जुन्या रहस्यकथांचे सँपल

Submitted by बेफ़िकीर on 9 June, 2016 - 08:09

जुन्या काळी रहस्यकथांचा भडिमार झाल्याचे काही भग्नावशेष काही उदासपणे उघडलेल्या वाचनालयांमध्ये दिसून येतात. हा एक मोठाच ठेवा काळाच्या ओघात नष्ट झाला व होतही आहे. त्या रहस्यकथा असायच्या की विनोदी कथा असाप्रश्न पडत असे.

साधारणपणे नायकाचे नांव भुजंगराव किंवा भवानराव असे. हे भुजंगराव किंवा भवानराव पन्नाशीचे गृहस्थ असत. त्यांचे भारदस्त व अजिबात लवचीक नसलेले शरीर हे प्रतिपक्षाच्या अंगात जणू धडकीच भरवत असे. हे भवानराव रात्री घराच्या अंगणात प्यायला बसत व समोर आलेल्या प्रकरणावर सखोल विचार करत. चकणा म्हणून ते उकडलेली अंडी चघळत. एकावेळी एक अख्खे अंडे चघळणे हा त्यांचा छंद असे. अशी बारा उकडलेली अंडी ते चकणा म्हणून फस्त करत असत. त्यांचा नोकर हा त्यांच्याच वयाचा व हरकाम्या असे. तो बागेत ठेवलेल्या एका टी पॉयवर ग्लास, व्हिस्की किंवा रम, बर्फ, अंडी व सुके चिकन असा जामानिमा तयार ठेवत असे. ह्या एका बैठकीत भुजंगराव प्रकरण समजून घेत, त्यावर सुम्म अवस्थेत सखोल विचार करत, एक आराखडा तयार करत व काही निश्चीत योजना मनातल्या मनात आखत असत.

भवानरावांची ही निश्चीत योजना कधीच कागदावर येत नसे. भवानरावांनी प्रकरण स्वीकारले की तसे नुसते तोंडाने सांगत असत. त्यांनी तसे सांगितले की समोरचा मनुष्य निश्चींत होत असे. वाचक केव्हाच निश्चींत झालेला असे.

तर अश्या काही विनोदी रहस्यकथा त्याकाळी फार खपत असत. ह्या कथांमध्ये खरे तर रहस्य काही नसेच. नुसतेच सगळेजण हादरत असत, कोणाला काही कळतच नसे, असे प्रकार होत असत. ठराविक वाक्ये पेरली की झाली रहस्यकथा असा प्रकार असे. काही अपवाद सोडले तर ह्या कथा मजेशीर असत. काळा पहाड एक गाजलेले व्यक्तीमत्व होते. बाकी काळा पहाड, धनुर्धर, ब्लॅकस्टार असे अनेक हिरो तेव्हा लक्ष्मी रोडवर एकेका कथेत गोवले जाऊन दहा-वीस रुपयांना मिळत असत.

अशीच एक सँपल कथा:

=================

प्रकरण १ -

संपतशेठ खाना उरकून लवंडले. दोन माळा जप करून झोपी जायचा त्यांचा प्रघात होता. कुत्र्याला बागेत मोकळा सोडला आहे की नाही हे नोकराला विचारून त्यांनी जपाची माळ हातात घेतली. सहज त्यांची नजर डावीकडे गेली तेव्हा उजवीकडून एक काळी धूसर आकृती अंधारात सरकत असल्याचा त्यांना भास झाला. शेठ नखशिखांत हादरले. भर थंडीत त्यांना घाम फुटला. जपाची माळ गळून पडली. एक हात छातीवर दाबून धरत त्यांनी दबक्या आवाजात विचारले.

"कोन हाये?"

कसलेच उत्तर आले नाही. दोन पावले सरकल्याचा आवाज मात्र आला. एक काळी आकृती अंधारातून नैऋत्येला सरकत होती. तिकडेच शेठजींची तिजोरी होती. शेठजींनी कशीबशी शेजारची बेल दाबली. त्या शांत वेळी बेलचा कर्णकर्कश्श आवाज आसमंतात घुमला. काळी आकृती बावचळली असावी. कारण काही मंद श्वास किंचित फुलल्यासारखे जाणवले. बेल ऐकून नोकर आला. नोकराने आत येऊन दिवा लावताच काळी आकृती दिसेनाशी झाली. नोकराला पाहून धीर आलेल्या संपतशेठनी धावत जाऊन पाहिले तर नैऋत्येची खिडकी उघडी होती. काळी आकृती त्यातून पसार झालेली असणार ह्याबद्दल शेठजींच्या मनात तीळमात्र शंका राहिलेली नव्हती.

