कथा संपादन शुद्धी श्रेय मायबोलीकर सहेली ह्यांना दिलेच पाहिजे, मोबाइल वर घाईघाईत खरड़लेल्या लिखाणाला वेळात वेळ काढून संस्कारित केल्या बद्दल त्यांचे असंख्य आभार
मे 09,1999,0930 वाजता
जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांसाठी एक रजिस्टर्ड पोस्ट पॅकेट हाती होते, ते द्यायला मी आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो, पॅकेट खुद्द साहेबांच्या नावचे होते म्हणून मी सामान्य प्रशासन मधे डाक न देता साहेबांच्या गोपनीय विभागात आलो होतो. हा खास कलेक्टर साहेबांची डाक हाताळणारा विभाग होता, आत गेलो ते एकटे बशीर मियाँ बसले होते त्यांनी मला पाहताच उठून एक खुर्ची आणली अन म्हणाले,
"आइये आइये साब बैठिये कैसे आना हुआ".
"कुछ नहीं ये साहब का रजिस्टर्ड था".
"ओके ओके" म्हणतच बशीर मियाँनी डीस्पॅच रजिस्टर काढले, अन झटकन अक्नोलेजमेंट मला काढून दिली मी ती माझ्या बॅग मधे टाकली अन बशीर मियाँना म्हणालो,
"अच्छा मियाँ येतो मी".
"बसा हो ज़रा कावाह मागवतो".
"नाही नको तिकडे पोस्ट ऑफिसला काम आहे भरपुर".
"ठीक आहे पोस्टमन बाबु भेटु परत पुढल्यावेळी वेळ काढून या".
तिथून बाहेर आलो अन माझ्या मोटरसायकलवर मी परत माझ्या पोस्ट ऑफिसकड़े निघालो ऑफिसला पोचताच मी गाडी लावली अन हेलमेट काढून बेरे कॅप लावणारच होतो तितक्यात समोरून लांस नाईक विश्वंभर दास आला अन एक कड़क सल्यूट केला त्याला तोच परत देताच लगेच बोलला,
"सर इमरजेंसी ड्यूटी लगी है आपको मेजर साब ने अभी बुलाया है"
काय झाले असेल ह्या नवलात मी तड़क मेजर साहेबांच्या ऑफिसला पोचलो,रितसर दरवाजा टकटक करुन परवानगी घेतली अन आत जाऊन मेजरसाहेबांना सल्यूट केला तसे त्यांनी at ease केले अन बसायला सांगितले, बसलो तेव्हा ते म्हणाले,
"कैसे हो सुबेदार साब?"
"बस सर ठीक है , आपने बुलाया था सर??"
"येस येसsssss सुबेदार साब कुछ ऐसी ड्यूटी थी जो सिर्फ आप जैसा एक्सपीरियंस बंदा ही कर पायेगा".
"मेरे लिए क्या ऑर्डर्स है सर??"
"आपको एक बॅग डिस्पैच रन करना है, श्रीनगर टु कारगिल,आज 09 तारीख है कल सुबह 0700 तक ये बॅग कर्नल.पुरी को डिस्पैच होगी कारगिल बेस कमांड में बॅग सिर्फ कर्नलसाब के हात में हैंडओवर होगी, कोई शक??"
"नो सर"
"सुबेदार साब लेटेस्ट रिपोर्ट कहती है की बकरवाल लोगोने कुछ बंदो को एलओसी रीजेस पर बैठा हुआ देखा है और उनकेपास सामान भी है, इसीलिए आपको थोड़ा ऐतियात से जाना होगा , और बचाव के लिए आप जिप्सी नहीं बाइक से जायेंगे ताकी आप स्पॉट न हो, मेल सेंसिटिव है आप बस इतना जानिये"
"हो जायेगा सर, मैं तुरंत निकल रहा हूँ"
"गुडलक सुबेदार साब"
"थैंक यू सर"
मे 09, 1999 , 1025 वाजता
मी प्रथम माझ्या क्वार्टरला गेलो सेंसिटिव पोस्टिंगमुळे मी एकटाच राहत होतो. जायच्या अगोदर मी ऑफिस मधुनच घरी फोन केला अन थोड़ा कमनिमित्त बाहेर जातोय आता थेट पुढल्या आठवड्यात बोलु हे घरी कळवले. क्वार्टर मधे जाऊन मी माझे बॅगपॅक भरले त्यात इमरजेंसी राशन म्हणजे चिक्की बिस्किट ग्लूकोज़ डबा अन एक एक्स्ट्रा बिसलरी भरली अन तड़क ऑफिसला आलो तोवर, लांस नाईक दास ने माझी यशवंती घोड़ी उर्फ़ रॉयल एनफील्ड 500 तयार करुन ठेवली होती , त्याला विचारले
"तयारी ओके है दास?
