आईचे पत्र ....

Submitted by अजातशत्रू on 11 June, 2016 - 05:15

दिनांक ५ जून २०१६

प्रिय कान्हू उर्फ कन्हैया यास
आईचे अनेक आशीर्वाद.

तुला तर माहितीच आहे की मला लिहिता-वाचता येत नाही. नेहमीप्रमाणं या वेळेसही तुझ्या ल्हान बहिणीकडून आपल्या नन्हूकडून लिहून पाठवत आहे. तु गावातून नोकरीसाठी पुण्याला गेल्याला आता ४ वर्षे झाली. तुझी खूप आठवण येते. तुला कितींवेळा पत्र पाठवून सुद्धा तू येत नाहीस. तु आपल्या आईवर नाराज आहेस का ? तुला नन्हूची आठवण येत नाही का ? आपली नन्हू आता मोठी झालीय ! आता तिला नन्हू म्हणायचं नाही, आता तिला नावानं हाक मारायची. कौशल्या म्हणायचं हां, काय लक्षांत आलं का ! तिला सुद्धा तुझी सारखी आठवण येती. कधी कधी शाळेतनं आल्यावर पुस्तकात तोंड घालून रडत बसते. आता तूच तिला काहीतरी समजंव बाबा. मी तरी कसं सांगू तिला ? माझ्या डोळ्याचं तर पाणी कुटं थांबतय ? तुजे आजोबा, आपले आबा आता थकून गेलेत. त्यांची हालचाल देखील आता कमी झालीय,त्यांच्या डोळ्याला कमी दिसायलंय. तू मागच्या महिन्यात धाडलेल्या पैशातनं चाळीशी आणू म्हटलं तर आबा दिवसभर देवळात जाऊन ऊपाशी बसले होते. त्यांनी वारभर नवीन कपडा सुद्दा आजवर आणून घातला नाही, सारकं आढ्याला डोळां लावून बसत्येत. गुडघे दुमडून बसलेला हा तुझा आज्जा आता हाय खाल्लेल्या वीज पडलेल्या वडापिंपळा सारखा झाला आहे. मला बघवत नाही. ते कुणाच्या लग्नात जात नाहीत, कुठल्या कार्यक्रमात जात नाहीत अन त्या दिवसापासून मळ्यात आजून पाय सुद्धा त्यांनी ठेवला नाही. रडून रडून त्यांचे डोळे कोरडे झालेत तरी कधी कधी त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्याच्या आडात तुझे वडील दिसतात, तेंव्हा आम्ही सगळेच रडतो…

मी पण येड्यागत माझीच रडकथा सांगत बसलेय. त्यात नवीन काय आहे का ? हरेक पत्रात आणिक वेगळं तरी काय सांगू ? गेल्या ऐतवारी तुझ्या आण्णांना जाऊन पाच वर्षे झाली. इत्के दिस लोटूनही एक दिस असा गेला नाही की त्यांची आठवण झाली नाही. तुझे वडीलसुद्धा असेच हळवे होते. अन्नपाण्याची आबाळ व्हायला लागल्यावर त्यांना सहन झालं नाही अन त्यांनी बाभळीला फास लावून घेतला. कोणाची एक दमडी अंगावर ठेवून घेतली नाही. खूप मानी होते ते. रीण काढून कधी सण केला नाही, कधी उदामादा केला नाही. कोरभर भाकरी, येसुर आणि गार पाण्यावर दिवस काढले पण कोणापुढं हात पसरले नाहीत. मिळेल ते काम केले लाज बाळगली नाही. कधी कुणाच्या रानातली काडी इकडची तिकडं केली नाही. सगळं आयुष्य नीतीने जगले आपले अण्णा. कधी कुणाच्या वाटंला गेले नाहीत. कधी कुणाशी भांडण,हेवेदावे केले नाहीत. तू सुद्धा असाच रहा. जे काही काम करशील ते मेहनतीने, ईमानदारीने कर. आपल्या वडिलांचे नाव मोठ्ठे कर. आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.

