नेमस्त

Submitted by अमेय२८०८०७ on 23 May, 2016 - 10:12

बाजारात जाणे म्हणजे लैच बोरींग काम असते गड्या. खांद्याला पिशव्या, हाताशी पोरे आणि पायावर भिंगरी घेऊन एका दुकानातून दुसऱ्या दुकानात बागडणारे नवरे पाहिले की आदरच वाटतो एकदम. "हि"ने काही आणायला सांगितले तर ताबडतोब "अपरिग्रह, झेन तत्त्वज्ञान, चंगळवाद" यासारख्या विषयावर चर्चा सुरु करणे, मोबाईल उघडून नुकतीच कवितेची स्फूर्ती येतेय असे दाखवणे, न आलेल्या फोनवर मित्राशी गप्पा सुरु करणे असे काही "पैतरे" मी माझ्यापुरते तयार करून ठेवले आहेत. अर्थात "नाही" असे बाणेदारपणे सांगून उघड युद्धभूमीत लढण्याची पॉवर नसल्याने ही कामे गनिमीकावा वापरून सावधपणे करावी लागतात. "हो" आणि "नाही"ची वारंवारता खुबीने सांभाळावी लागते.

त्यातूनही जेव्हा मी बाजारात हिच्याबरोबर जातो तेव्हा कवितेत होते तसे "मेरीचे कोकरू" बनणे, हीच भूमिका मला बेष्ट वाटते. स्वतःचे काही मत न दर्शवता केवळ नम्र आज्ञाधारकता दाखवली की सोबतची पार्टी कंटाळून खरेदी लवकर आटपते असा माझा अनुभव आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत याबद्दल मला शंका नसली तरी त्या बांधवांनी बाजारात इतस्तत: मारलेल्या पिचकाऱ्या, बेशिस्तीत लावलेली वाहने, त्यांचे गर्दीत बसणारे प्रेमळ धक्के हे मला जरा कमी आवडतात. त्यामुळे सकाळ संध्याकाळ बागकामासाठी येणारा आणि सायकल मारत वारंवार बाजारात जाण्यासाठी उत्सुक असणारा "भोला माळी" नामक देवदूत अंगणात दिसेस्तोवर बायकोने सांगितलेल्या कामांची शिस्तीत यादी करणे आणि भोला दिसताच पैसे - यादी त्याच्या हातात सोपवणे हे एवढे काम मी बिनचूक करू शकतो.

आज मात्र गडबड झाली. भोला येऊन विचारून गेला आणि नंतर मला काम आठवले. आज करणे भाग होते, बाजारात जावेच लागणार होते. एकतर आमचा बाजार म्हणजे ऑडी घुसली तरी नॅनो बनून बाहेर पडेल असा. सायकल रिक्षा , सुअर (डुकराच्या नाकासारखे तोंड असलेल्या रिक्षा), माझ्या साईड व्ह्यू मिररशी गतजन्मीचे वैर असणारे "डॉन क्विक्झोटचे"वंशज पादचारी (काही अज्ञानी याचा उच्चार 'डॉन किहोती' असाही करतात), हॉर्न ऐकताच "काय मेली कटकट आहे!" असा चेहरा करून नाक मुरडणाऱ्या रस्ताभर साखळी करून चाललेल्या रंगीतसंगीत ललना, एका इंचाचे "ओपनिंग" दिसले तरी त्यातून वाट काढण्याची उत्तुंग महत्त्वाकांक्षा ठेवणारे जांबाज मोटार-सायकलस्वार या पंचमहाभूतांशी चारहात करून त्या बाजारात गाडी घालण्यापेक्षा मी दोनदा एव्हरेस्ट चढून येईन. यावर उपाय म्हणून गाडी बाजारापासून मैलभर दूर ओळखीच्या भाजीवाल्याजवळ लावावी लागते. आमच्या गावची धूळ थोडी पेशल असल्याने गाडी बंद करून जाताना अदबीने,"कोई दिक्कत नही, जा कर आईये," म्हणणारा भाजीवाला परत आल्यावर गाडी उघडताना ,"अरे हटो गाडी से दूर", म्हणत वसकन अंगावर येण्याची शक्यता असते. चेहऱ्यावरील धुळीचे थर- चंद्रासमोरील ढगांना करावे तसे- बाजूला करून त्याला ओळख पटवून दिली की पुन्हा सन्मान मिळायला सुरुवात होते पण तोवर इतरांचे तुच्छ कटाक्ष झेलून आपले कान थोडे लाल होतातच. एकूण हे बाजार प्रकरण म्हणजे जितके टाळावे तितके बरे हेच माझे धोरण असते. अर्थात आज आधी लिहिल्याप्रमाणे नाईलाज होता.