"सर 2 जेरीकॅन्स पेट्रोल साइड फ्रेम में दोनों तरफ चढ़ाये है, पंक्चर किट पीछे वाले राइड पाउच में है, पानी और ड्राय राशन भी भर दिया है एक्स्ट्रा ब्रेक क्लच और अस्क्लेटर केबल्स भी रखवा दिए है"
हे म्हणतानाच त्याने बाइक चार्ज चे पेपर दिले त्यावर सही करुन मी अधिकृत रीत्या ती नखशिखांत ओजी उर्फ़ ऑलिव ग्रीन रंगवलेली घोड़ी ताब्यात घेतली. त्याचे ब्रेक अन क्लच चे ताण अन प्ले चेक केले अन दास ला इंस्ट्रक्शन दिली
"2 2 एक्स्ट्रा हेडलाइट और टेल लैंप बल्ब भी ले लो स्टोर से और ठीक से पॅक कर के बॅक पाउच में रखवा दो".
"ठीक साब " म्हणत तो सुसाट स्टोर कड़े सुटला.
तोवर मी आत जाऊन लॉकर रूम मधे माझा ऑफिशल यूनिफार्म काढला अन कामोफ्लाज कॉम्बैट ड्रेस चढ़वला, छातीवर वेल्क्रो ने नावाची पट्टी लावली "विश्वास". पायात डीएम शूज चढ़वले माझी बेरे लावली अन बाहेर आलो, येता येता कोत मधे जाऊन मी रजिस्टर मधे सही करुन एक 9mm बरेटा पिस्टल अन 4 मैग्ज़ीन ताब्यात घेतले, पिस्टल कापड़ी पट्टयात अड़कवलेल्या होल्स्टर मधे खोचली अन बाहेर आलो ते हाती हेलमेट धरून दास उभाच होता, मी समोर जाताच त्याने सल्यूट केला अन हेलमेट ताब्यात दिले मी त्याला सल्यूट रिटर्न केला बेरे काढून माझ्या बॅकपॅक मधे टाकली अन हेलमेट चढ़वले, अन जासुद काम करायला तयार झालो.
बाइकच्या उजव्या हाताला वैष्णो देवीची लाल सोनेरी चुनरी बांधली होती तिला नमस्कार केला, डाव्या हैंडलला लेह मॉनेस्ट्री ने दिलेला थांगका बांधला होता त्याला स्पर्श करुन हात छातीला लावला, अन सणसणुन किक मारली ते आमची यशवंती जिवंत होऊन फुरफरु लागली.
09 मे, 1999, 1100 वाजता
"जय हिंद साब!"
"जय हिंद दास!" म्हणून मी गियर टाकला पहिला अन सुसाट निघालो. श्रीनगर शहरातले वेगवेगळे भाग… तिथे तिथे मिळेल तशा ट्रॅफिकमुळे मी कमी जास्त गतीने रस्ता कापत होतो. दूर गावात कुठेतरी रोजच्याप्रमाणेच कुठलेतरी आंदोलन झालेले दिसत होते, ते समजायचा एकमेव मार्ग म्हणजे दंगा करणाऱ्या लोकांनी टायर जाळले की उठणारा काळाकुट्ट धूर. त्या धुराकडे एकवार नजर वळवून मी परत रस्त्यावर लक्ष केंद्रित केले अन चांगली 60 ची स्पीड पकडली, पण हे सुख मला जास्त काळ लाभणारे नव्हते. कारण शहरी वस्ती संपली तसा राखाडी-करडा रंग असलेला रस्ता उर्फ़ लद्दाख रोड सुरु झाला. मे महिन्याची सुरुवात म्हणजे बहुतांश बर्फ वितळलेला, तरीही थोडे थोडे पॅच शिल्लक असलेला असा तो आसमंत होता. तापमान -3℃ ते 15℃च्या मधे फिरत असते. दिवसाच्या वेळेनुसार सध्या सोसेल असे तापमान होते. खडबडीत म्हणण्यापेक्षा थोडी कच्ची अन मधेच डांबराचे पॅच उडलेली सडक असल्यामुळे मी गती आता कमी करून जवळपास 40च्या स्पीडने पुढे चालू लागलो. साधारण श्रीनगरच्या बाहेर 30 किमी. आल्यावर मला गार वारे बोचू लागले तसे मी लेफ्ट इंडिकेटर देऊन गाड़ी थांबवली. थोड़े पाय मोकळे केले अन बॅगपॅकमधून जाड ऑलिव्ह ग्रीन जॅकेट काढून चढ़वले. त्याची चेन गळ्यापर्यंत ओढून मी पूर्ण पॅक झालो. मग परत पुढे सुटलो.
