पाचोळा -१

Submitted by स्टीव रॉजर्स on 10 June, 2016 - 00:12

देशमुखांसोबतची ती मुलाखत जरा विचित्रच झाली.आज मुलाखत आणी दुसर्या दिवशी पहाटे लगेच निघायचं इकडचे सगळे सोडून म्हणजे जरा विचित्रच, परत दोन वर्षाचा करार म्हणजे तोवर नोकरी सोडता येणार नाही.विचार करायलाही वेळ मिळाला नाही.देशमुखांनी हातात टिकिटाचे पॆसे टेकवले सुद्धा,माझा होकार समजून. तसे त्यांना माझ्याविषयी सगळे समजलेले होतेच.माझ्याकडे दुसरा पर्याय देखिल नव्हता.
मी संतोष,मूळचा कोल्हापुरच्या अनाथाश्रमात वाढलेला.शिक्षण संपल्यावर तिकडुन मला निघावेच लागले.पण जेमतेम दहावी शिकलेल्या मला पुढे कसे करायचे याची काहीच कल्पना नव्हती.फिरत फिरत पुण्यात आलो.इकडे तिकडे राहात छोटी मोठी कामे करत पुढचे थोडेफार शिकलो.पण हल्लीच्या युगात मी म्हणजे पाचोळाच.वारा येईल तिथे उडायचे स्व:ताचे अस्तित्व काही नाही.लोकं मला तर मुकाच समजायचे.कोणाशी काही बोलायचा संबंधच यायचा नाही.बेतास बेत उंची,कुरूप म्हणता येणार नाही इतपत वर्ण.दुसर्यावर छाप पडेल असे काहीच नाही, ना शिक्षण,पॆसा नोकरी,कुटुंब.एका औषधाच्या दुकानात हिशेबनीस म्हणून कशीबशी नोकरी मिळाली,पण पगार इतका कमी की माझ्या एकट्याचेही भागण्यासारखे काही नव्हतें.अशाच एका सकाळी पेपरात एक जाहिरात पाहीली. फारच त्रोटक केवळ एक ओळ आणी खाली नाव पत्ता,फोन नंबर

केअरटेकर हवा.
उत्तम पगार राहण्याची सोय
अट: कुटुंब नसलेला,शक्यतो एकटा
संर्पक: दादा देशमुख
संग्रामवाडी पुणे.

