तंटा नाय तर घंटा नाय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 June, 2016 - 13:41

मुंबई लोकल फर्स्टक्लास. कमी गर्दीची वेळ. निदान फर्स्टक्लाससाठी तरी..
ट्रेन आपल्याच गतीने चालली होती. स्टेशनं येत जात होती. चार माणसे चढत होती तर चारच ऊतरत होती. डब्यातील लोकसंख्या कायम राहत होती. अश्याच एका स्टेशनवर ट्रेन सुटता सुटता डब्यातली गर्दी वाढवायला, दोन माणसे आत चढली..

‘मुंबई मे नया है क्या’ पटकन विचारावेसे वाटावे. असे त्यांचे चेहरे, आणि भांबावलेली देहबोली. हातातील प्रत्येकी दोन पेट्या सांभाळत रिकाम्या असलेल्या सीटांवर आपण कुठे अ‍ॅडजस्ट होतोय का बघू लागले. पण स्थानापन्न होण्याआधीच एका माणसाने त्यांना हटकले,
"हेलो, ये फर्स्टक्लास है"

खरंच होतं ते. फर्स्टक्लासमध्ये अशी गोंधळलेली माणसे चढणे आणि पुढच्या स्टेशनला कोणीतरी सांगितल्यावर डब्बा बदलणे हे काही नवीन नाही.

"उधर बाजू मे खडे रहो, वहा पे.." हे पुढचे वाक्य मात्र फारच गुर्मीतून आलेले होते.

आता मी तिघांचे निरीक्षण करू लागलो. ते दोघे पेटीबहाद्दर चाळीशीच्या आसपास असावेत. आणि तो गुर्मीबहाद्दर पस्तिशीचा. कुठल्या तरी विदेशी कार्यालयात साहेबाच्या पोस्टवर असावा. मिजास तरी तशीच होती. आपल्या हाताखालच्या लोकांवर डाफरावे तशी. पण लोकलच्या डब्यात सारेच एक समान असतात. इथे कोणी कोणाचा बॉस नसतो. सर्वांनी एकच तिकीट काढले असते आणि सर्वांचाच समान अधिकार असतो. पण कदाचित ईथे तसे म्हणता आले नसते. कारण या दोघांकडे फर्स्टक्लासचे तिकीट नसावे.

पडत्या फळाची आज्ञा घेतल्यासारखे ते काही बाजूला जाऊन उभे राहिले नाहीत. पण मग त्या सामानसुमानासह बसायलाही चाचरू लागले. शरीरयष्टी लक्षात घेतली तर त्या दोघांनी एकेक करून डाव्या हातानेही याला बुकलवला असता, जर प्रकरण मारामारीचे असते तर.. पण ईथे तसेही नव्हते.

दोघेही माझ्या जवळच घुटमळत होते, मी माझी शेजारी ठेवलेली बॅग उचलून सीट रिकामी केली आणि ईशार्‍यानेच त्यांना म्हणालो, ‘या बसा! सीट आपलीच आहे’
एक माझ्या बाजूला बसला तर एक समोर ..

आता मी त्यांचे आदरातिथ्य केले म्हणून तो मगासचा उर्मट माणूस माझ्यावर नक्कीच चिडला असावा. पण मला थेट ओरडू शकत नव्हता. एवढी तर आपली दुसर्‍याच्या एरीयातही चालते. पण म्हणून मग तो आपल्या आवाजातली जरब तशीच ठेवत म्हणाला, "दे डोण्ट हॅव फर्स्टक्लास तिकीट"

"ओके! बट आय अ‍ॅम नॉट ए टीसी!!" मी तेवढ्याच ठसक्यात परतवले.

पण लगेच जाणवले, अरे रुनम्या आपली मोडकी तोडकी ईंग्लिश का फाडतोयस? इथे वाद घालावा लागणारसे दिसतेय. मग लागलीच तोडकीमोडकी हिंदी कम मराठीवर आलो.