थोड्याच वेळात मी वायुल पार केले अन आता थोड़ा लयीत आलो होतो. जवळपास दीड तास झाला होता निघून, आता पुढे अजून 3 तासांवर सोनमर्ग, तिथून 4 तास पुढे कारगिल मग मी मोकळा, असा विचार येईपर्यंत पहिले विघ्न आले. मागच्या चाकातून एकदम फुसकन आवाज आला. झाला प्रकार समजायला मला वेळ लागला नाही. परत एकदा गाड़ी थांबवली अन मी यांत्रिकपणे पंक्चर काढत बसलो. टोटल 20 मिनिटं तिथे घालावून मी परत पुढे निघालो तेव्हा 1350 वाजले होते, अजून सोनमर्ग यायला 3 तास लागणारच होते. मी जवळपास 30-35 च्या स्पीडने पुढे सरकू लागलो. सोनमर्गपासून अंदाजे 38 ते 40 किमी. असताना उंची जाणवू लागली. सोनमर्ग 2650 मीटर उंचीवर होते अन श्रीनगर जवळपास 1580 मीटर. तरी बरं सतत इकडे काम करुन माझे शरीर ह्या हवामान अन उंचीला अडॉप्ट झाले होते. हा महिना मेचा होता अन बर्फ वितळू लागले होते. कुठे छोटे ओघळ तर कुठे ओढ्याच्या आकारात डीपफ्रीजरमधे असते तितक्या तापमानाचे पाणी वाहत होते. खाली सिंधुमातेला भेटायला जाणारी उसळती अवखळ बाळेच होती ती जणू!
पण त्यांच्यामुळे एक लफडे झाले होते. ह्या जलधारा फ़क्त निसर्गाचे नियम पाळतात- त्यांना फ़क्त गुरुत्व वापरून वरतून खाली जाणे येते. मग त्यांना मज्जाव करणाऱ्या सड़का-दगड-शिला ह्यांना त्या धारा चिरून-ढकलून पुढे पुढे सरकतात. त्यांना नीट मार्ग द्यायला बॉर्डर रोड्स ऑर्गनायजेशनची माणसे चर खोदतात, धारांचा अभ्यास करुन वाटा बनवतात. पण नादिष्ट वांड पोरांचा अन त्यांच्या खेळांचा भरोसा देता येत नाही तसेच ह्यांचेही असते. जो रस्ता आवडेल त्यावर दौड़त सुटतात. सोनमर्गपासून अंदाजे 30 कि.मी.वर एका वळणावर मी असाच फसलो. तिथे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याने एक रोडपॅच आपल्यासोबत खाली नेला होता अन तशा त्या वाहत्या ओढ्यात मी बुलेट घातली. वाहत्या पाण्यात पुढचे चाक ओढले जाऊ लागले इतपत त्याची गती होती. त्याच दरम्यान समोरील चाकाच्या खाली एक वाटोळा दगड यायला अन मागच्या चाकाखालील चिखल सरकायला एकच गाठ पडली अन गाड़ी डाव्या बाजूला कलली! माझे नशीबच थोर म्हणायचे म्हणून गाड़ी डावीकड़े पडली. उजवीकडे पडणारे पाणी अन गाडीसोबत मीही खाली नदीमातेच्या कुशीत गेलो असतो. डावीकड़े गाडी कलताच मी ओणवा फेकला गेलो अन आपण दंडवत घालतो तसा धपकन पाण्यात पडलो. उणापुरा 5 बोटे खोल ओहोळ अन त्यात मी पालथा पडलेलो. खाली असलेली दगडमाती खचकन रुतली अन तोंडी गढूळ पाणी गेले. धडपड करत मी उठून उभा राहिलो. पाणी थुंकले, जरा सावरलो अन स्वतःकडे पाहिले तर तळहातात दगडाची एक कपची शिरून रक्त येत होते अन उजवा गुड़घा दुखत होता; पण एकंदरित मी ठीक होतो. आता फ़क्त एक प्रॉब्लेम होता- मी नखशिखांत भिजलेलो होतो. तितक्यात मनात मेलबॅगचा विचार आला म्हणून मी यांत्रिकपणे बॅकपॅकला हात लावला तर नाशिबाने ती शाबूत होती. गाड़ीकडे पाहता तिलाही काही खास अपाय झाला नव्हता. मी परत गाडीजवळ आलो अन ती उभी करून सुरु करायला बघू लागलो.