त्यातल्या अटीने माझी उत्सुकता चाळवली गेली.इतकी वर्ष जी गोष्ट मला शाप वाटत होती.आज तीच कुठल्यातरी नोकरीसाठी पात्रता ठरत होती.काहीतरी गूढ जाणवत होतं,काय ते माहीत नाही पण आपण मुलाखतीला जायचे हे नक्की केले.
फोन करुन मुलाखतीची वेळ ठरवली आणि एका संध्याकाळी मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो.मनातल्या कल्पना आणि प्रत्यक्षात किती तफावत असते, आपले मन किती फसवत असते दर क्षणाला.वेगवेगळी चित्रे डोळ्यांसमोर आणुन वास्तवापासून अलगद दुर नेत जाते.मनातले देशमुख म्हणजे कोणतरी भारदस्त व्यक्तिमत्व असेल असे वाटलेले.खर्जातला आवाज,उंच निंच,पिळदार मिशा,भेदक डोळे पण प्रत्यक्षातले देशमुख अगदीच वेगळे होते.त्यांच्या गड्याने मला खोलिपाशी सोडले आणि तो निघून गेला. आत एका पलंगावर एक अस्थिपंजर देह पांघरूण घेउन झोपलेला होता,मी आल्याची चाहुल लागल्यावर त्यांनी कुस बदलली त्यानेही त्यांना खोकल्याची उबळ आली,मी पटकन पुढे जाउन त्यांना पाणी दिले.
त्यांनी उठवुन बसवण्याची खुण केली.मी कसेबसे त्यांना तक्क्याला टेकवून बसवले.साधारण साठीचे देशमुख कसल्यातरी भयंकर आजाराने त्रस्त होते.हातापायाच्या काड्या झालेल्या होत्या.टक्कल पडलेले,छातीचा भाता सतत वरखाली होत होता.नजर मात्र विचित्र होती, लालसर डोळे सतत इकडे तिकडे काहीतरी शोधल्यासारखे फिरत होते,जणु कोणीतरी आजुबाजुला वावरतय.माझी जुजबी चॊकशी करुन झाल्यावर ते कामाचे बोलु लागले.
तर संतोष, आमच्या घराण्याचा वाडा आणि आसपासची जमिन याची देखभाल करणे हे महत्वाचे काम आहे.वयानुसार आता मला काही झेपणे अशक्य आहे.बरीच प्राॅपर्टी आहे.लिखापढी आहे,सरकारी कामे करावी लागतील.मला काय हवे नको ते, अशा प्रकारचे कामाचे स्वरूप आहे. कमीत कमी दोन वर्षे तरी तुम्ही नोकरी सोडून जाउ शकत नाही.... काहीही झाले तरी ( शेवटच्या वाक्यात काही छुपी धमकी होती का?) जेवणखाण आणी राहणे सोडून वर तुम्हाला महीना तीस हजार मिळतील. तयारी असेल तर आपण करार करुन टाकून आणि उद्या पहाटे निघु, बराच लांबचा प्रवास आहे.तुम्हाला तशा कसल्याच जबाबदार्या नाहीत.त्यामुळे इतका वेळ पुरेसा असेल.माझा होकार समजूनच ते बोलत होते, मलाही नाही म्हणण्यासारखे काहीच नव्हते,पगाराचा आकडा एकुनच विश्वास बसत नव्हता,माझ्यासारख्या कमी शिकलेल्या माणसाला एवढे पॆसे?
मी ही नकळत चालेल म्हणून गेलो.
त्यांची ती चुळबुळणारी नजर काहीतरी वेगळीच वाटत होती,देशमुखांमध्ये मला वेडसर पणाची झलक दिसत होती.अशा माणसासोबत आपल्याला त्या खेडेगावात दोन वर्ष काढायची आहेत,हा विचार एकीकडे येत होताच, पण माझे आत्ताचे आयुष्यही काय मोठे सुखी होते, जगाच्या द्रुष्टीने माझ्या असण्या नसण्याला काहीच किंमत नव्हती.शेवटी जायचेच हा निर्णय घेतला,देशमुखांनी काही रक्कम काढून दिली ( टिकिटासाठी आणि मला खरेदीसाठी)जाताना रेल्वेचे टिकिट काढले. संध्याकाळी बाजारात फिरुन आवश्यक त्या गोष्टी जमवल्या,खायचे सुके पदार्थ, लोणची,पापड. कपड्यांचे जोड घेतले.एक मोठा टाँर्च,एक स्विस नाईफ( मला माझी चिंता वाटत होती का?) घरी सामान असे काही नव्हतेच गणपतीची एक चांदीची छोटी मुर्ती होती ती सोबत घेतली.उरलेले थोडेसे सामान भंगारात देऊन टाकले ते पॆसे पण बॅगेत टाकले.
आता खर्या अर्थाने मी रिकामा झालो.एकट्याचा संसार चार तासात मार्गी लागला. रात्रभर झोप लागलीच नाही.पुढे काय हा एकच प्रश्न फिरुन फिरुन येत होता. कोण देशमुख,कुठले खेडे,कसला वाडा.सगळेच अनोळखी. सल्ला तरी कोणाचा घेणार होतो या जगात ती गणपतीची मुर्ती सोडली तर माझे हक्काचे कोणीच नव्हते,त्यालाच हात जोडले. पहाटे माझ्या बॅगा घेउन देशमुखांकडे पोचलो.त्यांना कसेबसे टॅक्सीत बसवले आणि स्टेशन ला पोचलो. प्रवास खुप लांबचा होता, आणी रेल्वे तिथून पुढे बस. एसीत असल्याने देशमुख लगेच झोपुन गेले.मला करण्यासारखे काहीच नव्हते,मनात इतके प्रश्न होते पण देशमुखांशी बोलण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ जात होते.आधीच मी अबोल त्यात समोरचा माणुसही काही अधिक माहीती द्यायला तयार नव्हता.मीही मग रात्रीची झोप पूर्ण करुन घेतली.
