"अरे शिवल्या ती आधाराची दोन चाकं काढल्याशिवाय तू नाही शिकणार सायकल..."
"पण मी पडतोय ना?"
"पडूदे"
"हा पडूदे आणि लागूदे... शिवल्या बाबांचं नको ऐकू तू. येईल तुला नंतर आपोआप"
"आपोआप?"
"हो तू काय जन्मतः शिकून आलेलास का?"
"मी शेजार्यांच्या सायकली चोरून चालवून शिकलोय. आटलास... डोक्यापेक्षा उंच सायकली"
"पराक्रमच केलात मोठा"
"ओके. शिका कधी शिकायचं तेव्हा"
"बाबा कात्रजची बाग बनवायचीये..."
"बनव ना मग"
"मी झोपतोय तुम्ही बनवा ना प्लिज..."
"***वर फटके देऊ का?"
"पण..."
"प्रोजेक्ट मी स्वतः बनवलाय हे सांगता येईल एवढे तरी कष्ट कर"
"सॉरी बाबा"
मनगटावर संस्कार करायची संधी सापडत नाहिये.... किस्नाबाईच्या काठावरचा डोंगराएवढा वटव्रुक्ष... त्याच्या पैलतिरापर्यंत पाणी शोधत गेलेल्या मुळ्या... भुंड्या दुष्काळी माळाच्या छातीवर झुरमुळ्या हलवीत नाचणारी पिपरण... काहीतरी दाखवायला हवं त्याला. का त्याचं त्याला दिसेल सगळं? त्याला बघायची सवय लावावी लागेल की जगण्याच्या प्रवासात किंवा वाटेवर किंवा प्रवाहात वगैरे तो स्वतःच बघेल ते सगळं...? सटर फटर प्रश्न तर नेहमीसारखे पडतातच आपल्याला... हे ही तसलेच आसतील... पैशांच्या जंगलात हरवेल तो? नोटांच्या कुबड्यांशिवाय कसा जगेल तो? खेळणी ही खेळणीच असतात फक्त? त्यात कसलं आलय जगण्याचं तत्वज्ञान? मला वाटतय हे प्रश्न सटर फटरच असणार....
"बाबा मला धनुष्य पायजे"
"बनवू ऊद्या"
"बनवू?"
"हो. ऊद्या"
"जय गणेश व्हरायटीत गोल्डन मिळतो तोच हवा"
"अरे आता बनवत कुठे बसतो दे ना आणुन ५० रुपयात तर आहे."
"बरं... आणतो."
सोनेरी रंगाच्या धनुष्यानं पोरगं भिंतीवरच्या घड्याळावर नेम धरतं आणि मी एक डोळा मिटून महादेवाच्या देवळाच्या दगडी भिंतीवर उगवलेल्या पिपळावर बसलेल्या पोपटाकडे बाण सोडतो.
शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर माळ्यावरची कापड फाटलेली छ्त्री... तिची एक काडी कमान होते... गळ तुटलेल्या छ्डीचा तंगुस ताणून धनुष्य होतो. ज्वारीच्या गणगाट्याला बाभळीचा काटा लावला की बाण होतो... दारात फिरणार्या कोंबडीवर पहिला निशाणा... मग शिकारीला प्रस्थान...
"बाबा हा बाण फुसका आहे"
"अबे पोपट पाडला ना देवळावरचा..."
"पोपट?"
"काय नाय. काय झालं बाणाला?"
" घड्याळ टीपतच नाही. इथेच पडतोय जवळ"
"मग आता काय?"
"मला भवरा आणा"
"का पतंग आणू?"
"नको त्यापेक्षा रिमोट कार आणा..."
"ओके बेटा. उद्याच जयगणेश व्हरायटीत जातो..."
पोरगं जाम खुश होतं.
पन्नास शंभरात विकत मिळणार्या या खेळण्यांसाठी आपण केवढे झिजलो ना? पण ह्याला तसं नाही करावं लागणार जय गणेश वाल्याने त्याच्या मनगटाची मशागत रोखून ठेवलीये... त्या मनगटावर आता घामाचे ऊमाळे जन्मणार नाहीत... तिथे गवत माजत जाईल... कचरा साचत जाईल... विकत घेतलेल्या आनंदाचे एवढे थर बसतील की मनगटातल्या चैतन्याची कबर मनगटावरच बांधली जाईल...
अरे देवा केवढासा विषय आणि केवढे ते पाल्हाळ...?
आपली खेळणी आपण नाही बनवली आणि जे मागेल ते दुकानात मिळाले तर त्याच्या व्यक्तीमत्वावर काय असा मोठा परिणाम होणारेय...? तुम्ही बाण, लगोर्या, गाड्या स्वतः बनविल्या कारण जय गणेशवाला तेव्हा गुजरात सोडून महाराष्ट्रात आला नव्हता... शहरात कुठून आणणार छत्रीच्या काड्या, तंगूस गणगाटे? बाभळी दिसतात का तुम्हाला टोकाला काटे लावायला? आणी नेम काय चिकन सेंटर वाल्याच्या कोंबड्यांवर लावायचा का? सटर फटर लिहायचं म्हणजे झालं...