"मै टीसी नही हू भाई. मै चेक नही कर सकता, के उनके पास फर्स्टक्लास का टिकट है या सेकंडक्लास का.. या फिर है भी के नही.."

"हां, वो ठिक है. लेकीन टीसी आयेगा तो फिर पकडेगा उनको" पुढच्याच वाक्याला तो बरेपैकी बॅकफूटवर आला होता.

"पकडू दे की मग. कामच आहे त्याचे ते. आपल्याला काय करायचेय.." मी सरळ तोडून टाकले.

पण त्याचं आपलं चालूच. "ऐसेही ये लोग चढ जाते है .. फिर.. और .. ये हो जाता है, वोह हो जाता है.. काहीबाही बडबडत होता. स्वताशीच की आमच्याशी कल्पना नाही. मी लक्ष देणे सोडून दिले होते..

ईथे एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. आधी तो उर्मट माणूस त्या दोघांवर डाफरत असताना डब्यातले ईतर प्रवासी आपल्याला काहीच पडले नाही म्हणत शांत होते. तसेच मी देखील त्या माणसाशी हलकासा वाद घालत होतो तेव्हाही सारे चिडीचूप होते. कोणालाही आपले साधे मत नोंदवावेसे वाटले नाही. साली मुंबईमधली पब्लिक आजकाल अशी बदलत का चाललीय हे समजत नाही. आता हे मलाच असे वाटते की ईतरांचाही अनुभव हाच बोलतो. किंवा असंय का, की हे फक्त वेस्टर्न लाईन फर्स्टक्लास पुरतेच मर्यादीत आहे आणि हार्बर लाईनच्या सेकंड क्लासमध्ये आजही दुसर्‍याच्या फाटक्यात आपला पाय अडकवायची हौस तितकीच आनंदाने भागवली जाते.

असो,
तर एव्हाना ते दोघे रिलॅक्स झाले होते. मी चौकशी न करताही ते स्वत:हूनच मला आपल्याबद्दल सांगू लागले. त्यांच्याबद्दल बांधलेला अंदाज साधारण खरा ठरत होता. दोघे वर्ध्याचे होते. काही वैयक्तिक कामासाठी सरकार दरबारी चकरा मारायला मुंबईत आले होते. पहिल्यांदाच आले होते आणि फर्स्टक्लास, सेकंडक्लास असा काही प्रकार असतो हे त्यांच्या गावीही नव्हते. किंवा काही रंगीत पट्ट्यांनी तो ओळखावा एवढे ज्ञान तरी नक्कीच नव्हते. बघितला रिकामा डबा आणि चढले पटकन, ईतका साधा सरळ हिशोब होता.

दोनच स्टेशनानंतर त्यांना उतरायचे होते. एका स्टेशनासाठी कुठे त्या अवजड पेट्या उचलत डब्बा बदलणार म्हणून मी त्यांना माझ्या रिस्कवर ईथेच बसा म्हणालो. टीसी आला तर घेऊ बघून हे ही पुढे जोडून दिले. आणि मग ते माझ्याच बाजूला बसून माझ्याच मुंबईला नावे ठेवू लागले.

सुरुवात आमच्या मूंबईच्या फेमस गर्दीपासून केली आणि शेवट अ’स्वच्छतेवर झाला. कदाचित वर्धा शहर फार स्वच्छ असावे किंवा स्वच्छता अभियानाने त्यांच्या अपेक्षा फार वाढवल्या असाव्यात. त्यानंतर खाद्य संस्कृतीकडे वळले आणि ‘मुंबईच्या वडापावबद्दल फार ऐकून आलेलो पण काही जमला नाही’ असेही बोलून गेले. आता इथेही काय ऐकून आलेले हे त्यांनाच ठाऊक. तसेच कुठच्या गाडीवर खाल्ला की जंबोक्वीन खाल्ला, किंवा मग वडापावच्या नावावर मॅक’डी मध्ये तर नाही ना घुसले, हे डिटेल विचारायच्या फंदात मी पडलो नाही.