दुपारी तीन च्या सुमारास स्टेशनवर उतरलो.स्टेशन अगदीच लहान होते.सगळीकडे शुकशुकाट होता.लागुनच उसाची शेते पसरलेली होती.त्यामागे उघडे बोडके डोंगर दिसत होते.प्रचंड गरम होत होते.बाहेर एक दोन रिक्षा उभ्या होत्या.बाजूला एक कळकट टपरी होती.मला चहा प्यायची तलप आली.देशमुखांना बाहेर एका पिंपळाच्या पारावर बसवलं.त्यांना चहा हवा का विचारले त्यांनी मानेनेच नकार दिला.फक्त बस कितीची आहे याची चॊकशी करुन ये असे सांगितले.
मी लगेच जाउन आधी चहा घेतला, थंड पाण्याची बाटली घेतली.जरा तरतरी आली.बस स्थानक वेगळे असे नव्हतेच,रेल्वे स्थानकाजवळच बस थांबायच्या.चॊकशी केल्यावर समजले की बसला अजुन एखाद तास वेळ आहे.परत देशमुखांजवळ आलो.उन्हामुळे त्यांना ग्लानी आल्यासारखे झाले होते.त्यांना पाणी दिले.इतक्यात सोसाट्याचा वारा सुटला आणि बाजूचा पाला पाचोळा उडायला लागला. छोटेसे चक्रीवादळच जणू त्या पाराभोवती घोंघावायला लागले.इतक्या उन्हात मध्येच असा वारा काहीच कळेनासे झाले,डोळ्यात धुळ गेल्याने मी पटकन डोळे मिटले.तसाच उभा राहिलो.पाचेक मिनिटात परिस्थिती पूर्वीसारखी झाली.मी डोळे उघडले.समोरचे द्रुष्य पाहुन हबकलोच.देशमुख बसलेले त्यांच्या आजुबाजुला सगळा पाचोळ्याचा ढीग जमा झालेला होता.कुजलेली,वाळकी पाने. देशमुखांच्या चेहर्याचा रंग उडालेला होता.भितीने अक्षरशः थरथर कापत होते,ती नाही सोडणार मला,नाही सोडणार.असं काहीसे पुटपुटत होते, मी एका झटक्यात तो ढीग बाजुला केला,त्यांच्या कपड्यावरची धुळ झटकली,ते ही तितक्यात सावरले.मला विचारायची हिंमत झाली नाही ते कशाबद्दल बोलत होते.काही मिनिटे दोघे शांतच होतो,देशमुखांचे इकडे तिकडे बावरून बघणे सुरूच होते.तेवढ्यात बस आली,बसायला जागा मिळाली.अजुन दोन अडिज तासांचा प्रवास होता. देशमुख डोळे मिटून पुटपुटत होते.मी ही आत्ताच झालेल्या प्रकाराने थोडा गांगरलोच होतो.अचानक तो गरागरा फिरणारा पाचोळा,देशमुखांभोवती पसरलेली पाने.नंतर घाबरलेले देशमुख,कसलीच टोटल लागत नव्हती
बाहेर मॆलोंमॆल नुसती उघडी बोडकी जमिन दिसत होती,खुरटी झाडे पसरलेली होती.गरम वारा आत येत होता. उन्हाळा संपत आलेला होता.शेवटी एकदाचे देशमुखांच्या गावात पोचलो.एसटीच्या प्रवाशाने अख्खे अंग आंबुन निघाले होते.दिवसाची शेवटची बस असावी. दहा बारा प्रवासी उतरले.तेवढेच चढले.एका रिक्शावाल्याला देशमुखांनी पत्ता सांगितला.थोडेसे आढेवेढे घेतच तो तयार झाला.गाव अगदीच मागासलेले वाटत होते.वीस पंचवीस घरे दिसत होती. एक दोन सरकारी कचेर्या दिसल्या.रस्ता असा नव्हताच मधूनच गटारे वहात होती, त्यातुनच डुकरे फिरत होती.संध्याकाळच्या वेळी तसले गाव अजुनच विद्रुप दिसत होते,अशा ठिकाणी मला पुढची दोन वर्ष काढायची होती.पण गावाबाहेर आल्यावर जरा मोकळे वाटले,गार वारा जाणवला.एका वस्तीपाशी देशमुखांनी थांबायला सांगितले. एक काळासावळा माणुस जणुकाही आमचीच वाट बघत तिथे बसुन होता.आम्ही थांबल्यावर झटकन तो पुढे आला.वाड्यावर काम करणारा गडी होता तो.त्याला मागोमाग यायचे सांगुन आम्ही निघालो.
देशमुखांचा वाडा तसा गावकुसाबाहेरच होता.एक लहानशी टेकडी चढून रिक्शा वाड्यासमोर थांबली.वाड्याला चहुबाजुनी दगडी तटबंदी होती.आजुबाजुला वडा पिंपळाचे मोठाले व्रुक्ष होते,पक्षांचा भयंकर किलकिलाट सुरु होता.दिंडीदरवाजाचे कुलुप काढून आम्ही आत शिरलो.आत पाऊल टाकल्या टाकल्या देशमुख किंचाळले, "अरे किती हा कचरा आम्ही येणार हे ठाउक असुन साफसफाई करता येत नाही,हरामखोर माजलेत, थांब येऊ दे आता त्याला".आत सगळीकडे पाला पाचोळा पडलेला होता.मला दुपारचाच प्रसंग आठवला आणि अंगावर काटा आला. देशमुख आतही यायला तयार नव्हते.शेवटी मीच आत आलो.आत आल्या आल्या वातावरण अचानक गार झाले.फरक लगेचच जाणवला.बाजुला एक खराटा पडलेला होता.सरळ झाडायला सुरवात केली.तोवर तो गडी पण आलाच .देशमुखांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले.तो पण इतका पाचोळा बघून बावरला.त्याने दुपारीच सगळी झाडलोट केलेली होती असे त्याचे म्हणणे होते.पण देशमुख एकायच्या मनस्थितीत नव्हते.तो ही माझ्या मदतीला अाला.आवार आम्ही झाडुन काढले. आता चांगलाच अंधार पडलेला होता.वीज बहुतेक गेलेली होती. दगडी बांधकामातला वाडा चांगलाच मोठा होता.