5-6 किक्समधे गाड़ी सुरु झाली अन मी पुढे निघालो. भिजल्यामुळे मात्र आता भयानक हिव भरू लागलं होतं. वरती ऊन होतं थोडं थोडं, पण हवा जोरात सुरू असल्यामुळे मला कापरं भरू लागलं होतं. हाताची बोटे सुन्न पडू लागली होती. मी तड़क ओले हातमोजे काढून पिळले अन परत चढ़वले अन हात झटकून बोटे गरम करायचा प्रयत्न करु लागलो, पण ते काही जमेना म्हणल्यावर मी शिस्तीत गाडी कडेला लावली अन पहिले उड्या मारल्या भरपूर. आता नाकाचा शेंडा बधीर झाला होता. ओला युनिफार्म मी काढला, पूर्ण ताकद लावून पिळला अन परत चढ़वला. आता होईल ते बघू म्हणून मी पुढे निघालो. सुन्न पडत असलेले हात-पाय अन चेहऱ्यामुळे माझी गती आता 20-25 ची झाली होती. कपडे चिखलात रॅड झाले होते. मी सोनमर्गच्या शेड्यूल्ड टाइमपेक्षा जवळपास तासभर मागे होतो, पण माझा निरुपाय होता. तरीही मी गती वाढवू लागलो कारण मी टाइम बाउंड डिलीवरीवर होतो. अंदाजे 1730 ला सोनमर्ग दिसू लागले तसा मला थोड़ा हुरूप आला.
समोर जाता मला एक बॉर्डर रोड्स ऑर्गनायजेशनची चौकी दिसली. तिथे मी गाडी थांबवली तशी तिथे राहणारी मजूर मंडळी अन त्यांचा मुकादम असलेला एक जेसीओच असणारा माणूस माझ्याकडे आले. ओजी जामानिमा पाहून त्यांनी मला ओळखलेच होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी मला आत नेले, चहा दिला अन मी तिथल्याच एका शेकोटीसमोर बसकण मारली. गरम चहा अन थोड़ी ऊब पोटी जाताच मी परत एकदा त्या मित्रांचा निरोप घेऊन पुढे निघालो. निघताना त्यांना विचारले, पुढे कारगिलपर्यंत रोड कसा आहे हो? त्यावर ते म्हणाले की आम्ही थोड़ाबहुत बंदोबस्त केला आहे, पण पुढे पर्वतराजाची जी इच्छा असेल ती! तसे मी हसून पुढे निघालो.
मी सोनमर्ग पार केले तेव्हा जवळपास अंधार झाला होता. पहाड़ी भागात लवकर अंधारून येते, तरीही 1830 म्हणजे आता मात्र खासे अंधारुन आले होते. म्हणून मी गाडीचा हेडलाइट लावला अन माफक गतीने तरीही काळजीपूर्वक पुढे जाऊ लागलो. सोनमर्ग ते बालाथल अंतर मी सहज पार केले. नॉर्मल गतीने, अगदी ज्याची भीती होती ते बालाथलचे झिगझेग घाटसुद्धा शिस्तीत पार पडले. आता मी द्रासच्या वाटेला लागलो होतो, पुढचा सहा तासांचा प्रवास हा माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक तरीही साहसी प्रवास ठरणार होता हे मला तेव्हा माहिती नव्हते. द्रासपासून 5 कि.मी. अगोदर मी अतिशय निवांत जात होतो. गाड़ीची टिपिकल बुलेटची धगधग वगळता आवाज नव्हता. नाही म्हणायला वरती आकाशात निव्वळ सड़ा पडू लागला होता ताऱ्यांचा. प्रदूषण नसलेल्या ह्या भागात तारे सवाष्णीच्या कुंकवासारखे दिसतात, एकदम ठसठशीत. अशा वातावरणात मी वाया गेलेला वेळ भरून काढायला एक्सीलरेटर पिळू लागणार, इतक्यात, हलकासा 'कुईंईईई' असा आवाज आला अन मला काही समजायच्या आत रस्त्याच्या डाव्या बाजूला 35 ते 40 फुटांवर भयानक स्फोट झाला. सहज प्रतिक्षिप्त क्रियेने मी बुलेट उजवीकडे घातली अन रस्त्याच्या उजव्या बाजूला एक खळगा होता पाणथळ असा, तिथे घुसलो. डोके गरगरत होते, कान बधीर होऊन गेले होते. दचकल्यामुळे हृदय, बरगड्या तोड़ते की काय इतक्या जोरात धड़धड़त होते. परत एकदा मी ओलागच्च झालो होतो. गाड़ी त्या डबक्यात अन खळग्यात उजवीकडे कलंडली होती, पाठीवरले बॅगपॅक काढले अन आधी मेल बॅग चेक केली. ती ओके होती. थोड़ा सावरत होतो तितक्यात मी ज्या पाऊलवाटेने खाली उतरलो होतो तिकडे परत एकदा स्फोट झाला अन चिखल-माती-बारके दगड-चिपा ह्यांचा मला अभिषेक झाला. अन एकदम डोक्यात प्रकाश पडला!.
