाला न शोभणार्‍या वार्ता करणारा ज्ञानेश्वर
कधीच 'आपण दैवत का आहोत' हे न समजलेला विठ्ठल

निर्भयाचा आरोपी क्रमांक एक
दाभोलकरांचा आरोपी क्रमांक एक
मलाला आणि सनी लिओनि, दोघींपुढे नतमस्तक होणारा
जन्माने बाबासाहेबांचा ठरलेला शत्रू
कर्माने बापासकट सगळ्यांचा ठरलेला शत्रू

ओ एल एक्स वर काहीही विकणारा
अजूनही रेडिओ खरेदी करणारा
देशात कुठेही मुतणारा
परदेशात मुतताना जानवे कानात अडकवणारा

स्वतःसकट सगळ्यांचा तिरस्कार करणारा
सगळ्यांसकट स्वतःला मानसिक आधार देणारा

काहीच्या काही लिहिणारा
काहीही न लिहिणारा

हे सगळे
स्वतःमध्ये एकवटताना
जी घालमेल होते
ती मृत्यूला स्वीकारार्ह बनवत असावी
=========================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे स्फुट एखाद्याच्या मनातील विचारांची गुंतागुंत आणि कल्लोळ दर्शवते. जुन्या आणि नव्या प्रकारच्या विचारांमधील संघर्षामुळे होणारी घालमेल दाखवते. सोशल मीडिया व इतर सर्वच माध्यमांमधून येऊन सातत्याने आदळणार्‍या विविध सामाजिक / धर्मविषयक / प्रादेशिक वगैरे भूमिकांच्या कलकलाटामुळे जो बधीरपणा येतो / येऊ शकतो, तो दर्शवते. हे स्फुट वरवर वाचणार्‍यांसाठी नाही. तसेच, असे म्हणण्यात कोणतीही शेखी मिरवणे नाही, निखळ प्रामाणिकपणा आहे.

-'बेफिकीर'!

एक वेळ ग्रेस यांच्या कवितेचा अर्थबोध होईल हो बेफीकीरसाहेब. पण तुमच्या ह्या लेखनाचा अर्थ लावणे कठीणच. तुम्हीच ह्याला "हे स्फुट एखाद्याच्या मनातील विचारांची गुंतागुंत आणि कल्लोळ दर्शवते." म्हणले म्हणुन सोपे झाले आहे.

बाकी इसीसशी त्याचे कनेक्शन लावणे म्हणजे बरोबर नाही असे वाटते. अहो ते खलीफाचे राज्य निर्माण करणारी चळवळ आहे. कधी काळी महात्मा गांधींनी सुध्दा खिलाफत चळवळीला पाठींबा दिला होता. गांधींच्या देशात आणि निधर्मी राज्यात एखाद्या धार्मीक चळवळीला " एखाद्याच्या मनातील विचारांची गुंतागुंत आणि कल्लोळ दर्शवते." असे संबोधणे म्हणजे अल्पसंख्यांकाच्या धार्मीक बाबीत हस्तक्षेप केल्यासारखे होईल असे मला वाटते.

विचारांची गुंतागुंत आणि कल्लोळ

अशी स्थिती झाली आहे याची जाणीव होणे हेहि नसे थोडके. अशी गुंतागुंत नि कल्लोळ झाल्याखेरीज योग्य दिशेने विचार करण्याचा मार्ग सापडत नाही.

भरपूर घुसळल्याखेरीज ताकावर लोणी येतच नाही.
पण मुळात ताक घुसळतो आहोत की नुसते पांढरे पाणी?