शांता क्लोजचा दैवी चमत्कार

Submitted by सखा on 19 May, 2016 - 22:42

आता तुम्हाला तर माहितीच आहे गुळ म्हटलं कि माशा तसं गाव म्हटलं की रिकामटेकडे लोक असणार. त्यांना कुटाळक्या करायला एक बिनघोर जागा लागणार. "बाबूलाल सुंदरलाल साडी सेंटर" हे दुकान हीच ती जागा. स्टेशनवर नुस्त विचारल तरी कुणीही तुम्हाला बाबूलालच्या दुकानावर आणून पोचविल. कुणीही खुश्शाल आपल्या दुकानात यावं चार घटका बसावं. समोरच्या धी न्यू विष्णू चाय हाउस मधून स्व:ताच्या पैशाने चहा मागवावा. स्व:ता प्यावा बाबूलालला आणि त्याच्या कारागिराला पाजावा. चहा पिण्याच्या आधी किवा नंतर कधी पण मस्त तंबाखू चोळावी. चहा पिताना मस्तं फुरकत, गावाच्या बारा भानगडी बोलाव्या. याची चाहाडी त्याला करावी. नसलेली लफडी तयार करावी. गावातले वकील तुम्हाला अभिमानानं सांगतील की गावातली अर्धी भांडणं तर इथच या बाबूलाल च्या दुकानात जन्माला आली. उगाच नाही सगळ्यावर वस वस करणाऱ्या वकीलीण बाई बाबूलालशी मात्र आदरानं बोलतात.
डिसेम्बर महिना उजाडून तीन दिवस होवून गेलेले. एक दिवस सकाळी सकाळी दुकानात भूमितीचे बोकडे मास्तर आणि सोबत भैरू पैलवान चहा पीत बसले होते. बाबूलाल गल्ल्यावर हिशोब लावत बसला होत. एव्हढ्यात बोकडे मास्तरच लक्ष दुकानातल्या बियर कंपनीच्या कॅलेंडर कडे गेले. कॅलेंडर वरचे फोरेनच्या बायांचे फोटो त्यांना फार विशेष आवडत. केवळ एक कलात्मकता म्हणून बाकी गैरसमज नसावा. अजूनही कॅलेंडरवर नोव्हेंबर महिनाच चालू आहे हे महापाप त्यांच्या लक्षात येवून मग ते म्हणाले
"ओ बाबूलाल बाई बदला की आता किती दिवस हिलाच ठेवतात"
"हा चाललाय प्रयत्न…." - पैसे मोजता मोजता बाबूलाल बरळले
"आता यात प्रयत्न कुठून आला? स्टुलावर चढलं की काम होतय"
"आता या वयात स्टूल काय आन टेबल काय? आपुन थोडेच बाजीराव हायेत मस्तानी गावायला" - बाबूलाल
"ओ बाबूलाल …अहो त्या कॅलेन्डर वरच्या बाई बद्दल बोलतोय मी…. तुमच्या मनात भलतच"
"आं?? असं होय मला वाटलं …. अरे गण्या बदल रे पान"
गण्या कारागीरानं स्टुलावर अल्लद चढून पान जसं बदललं तसं मास्तर अन भैरू डिसेम्बर महिन्याच्या पानावरच धिन चाक चित्र जिभल्या चाटीत न्याहाळू लागले.
तेवढ्यात कुरिअर कंपनीची जीप येवून दुकाना समोर थांबली आणि कुरिअरवाल्यांनी एक भलं थोरलं माणसाच्या आकाराचं पार्सल आणून दिलं.
गण्यानं कात्री घेवून प्याकिंग कापताच काय आश्चर्य त्यातून एका बाईचा पूर्णाकृती मानिकेन निघाला आणि सगळ्यांनीच आश्चर्याने आ वासला.
ती होती सगळ्यांची हवा टाईट करणारी लाल बिकिनी मधे एक धिन च्याक पोझ घेवून हसणारी मदनिका पामेला अंडरसन.
तिच्या डोक्यावर होती एक संता क्लॉजची गोंडेदार टोपी. तिचा टू पीस ड्रेस सुध्धा जणू काही सान्ताच्या घरचा लाल टर्किश टावेल फाडू फाडू उरलेल्या चतकोर कपड्यात शिवलेला.