पण शेठजींना एकच प्रश्न भयानक सतावत होता. तो प्रश्न मनात आला की शेठजी हादरून ताडकन् उठून बसत होते. तसा प्रश्न वरवर साधासाच होता. पण त्यातील खरी गोम शेठजींनाच जाणवलेली होती. काळी आकृती आत आलीच कशी हा तो प्रश्न!

आणखी एक प्रश्न शेठजींना छळत होता. तो प्रश्न तर फारच भयानक होता. ह्या प्रश्नाने तर शेठजींना जेरीला आणलेले होते. आत आलेली काळी आकृती बाहेर गेलीच कशी? बाहेर तर टॉमी होता. एखाद्या लांडग्यासारखा भयानक असलेला टॉमी एकावेळी दिड किलो मटनाचा फन्ना उडवायचा. त्याने अंधारात काळ्या आकृतीचे नरडे धरल्याची घुसमट कशी ऐकू आली नाही? शेठजी आतल्याआत प्रचंड हादरलेले होते. जी काळी आकृती टॉमीच्याही आवाक्यात नाही ती नेमकी कोण असेल?

आणि एकच नांव शेठजींच्या डोक्यात चमकले. त्या नावाची आठवण झाल्यावर शेठजी किंचित स्थिरावले. त्यांची छाती पूर्ववत ठोके देऊ लागली. नोकराने आतमध्ये कोणीही नसल्याची खात्री करून घेऊन आतील सर्व खिडक्या व दारे बंद करून घेतली व तो शेठजींना सोबत म्हणून तेथेच जमीनीवर कांबळे टाकून झोपला.

पहाट होईपर्यंत शेठजी त्या नावाचाच विचार करत होते. आजच नेमके ते नांव का आठवावे हेच त्यांना कळत नव्हते. त्या नावाशी आपला नेमका केव्हा संबंध आला होता हेही शेठजींना आठवत नव्हते. आपल्याला आठवलेल्या नावाची खरेच कोणी व्यक्ती आहे की आपल्याला भास होत आहे अश्या विचारात बुडलेले असतानाच शेठना झोप लागली.
=============

प्रकरण २ -

इन्स्पेक्टर सावंतांनी बुलेट स्टँडला लावली आणि खिशातून पनामा काढून ती शिलगावली. सुभान हवालदाराने सामोरा येत सलाम ठोकल्याचे जाणवून धुराचे वर्तुळ काढतच सावंतानी मान हलवून अभिवादनाचा स्वीकार केला. सुभान मुळापासून हादरलेला होता. नेहमी साडे दहाच्या ठोक्यावर येणारा आपला साहेब आज दहा अठ्ठावीसलाच कसा काय उगवला हेच त्याला समजत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून विचित्र घटना घडत होत्या. काळ्या वर्तुळात तीन नांवे गाजत होती. ही नांवे ऐकली की पट्टीचे बदमाष थरथर कापत होते. जेथे ह्यापैकी एकही नांव ऐकू येइल तेथील व्यवहार त्याक्षणी गुंडाळले जात होते. सुभान बेभान झाला होता. तो जीवावर उदार व्हायला तयार होता. पण ही तीन नांवे कोणती हेच त्याला अजून समजलेले नव्हते. आपल्याला नांवे का समजू नयेत हेही सुभानला कळत नव्हते. तेवढ्यात फोन खणखणला. सुभान फोनकडे झेपावणार तेवढ्यात त्याला धक्काच बसला. तोंडातील पनामा तशीच ठेवून सावंतांनी थेट फोन उचलला. आजवर असे घडलेले नव्हते. प्रथम सुभान फोन घ्यायचा आणि सावंत साहेबांसाठी असेल तर त्यांना द्यायचा. आज आपला साहेब असा विचित्र का वागतोय हेच सुभानला कळत नव्हते. सावंतांनी फोन घेऊन काहीतरी ऐकले व केवळ एक हुंकार भरून फोन ठेवला. सुभान बेअक्कल माणसासारखा पाहातच राहिला. सावंतांनी करंगळी शेजारचे बोट वर करताच सुभानने बाहेर येऊन तीन चहा सांगितले. पावणे अकराला आपल्या साहेबाला दोन कप चहा लागतो हे चाणाक्ष सुभानला केव्हाच माहीत झालेले होते. साहेब चहा घेताना एक चहा आपल्यालाही पाजतो आणि घडलेल्या घटना ऐकून घेतो हेही सुभानच्या सवयीचे झालेले होते.

