स्त्री सक्षमीकरणाबाबत

Submitted by बेफ़िकीर on 19 May, 2016 - 03:03

टीप - स्त्री सक्षमीकरणाबाबत मते मांडण्यात मी कमी पडेन ह्याची नम्र जाणीव आहे. 'जावे त्याच्या वंशा' ही उक्ती येथे पूर्ण लागू होते हे मला समजते.
====================

स्त्रीच्या सक्षमीकरणाबद्दल बोलणे ही बाबच सक्षमीकरणाच्या आड येणारी पहिली बाब आहे असे माझे मत आहे. सक्षमीकरण, सबलीकरण ह्यांची गरज नितांत आहेच. मात्र ते करायचे कोणी व कसे ह्याबाबत होणार्‍या चर्चाच नेमक्या सक्षमीकरणाच्याच मुळावर घाव घालतात असे मला वाटते. ह्याचे कारण 'स्त्रीचे सक्षमीकरण व्हायला हवे आहे' असे म्हणणे म्हणजे स्त्री दुय्यम आहे हे मान्य करण्यासारखे आहे. हा विषय असा आहे की समस्या आहे हे मान्य करून उपाययोजना व्हायला तर हव्या आहेत पण समस्या आहे हे उघडपणे मान्य करणे हे समस्या जटिल करण्यासारखे आहे. तरीसुद्धा लेखाच्या विषयाची गरज म्हणून ह्या समस्येचा उघड उल्लेख करणे माझ्यावर बंधनकारक ठरत आहे.

स्त्रीला कोण सक्षम करणार? सक्षम करणार म्हणजे काय करणार आणि कसे करणार? पुरुष स्त्रीला सक्षम करू शकत नाही कारण स्त्री आधीच पुरुषापेक्षा अधिक सक्षम असते. बाळंतपण आणि शारीरिक दौर्बल्य हे घटक नसते तर स्त्रीला सक्षम करण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. ती सक्षम आहे हे नैसर्गीकरीत्याच मान्य झालेले असते. पण तिच्याभोवती अब्रू, खानदानकी इज्जत, अस्मिता अशी काटेरी कुंपणे घालून तिचे व्यक्तीमत्त्व मृतवत करून टाकण्यात आले. हे करताना शारीरिक बळाचा वापर झाल्यामुळे स्त्रीला ही अवस्था हतबलपणे मान्य करावी लागली.

जितका प्राचीन इतिहास बघू तितके स्त्रीचे हे स्थान पुरातन असल्याचे जाणवेल. काही संस्कृती अश्याही होऊन गेल्या ज्यात स्त्रीला पुरुषापेक्षा अधिक महत्त्वाचे व अधिकाराचे स्थान होते. त्याची काही चिन्हे आजही अवशेष रुपात राहिलेली असावीत. पण त्या संस्कृती नगण्य म्हणाव्या लागतील. 'स्त्री म्हणजे शरीर, सौंदर्य आणि उपभोग' ह्या पलीकडे विचार तेव्हाही पोचलेले नव्हते आणि आजही ते पुरेसे पोचलेले नाहीत.

तरीही आजची स्त्री बहुतांशी क्षेत्रांमध्ये अग्रगण्य आहे, सर्वात महत्त्वाच्या पदांवर विराजमान आहे, शेकडो पुरुषांचे नेतृत्त्व करत आहे. काही राजकीय नेत्या असलेल्या स्त्रियांनी तर कोट्यावधींचेही नेतृत्त्व केलेले आहे, करत आहेत.

तरीही ही समस्या आज जगातील कोणत्याही संस्कृतीत, प्रांतात व क्षेत्रात उग्र स्वरूप धारण करून समोर येत आहे.

त्या त्या संस्कृतीनुसार स्त्री सक्षमीकरणाच्या आवश्यकतेची तीव्रता, संकल्पनेबाबतच्या समजुती ह्या बदलत राहतील. उदाहरणार्थ, ज्या संस्कृतीत स्त्रीची मान उंच दिसावी ह्यासाठी तिला चोवीस तास एक धातूचे सिलिंड्रिकल उपकरण मानेत धारण करावे लागते तेथे शारीरिक स्वातंत्र्य ही सक्षमीकरणाची किमान संकल्पना असू शकेल. जेथे रीसर्चमध्ये स्त्री तिच्या कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे योगदान देऊ शकणार नाही असे समजून तिला संधी नाकारली जाते तेथे तिला अशी संधी मुद्दामून देऊ करणे ही सक्षमीकरणाची कल्पना असेल.