"अबाबाबा ह्याला म्हनतेत मॉडेल…. अगदी समभूज त्रिकोण"- बोकडे मास्तर कौतुकाने म्हणाले.
"ओ मास्तर काड्या मोडल्या तुमच्या त्रिकोणाच्या, आर ही तर तुमची वैनी आहे. मिसेस भैरू व्ही. पाटील" भैरू पैलवान उचकला आणि मग तो स्टुलावर उभा राहून बाई च्या चेहऱ्यावर फडके मारणाऱ्या कारागीर गण्याकडे वसकत म्हणाला "आरं ये लेका गण्या तुझ्या वैनीला नमस्कार कर आन उतर तिथून नाही तर पाठीत बुक्कीच घालतो तुझ्या फोकणी च्या" तसा गण्या घाबरून गडबडीनं आपल्या जागी जावून बसला आणि तिथून चोरून चोरून पामेला कडे पाहू लागला.
"अबाबा हे काय तरी वेगळच प्रकरण हाये" - बाबूलाल
"प्रकरण नाय हा आयटम बॉम्ब हाये. तुम्हाला म्हणालो नव्हतो का हीच ती आपल्या सर्वाची लाडकी मिसेस भैरू पाटील" - भैरू
"आं सर्वाची??" बाबूलाल आणि मास्तर एकदमच ओरडले
"नाय फक्त माझी चुकून बोल्लो" - भैरू जीभ चावत म्हणाला
"तस नाय भैरू मी म्हातारा संता क्लोज बघितला होता पण ही तरणी बाई त्याच्या गणवेशात? म्हणजे हे प्रकरण काय आहे?" - मास्तर
"आर तिच्या मारी… ही त्याची ल्योक आहे कि काय?" भैरू ने डोके खाजवले
"असलीच पाहिजे?" इति मास्तर
"काय नाव हाये हीच?" बाबूलाल
"शांता क्लोज - मिसेस शांता भैरू पाटील, विषय क्लोज!" भैरू विजयी स्वरात म्हणाला
"पण मी काय म्हणतो साडी कंपन्या हीला कशी काय दाखवायलेत?" बाबूलाल
"का बर? हिच्यात काय खोट आहे?" आता मात्र भैरुला रागच आला
"आरे तसे नाही रे बाबा फोरेनच्या बाया काय साड्या घालतात काय? आन हिने तर सांता बाबा चा लेडी ड्रेस घातलाय - त्यो पण लांडा" - बाबूलाल
"हा डिसेम्बर महिना आहे नाताळात फोरेनला असेच असते" भैरुने दिले ठोकून
"मी काय म्हणतो बापा ऐवजी पोरगी यायली नाताळात, म्हन्जे म्हातारं गचकल कि काय?" मास्तर म्हणाले
"आरे तसं काही नस्त लोक संख्या वाढल्या मुळे आता काही गावाला त्यो आणि काही गावाला ही जात असेन, चाकलेट वाटप करायला" बाबूलाल बोलले
"आर तिच्या मारी… चॉकलेट स्वताच चॉकलेट वाटायलय म्हणाकी… हा हा हा" मास्तर म्हणाले
"ए गपे फोकलीच्या सांगितला ना ही तुमची वैनी आहे आदराने बोला" भैरूने पुन्हा एकदा गुद्दा मारायची तयारी केली पण मास्तर चपळाईने लांब पळाले.
जरी हा मानिकेन बाबूलालच्याच दुकानात साडी कंपनीने नेमका का पाठवला ह्याचे रहस्य उलगडले नाही तरी
थोडक्यात या चतुर चर्चेतून सर्वाना हा ज्ञानबोध झाला की दर नाताळाच्या रात्री गुपचूप दाढीवाला सांताक्लोज येतो आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतो. या वर्षी पण तो येणे शक्य आहे मात्र या वेळी बोकलवाडीला तो किवा त्याची ही मुलगी शांता स्वतः येण्याची शक्यता आहे.
स्वतः शांता क्लोज येणार ही कल्पनाच मोठी रोमांचकारक होती. सर्वानांच एक प्रकारचा उत्साह किवा विशेष चैतन्य आले असे वाटले. गणू कारागीर तर अकारणच लौकर घरी गेला आणि बायकोवर अजिबात न वसकता कधी नव्हे तो लाडं लाडं बोलू लागला.

