चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो - भाग ४

Submitted by अस्मि_ता on 9 June, 2016 - 07:45

मनुने खूप विचार केला पण अनि ला भेटल्याशिवाय काही कळणे अशक्यच होते. मनुने अनिकेतला फोन केला. काहीही झाल तरी आपण आता परत अनिकेतचा विचार करायचा नाही असे मनुने ठरवले होते. त्याला भेटण्याचे एकंच कारण होते... तिला जाणून घ्यायचे होते, असं काय झालं की तो आपल्याशी असं वागला... आज सगळ्या गोष्टींचा खुलासा करायचाच होता.
ठरल्याप्रमाणे ती अनिकेतला भेटायला गेली.
आजही मनुला बघून अनिकेत काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला. आधीपेक्षा कितीतरी सुंदर दिसत होती मनु.. तिनेही अनिकेत कडे पहिले आणि सगळ्या आठवणी ताज्या झाल्या... हाच तो अनिकेत ज्याला भेटायला आणि बोलायला आपण एवढी वर्ष तळमळत होतो. तो आज आपल्या समोर बसला आहे... प्रेमाची भावना उफाळून आली तिच्या मनात. असे वाटले पटकन जाऊन त्याला मिठी मारावी आणि विचारावे इतके दिवस कुठे होतास? ती खूप आनंदाने त्याच्याकडे गेली. पण??? तिला अचानक जाणीव झाली की आपलं लग्न ठरलं आहे आणि हाच तो मुलगा आहे ज्याच्यामुळे आपण स्वतःसकट घरच्यांना पण खूप दुःखी केलं आहे. ती यन्त्रवतच त्याच्यासमोर खुर्चीवर बसली.
अनिकेत: Hi, कशी आहेस?
मनु: मी एकदम मजेत. तू कसा आहेस?
अनिकेत: मी पण मस्त.
मनु: हो तू काय मस्तच असणार. पुण्यात मोठ्ठ घर असेल, ४ व्हीलर असेल, आई-बाबा खुश असतील. अजून काय हव आहे?
मनुने अनिकेतला टोमणा मारला.
अनिकेत (हसतच): हो ना... बरोबर आहे तुझं.
मनुला खूप राग आला त्याचा. माझ्या आयुष्याशी खेळून हा एवढा शांत कसा काय हा प्रश्न तिला पडला.
ती रागातच म्हणाली, “माझ्याकडे जास्त वेळ नाहीय. लवकर बोल. बरीच काम आहेत घरात".
अनिकेत: अगं, थांब जरा. इतक्या दिवसांनी भेटत आहोत, एवढी काय घाई आहे? काय घेणार सांग...
त्याने waiter ला हाक मारली.
मनु: Please, काही नकोय मला. मला फक्त हे सांग की एवढ्या वर्षांनी तुला माझ्याशी मैत्री का करायची आहे? आणि आत्ताच का आठवले मी तुला? का?
मनु रागात अजूनच छान दिसत होती. अनि तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला,
“आठवण यायला विसरलोच कुठे होतो मी तुला?"