चहाचे कप टेबलवर ठेवले जाताच सावंतांनी दुसरी पनामा शिलगावली व गूढ चेहरा करत समोर उभ्या असलेल्या सुभानकडे पाहिले.

साहेब असे बघतात तेव्हा त्यांना काय काय घडले हे ऐकायचे असते हे सुभानला माहीत होते. त्याने सरावाने सांगितले.

"साहेब, हद्दीत कोणताही मोठा गुन्हा घडलेला नाही. लहान गुन्हाही नाही. किरकोळ बाचाबाचीची दोन प्रकरणे निस्तरली. भुरटा पावश्या काल हद्दीत आल्याची बातमी हाती लागली. दोन माणसे पाळतीवर ठेवली आहेत. किंग हॉटेलमध्ये आज रात्री एक पार्टी येण्याची शक्यता असल्याचे नाना खबरी म्हणाला. बाकी सगळे ठीक"

सावंतांनी हे ऐकेपर्यंत एक पनामा संपवलेली होती. ते उठून उभे राहिले व खिडकीपाशी गेले. धूर्त व अतिशय गंभीर नजरेने खिडकीबाहेरील वडाकडे पाहातच त्यांनी तिसरी पनामा शिलगावली व अचानक गिरकी घेऊन मागे वळाले. तीक्ष्ण चेहर्‍याने सुभानकडे पाहात त्यांनी जरब बसेल अश्या आवाजात विचारले.

"सुभान, हा उंट कोण?"

सुभान नखशिखांत हादरला. उंट हे नांव साहेबापर्यंत पोचलेच कसे हेच त्याला कळेना! ह्या उंटाचा दरारा चोहीकडे पसरलेला होता. गेल्या काही दिवसांपासूनच उंट हे नांव ऐकू येऊ लागले होते. उंट हे नांव उच्चारले की ऐकणारा चळाचळा कापत असे. हा उंट कोण, कोठून येतो, कोठे जातो हेच कोणाला समजत नसे. अनेकजण उंट पाहिल्याचे शपथेवर सांगत. पण त्यांनाही सांगता येत नसे की उंट दिसतो कसा. उंटामुळे काळ्या जगात झालेल्या उलथापालथी बघता उंट हे प्रकरण डिपार्टमेन्टला जड जाणार हे सुभानला समजलेले होते. उंटाचे नांव आपल्या हद्दीत निघू नये ह्यासाठी प्रत्येक पोलिस अधिकारी प्रार्थना करत असे. भल्याभल्यांना धडकी भरवणार्‍या ह्या उंटाचे नांव आज सावंत साहेबांच्या तोंडून ऐकल्यावर सुभानला भोवळ यायचीच राहिलेली होती. आपल्यापर्यंत अजून जे नांव पोचलेले नाही ते साहेबापर्यंत पोचलेच कसे हे सुभानला समजेना. सुभानचे ठोके जलदगतीने पडत होते. काहीतरी उत्तर द्यायलाच हवे होते. त त प प करत सुभान उत्तरला.

"स स साहेब, उ उ उंट???? कोण उंट????"

"सुभान, तुला उंट माहीत नाही?"

"मी उंट पाहिलेला नाही साहेब, पण ऐकलंय"

"काय ऐकलंयस ते सांग" असे म्हणत सावंतांनी चहाचा एक मोठा झुरका घेतला व ते डोळे मिटून खुर्चीत रेलून बसले.

सुभानच्या चेहर्‍यावर भयानक वादळे होती. पण ती दूर सारत सुभान बोलू लागला.

