सर्व्हिस ट्याक्स…

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 19 May, 2016 - 07:53

सर्व्हिस ट्याक्स…

सकाळपासून ह्या ना त्या क्लाईंटला भेटण्यासाठी तो भटकत होता. इतर वेळी हे सगळ चालत पण भर उन्हाळ्यात फिरायचं म्हटलं कि त्रागा वाढतोच, AC मधल ऑफिस जास्त प्रिय वाटत अशा वेळी. त्यातच दुपारचे तीन वाजत आले होते, डोक्यावर सूर्याच्या झळा आणि पोटात भुकेच्या ज्वाळा पेटल्या होत्या. तश्यातच स्टेशन बाहेरच असलेल्या म्याक्डोनाल्ड मध्ये तो शिरला. फारशी गर्दी नव्हती. त्याच्यापुढे दोघे आणि त्यांच्यापुढे आणखीन एक मुलगा...९-१० वर्षांचा

तो मुलगा... वडा पाव न खाता आज बहिणीसोबत बर्गर खायचा, तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा असा काहीसा विचार करत काउंटर वर पैशांचा हिशोब समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. नेहमीच्या त्या दुकानाच्या पडणाऱ्या सावलीत न बसता आज एखाद-दुसरा गिऱ्हाईक जास्त मिळावा ह्या हिशोबाने सूर्य आग ओकत असतानाही रस्त्यावर फिरून त्याने एक-दोन रुमाल जास्तच विकले होते. काहीतरी गोड हव म्हणून त्याने एका दुकानातून क्याडबरी आधीच घेतली आणि म्याक्डोनाल्ड मध्ये तो शिरला. थंड हवेच्या स्पर्शाने क्षणभर गारठला. अजून पर्यंत बाहेरूनच मोठ्ठाल्या अक्षरात लिहिलेली प्राइज त्याने मनात साठवली होती, कितीतरी वेळा हिशोब करून - उजळणी करून बजेटमध्ये तडजोड केली होती आणि आत्ता धीराने तो तिथे रांगेत उभा राहिला होता. पण तरीही पैशांचा हिशोब चुकलाच. सर्विस ट्याक्स अस काहीस जे असत तेच आता समजून घेत होता. त्याच्या मागे बरेच वेटिंग ला थांबले होते.

इथे हा क्लाईंट, सूर्य आणि भूक याने आधीच तापला होता आणि चिडून ओरडलाच, "नया काउंटर चालू करो यार " सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला अन मग मात्र हा पोरगा बाजूला सरकला. काही समजायच्या आत मागचे पुढे झाले आणि आपापली ऑर्डर घेऊन निघूनही गेले. मघाशी वैतागलेला तो आता थोडा शांत झाला होता आणि एका टेबलवरून त्याला पाहत होता. म्याक डी चा दुसरा कोणी अटेंडन्ट त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता. सगळा प्रकार ह्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही, काहीतरी नवीन खाण्याची इच्छा आणि ती पूर्ण करण्यासाठी खिशात नसलेली ऐवज.... काहीच नवीन नव्हत. पण इथे वेगळाच मामला होता. तो अटेंडन्ट त्याला पैसे देऊ करत होता आणि तो घेत नव्हता... स्वाभिमान... तो खूप असतो यांच्यात.. खांद्यावरच्या झोळीत रुमाल अजूनही अडकवलेले दिसत होते... काहीतरी विचार करून हा उठला.. त्याच्याकडे गेला आणि वीस रुपये देऊन एक रुमाल मागितला.. " खूपच गर्मी आहे आणि त्यातच रुमाल विसरलोय... टिश्यू किती उपयोगी पडणार न? दे एक पटकन.." तो हसला, डोळे चमकले... हिशोब लागला.. आणि ऑर्डर हातात आली.

बाहेर हा रिक्षा/बस साठी थांबलाच होता.. धावत येत तो म्हणाला, "थ्यांक यु, आणखीन एक सांगाल... हा सर्व्हिस ट्याक्स जबरदस्ती घेतात का ओ ? मी पण लाऊ का एक-दोन रुपये जास्त, देतील का मला कोणी? " त्याच्या या निरागस प्रश्नावर हसावं कि रडावं कळत नसताना तो म्हणाला, "ती खूप मोठी प्रोसिजर आहे. मेहनत कर आणि शिक.. हळू हळू सगळ कळेल... आणि बिलकुल लाऊ नकोस असा सर्व्हिस ट्याक्स सध्या .. पण सर्व्हिस ट्याक्स लावण्याइतका लवकरच मोठा हो.."

त्याला काहीच कळाल नाही, हे समजलच होत.. पण आजच्या आनंदी दिवसाचं मोठ समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होत... आणि त्यातच तो तिथून निघून गेला.. बहिणीच्या बर्थडे सेलिब्रेशन साठी.. हा देखील खिशातल्या दोन रुमालातील एक काढून डोक्यावरचा घाम टिपत रिक्षा थांबवून निघून गेला.. थंड AC च्या सानिध्यात पोहोचून पुढच काम आटपण्यासाठी.

………. मयुरी चवाथे-शिंदे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आवडली ..
हा एक्स्ट्राचा टॅक्स माझ्याही डोक्यावर आठ्या पाडतो. अरे जे काही आहे ते सरळ किंमतीतच लावा ना म्हणून मनातल्या मनातच दरवेळी चरफडतो. साला माझाही हिशोब दरवेळी गंडतो

Happy

छान ..... Happy

व्हा व्हाव्हा खुप छान, खुप आवडलि, हो ना नेहमि सर्व्हिस ट्याक्स डोक्यात धरुनच हिशोब करावा लागतो. पण या सर्व्हिस ट्याक्स वर एवडि छान गोश्ट होइल वाटल नव्त.