गाडी लावून दु:खी अंत:करणाने चालत असता समोर एक जोडपे दिसले. दोघेही साधारण पस्तिशी-चाळीशीतले. रस्त्याने चालताना जोडप्यांच्या चालीही पाहण्यासारख्या असतात. अगदी नव्या नवलाईची वगळली तर एका चालीने आणि एकाच दिशेला पाहणारी जोडपी शक्यतो दुर्मिळच. बहुतेकांत पुरुष ताडताड पावले टाकत पुढे जाताना तर स्त्री सगळी दुकाने कुतूहलाने निरखत सावकाश इष्ट स्थळी पोचताना दिसते. अनेक पुरुषांचे वागणे सोबत कुणी आहे याचे विस्मरण झाल्यासारखे असते, काही अंतर समोर गेल्यावर असे लोक तंद्रीतून जागे होतात आणि मग बरोबरचे माणूस येऊन भेटेपर्यंत एका जागी चुळबुळत उभे राहतात. फ्रॉइडने नक्कीच यावर काही मौलिक भाष्य लिहिले असते.

समोरचे जोडपे मात्र अपवाद गटातील दिसत होते. अगदी खेटून नसले तरी परस्परांसोबत चालत होते, देहबोलीतून संवाद दिसत होता. एक चौक पार केल्यावर नाक्यावरच्या फूलवाल्याकडून त्याने एक कळीदार गजरा विकत घेतला, तिनेही अगदी कौतुकाने तो माळला.
"मग आज काय घ्यायचंय इथे ?" त्याने विचारलं.

गजऱ्याच्या सलामीने मी प्रभावित झालो होतोच पण हा "ओपन एन्डेड" प्रश्न ऐकून मला त्याचे मागून पाय धरावेसेच वाटले. खचाखच भरलेल्या बाजारात असा प्रश्न विचारायला धैर्य लागते. त्या महामेरुचे कौतुक आणि मी हिला बाजारात नेताना व्हर्सायच्या तहाप्रमाणे घालत असलेल्या अटी आठवून किंचित लाजही वाटली. काहीतरी दैवी योग म्हणूनच आज या पुरुषशिरोमणीचे दर्शन होऊन त्यातून माझ्या गंजत चाललेल्या व्यक्तित्वावर पुन्हा झळाळी आणण्याचा नियतीचा बेत आहे हेही मला उमगून चुकले आणि हे जोडपे समोर आहे तोवर मिळेल तितके ज्ञान- अर्थात सुरक्षित अंतरावरून- ग्रहण करण्याचा मी निर्धार केला.

त्यांचे बोलणे पुढे सुरूच होते.
"काय सांगू ? इतका मस्त बाजार आहे, सगळंच घ्यावं वाटतं".
"घे की मग, तुला कधी मी नाही म्हणतो काय? तूच हे नको, ते नको करत असतेस, काय पाहिजे ते घे!".
आता मात्र मला पुढचे ऐकवेना. आत्ताच्या आत्ता घरी परत जावे आणि हिला सोबत आणून त्या जोडप्याने केलेला प्रवेश गजऱ्याच्या नांदीसकट पुन्हा सादर करावा असे वाटत असतानाच पुढचा संवाद ऐकू आला.