एकंदरीत त्यांचे काम काही होत नव्हते. सरकार दरबारी कोणी त्यांची दाद लागू देत नव्हते. त्यांच्या भाबडेपणामुळे येणार्‍या जाणार्‍या लोकांकडूनही हटकले जात होते. आणि कदाचित या सर्वांमुळे मुंबई त्यांना जमत नव्हती असा निष्कर्श मी काढला. तसेही मुंबई ही चार आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीमधील हत्तीसारखी आहे. बाहेरची लोकं येऊन मुंबईत ज्या भागात राहतात, वावरतात, तिथे मुंबईचे जे रूप बघतात, तेच आणि तेवढीच मुंबई आहे असे समजून इथे अडकतात तरी किंवा पसार तरी होतात.

असो, दोन स्टेशनं पटकन आली आणि संवाद फारसा वाढला नाही. पण जो थोडाबहुत झाला तो त्यांची मनस्थिती समजून घेण्यास पुरेसा होता.

खिडकीतून प्लॅटफॉर्म दिसू लागले तसे उठले. मुंबईत पहिल्यांदाच त्यांना कोणीतरी सहृदयी माणूस भेटल्यासारखे गहिवरून जात शुद्ध मराठीत मला ‘धन्यवाद’ बोलले. मी देखील तेवढीच संधी साधत मला फार दुनियादारी जमते असा आव आणत म्हणालो, काका, मुंबईत चांगली वाईट दोन्ही प्रकारची माणसे मिळतील.. पण एक लक्षात ठेवा.. इथे तण्टा नाय तर घंटा नाय !

- ऋ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. मायबोलीचा नागराज मंजुळे झालास आता .
प्रसंग काल्पनिक कि वास्तवदर्शी याची कल्पना नाही, पण लोकलमधे आयुष्य गेलेलं आहे हे जाणवलं. लोकललाईफ मधे जे भोगावं लागतं ते जसंच्य तसं मांडलंय. मग वाचकांनी त्यातून काहीही अर्थ काढावेत. कान्स फिल्म फेस्टीव्हल मधे या लेखावर आधारित शॉर्ट फिल्म पाठवून दे.

तो गुर्मीत बोलणारा मनुष्य एका क्लासचं रिप्रेझेंटेशन करतो, तू स्वतः एका क्लासचं आणि ते दोघेजण बहिष्कृत भारताचं ! बाकीचे मूक प्रेक्षक म्हणजे जनता. यांना कशाचीच फिकीर नसते. पण व्हॉट्स अप वर तत्वज्ञान झाडण्यात, पकावू फॉर्वर्डस पाठवण्यात हे आघाडीवर असतात. त्यामुळे शॉर्टफिल्म मधे कुणाच्या तरी हातात मोबाईल हवाच आणि त्यावर कुठेवर वरचे फॉर्वर्डस वाचतानाचे हावभाव इत्यादी मस्ट आहे. फॅण्ड्री आणि सैराट मधे नाही का फेसबुक वापरणारे गावकरी दाखवलेले ? लोकांनी किती अर्थ काढले त्यातून.

हे असं ध्येय ठेवलं म्हणजे मायबोलीवर धागे काढण्याच्या छंदाला महत्वाकांक्षेची जोड देता येईल. जर कान्स मधे ही फिल्म गाजली तर आम्ही पण म्हणू ना कि हा आमचा ऋन्मेष आहे.. तू ही आयडी लगेच तुमचा रुन्मेष करशील.

नाही , थांब. तुमचा असं वाचताना परकेपणा वाटतो. तुमचा पेक्षा आमचा असं लिहीलंस तर वाचणारा आमचा ऋन्मेष असे वाचेल...

थांबतो बुवा. नाहीतर पाल्हाळ तुझ्या लेखापेक्षा मोठं होईल. लेखाच्या वरताण प्रतिसाद असू नये असा नियम वाचल्याचे आठवते.