-त्या रात्री बोकडे मास्तरला स्वप्न पडलं की चांदणी रात्र आहे. नदीचा सुरेख किनारा आहे. ते आणि शांता क्लोज हातात हात घालून मजेत फिरत आहेत. भैरू पैलवानाचा पाय मोडला आहे आणि त्याच्या कुबडी घेतलेल्या हातात शांतानं बांधलेली राखी बांधली आहे त्या मुळे तो मोठ मोठ्याने रडत आहे.

-त्या रात्री भैरूला स्वप्न पडलं की चांदणी रात्र आहे. नदीचा सुरेख किनारा आहे. तो आणि शांता क्लोज त्याच्या हातात हात घालून मजेत फिरत आहेत. बोकडेचा पाय मोडला आहे आणि त्याच्या कुबडी घेतलेल्या हातात शांतानं बांधलेली राखी आहे त्या मुळे ते मोठ मोठ्याने रडत आहेत.

-त्या रात्री गण्या कारागिराला स्वप्न पडलं की चांदणी रात्र आहे. नदीचा किनारा आहे. तो आणि शांता क्लोज त्याच्या हातात हात घालून मजेत फिरत आहेत. बोकडे मास्तरचा आणि भैरूचा पाय मोडला आहे. त्यांच्या आणि भैरू दोघांच्या हातात राख्या आहेत. भैरूच्या त्याच्या हातातील "गणू-शांताची" लग्न पत्रिका मोठ्याने वाचून दाखवीत आहे आणि ते दोघेही टाहो फोडून रडत आहेत.

-त्या रात्री बाबूलालला स्वप्न पडलं की चांदणी रात्र आहे. नदीचा किनारा आहे. त्यांची जालीम बायको पामेलाचा एक हात उपटून त्यांना त्या हाताने बेदम धोपटत आहे आणि ते बिचारे धोतर सावरत जीवानिशी नदी काठी सैरावैरा पळत आहेत.

दुसऱ्या दिवशी सुगंधी वाऱ्या सारखी बातमी गावभर पसरली जो तो बाबूलाल साडी सेंटरला व्हिजीट देऊ लागला. काही लोकांनी तर आपली बायको आश्चर्याच्या धक्क्याने बेशुध्द पडेल याचा विचार सुध्धा न करता पामेलाकडे भोकणे डोळे करून पाहत भारी साड्या पण विकत घेतल्या. गावातल्या स्वयंस्थापित संस्कृती रक्षक समितीचे कार्यकर्ते जे की व्हेलेनटाईनडे ला विरोध करणे, गावातील सच्च्या प्रेमिकाना बदडून काढणे असले उद्योग करणारे, ते पण बाबूलालच्या दुकानात सामूहिक येवून मानिकेन पाहताच दंग उभे राहिले. ते काही बोलणार एव्हढ्यात भैरू पैलवानाने मूठ आवळत त्यांना "ए भाड्या हो ही तुमची फोरेनची वैनी आहे तेव्हा नमस्कार करून मुकाट निघायचं!" अस धमकावल्यावर त्याचा पण नाईलाज झाला. भैरू सारख्या रेमडोक्या मनुष्याशी शत्रूत्व घेण्यात काहीही शहाणपण नव्हते हे त्यांनाही कळत होतेच की.
भैरू पासून सुरक्षित अंतरावर गेल्यावर नाही म्हणायला एक किरकोळ कार्यकर्ता दुसऱ्या किरकोळ कार्यकर्त्याला म्हणाला "काही म्हण नाग्या या जगात काही संस्कृतीच उरली नाहीये आता भैरू पैलवानाला लग्नाची बायकू आहे तरी हा पठ्ठा त्या फोरेनर बाई च्या पुतळ्याला बायकू म्हणतो."
"अरे त्याची बायको रागावून माहेरी जाऊन बसलीये म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असेल." दुसरा कार्यकर्ता कुजबुजत म्हणाला.