"एक मिनिट हं, जरा औषधाच्या दुकानात जाऊन येते", ती म्हणाली.
"काय झालं गं? तब्येत बरी नाही ?"
"छे, मला काय होतंय? नवरा येतोय रात्री अकरा वाजताच्या ट्रेनने दिल्लीहून, सासूबाईंची औषधे संपत आलीत, ती घेऊन ठेवायला सांगितलेय त्याने. उद्या दुकाने बंद, आजच घ्यायला हवीत".
"ओह, आज येतोय का ? ठीक आहे, ये लवकर, आपल्याला अजून जेवायचे आहे, लक्षात आहे ना?" त्याने अत्यंत स्नेहार्द्र की काय म्हणतात त्या आवाजात सांगितले.

लहानपणी टीव्हीवरील ऑलिंपिक की एशियाड बघून जोशात घराबाहेर येत कुंपणावरून उंच उडी मारायचा प्रयत्न केला होता. उडी मारून होताहोताच आपण काहीतरी घोडचूक केली आहे याची दुखरी जाणीव व्हायला सुरुवात झाली कारण एरवी किरकोळ वाटणारे कुंपण उडीसाठी उड्डाण करताच अचानक चीनच्या भिंतीसारखे अजस्र वाटू लागले. जोरदार आपटल्यामुळे उत्तमांग उत्तमपैकी सडकून बसायचे (तसेच इतर नैमित्तिक गोष्टींचेही) चांगलेच वांदे झाले होते. पुढचे दहा-पंधरा दिवस ती वेदना सोबत राहिली पण आजही त्या वेदनेहूनही खाली आपटण्याचा सुन्न क्षण जास्त लक्षात आहे.

आत्ताही तशीच बधीरता आली. "तुझे मैं क्या समझा और तू क्या निकला", टाईप संवाद कानात गुंजायला लागले. अंतू बरव्याप्रमाणे गणित चुकलेला चेहरा करून मी माझ्या कामाकडे वळलो.

एकूण काय? माझ्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र का काय बदल होण्याची संधी हुकलीच पण असल्या "कोंडीफोडू" वैचारिक सर्जनापेक्षा आपण आपले 'नेमस्त' आहोत तेच बरे, कसे?

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विख्यात गोलंदाज चंद्रशेखरच्या षटकातील सहापैकी पाच चेंडूना संयमित फलंदाजीने तोंड देवून खेळाचा आनंद घेत असतानाच सहावा चायनामन असा काही येतो की सराईत फलंदाजही गोंधळविश्वाचा तहहयात सदस्य असल्यागत त्रिफळाचीत होऊन जातो....अमेयची ही करामत....बस्स एका ओळीत त्याने वाचकाला असे काही गुंडाळून ठेवले की त्याला आलेल्या "प्रिय बाजार संवाद धारे" चा परिणाम लेख वाचून संपला तरी त्याची झिंग जात नाही, असेच झाले.

..."तुझे मैं क्या समझा और तू क्या निकला".... ~ भाया, मै भी यहीच कहनेवाला था; लेकिन वो काम भी तुमनेच पूरा कर डाला....लिखते रहो जी....!

मस्त लेख
पण असल्या "कोंडीफोडू" वैचारिक सर्जनापेक्षा आपण आपले 'नेमस्त' आहोत तेच बरे, कसे? ही शब्द योजनाही मस्तच !

Happy

वाचताना सुरवातीला असे वाटत होते कि हे सगळे बायकोला आवर्जून आपण स्वत वाचून दाखवावे आणि म्हणावे बघ जरा हे आणि तू... पण तुम्ही तर गुगली टाकली राव साफ तोंडावर पडलो असतो... थोडक्यावर निभावले...

Pages