चूड...

Submitted by मी मुक्ता.. on 14 June, 2016 - 10:58

चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा
बघता बघता वेढून टाकतील मला असं वाटलं..
माझाच घास घेवू बघण्याइतक्या उन्मत्त..
चोहीबाजूंनी..
अक्राळविक्राळ ज्वाळा...
त्याचा असह्य विरह एकदमच अंगावर आल्यासारख्या..
त्याच्यापर्यंत कधीच पोहचू न शकणारी माझी तळमळ
बाहेर आल्यासारख्या..
त्याच्या आत्ममग्न अनभिज्ञतेला माझ्या प्रेमाची दखल घ्यायला लावण्याच्या अट्टहासासारख्या..
आता व्यर्थ आहे या ज्वाळांच्या तडाख्यातून स्वतःला वाचवणं..
पण ही आग पुरती भस्मही करुन टाकत नाहीये मला..
बचावतेच आहे मी..
असह्य वेदनेत तळमळण्यासाठी..
रोज कणाकणाने मरण्यासाठी...
अजून आहेच बाकी माझं जळणं...
डेनेरस,
दरवेळी आगीतून वाचत राहणं बरं नाही बयो..
सारखी सारखी आपल्या स्वप्नांची अशी राख होत असताना आपणच फक्त मागं उरणं जीवघेणं असतं..
त्यापेक्षा जळून जावं आपल्या स्वप्नांबरोबर आपण..
स्वप्नांची वाट पहाणार्या पापण्या अश्रूंनी जेवढ्या जळतात तेवढ्या आगीने नाही...
मला विचार..
कालच रात्री त्याची सगळी स्वप्नं गोळा करुन
पेटवून आलेय मी मनाच्या स्मशानात...
चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा...
--------------------
merakuchhsaman.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users