"साहेब, उंट बेजोड आहे. उंटाला कोणीही पाहिलेले नाही. उंट केव्हा, कुठे आणि कोठून येतो ते समजत नाही. तो आला आहे हेही समजत नाही. का येतो तेही समजत नाही. तो गेल्यावर कळते की तो येऊन गेला. तो जे करून जातो ते भयानक असते. काळ्या जगात आज उंट म्हंटले की लोक देवाचे नांव घेऊ लागतात. सगळीकडे उंटाचाच बोलबाला आहे साहेब"

"हा उंट आज धरायचाय सुभान"

सुभानने आ वासला. क्षणभर त्याला साहेबाला वेड लागले असे वाटले. उंटाची सावलीसुद्धा दिसत नसताना खराखुरा उंट धरण्याच्या वल्गना साहेब करतो कसा हेच त्याला कळेना. पण सुभानला एक माहीत होते. उंट कोण असावा ह्याचा अंदाज फक्त आपल्यालाच आहे हे त्याला माहीत होते. पण ते तो आत्ताच बोलणार नव्हता. खात्री करून घेतल्याशिवाय बरळणे त्याच्या स्वभावात नव्हते. अचानक सावंत उठले. काही वेळ शून्यात पाहात ते काहीतरी पुटपुटले. त्यानंतर खाडकन् सुभानकडे पाहात ते म्हणाले.

"उंट, तुला मी ह्याक्षणी अटक करत आहे"

पोलिस चौकीच्या भिंतीसुद्धा चक्रावून सुभानकडे पाहात होत्या. गेली चार वर्षे जी व्यक्ती दिवसा हवालदार म्हणून वावरत होती तीच रात्री उंट म्हणून वावरते हा सामान्य हादरा नव्हता. सुभान धूर्तपणे साहेबाकडे बघत होता. क्षणार्धातच त्याने दाराबाहेर मुसंडी मारली. जवळच्याच एका टोकदार दगडाने साहेबाच्या बुलेटचे एक टायर फाडत उंट भयानक गतीने भिंतीवरून उडी मारून पसार झाला. सावंत बुलेटपर्यंत पोचेपर्यंत उंट दिसेनासाही झालेला होता.

==================

प्रकरण ३ -

भाजलेल्या कोंबडीचा एक तुकडा दाताखाली ठेवत भवानरावांनी रमचा एक मोठा घोट घेतला. रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले होते. सावंतने पनामा शिलगावली तशी मग भवानरावांनी ब्रिस्टॉल पेटवली. कडक धूर छातीत गेल्यावर त्यांना जरा हलके वाटले. समोरच्या संपतशेठच्या अंगातून भर थंडीत घामाच्या धारा लागल्या होत्या. सावंतचा असिस्टंटच उंट असल्याचे समजल्यापासून त्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या होत्या. काल रात्री आपल्याला अंधारात जाणवलेली काळी धूसर आकृती म्हणजे उंटच असणार ह्यात त्यांना शंका वाटत नव्हती. त्यामुळेच त्यांनी आज भवानरावांच्या अंगणात ही मीटिंग बोलवायला लावली होती. भवानरावांनी प्रकरण मगाशीच स्वीकारलेले होते. पण तरीही संपतशेठना खात्री नव्हती स्वतःची! भवानरावांच्या मजबूत पकडीत उंटाची मान अडकायच्या आतच उंट आपले मस्तक धडावेगळे करेल अशी भीती त्यांना वाटत होती. त्यातच भवानराव आणि सावंत ह्यांनी गेल्या अर्ध्या तासात दोन भाजलेल्या कोंबड्यांचा फन्ना उडवलेला असल्यामुळे शेठजींना ही दोघे माणसे आहेत की राक्षस हे समजत नव्हते. तेवढ्यात सावंतला तोंड फुटले.

"सर, उंटाच्या बाबतीत तुम्ही काय ठरवलं आहेत?"

चौथे अंडे तोंडात टाकून चघळत भवानराव म्हणाले.

"अस्पष्ट अशी योजना तयार आहे. पण पक्की होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल"

"उंट तुमच्या पकडीत येईल असे तुम्हाला वाटते?"

"उंटाचा आता फार काळ राहिलेला नाही सावंत! त्याची काम करण्याची पद्धत मला समजलेली आहे. सापळा लावला की अडकणार उंट"

"सापळा कुठे लावायचा?"

"संपतशेठच्या घरात"

संपतशेठ हादरला. दोन तळलेले काजू तोंडात टाकत त्याने तांब्याभर पाणी प्यायले आणि म्हणाला.

"मी घरात थांबलो नाही तर चालेल ना?"