जवळपास १० वर्षांपूर्वी लोकलमध्ये फर्स्ट क्लास हाच प्रसंग एका आजीबाईंच्या बाबतीत घडलेला. तेव्हा मी त्यांना आत बसायला मदत केली होती स्वतःची जागा देऊन. लॉजिक तेच, चुकलेल्या माणसाला मदत करायची सोडून सगळे त्यांच्यावर तुटूनच पडतात. Sad त्यांच्याकडे तिकीट आहे की नाही हा टीसीचा प्रॉब्लेम आहे. कितीतरी संभावित लोक फर्स्ट क्लासमधून विनातिकीट पण जातातच. फक्त ते संभावित 'दिसतात' म्हणून सुटतात.

कितीतरी संभावित लोक फर्स्ट क्लासमधून विनातिकीट पण जातातच.
आणि वर प्रौढी मिरवतात - ह्या:, आम्ही कधीच तिकीट काढत नाही, टीसी ची हिंमत नाही अपने साथ पंगा लेनेकी!!

एक नंबर रे भाउ !!
>>मायबोलीचा नागराज मंजुळे झालास आता << क्या बात है !! नवीन नवीन पदव्या मिळवितो आहेस ऋ Happy

ऋ मस्त लिहिलंयस रे.
पण मला पण फर्स्ट मध्ये विदाउट तिकीट माणसं आलेली नाही आवडत सम हाऊ. आणि माझं मत आहे ती जाणून बुजूनच शिरतात . एवढं कळत नाही अस नाहीच शक्य . हेमवैम. एक दिवस सेकंडच तिकीट असेल पास संपला म्हणून तरी मी कधी नाही शिरत फर्स्ट मध्ये . असो, पण आता यावर नको वाद .

मनीमोहोर, जगात सर्व प्रकारचे लोक असतात. तुम्ही म्हणता तसेही असतात, मी वर सांगितले असेही असतात. इथे अश्या लोकांबद्दल लिहावेसे वाटले पुढच्या लेखात आपण म्हणत आहात तश्या लोकांबद्दल लिहेन Happy

घाटकोपर ते ठाणे जात असताना दुपारच्या त्या १५ मिनिटाच्या प्रवासात मलाही असा एक अनुभव आलेला. मुंबईतलाच पण सेकंड क्लास वाला वाटणारा एक बारीक अंगकाठीचा व्यक्ती चढला. फुटबोर्ड वरच थांबलेला. खिडकीत बसलेल्या एकाने त्याला खटकलेच... त्या दोघांतला संवाद...

फ: अबे... फर्स्ट क्लासमें कहा आ रहा है तु
से: ठाणे
फ: लेकीन,ये फर्स्ट क्लास है रे... महंगा होता है टिकीट... टीसी पकडेगा तो बहोत जादा फाईन होगा
से: पकडेगा तो फाईन तु देगा या मैं
फ: मैं क्युं दुंगा बे ... तुझेही देना होगा
से: तो तुझे क्या तकलीफ है.... तु बैठा है ना ठीक से... तो फिर (वैतागुन)
फ: मतलब!!!! हम क्या चु** है जो पास निकाल के जा रहे है (आवाज चढवत)
से: तु होगा... मुझे क्या लेना देना...
फ: साला... मेरे को चु** बोलता... भेंडी........ चल टिकीट दिखा तेरा... (आणी तावातावाने हा गडी चक्क विंडो सीट सोडून त्याच्याकडे गेला)
से: तु कोण मुझे पुछनेवाला... तेरे पास कहाँ टिकीट है... तु दिखा पहेले

फर्स्ट क्लास वाला बहुधा फ्रस्ट्रेटच असावा.. त्याने पास दाखविला.... पण मनातून चिडलेल्या त्या बारीक व्यक्तीने तो पास अक्षरश: हिसकावून बाहेर फेकून दिला व जोराने पण कडक पण आवाजात बोलला

से: अब तु विदाऊट टिकीट है... जा और चुप बैठ...