अण्णा गेल्यापासून आपल्या बांधावरची बाभळीची सगळी रांग जळून गेलीय, त्यांचे नुसते जळण झालेय. पाऊस या वर्षी सुद्धा नीट पडला नाही. पीकपाण्याचा सवालच नाही. रान तसंच पडून आहे. मी मिळेल त्या रोजंदारीच्या कामावर जाते, तेव्हढेच मन लागते आणि चार पैसे मिळतात. तुझी जास्त ओढाताण करून घेऊ नको. पोटाला भरपूर खात जा,उपाशी राहू नको. वेळेवर झोपत जा, चांगल्या लोकांची संगत कर. उपास तापास करू नको पण आपल्या विठ्ठल-रुक्माईला विसरू नकोस. कपडे नीट नेटके घालत जा.वायफळ खर्च करू नको. आता मला एक सांग, तू गावाकडं नक्की कधी येणार आहेस ? असे किती पैसे तू आमच्यासाठी साठवायला लागला आहेस. इतके दिवस ओढ लावू नये माझ्या बाळा, दोसरा काढून आई आजारी पडली तर काय करणार ? का आपल्या बहिणींचा मांडव दारात उभारल्यावर तू इकडे येणार आहेस ? असं करू नये, हट्ट करू नये. इतकं ताणून धरू नये. तुला बघायला आमच्या डोळ्यात आमचे पंचप्राण गोळा झाले आहेत. पत्र मिळताच दोनचार दिवसाची रजा टाकून ये. गावात आता मोबाईल सुरु होणार आहे असं लोक म्हणतात. तेंव्हा तुझ्याशी बोलता येईल पण तोवर तरी तू एक डाव आम्हाला भेटून बेगीने परत जा. तू दर महिन्याला पोस्टाने पाठवलेले पैसे मिळतात, आम्ही त्यातलेच बरेच पैसे साठवून ठेवले आहेत.

तु एकटा आमच्या सगळ्या पासून, गावापासून लांब राहतोस. तुझी खूप काळजी वाटते. तुझा आवाज ऐकूनही बरेच दिवस झालेत. तुझं काम व्यवस्थित चाललं आहे नां ? काही त्रास तर नाही नां बाळा तिथं तुला ? आमच्या सगळ्यांचं खूप मोठ्ठं ओझं तुझ्यावर पडले आहे आणि तु गुमान राहून ते पार पाडतो आहेस. तुझ्यासाठी काळीज तुटते रे माझ्या वासरा…. आता डोळ्याला धार लागायच्या आधी पत्र थांबवते. ह्या वेळेस तरी पत्राला उत्तर धाडू नकोस, तू समक्ष ये.

सूर्य येता माथी तुझे पोळतील पाय !
संगे चाले श्रीराम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय
( दादा हे माझं मी लिहिले आहे, आईने सांगितले नाही - नन्हू कौशल्या.)
चिरंजीव कन्हैय्यास आईचा गोड गोड मुका. तू जरी मोठा झाला असला तरी माझ्यासाठी माझा बाळच आहेस.

- तुझी आई,
गं.भा.पार्वतीबाई,
आणि नन्हू कौशल्या व आजोबा नारायण आबा.

कौशल्याने लिहिलेले हे पत्र यथावकाश कन्हैय्याच्या पत्त्यावर पुण्यात फुरसुंगीला आले. कन्हैय्या परभणी जिल्ह्यातल्या पिंपळगावचा. बारमाही दुष्काळ गेली कित्येक वर्षे त्याच्या गावाने पाहिलेला. वडिलांच्या आत्महत्येनंतर पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातल्या मित्रांच्या ओळखीने पुण्यात कंपनीत कामाला आलेला. पुण्यात आल्यानंतर सहा महिन्यातच त्याचे रस्ता अपघातात निधन झाले. बेफाम वेगात असलेल्या एका लांबसडक अज्ञात कारने त्याला उडवून दिले होते त्यातच त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्याने त्याच्या घरची सगळी परिस्थिती त्याच्या खोलीवर राहणारया मुलाना पूर्वीच सांगितलेली असल्याने त्यांना खरं कळवण्याची कुणाची हिंमत झालीच नव्हती. कन्हैय्याच्या गावाकडून पत्र आले की ही सर्व मुलेच त्या पत्राला उत्तर देत. त्याच्या घरी सत्य कसे कळवायचं याचा मार्ग कुणाला सुचत नसल्याने ते सगळे मिळून आपल्या पगारातले थोडे थोडे पैसे साठवून त्याच्या घरी पाठवत. कंपनीच्या वरिष्ठ अधिकारयांशी त्यांची गेल्या दोनचार वर्षापासून बोलणी पूर्ण झालीत. त्यात देखील यश मिळेल असे त्यांना वाटतेय. कंपनी आता कन्हैय्याच्या कुटुंबासाठी काही रक्कम देण्यास तयार झाली आहे. त्यातून भविष्यात कौशल्याचे लग्नही होऊ शकेल. पण हे सगळे गावाकडे कसे कळवायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे बाभळीला लावलेल्या फासासारखा लटकला आहे. आज आलेले पत्र वाचून झाल्यावर हे सगळे श्रावण बाळ भरल्या डोळ्याने गोठून गेल्यासारखे बसलेले आहेत……

- समीरबापू गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2015/09/blog-post_40.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

खरं तर वाचता वाचताच थोडंफार प्रेडीक्ट झालं होतं असं काहीतरी असेल हे.. पण तरीही असं काही असू नये असं आतून मनातून खूप वाटत होतं.. पण.. प्रत्यक्षात जे नको वाटले तिच वस्तुस्थिती होती कथेतली..
देव अशी वेळ कोणावरही न आणो !! Upset.gif