"तुम्ही तर पाहिजेच शेठ घरात, फक्त तुम्ही तुमच्या नोकराच्या जागी, तुमच्या जागी मी आणि सावंत गच्चीवर! तुमच्या नोकराला सुट्टी द्या. त्याला कसलीही कल्पना असता कामा नये"

भवानरावांच्या मनात काय उलथापालथी चाललेल्या आहेत ह्याची किंचितशी कल्पना आता सावंतला आली. अत्यंत भेदक नजरेने अंदाज घेत सावंत त्या योजनेवर विचार करू लागला. योजना पक्की वाटू लागली होती. आता उंट सुटण्याची शक्यताच उरत नव्हती.

मध्यरात्री सुमारे दिड वाजता योजनेवर शिक्कामोर्तब झाले आणि मग शेठजींनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

==================

प्रकरण ४ -

शेठजी नेहमीप्रमाणे आठ वाजता जेवले आणि रेडिओवरील भजने ऐकत बसले. साडे नऊ वाजता भजन संपल्यावर त्यांनी नोकराला हाक मारली. नोकराने त्यांना सर्व दारे व खिडक्या आतून लावल्याचे व टॉमीला मोकळा सोडल्याचे सांगितले. जपाची माळ हातात घेऊन शेठजींनी मोजून एकशे आठ जप दोन वेळा केला. शेजारी ठेवलेले कोमट दूध घेऊन शेठजी आडवे झाले.

साधारण दहा सव्वा दहा वाजता संपूर्ण सामसूम झाली आणि अंधारात काही हालचाली सुरू झाल्या. कोणाचाही विश्वास बसला नसता पण शेठजी अलगद उतरून नोकराच्या खोलीत गेले. निजलेला अवाढव्य नोकर उठून उभा राहिला व शेठजी त्याच्या बिछान्यावर निजले. अवाढव्य नोकर ब्रिस्टॉल ओढत शेठजींच्या बिछान्यावर येऊन निजला. त्यातच एक काळी आकृती सराईतपणे गच्चीवर गेली. आता फक्त वाट पाहायची होती.

उंट कधी येतो ह्याची!

घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. काट्याची टिक टिक अस्वस्थ करणारी होती. मध्यरात्री सुमारे पाऊण वाजता अवाढव्य नोकराला एक ढेकर आली, तोच काय तो आवाज! खोलीत ब्रिस्टॉलचा धूर साठून राहिला होता. सव्वा वाजता काहीतरी खसपसले. एक काळी आकृती निळसर होत नैऋत्येला मावळली. त्याच्याच पुढच्या क्षणी आकाशातून एक खच्चून किंकाळी ऐकू आली. किंकाळीच्या पाठोपाठ शिव्यांचा भडिमार ऐकू आला. त्यातच टॉमीचे जबरदस्त भुंकणे मिसळले. अवाढव्य नोकर लगबगीने खिडकीपाशी आला तर त्याच्या मनगटावर एक चिठ्ठी येऊन पडली. अवाढव्य नोकराने ती पटकन् खिशात सारली व दिवा लावला. शेठजी धावत आले. किंचाळत सावंतही आत आला. अवाढव्य नोकर म्हणजे भवानरावच होते. ते भयानक नजरेने सावंतकडे पाहात होते. सावंतची पोटरी टॉमीने फाडली होती. ते दृश्य पाहून शेठजींचे धोतर ओले झाले होते. भवानरावांनी हळूच चिठ्ठी काढली व मोठ्याने वाचली.

"शेठजींच्या खोलीत कधी सिगारेटचा वास येत नाही. उंट फसणार नाही. उंट तिजोरी फोडणारच! आणि हो, उंट म्हणजे सुभान नव्हे. - उंट"

तिघेही चक्रावून चिठ्ठीकडे पाहत होते. नवीन प्रकरणाला सुरुवात होत होती.

===================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमशः आहे का?
मला तरी उत्कंठावर्धक वाटले सँपल.. जुन्या स्टाईलचे असले तरीही..
पुढील भाग आले तर वाचायला आवडतील.. Happy

ही अ‍ॅक्चुअल कथा नसून त्या स्टाइल मधे लिहिण्याचा फक्त प्रयोग आहे ना ? (मला तसं वाटलं)
छान जमलाय प्रयोग.