मोठी बाग होती( जी अाता वाळलेली होती) मुख्य दरवाजातुन पडवी होती.आत शिरल्यावर दोन्ही बाजूंना तिन-तिन खोल्या होत्या.समोर प्रशस्त दिवाणखाना होता.दिवाणखान्यातुन वर जिना जात होता.वर अंधारच होता.तसा मी काही अगदी धीट माणुस नव्हतो.एवढ्या प्रचंड वाड्यात आम्ही दोघेच,त्यामुळे एकूण मला थोडी भितीच वाटली.दिवाणखान्यात जुन्या सिनेमात दाखवतात तशा जुन्या माणसांच्या तसबिरी टांगलेल्या होत्या.बहुतेक देशमुखांचे पूर्वज असावेत. गडी सगळीकडे कंदिल लावून निघुन गेला. त्याने येताना जेवणही आणलेले होते.बाहेर पडवीतच आम्ही अंधारात जेवण उरकले. देशमुखांचे बावरणे अजुनच वाढलेले होते.त्यांच्या भिरभिरत्या नजरेचीच मला भिती वाटायला लागली होती. जणु कोणीतरी सारखे आमच्या बाजुला वावरते आहे असे वाटायला लागलं. शेवटी न राहावून मी विचारलं, काका तुम्हाला एक विचारु का?
अँ? अचानक माझ्या प्रश्नाने ती शांतता भंगली आणि देशमुख केवढ्याने दचकले. तुम्ही सतत आजुबाजुला का पाहात असता? काही घडलय का?तुम्हाला जाणवतंय का? काही नाही काही नाही
तुझं जेवढे काम आहे तेवढेच करायचे,जास्ती प्रश्न विचारायचे नाहीत. अचानक देशमुखांचा आवाज बदलला, पण दुसर्याच क्षणी डोळ्यात ती भिती दाटून आली.अचानक असे फटकन मिळालेले उत्तर एकुन मी ही गप्पच बसलो,मलाही नोकरीची गरज होती.शेवटी देशमुख माझे मालक होते. ( कसली तरी खसखस झाली का मागे?)
तेवढ्यात दिवे आले. आणि दिवाणखाणा उजळुन निघाला. आज आपण इथेच झोपुयात. उद्या दोन गडी बोलावलेत त्यांच्या कडून मी सांगेन तितकाच वाडा झाडुन घ्यायचा.मी सांगेन त्याच लोकांशी बोलायचे.मी सांगेन तेवढ्याच भागात फिरायचे समजले ?मी मान डोलावली. त्यांनी सांगितलेली ऒषधे त्यांना दिली( झोपेच्या ऒषधांचा चांगलाच मोठा डोस होता त्यात) इतका दमलेलो होतो की पाच मिनिटात झोप लागली. रात्री झोपेत चित्रविचित्र स्वप्न पडत राहिली. कोणतरी ओणवे उभे राहून माझ्याकडे बघतय असे वाटत होते,पण डोळे उघडायची हिंमत झाली नाही. सकाळी जाग आली तेव्हा अंग भयंकर दुखत होते.वातावरण बर्यापॆकी गार होते.तसाच शाल लपेटून बाहेर आलो. चुल पेटलेली होती. बहुतेक कालचा गडी आलेला होता.त्याच्यापाशी गेलो तर तो झटकन निघून गेला एकही शब्द न बोलता. मग आत आलो आणि बॅग उघडून आंघोळीचे सामान बाहेर काढले.तोवर देशमुखांना जाग आली तेही कण्हत उठले.आमचे आवरे पर्यत गडी दुध घेउन आला.सोबत अजुन दोघे होते.बाहेरच चहा झाला.नंतर दुपार पर्यंत साफसफाईतच वेळ गेला.खालच्या सगळ्या खोल्या झाडुन घेतल्या.स्वयंपाकघर साफ केले.विहिर साफ झाली
पाणी भरले.भाजी आणि काही फळे आणुन ठेवली. देशमुखांनी एक खोली मला दिली. आणी समोरची त्यांच्या करता तयार करुन घेतली.ते तिथेच पडून होते.दोन तीन दिवस याच गडबडीत गेले. मग अशाच एका संध्याकाळी वाडयातल्याच एका सायकलवरून ( किती वर्षांनी सायकल चालवली) गावात जाउन काही सामान खरेदी करुन आलो.(गावातले लोकं विचित्रच नजरेने पाहात होते का?) येताना गड्याकडुन जेवणाचा डबा घेतला आज देशमुखांना मटण खायची इच्छा झाली होती. जेवणं आटोपलि नी देशमुख परत अस्वस्थ झाले."आज अमावास्या ना रे?"
मला काय माहिती मी उगाच मान डोलावली.
पाठ टेकल्या टेकल्या झोप लागली. पण कधितरी मध्येच जाग आली.घड्याळात दिड वाजलेला होता.मागच्या शेतांमधुन कोल्हेकुइ ऎकु येत होती.त्या भयंकर आवाजाने घशाला कोरड पडली. खोलीतीले वातावरणही दमट झाल्यासारखे वाटले अनामिक आदिम भीती दाटून आली,मला नेमकी तहान लागली आणि पाणी घ्यायला मी विसरलो होतो(खोलीबाहेर पडायचे म्हणजे एकप्रकारचे दडपणच आलेले होते.)हातात बॅटरी घेउन उठलो आणी बाहेर आलो,काहीही दिसत नव्हते. अंदाजानेच स्वयंपाकघरात गेलो.बाहेर किर्र अंधार होता.देशमुखांचा कण्हण्याचा आवाज येत होता. (जागे होते का?) पाणी पिऊन परत मी माझ्या खोलीत आलो.आणी झोपलो. पण काहीतरी वेगळेच वाटायला लागले.काहीतरी चुकलेय असे वाटले.कसलातरी तिखट वास नाकाला झोंबायला लागला.कापरे भरल्यासारखे झाले.पायाखाली पांघरूण नव्हते.परत चाचपडत उठलो आणि सरळ लाइट लावला.पण पण मी एकटाच नव्हतो .
.
.
.
.
.
.
गादीच्या बाजुलाच त्या तिघी भिंतीकडे तोंड करून बसलेल्या होत्या