काय ऐकले मी आत्ता? मनूचा तिच्या कानावर विश्वासच बसेना. आजपर्यंत हेच ऐकण्यासाठी तिचे कान आतुरले होते... पण मग, असे असेल तर हा असा का वागला माझ्याशी?
"काय म्हणालास"??? मनु मोठ्याने म्हणाली...
“हेच की, आठवण यायला विसरलोच कुठे होतो मी तुला"? अनिकेत तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. दुसर्याच क्षणी, जोर जोरात हसत म्हणाला, “तुला हेच वाटलं असेल नाही? मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुला भेटायला बोलावलंय?" हा हा हा...
“नाही मानसी!! Sorry... खर तर मी कधी तुझ्यावर प्रेम केलंच नाही. तुझ्याबद्दल फक्त एक आकर्षण होत. U.S. ला गेल्यावर मला ते जाणवलं... यार, एवढ्या सुंदर आणि आकर्षक मुली आजूबाजूला असताना मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो म्हणून committed राहायचं? थोडे दिवस मी प्रयत्न पण केला. एखादी सुंदर मुलगी दिसली की मनात तुझा विचार आणायचो आणि तिच्याकडे दुर्लक्ष करायचो. पण किती दिवस असा राहणार होतो मी? तिकडे राहायचाच विचार होता पण आई बाबांसाठी इकडे याव लागलं. खरं सांगू मला इतक्या दिवसात तुझी साधी आठवणही आली नाही."
मनुला त्या क्षणी फक्त जोरजोरात रडावेसे वाटत होते.पण तिने स्वतःला सावरले. अनिकेत बोलत होता पण तिला ते ऐकायची इच्छा नसूनही ऐकावे लागत होते. तिचा स्वाभिमान आडवा येत होता. तिने ओंकार ला होकार दिला होता. आता कोणत्या तोंडाने ती अनिकेत ला सांगणार होती की तिचे अजूनही त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचा पुढचा एकही शब्द ऐकण्याची तिची हिम्मत नाहीय.
“मला माफ कर मानसी. मी तुला काहीही कल्पना न देता तुझ्यापासून वेगळा झालो. मला सुरवातीला तुला कस सांगाव हेच कळत नव्हत आणि नंतर तू मला विसरली असशील असे समजून मी तुला काहीच सांगितले नाही." अनिकेत बोलत होता. “परवा मला ओंकार भेटला. तो माझ्या एका मित्राचा मित्र आहे. त्याने मला तुमच्या साखरपुड्याची बातमी दिली म्हणून मी तुला फोन केला. मला वाटलं एकदा तुझी माफी मागायला हवी मनापासून. म्हणून मी तुला भेटायला बोलावले" मनुला आत्ता ह्या गोष्टीचा उलगडा झाला की अनिकेत आत्ताच तिच्या आयुष्यात परत का आला. "मला माफ केलं आहेस ना तू?"
एवढ सगळ होऊनही हा इतका सहजपणे बोलतोय. ह्याच्यासाठी ते प्रेम म्हणजे फक्त timepass होता आणि आपण वेड्यासारखी आशा ठेऊन होतो की कधीतरी तो येईल, आपल्याला म्हणेल की "माझं तुझ्यावर खूप प्रेम होत, आहे आणि पुढेही राहणार" त्याची काहीतरी मजबुरी असेल त्यामुळे तो आपल्याशी बोलत नाहीय असा समज मनुने करून घेतला होता. त्या खोट्या आशेवर ती जगत होती आणि ह्यापुढेही जगणार होती. पण आज?? आज जेव्हा अनिकेतने सांगितले की त्याचे तिच्यावर प्रेमच नव्हते आणि तो तिला कधीच विसरून गेला होता, तेव्हा मनूच्या जगण्याला काही अर्थच उरला नव्हता. ती स्तब्धपणे सगळ ऐकून घेत होती.
"मानसी, सांग ना, मला माफ केल ना तू?"
"हो. म्हणजे माफ करायचा प्रश्नच कुठे येतो? प्रत्येकाला हक्क आहे स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगायचा. फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तू माझ्यावर प्रेम केल असतंस तर ते मलाही आवडलं नसतं... So, be happy and chill. All the best for your future. माझी काहीही तक्रार नाहीय".
"मग आता आपण friends आहोत ना?"
"हो!!" का नाही? चल bye... मी निघते आता. बराच उशीर झालाय" हुंदका आवरत मनु म्हणाली.
"Thank You. तू खूप समजूतदार आहेस हे माहित होत मला. लग्नाला बोलाव"...
गुड बाय.
त्याचे ते वाक्य पूर्ण होईपर्यंत मनु तिथून निघाली होती.

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलय. पण अगदी एखादा नविन किस्सा पाहावा असे वाटले. वेग खुप जास्त आहे. जरा मोठा करा. अजून नात्यास मेळ यावा असे पुर्ववत किस्से हवे.