शेलिंग!! पाकिस्तानी आर्मी शेलिंग करते आहे. बकरवाल, रिजेस, सामान, माणसे… एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला! झुंजरके साधून हरामी पाकडे डाव साधत होते. कारगिलचं युद्ध अक्षरशः सुरु होताना पाहणारा मी पहिला मनुष्य होतो. मी गुमान बिसलेरीची बाटली काढली, एक घोट पाणी प्यालो, तसा परत एकदा धुडुमधड़ाम आवाज आला. फ़क्त या वेळी तो दिवाळीतल्या सुतळी बॉम्बसारखा आला. बहुदा शेल थोड़े दूर पडले होते. मी क्रॉलिंग करत रस्त्याच्या पातळीला आलो. इकडे तिकडे पाहता अंदाजे 100 मीटर दूर धूळ बसताना दिसली. नवी इन्फर्मेशन, पाकिस्तानी भारताच्या गर्दनीची नस असणारा हायवे तोडू इच्छित होते. होय!! नॅशनल हायवे-1 डी! अन त्यावर द्रासच्या वाटेला असलेला मी, आर्मी पोस्टल सर्व्हिस कोरचा सुभेदार विश्वास प्रभाकर बांदेकर. मी परत क्रॉलिंग करत खाली आलो. आता ठरावीक अंतराने आर्टिलरी शेल्सचा आवाज येऊ लागला. लगेच मनाने गणित बांधले, कुठल्या गन्स असतील… बॅटरी कशी ऑपरेट होते आहे हे गणित सुटत नव्हते, कारण मी आर्टिलरीचा माणूस नाही. मी तर साधा डाक ड्यूटी रनर होतो. आता काय करावे ह्यावर मी मिनिटभर विचार केला अन पहिले गाड़ीकड़े मोर्चा वळवला. गाडी ठीक होती, फ़क्त उजवीकडील दोन्ही इंडीकेटर्सचा चुराडा झाला होता. गाड़ी अजून जवळून पाहता उजव्या बाजूला असलेल्या जेरीकॅनमधे एक बारीक अणकुचीदार दगड रुतून पेट्रोल लीक होऊ लागलेले दिसले. क्षणभर विचार करुन मी तो कॅन ओढला अन पेट्रोल रिकाम्या होऊ घातलेल्या गाड़ीच्या टाकीमधे ओतले. अर्धे पेट्रोल त्यात बसले तरी कॅनमधे थोड़े होतेच. मी माझ्या हातमोज्याचं मनगटाजवळ असलेलं कापड फाडलं अन लीक होणाऱ्या कॅनमधील बारीक़ छिद्रावर दाबून बसवलं. हा इलाज तर जमला होता, आता अजून एक प्रश्न होता. माझ्या गाड़ीचा हेडलैम्प अन टेललैम्प अगदी प्रखर जरी नाही म्हणला तरी अंधारात नक्कीच चमकला असता. आर्टिलरी कव्हरमधे जर शत्रूचे एखादे युनिट पुढे सरकत असले तर मी त्यांच्या तावडीत सापडू शकलो असतो. परत समोरची शॉकप अन साइड पेनलवर असलेली रिफ्लेक्टर स्टिकर्ससुद्धा चमकण्याचा धोका होता. काय करावे ह्या विचारात मला एक शक्कल सुचली. मी सरळ ज्या पाण्याच्या थारोळ्यात बसलो होतो त्याच्या तळाला हात घालून खरवडले. हाती थोड़ा मुलायम चिखल लागला. मी तो चिखल सरळ रिफ्लेक्टर्स अन टेल लाइटवर फासला अन त्यांना conceal केले. त्यानंतर तसाच चिखल हेडलाइटवर चोपड़ला. फ़क्त मधे एक छोटेसे वर्तुळ सोडले, जेणेकरुन पसरणारा लाइट कंट्रोल होईल, पण मला अंधूक रस्तासुद्धा दिसत राहील. मी एक आर्मी पोस्टमॅन होतो, मला घाबरून चालणार नव्हते.