काळा पहाड प्रकरण बालपणी वाचलेय. आता नेमके आठवत नाही. पण शैली अगदी अशी नसावी. कारण हे नाही आवडले, पण ते आवडायचे. तुमची ओरिजिनल शैलीही आवडते. काही कथा असेल डोक्यात तर तुमच्या ओरिजिनलनेच येऊद्या Happy

नाही नाही ऋन्मेष, मैदेवी म्हणतायत तसेच आहे हे. त्या जुन्या कथांच्या शैलीने लिहिलेली आहे इतकेच. ही क्रमशः वगैरे कथा नव्हे. (काही नि:श्वास! Proud ) किंबहुना ही कथाच नव्हे. त्या शैलीची कॉपी आहे फक्त!

एकदम झकास, बेफिकीर. मजा आली वाचताना. क्रमशः असती तर मजा अजून सुरु राहीली असती हो.

खूप जुन्या आठवणी जाग्या केल्यात. जुने कथानायक, त्यांच्या लकबी, त्यांचे सहकारी आणि त्यांची प्रेमप्रकरणे आठवली.

घंटाकर्ण - "आपला चकणा डोळा अस्मानात उडवत घंटाकर्ण उद्गारला !"
चाणक्य - "चाणक्याची शेंडी स्तुतीने फुलून जाऊन ताठ अँटेनासारखी उभी होती"
वार्ताहर संजय - " वार्ताहर संजयने शांतपणे त्याकडे दुर्लक्ष केले. नेहमीप्रमाणे तो मुंबईच्या चौपाटीवरची भेळ खाण्यात मग्न होता. भेळ संपेपर्यंत त्याला कुणीही जागेवरून ऊठवू शकत नसे"

- कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख, मारीया लोबो
- झुंझार आणि विजया
- अजीतसिंह राठोड आणि उदयसिंह चौहान
- धूमकेतू
- रातराणी
- आणि थोड्या जास्त सखल, रहस्यपूर्ण आणि भितीदायक नारायण धारपांच्या "समर्थ" कथा.

१८ वर्षांपूर्वी मायबोलीवर हा विषय निघाला होता.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/3637.html?916777924

http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/217.html

गुरुनाथ नाईकांच्या रहस्यकथां मध्ये एक कॅरेक्टर होतं - दिसायला अगदि सामान्य, बावळट म्हणण्या इतपत परंतु नेमबाजीत अत्यंत कुशल. नांव आठवतंय का कोणाला?

मांडली हा माझा माबोवरचा पहिला प्रतिसाद!
ठरवलं होतं कि पहिला प्रतिसाद बेफिकिर यांच्या लेखालाच द्यायचा!

एवढ्या सर्व विषयांवर लेखन करणारे आंतरजालिय चतुरस्त्र लेखक फक्त दोनच!

एक रामदास - मिपा
दोन बेफिकिर - माबो

दंडवत घ्या!

मस्तं!
मला दुसरं प्रकरण भारीच आवडलं. सगळ्यात भारी म्हणजे झटकन टोकदार दगडाने बुलेटचा टायर फाडणे.

पूर्ण कथा लिहिली असतीत तर मजा आली असती.
Wink

बारा अंडी, भाजलेलं चिकन, ब्रिस्टॉल- पनामा अगदी सही सही वर्णन आहे.

अजय,

तुमच्याकडे तर फारच मोठ्या प्रमाणावर आठवणी आहेत असे दिसते. मला फक्त झुंजार, रातराणी, कॅप्टन दीप आणि धारपांच्या समर्थ कथा लगेच आठवल्या. बाकीची नांवे आत्ता आठवत नाहीत. तुमची वाचनसंपत्ती आणि स्मरणशक्ती भारी दिसते.

>>>अठरा वर्षांपूर्वी मायबोलीवर<<< बाप रे!

राज,
गुरुनाथ नाईकांच कॅरॅक्टर तुम्ही म्हंटल्यावर आठवलं खरं, पण नांव नाही आठवत. काळा पहाड मात्र बाबुराव अर्नाळकरांचाच होता बहुधा! धनुर्धर, ब्लॅक स्टार असेही काही हिरो मी वाचलेले होते. त्यातला ब्लॅक स्टार हा 'अजोड गनर' होता.

सर्वांचे अनेक आभार! आता शिरवळकरांच्या अमर - फिरोज - मंदार - दारा वगैरे हिरोंवर लिहायची सुरसुरी आलीय.