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरीच! अनेकदा वाचलेले कथा बीज असूनही वाचणे थांबवावेसे वाटले नाही.
मस्त वातावरण निर्मिती.

कथा अर्धवट ठेवू नका ही विनंती

मस्त

धारपांच्या साच्यातली वाटतेय >>> +१. इनफॅक्ट अशी काहीशी कथा वाचल्यासारखं अंधूक आठवतंही आहे. बहुतेक अनोळखी दिशा कथासंग्रहात. पाचोळाच नाव होतं स्टोरीचं असं वाटतंय.

बाप्पा एका दम्मात सारे अ‍ॅव्हेंजर्सच अवतरले वाटत माबो ला तारायला..
आधी आयर्न मॅन.. आता स्टीव रॉजर्स..

असो मस्तच लिहिलयं.. किप इट अप Happy

बाप्पा एका दम्मात सारे अ‍ॅव्हेंजर्सच अवतरले वाटत माबो ला तारायला..
आधी आयर्न मॅन.. आता स्टीव रॉजर्स..>>>>>>>> Lol टीना

इनफॅक्ट अशी काहीशी कथा वाचल्यासारखं अंधूक आठवतंही आहे.>>> रमड, हो कुणीतरी लिहिली होती खरी.. नाव आठवेना पण एकटा व्यक्ती हवा.. कुठतरी उत्तरेकडे एका प्रॉपर्टीची राखण करायला.. ठिक ठाक ऑफिसमधे इंटरव्ह्यु होतो.. आधीचे लोक कसे ताबडतोब सोडून गेले त्याची फाईल.. रोजचे अपडेट्स द्यायचे असतात अस काहीस.. सुरुवात सारखीच होती पण कथा पूर्ण झाली नाही शायद..