माणसाचे मन विचित्र असते. ह्या क्षणी मला गोष्ट आठवत होती ती एका प्राचीन ग्रीक निरोप्याची, फिडिपेडिस त्याचं नाव, अथेन्सचा राहणारा फेडिपेडिस धावत जाऊन सन्देशवाहन करत असे. अथीनियन आर्मीचे मैराथनच्या मैदानात असलेल्या युद्धभूमीपासून अथेन्सपर्यंत निरोप पोचवायचे काम त्याला एकदा मिळाले. निरोप बाका होता. "मैराथनचे मैदान मारले. आपण जिंकलो!" हा निरोप अथेन्स सिटी कौंसिलला पोचला नाही तर ते अज्ञानापायी शरणागती पत्करतील. असे व्हायला नको म्हणून फिडिपेडिस धावत सुटला; श्वास न मोजता, कसलीच तमा न बाळगता धावत सुटला. शेवटी अथेन्सच्या दरवाज्यावर आला तेव्हा कोसळून पडला. त्याला विलक्षण धाप लागली होती. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले- "Rejoice, we won!" अन तिथेच फेडिपेडिस वारला होता. आजही लांब अंतराची धावण्याची शर्यत होते ती मैराथन म्हणवते, ते फ़क्त फिडिपेडिसचा सन्मान अन त्याची आठवण म्हणून. आज मीही फेडिपेडिस झालो होतो. जीव गेला तरी बेहत्तर, फ़क्त तो माझे अथेन्स उर्फ़ कारगिल बेसलाच जायला हवा, ह्या निश्चयाने मी तयार झालो.
चिखल माखून गाडीचा कमांडो मी आधीच केला होता, अंगावरसुद्धा काहीच चमकदार नको म्हणून सर्वांगाला चिखल फासला. बॅगपॅक परत एकदा पाठीवर आवळले अन सुसाट म्हणजे अक्षरशः सुसाट सुटलो. आता हल्ल्याची व्याप्ती लक्षात आली होती, येत होती, गाड़ी चालवण्यात अनेक व्यवधाने येत होती. हेडलाइटवरच्या चिखलामुळे रस्ता नीट दिसत नव्हता. त्यामुळे मधेच कंबरतोड़ गचके लागत होते ते वेगळेच. मधेच एखादे शेल सड़केजवळ आदळले की मी हेलपाटत गाडी परत उजवीकडे रस्त्याखाली घालत असे. एकदा तर हा वेग इतका होता की रस्त्यावर शेल आदळले अन त्याने जेसीबी काढतो तसा एक स्कूप काढला, रस्त्याच्या मधून डाव्या कोपऱ्यापर्यंत. तेव्हा गाड़ी कंट्रोल करून उजवीकड़े न वळवता आल्याने मी जिथून रस्ता उखड़ला होता त्याला अगदी चिकटून बोजड़ बुलेट काढली होती. उड़णारी माती, खड़े अंगावर असंख्य ओरखडे देत होते पण मला पर्वा नव्हती. कारगिलजवळ पोचलो तेव्हा ही धग अजून जाणवली, पण मला मागे वळायचे नव्हते. कारगिल बेसजवळ आलो तेव्हा मी अक्षरशः गलितगात्र झालो होतो.
बेसच्या सेंट्रीने मला शिट्टी वाजवून थांबवले तेव्हा मी भानावर आलो. कदाचित युद्धज्वर ह्यालाच म्हणतात असे वाटते. सेंट्रीला चिखलात माखलेला मी ओळखू येइना तसा मी परिचय दिला अन कर्नल पुरी ह्यांना भेटायचे आहे असे सांगितले. चारच्या चार सेंट्री बंदुकी खाली करुन धावत आले,
"ओये, अपना बंदा है ओये!" म्हणत. त्या जवानाची ग्रेनेडियर्स लोगो लावलेली बेरे दिसली तेव्हा मी निश्चिन्त झालो होतो. माझ्या अंगातून चारपाच ठिकाणहून रक्त येत होते. हाताची बोटे काळीनिळी पडली होती, पाय-कान-पाठ बधीर झाली होती, पण बॅगपॅक घट्ट होती पाठीवर. एका जवानाने माझे ओले हातमोजे काढून टाकले होते, दुसऱ्याने बूट अन सॉक्स. दोघे खसखसा चोळून माझे हातपाय गरम करत होते तोवर तिसऱ्याने आत मेसेज दिला रेडियोवर अन मला न्यायला जिप्सी आली. रेडियो करणारा जवान माझी बुलेट घेऊन मागून आला अन थेट मला बेसच्या MI सेक्शनला आणले गेले. तिथे एक खाट तयार होती. आत रूम हीटर होता. मला माझे कपडे बदलायला सांगितले. मग तिथे निजवले गेले. डॉक्टरने अंगावर असलेले छोटेमोठे ओरखड़े, जखमा नीट स्वच्छ करून बांधल्या अन मी पडलो होतो तेव्हाच कर्नल पुरी आले. रात्री साडेअकरा वाजता मी माझ्या इच्छित अधिकाऱ्याला भेटलो! जवळ पडलेल्या बॅगपॅकमधून मी मेल बॅग काढून कर्नल साहेबांना दिली अन म्हणालो,
"सर, ये मुजाहिद नहीं हैं, ये प्रॉपर आर्टिलरी कवर था, सर। द्रास से कारगिल के बीच में एनएच-1डी तोडा जा रहा है श्रीमान।"
मे 09,1999 2330 वाजता मी जे करायला निघालो ते पूर्ण केले होते.