दोन अश्या स्त्रियांवरील लेख वाचनात आले होते ज्या आपल्या संस्कृतीत अद्भुतच समजल्या जातील. एक स्त्री न्यू यॉर्कच्या एका चौकात टॉपलेस उभी राहते. तिचे म्हणणे असे की स्त्रीच्या शरीराबाबत असलेले कुतुहल व त्यातून निर्माण होणारे पुढील अनेक प्रकारचे गुंते नष्टच व्हावेत ह्या उद्देशाने मी असे करते. 'स्त्रीचे शरीर असे असे असते' हे अगदी लहान वयापासून मुलांनादेखील ज्ञात असावे व त्यांचे कुतुहल विकृतीकडे वळू नये ह्यासाठी ती मुद्दाम देहप्रदर्शन करते. तिची चेष्टाही केली जाते, काही वेळा तिला पकडलेही जाते, काही वेळा तिला पाहून पालक आपल्या पाल्यांना दूर घेऊन जातात तर काही वेळा तिच्याबरोबर फोटोही काढले जातात. पण तिचा उद्देश किती प्रमाणात सफल होतो हा प्रश्नच आहे. पण तमाम स्त्रीजातीमधील एक स्त्री असे म्हणू पाहते हेही नसे थोडके. दुसरी एक स्त्री आहे जी ब्रा वापरण्यास नकार देते. ती म्हणते की स्त्रीजातीवर असलेले हे बंधन केवळ पुरुष वर्चस्ववादातून आलेले असून मी ते नाकारते. माझे शरीर असे असे आहे आणि ते असेच असेच दिसण्यात मला जर काही हरकत नाही तर बघणार्‍यांनी डोळे का विस्फारावेत?

ह्या दोन स्त्रियांच्या तुलनेत आपल्याकडे आजही मोठ्या प्रमाणावर असलेल्या घुंघट घेणार्‍या, शर्मिल्या व अडाणी स्त्रियांचे प्रश्न किती भिन्न आहेत. दोन्ही स्त्रियाच आहेत पण दोघींसमोर एकाच प्रश्नाची वेगवेगळी स्वरुपे उभी ठाकलेली आहेत. ह्यावरून लक्षात यावे की ह्या समस्येची व्याप्ती अगाध आहे.

इतकी प्रचंड व्याप्ती असलेल्या समस्येवरच्या उपाययोजना अर्थातच त्या त्या प्रदेशापुरत्या, संस्कृतीपुरत्या खास असणे आवश्यक होऊन बसते. आपल्या देशापुरते पाहिले तरीसुद्धा शहरी मुली व ग्रामीण मुली ह्यांच्यासाठीच्या समस्या आणि उपाययोजना भिन्न भिन्न आहेत. पंथ, जात, धर्म, संस्कृती ह्या वैविध्यांमुळे तर हे सगळे फारच क्लिष्ट होऊन बसते.

ह्यातही काही समानतेचा धागा शोधायचा झाला तर वरकरणी हे मुद्दे समान आढळावेत.

१. शिक्षण स्वातंत्र्य
२. वस्त्रपरिधान स्वातंत्र्य
३. वाचास्वातंत्र्य
४. विचारस्वातंत्र्य
५. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य
६. जोडीदार निवडीचे किंवा लग्नच न करण्याचे स्वातंत्र्य किंवा लग्नाशिवायही राहण्याचे स्वातंत्र्य
७. मूल जन्माला घालणे / न घालणे ह्याबाबत निर्णयस्वातंत्र्य
८. सर्व क्षेत्रात संधी मिळण्याचे स्वातंत्र्य (पात्रतेनुसार, अर्थातच)
९. बलात्कारानंतरही उजळ माथ्याने जगता येईल ह्यासाठी पोषक वातावरण निर्माण होणे
१०. स्त्री विषयक कायद्यांच्या अंमलबजावणीची परिणामकारकता वाढणे
११. हिंसा अमान्य करून वेगळे होण्याचे स्वातंत्र्य व पुनर्वसनास पोषक वातावरण निर्माण होणे
१२. कौटुंबिक छळ अमान्य करून वेगळे होण्याचे स्वातंत्र्य व पुनर्वसनास पोषक वातावरण निर्माण होणे
१३. आहार स्वातंत्र्य
१४. माध्यमांमधून व चित्रपटांमधून स्त्री देहाचे उत्तान प्रदर्शन क्रमाक्रमाने सीमित करणे
१५. छेडछाड झाल्यास जोरदार विरोध करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होणे
१६. एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला स्वतःहून अधिक मुक्त होण्यास सहाय्यकारक ठरणे