आपल्याला नसलेले अधिकार वापरून डाफरणारा एक क्लास आहे. तो फर्स्ट क्लास आहे. रस्त्यावर देखील हे लोक प्रबोधन करण्यात पटाईत असतात.तुम्ही कोण असं विचारलं की इंडीयन सिटीझन असं उत्तर दिलं जातं.

असेलही भम, नाही म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणजे असणारच पण घंटा म्हणजे काहीही न मिळणे अशा अर्थी वापरतात ना. तंटा न करता काहीही मिळत नाही अशा अर्थाने
'नाय केला तंटा तर मिळेल घंटा' असे काहीतरी हवे ना !

हर्पेन, भांडलात नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही. भांडाल तर मिळवाल.
भ्रम म्हणतात तसा लय भारी डायलॉग आहे. लिंकही डकवली आहे.

अपरीचित, वाह मिथुन चक्रवर्ती आठवला

हर्पेन घंटा हा एक उद्गारवाचक शब्द आहे. याचे बरेच अर्थ निघतात.

कोणीतरी आपल्याला पकवले तर त्याला आपण नुसते "घंटा" बोलू शकतो.

उदाहरणार्थ काहीही हं श्री ऐवजी घंटा श्री

एक माझं आणि माझ्या भावाचं वैयक्तिक मत आहे, कि ६०% ते ८०% लोक्स हे लोकलच्या फर्स्ट क्लासनी प्रवास करतात कारण त्यांना त्यांची कंपनी ट्राव्हलिंग अलावन्स देते.... खुप कमी लोक्स आहेत जे स्वः खर्चाने फर्स्ट क्लास अफॉर्ड करतात... गुर्मी दाखवणारे हे सहसा कंपनीच्या जिवावर उड्या मारतात... पण मुंबई ही स्वतःचं वेळोवेळी अश्या लोकांना धडा शिकवते......

तृष्णा, आपल्या 60-80 निरीक्षणाशी जरा असहमत. मला नाही वाटत हा टक्का एवढा भलामोठा असेल. फर्स्टक्लासचा पास परवडतो बरेच जणांना. आमच्या कंपनीत एका लेव्हलला पेट्रोल अलाऊन्स सुरू होतो. ते सर्व बहुतांश कारनेच येणारे आहेत. पण त्या आधीचे कैक कुठल्याही अलाऊन्स शिवाय फर्स्टक्लास एफोर्ड करतात.
आणि अलाऊन्स म्हणजे तरी काय शेवटी, पगाराचाच भाग..

एका वर्गाचे उत्पन्न वाढले आहे आणि त्यांनी आपल्या गरजाही वाढवल्या आहेत.

तरी फर्स्टक्लासचा पास परवडणारे ईतर दिवशी ईतर प्रवासात फर्स्टक्लासचे सिंगल तिकीट महाग पडते म्हणून सेकंडने प्रवास करतात असे बरेच असतात.

मात्र काही ठिकाणी ट्रेन्सना ईतकी गर्दी असते की फर्स्टक्लासवालेही दाराला लोंबकाळलेलेच असतात. आणि म्हणूनच आपल्या क्लासवर अहंकार कधी बाळगू नये हेच खरे..

ऋन्मेऽऽष
ईथे प्रश्न एका वर्गाचा नाही आहे. प्रश्न आहे कि स्वःताला एक उच्च वर्ग समजणारी लोक ही खरे तर फक्त दिखावा करतात. अलाऊन्स हा पगाराचा जरी भाग असला तरीही कितेक कंपन्या विथाऊट रीसिप्ट वॉवचर एक्सेपट करीत नाही म्हणुन निदान ५०% लोक्स तरी फर्स्ट क्लासनी प्रवास करतात. हे ही तुम्हाला जर मान्य नसेल तर तुम्हि फक्त एका विशिष्ट गटाकडेच पाहत आहात... मुंबईत खुप वेगवेगळ्या पेशीची माणसं आहेत जी दोन नाही तर तीन ते चार मुखवटे घालुन ट्रेन नी प्रवास करताना हमखास दिसतात...