तेव्हा पुरी सर म्हणाले, "बहुत बढ़ीया सुभेदार साब, हम देख लेंगे। अब आप सो जाएँ।" औषधांच्या इफ़ेक्टमुळे मला पण झोप आली. सकाळी मला जाग आली ती आर्टिलरीच्या आवाजानेच, पण जवळून आवाज येऊनसुद्धा कोणी गड़बड़ीत दिसत नव्हते. अर्थ स्पष्ट होता, भारताच्या बोफोर्स नामे वाघिणी तैनात झाल्या होत्या अन पाकिस्तानचे धिरडे भाजायची आपली ड्यूटी चोख बजावत होत्या. निरोप नीट पोचले होते.
एक पोस्टमन समाधानी होता.समाप्त.
(कथा पूर्णपणे काल्पनिक, आधी इतरत्र प्रकाशित)

हुश्श!!! सारखं श्वास रोखून
हुश्श!!! सारखं श्वास रोखून वाचत होते.. तिकडल्या भीषण परिस्थिती शी तुमचा मुकाबला, ती धडपड अगदी अगदी जिवंत पणे उभी झाली डोळ्यासमोर..डोकं अक्षरशः बधीर झालं..
सिविलिअन्स ना आर्मी लाईफ ची इतक्या जवळून ओळख करून देण्याबद्दल खूप आभारी आहे..
देशा चे रक्षण करणार्या जल,थल,वायु सेनेला ___/\___
आणी देशातील पोलीस फोर्स ला ही ____/\___
फार सुंदर. श्वास रोखून
फार सुंदर. श्वास रोखून धरायला लावणारं लेखन.
काय जबरदस्त कथा लिहिली आहे
काय जबरदस्त कथा लिहिली आहे सोन्याबापू....
केवळ ग्रेट....... नि:शब्द ......
धैर्य, चिकाटी, कणखरपणा, देशभक्ति, कर्तव्यपालन हे सगळे शब्द साक्षात उभे केलेत....
फक्त सलाम, सलाम आणि सलाम .....
_________________/\________________
वर्षु ताई अन ममो तै
वर्षु ताई अन ममो तै आभार,
आर्मी म्हणजे सहसा आपल्या डोळ्यासमोर फ़क्त तड़ताड़ गोळ्या विमाने बोजड़ नौका अन तोफा रणगाड़े येतात पण तसे नसते फाइटिंग फ़ोर्सला फिट ठेवायला सपोर्ट कोर उदाहरण रिमाउंट एंड वेटर्नरी कोर (सैनिकी पशुधनाची काळजी घेणारी कोर) ASC उर्फ़ आर्मी सर्विस/सप्लाई कोर APS उर्फ़ आर्मी पोस्टल सर्विस इत्यादी सुद्धा महत्वाचे रोल निभावतात, त्यांचे महत्व सांगायला हा लेख प्रपंच
जबरदस्त. __/\__
जबरदस्त. __/\__
मुकाबला माझा नव्हता ! मी
मुकाबला माझा नव्हता ! मी नव्हतो तिथे ९९ साली मी नववी मधे होतो
कथा काल्पनिक असली तरी मस्तच
कथा काल्पनिक असली तरी मस्तच रंगवून लिहीली आहेत.
जबरदस्त! कसली अंगावर आली कथा!
जबरदस्त! कसली अंगावर आली कथा! ह्या निमित्ताने सोन्याबापू, तुम्हाला आणि सगळ्या देशभक्त सैनिकांना साष्टांग नमस्कार घ्या. __/\__
मस्त लिहिलंय बापु
मस्त लिहिलंय बापु !
मॅराथॉनच्या इतिहासाशी अजिबात परिचय नव्हता. धन्यवाद.
अप्रतिम. अगदी लेख संपेपर्यंत
अप्रतिम. अगदी लेख संपेपर्यंत स्क्रीनवरून नजरच हटली नाही. मस्त वर्णन.
अशक्य भार्री ! तोडच
अशक्य भार्री ! तोडच नाही
लिखाणाची शैली आणि वर्ण्यविषय श्वास रोखून धरायला भाग पाडतात.