साधारण दोन तीन महिन्या नंतरची गोष्ट:
मध्यंतरी काही घटना घडून गेल्या. बाबूलालनी बरेच समजवल्यामुळे की काय भैरू पैलवान त्याच्या बायकोला पुन्हा नांदवायला सन्मानाने घेवून आला. गण्या कारागीराचे अधून मधून कामाच्या वेळी किवा लौकर घरी जाणे कमी झाले तो पुन्हा मन:पूर्वक काम करू लागला. पंचक्रोशितल्या गावा मध्ये पामेलाची किर्ति पसरल्याने बोकलवाडी ला येणारी पुरुष मंडळी बाबूलालच्या दुकानाला आवश्य भेट देवू लागले. बाबूलालचा धंधा देखील जोमात चालू लागला.

एक दिवस बाबूलाल, भैरू पैलवान आणि मास्तरची बायको एका निवांत दुपारी नदीवर धुणे वाळत घालून गावगप्पा करत बसल्या होत्या तेव्हा बाबूलालची बायकू हळूच म्हणाली तुम्हाला कळलं का गण्याची बायकू पोटुशी आहे तिसरा लागलाय म्हणे. त्यावर संधी साधून भैरू पैलवानाच्या बायकोने पण हळूच आपले पोटुशी असल्याचे गुपित सांगितले. त्यावर मास्तरची बायको पण लाजत म्हणाली "मला बी दिस गेलेत"!

त्या दिवशी बाबूलाल रात्री जेवायला बसला तेव्हा बायकोने त्याला भैरू, मास्तर आणि गणूच्या बायकोची गुड न्यूज सांगितली. ते ऐकून बाबूलाल उडालाच. च्या मारी आपल्या दुकानाच्या तिन्ही लाइफ मेम्बरचा एकाच वेळी शॉट लागला?? हा काय दैवी चमत्कार आहे?
"तुमच्या दुकानाचा नाही तर त्या शांता क्लोजचा पायगुण असन दुसरं काय?" बायको उपरोधाने म्हणाली
"आता मी चौथ्यांदा बाळंत नाही राहिले म्हणजे मिळवली" अशी पुस्ती तिने जोडताच बाबूलालच्या डोळ्या समोर तारे चमकले.

दुसर्या दिवशी बाबूलाल सकाळी सकाळी दुकान उघडतच होते तर दोन तीन तरुण बायका ओटीच समान घेवून दुकानात आल्या आणि त्यातली एक बाबूलालला म्हणाली शांता क्लोज ची ओटी भरायची आहे नवस करणार आहे यंदा बाळ होऊ दे.
बाबूलालने जरा आश्चर्याने चौकशी केली तर त्या बायांनी सांगितले कि गावातच काय पण पंचक्रोशीत चर्चा चालू आहे शांता क्लोजच दर्शन पुरुषांनी घेतलं कि संतती प्राप्ती होते. त्यांच्या कडे पुरावे होते. बाबूलाल कडे पण पुरावे होतेच की. बाबूलाल नाही म्हटलं तरी व्यापारीच त्याचे डोके मग मात्र तुफान चालले.
पुढच्या दोनच महिन्यात बाबूलालचे साडीचे दुकान जाऊन तेथे शांता क्लोज चे अलिशान मंदिर उभे राहिले. दर्शना साठी भाविकांची रांग लागू लागली अर्थात पुरुषाची.
एक दीड वर्षाच्या आतच शांता क्लोजच्या कृपेने बाबूलाल, भैरू, मास्तर आणि गणू मंदिराचे श्रीमंत ट्रस्टी आणि बाप झाले. हो हो आपले बाबूलाल सुध्धा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदापोहे, Swara@1,अनघा.,बंट्या,Nidhi,अमा,चनस,आशुचँप,मनीष आपले आभार!

-त्या रात्री बाबूलालला स्वप्न ...................... नदी काठी सैरावैरा पळत आहेत.

बिच्चारे, बिच्चारे बाबूराव!! स्वप्नात पण सुख नाही!!!!

गोष्ट वाचून लै हसू आले!

Pages