सर्वाधिक गरज आहे ती स्त्रीने स्वतःला सक्षम समजण्याची! आपण चौकटीबाहेर पडू शकतो हे आधी स्त्रीलाच समजायला हवे आहे. मानसिकतेबाबत उपाययोजना करताना जशी पुरुषांच्या मानसिकतेवर चर्चा होते तशीच स्त्रियांच्य अमानसिकतेवरही व्हायला हवी आहे. स्त्री 'दबावाला बळी पडण्याच्या मानसिकतेत' जबरदस्तीने शतकानुशतके भरडली गेलेली आहे. आजही ग्रामीण विभागात मुलींना पदवीधारक होईपर्यंत शिकवले जाण्याचे मूळ कारण लग्नाच्या बाजारात त्यांचे स्थान बरे असावे हे आहे. आजही वयानुसार लग्न होणे ही मुलींच्या बाबतीतील अपेक्षा फार खोलवर रुजलेली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या ठिकाणी काही भागात तर पाळी सुरू असलेल्या स्त्रीला पाच दिवस गावकुसाबाहेर ठेवण्यात येते आणि शिळे अन्न पुरवण्याचे उपकार केले जातात. त्याचवेळी प्रगत शहरांमधील मुली आणि स्त्रिया उच्च उच्च स्थानांवरून कोट्यावधी रुपयांचे निर्णयही लीलया घेत असतात. त्यांच्या शब्दाला सर्वत्र मोल असते.

विरोधाभासाबद्दलच बोलायचे तर शहरातील सुशिक्षित व उत्तम नोकरी असलेली स्त्रीसुद्धा अन्याय स्वीकारत असते आणि खेड्यातील एखादी नुकतीच वयात आलेली मुलगीसुद्धा दे दणादण वागणारी असू शकते.

त्यामुळे स्त्री सक्षमीकरणाच्या उपायांबाबत बोलताना सर्वात आधी हे चित्र उभे करण्याची गरज आहे की स्त्री मुळातच सक्षम आहे. ही बाब ठसवली जाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ह्यातून आत्मविश्वासयुक्त मानसिकता निर्माण होण्यास सहाय्य मिळेल. नकारात्मक घटनांवर लक्ष केंद्रीत करण्यामुळे स्त्री अधिक बावरत राहील.

प्रत्येक निर्णयामागे चारचौघांचे विचार घेणे, आपल्याला उद्या कोणी नांवे ठेवणार नाही, जाब विचारणार नाही ह्याची तरतूद करणे, निर्णयासाठी अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही हे माहीत असूनही पुरुषांच्या कलाने घेणे, कौटुंबिक वातावरणातच सुरक्षिततेची अनुभुती मिळते हा विचार जोपासणे, आपण एकट्या जगू शकतच नाही हे स्वतःवर ठसवणे, पुरुषांच्या तुलनेत कायम एक पाऊल मागे ठेवून चालणे हे सगळे स्त्रीच्या मानसिकतेतील असे घटक आहेत जे तिच्या सक्षमीकरणाच्या आड येत आहेत. 'फक्त हेच घटक आड येतात' असे म्हणायचे नसून हे महत्त्वाचे घटक आहेत असे म्हणायचे आहे.

अशी अनंत उदाहरणे आहेत की स्त्रीने एक पाऊल पुढे टाकले तर जग तिच्या मदतीला मनापासून धावते.

सक्षमीकरण म्हणजे शिकून सवरून नोकरीला लागून चार पैसे मिळवणे नव्हे. ही व्याख्या कोणत्यातरी शतकात कदाचित योग्य ठरलेली असेलही, पण आजची व्याख्या फार निराळी आहे. अवलंबित्त्वापासून सुटका हे आजच्या व्याख्येचे अधिष्ठान असायला हवे. कोणत्याही प्रकारचे अवलंबित्त्व!

चार गोष्टी पुरुषांप्रमाणे करता येणे व करण्याचे स्वातंत्र्य मिळणे म्हणजे सक्षमीकरण नव्हे. ती सक्षमीकरणाच्या हिमनगाचे वरचे टोक आहे. 'मी एकटी आहे आणि एकटीच व्यवस्थित जगू शकते' हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे.

ह्यात लाखो अडचणी आहेत. छेडछाड करणारे, गैरफायदा घेणारे, मागे लागणारे खूप भेटणार! अशी अशी वागू नकोस असे उपदेश करणारे खूप असणार! तोंडावर किंवा पाठीमागे टीका करणारे खूप निघणार! पण हाच तो भोग आहे जो काही पिढ्यांनी भोगला तर पुढच्या पिढ्या मुक्त होतील. जसे आजच्या पिढ्यांकडे असलेले स्वातंत्र्य यायला मागच्या अनेक पिढ्यांनी काहीकाही सोसलेले होते.