कथानायकाला मॅरॅथॉन चा इतिहास माहित होता हे वाचून खूप छान वाटलं
आर्मी म्हणजे सहसा आपल्या डोळ्यासमोर फ़क्त तड़ताड़ गोळ्या विमाने बोजड़ नौका अन तोफा रणगाड़े येतात पण तसे नसते फाइटिंग फ़ोर्सला फिट ठेवायला सपोर्ट कोर उदाहरण रिमाउंट एंड वेटर्नरी कोर (सैनिकी पशुधनाची काळजी घेणारी कोर) ASC उर्फ़ आर्मी सर्विस/सप्लाई कोर APS उर्फ़ आर्मी पोस्टल सर्विस इत्यादी सुद्धा महत्वाचे रोल निभावतात, त्यांचे महत्व सांगायला हा लेख प्रपंच >>> ह हेतू तर निरतिशय स्तुत्य
भारी लिहिता तुम्ही बापूसाहेब
भारी लिहिता तुम्ही बापूसाहेब . श्वास रोखून वाचलं गेलंय शेवतपर्यत . एखादा चित्रपटच बघतोय अस वाटत होत.
भारतीय सेना व तिच्या सर्व सपोर्ट सर्व्हिसना _/\_
जबरदस्त. ____/\____
जबरदस्त. ____/\____
हॅट्स ऑफ......
हॅट्स ऑफ......
जबरदस्त !!! सलाम बापू! आर्मी
जबरदस्त !!!
सलाम बापू!
आर्मी च्या सोल्जर चे जगणे इकडे एसीत बसून असहिष्णु सरकारच्या नावाने ढोल बडवणार्या अन सतत देशद्रोही अतिरेक्यान्ची तळी उचलणार्या बोगस मीडिया ला कधी बरे कळणार ?
खूप छान अन उद्देश तर त्याहून
खूप छान अन उद्देश तर त्याहून बढिया.
असंच काही नाही विश्वरूपानंद
असंच काही नाही विश्वरूपानंद जी, दाखवतात ते आपण बघुन विसरत असू का? उदाहरण NDTV (बरेच बदनाम चॅनल) ने चालवलेली "वतन के रखवाले" ही सीरीज किंवा NDTV Good times ने चालवलेली "जय हिंद" ही सीरीज ह्या अप्रतिम होत्या, टाइम्स नाऊ वरची गाजलेली स्पेशल फोर्सेजची सीरीज तर खुद्द कर्नल (रिटायर्ड) महारुफ रज़ा ह्यांनी होस्ट केली होती
छान.
छान.
सॅल्यूट ,सर !
सॅल्यूट ,सर !
जबरदस्त... ---/\--- सरसरुन
जबरदस्त... ---/\---
सरसरुन काटा आला अंगावर. काल्पनिक असली तरी भारी.
वा! खरच श्वास रोखून धरायला
वा! खरच श्वास रोखून धरायला लावणारी कथा आहे!
बापरे... काटा आला... खुप छान
बापरे... काटा आला...
खुप छान कथा.
खिळवून ठेवणारी कथा एक कडक
खिळवून ठेवणारी कथा
एक कडक सल्युट घ्या राव
सोन्याबापू अप्रतिम्,चित्तथरार
सोन्याबापू
अप्रतिम्,चित्तथरारक अन काय ओघ आहे ? भन्नाट
एक बाळबोध प्रश्न
स्वतः अनुभव नसतांना ( असे तुमचे म्हणणे... ज्यावर मला विश्वास ठेवणे कठीण जात आहे) एवढे अचूक मायक्रो डिटेल्स कसे मिळाले.... वा कल्पनेत आणले हो???
आर्म्ड फोर्सेज विषयी अभ्यास
आर्म्ड फोर्सेज विषयी अभ्यास करायला आवडतो, स्वतः निम्लष्करी दलात आहे, बॉर्डर वर ड्यूटी केली आहे, आर्मी पोस्टमन लोकांसोबत गप्पा झाल्या होत्या त्यात ऐकलेल्या काही अनुभवांवर कथा बेतलेली आहे.
मस्त लिहीलंय. __/\__
मस्त लिहीलंय. __/\__
जबरदस्त लिहिलेय बापूसाहेब .
जबरदस्त लिहिलेय बापूसाहेब . श्वास रोखून ठेवला होता शेवटपर्यंत..
तुम्हाला आणि सगळ्या देशभक्त सैनिकांना साष्टांग नमस्कार _/\_
जबरदस्त लिहीलयं! काल्पनिक
जबरदस्त लिहीलयं! काल्पनिक वाटतच नाही. तुम्ही काल्पनिक म्हणून लिहीलीत, पण अशा गोष्टी नेहमीच घडत असतील.
देशाच्या संरक्षणासाठी, जीवाची पर्वा न करता लढणार्या आणि त्यांना मदत करणार्या सर्वांना ______/\_______.
सलाम बापू... जबरदस्त आहे हे !
सलाम बापू... जबरदस्त आहे हे ! हे असे काहितरी अधून मधून मायबोलीवर येते.. म्हणून तर रोज डोकावतो इथे.
Great. My family members
Great. My family members have lived and workd in arty. In the same area. Very correct and we'll written. Jai durge.
Pages