Wink

ही मूळ शैली कोणाची आहे ते समजले नाही. बाबूराव अर्नाळकरांची तर नाहीच नाही. अर्नाळकरांपूर्वीची तर नाही?मला अर्नाळकर सोडून कोणी आवडलेच नाही. अर्नाळकर खूप वाचले मात्र...गुरुनाथ नाईक आणखी एक कोणीतरी होते. ही दोन्ही नावे डु आय डीच होते. बाबुरावांची वृद्धत्वामुळे दृष्टी गेल्याने यांचे फावले. भरमसाठ इंग्रजी वाक्ये आणि सेक्सची वर्णनेही असत.

मंदार रत्नपारखी नव्हे, मंदार पटवर्धन!

दुसरे दोघे म्हणजे बॅरिस्टर अमर विश्वास आणि फिरोज इराणी!

मंदारच्या साथीला डॅनी, प्रिन्स आणि इन्स्पेक्टर दिनेश सायगल असायचा. फिरोजच्या साथीला इन्स्पेक्टर मुकेश भाटिया. अमर विश्वासबरोबर डिटेक्टिव्ह गोल्डी मायर आणि इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल! Happy

दारा बुलंदच्या साथीला मधुर, शीतल आणि आणखी एकजण!

ज्जे बात बेफिकीर. आठवले सगळे.
सगळ्यात हाइट म्हणजे तो दार बुलंद दोन्ही हात आणि पायांवर बेफाम वेगात चालत / पळत जायचा ना? Happy
दारा बुलंदची हिरोईन सलोनी ना?

अमर विश्वासबरोबर डिटेक्टिव्ह गोल्डी मायर आणि इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल! > आणि सगळ्यात मस्त कॅरॅक्टर बॅ. दिक्षित. त्यांच टेंगुळ आणि....

बेफ़िकीर जी,

Play store वर मायबोली च्या काही कथा-कादंबर्या उपलब्ध आहेत अँप च्या स्वरुपात जसे की छावणी, ट्रप, भुताळी जहाज व. तस्याच तुमच्याही कथा-कादंबर्या टाकाल का प्लिज....

अवांतराबद्दल क्षमस्व

अगदी अग्दी...! पर्फेक्ट जमलीय ती शैली! बेफी...धन्यवाद! फार जुनी आठवण करुन दिली. Happy

मी एके काळी 'झुंझार ' ची फॅन होते. एवढच काय झुंझार नावाची व्यक्ती खरोखर अस्तित्वात आहे असे वाटायचे मला! Lol
हिंदीत ही 'विक्रांत कथा' वाचायचे त्यावेळेस.
चित्रविचित्र, अदभूत गोष्टींनी भरलेला आणि कोणालाही एण्ट्रन्स सापडणार नाही असा बंगला त्याचाच होता ना?

"डाव्या डोळ्याच्या कोपर्यातून मागे अंधारात उजवीकडे कोणीतरी सरकल्याचे त्याने ताडले. पाठीला थंडगार स्पर्श जाणवला आणी तो गर्रकन मागे वळला. आणि काही कळायच्या आता त्याचा हात वेगाने फ़िरला. त्या सराईत गुंडाच्या पोटात डावा गुडघा खुपसुन उजव्या हाताने त्याची मानगुट पकडून त्याने एक विशिष्ट नस दाबली आणि तो गुंड क्षणार्धात खाली कोसळला. पुढच्याच क्षणी गुंडाच्या हातातले पिस्तौल त्याच्या हातात होते. आणि काही झालेच नाही अश्या अविर्भावात होत मस्त शीळ घालत तिथून चालु लागला. वै वै " अश्या ओळी माझ्या फार आवडत्या असायच्या! Lol

बेफिजि खरच टाका हो सुशिंच्या शैलितल्या कथा
मंदार आणि अमर च्या कथा वाचून तर खुप वर्षे झाली, बहुतेक सगळीच् वाचून झाली असतील.
आणिक एक कथा आठवतेय "मुक्ती "बहुतेक love story होती पण खुपच आवडायचि मला ती तेव्हा .खुप वेळा वाचून काढली होती
मुग्धा पटवर्धन नाव असावे नायिकेचे नि बहुतेक अशोक नवरा नि कदाचित सुनील दूसरा नायक
नीट आठवत नहिये ..पण खरच तुम्ही लिहा त्यांच्या स्टायलित

Pages