पाणी शोधत फिरणार्या मुळ्यानी वडाला डोंगराएवढं मोठं केलं.... माळावरच्या ऊन्हाच्या झळा पिपरणीनं सुसह्य केल्या... आमचा बाण भलताच पावरफूल बनला नाही पण फुसकाही निघाला नाही....
हे सगळं भुतकाळी भराड काळजाच्या देवळात घुमत राहतं... आणि जय गणेशच्या व्हरायाट्यांनी झपाटलेल्या झाडांना मोकळं करावं असं वाटून जातं...
पण च्यामारी ह्याचा संस्काराशी आणि व्यक्तीमत्वाशी काही संबंध आहे का?
आवडलं. सगळं सहज मिळण्याजोगं
आवडलं. सगळं सहज मिळण्याजोगं असलं तरी खरंच त्यासाठी थोडे कष्ट घ्यावेत. त्यात involved असलं की किंमतही राहते, स्वनिर्मितीचा आनंदही मिळतो.
मस्तच... आवडलं...
मस्तच... आवडलं...
अश्वीनी, आबासाहेब आभारी आहे!
अश्वीनी, आबासाहेब आभारी आहे!
वेलकम बॅक ... भारी
वेलकम बॅक ... भारी लिहिलंय.
रच्याकने, काल तुमच्या 'सुपाएवढ्या काळजाची..' मधल्या सगळ्या कथा वाचल्या. अफाट लिहिल्या आहेत सगळ्याच. योगायोगाने हल्लीच माडगूळकरांचं 'माणदेशी माणसं' वाचलं. लेखनशैलीत बरंच साम्य आहे. बहुतेक तिथल्या मातीचा गुण ! जियो ! पुलेशु.
धन्यवाद मित!
धन्यवाद मित!
जबरदस्त! ताकदीचं लिखाण..
जबरदस्त! ताकदीचं लिखाण..
आम्ही आज तिशीला आलो, आमची पिढी खऱ्या अर्थाने संक्रमण जगलेली. आम्ही पोस्टातली पत्रे पण लिहिली, वाचली.. std booth वरून फोन केला, फोटोस्टुडिओत फॅमिली फोटो पण काढलेत.. गोट्या, फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, धनुष्यबाण, गुलेर, अंताक्षरी, मामाचं पत्र वगैरे सगळं खेळलो, जगलो.. पुस्तकं वाचली, जुन्या नव्या पुस्तकांचा वास छातीत भरून घेतला!
पण लहान पाटील येतील तेव्हा त्यांना यातलं काय काय करता येईल? त्यांचं मनगट घाम निपटून कडक होईल की जय गणेश व्हरायटी त्यांचं बालपण खाऊन जाईल? म्हसोबा जाणे!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
ह बा तुम्ही माबोवर बर्याच दिवसांनी दिसलात. वेलकम बॅक.
झकास
झकास
तिथे गवत माजत जाईल... कचरा
तिथे गवत माजत जाईल... कचरा साचत जाईल... विकत घेतलेल्या आनंदाचे एवढे थर बसतील की मनगटातल्या चैतन्याची कबर मनगटावरच बांधली जाईल...>>>>
आजच्या पिढीचे हे दुर्दैव की त्यांना निर्मितीतला आनंद चाखायला मिळत नाहीय आणि त्याहून मोठे दुर्दैव हे की त्यांचे आईबाबाना त्यांच्या लहानपणी ज्या गोष्टींचा अभाव होता असे आता वाटतेय त्या गोष्टी मुलांना न मागताच देऊन मुलांचा काही मागण्याचा, त्याची वाट पाहण्याचा व नंतर ती मिळण्याच्या अपूर्वाईचा आनंद स्वतःच मारून टाकताहेत.
सुंदर; बालपण आठवलं ,आम्ही
सुंदर; बालपण आठवलं ,आम्ही खराट्याच्या काड्या वाकवून, त्याला काची दोरा ताणून बांधायचो व धनुष्य तयार करायचो ,बाण म्हणजे खराट्याची कडीच असायची आता खराटे ही प्लॅस्टिकचे निघालेत.
बित गए ओ दिन ,
बस यादे बाकी हैं।
पुराने दिनों को याद करने,
की बस आदत बाकी हैं।
असच आपलं सटर फटर - भारीच
असच आपलं सटर फटर - भारीच लिहिल आहे.
येउदे अजुन असच आपलं सटर फटर.
सुंदर लिहीलय ह.बा. भिडलच!
सुंदर लिहीलय ह.बा. भिडलच!
मी आधी हा.ब असा वाचला आयडी
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा
छान लिहिलंय.माबोवर बर्याच
छान लिहिलंय.माबोवर बर्याच दिवसांनी छान लिहिलेलं वाचायला मिळालं
छानच आहे सगळं. एक गम्मत अशी
छानच आहे सगळं. शैली खूप आवडली.
एक विरोधाभास असतो. अनेकांना त्यांच्या लहानपणी त्यांना स्वत:ला जे मिळालं नाही ते आता आपल्या मुलांना तरी निदान मिळू दे असं वाटत असतं तर आणखी वेगळ्या अनेकांची त्यांच्या लहानपणी त्यांना जे भरपूर मिळालं आहे ते (तेच ) आपल्या मुलांनाही मिळावं अशी इच्छा असते.
Pages