बाकी पुरुषांच्या मानसिकतेबाबत काही बोलायलाच नको. तो विषय सर्वज्ञात आहेच.

पुरुषही स्वयंपाक करतो म्हणजे स्त्रीपुरुष समानता आली किंवा स्त्री सक्षम झाली असे नव्हे.

कोणीतरी आधार दिला किंवा काही सहाय्य केले तरच स्त्री नीट जगू शकते ह्या विचारापासून स्त्री व एकुणच जग दूर जाणे हे सक्षमीकरण आहे, सबलीकरण आहे. मग हे कोणीतरी भले एखादी स्त्री असो, कुटुंब असो, कोणत्याही नात्याच्या रुपाने (मुलगा / पती / वडिल / भाऊ / सासरा / मित्र वगैरे) पुरुष असो, संघटना असो की आणखीन कोणी असो!

'मी स्त्री आहे म्हणून मला सतत सिद्ध व्हायला हवे आणि सुरक्षित राहायला हवे' ह्या भावनेपासून कायमस्वरुपी मुक्तता मिळणे हे सक्षमीकरण आहे. 'मी काही वेगळी आहे किंवा माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते' ही भावनाच नष्ट व्हायला हवी आहे. 'जसा पुरुष आहे तशी मी आहे' इतके सिंपल व्हायला हवे आहे ते!

स्वतःच्या स्त्रीत्त्वाची जाणीव चोवीस तास जोखडासारखी वागवावी लागत नाही अश्या अवस्थेकडे जाणे ही सक्षमीकरणाच्या प्रवासाची दिशा असायला हवी.

आजमितीला सक्षमीकरणाबाबत असलेल्या काही खुळचट कल्पनासुद्धा सक्षमीकरणाच्या मुळावरच घाव घालत आहेत असे एक विचित्र चित्र आजूबाजूला दिसून येईल. उदाहरणार्थ, 'मुलगी शिकली तर घर शिकेल' ही पाटी! मुलीने शिकावे हा कायदा असायला हवा, आवाहन नव्हे. घर शिकेल हे ध्येय असायला नको, मुलीने शिकावे हा कायदा असायला हवा. मुलीच्या शिक्षणाचा भलताच हेतू आहे असे चित्र ह्या पाटीतून उभे केले जाते. हे सक्षमीकरणाच्या मुळावर घाव घालणारे आहे कारण शिकलेली मुलगी घरातल्या पुढच्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व सांगत राहील ह्यात त्या स्त्रीवर एक भूमिका उगीचच लादली जात आहे. तिला मोकळी सोडून द्यायला हवी आहे. तिचे ती काय करायचे ते पाहील. फक्त तिला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिले जाणे हे समाजाने आणि कायद्याने पाहायला हवे.

================

-'बेफिकीर'!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले. विशेषकरून

प्रत्येक निर्णयामागे चारचौघांचे विचार घेणे, आपल्याला उद्या कोणी नांवे ठेवणार नाही, जाब विचारणार नाही ह्याची तरतूद करणे, निर्णयासाठी अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही हे माहीत असूनही पुरुषांच्या कलाने घेणे, कौटुंबिक वातावरणातच सुरक्षिततेची अनुभुती मिळते हा विचार जोपासणे, आपण एकट्या जगू शकतच नाही हे स्वतःवर ठसवणे, पुरुषांच्या तुलनेत कायम एक पाऊल मागे ठेवून चालणे हे सगळे स्त्रीच्या मानसिकतेतील असे घटक आहेत जे तिच्या सक्षमीकरणाच्या आड येत आहेत.

हा परीच्छेद.

या धाग्यावर अवांतर गदारोळ न माजता शक्य तितकी संतुलित चर्चा व्हावी ही स्वामीचरणी प्रार्थना.

भाऊ,नवरा आणि वडील...यांचा रोल यात महत्वाचा आहे...हेच पुरुष स्त्रीच्या आयुष्यात पहिल्यांदा येत असतात.
स्त्री चे जे घटक तिला असक्षम होण्यासाठी कारण मानले जातात त्यांचा नायनाट करा.
स्त्रीने पुरुषापेक्षा जे सकारात्मक तिला मिळाल आहे त्या मानसिक गोष्टी विकसित करण्यावर भर द्यावा.

स्त्रीला दुय्यम तर गेल्या शतकात पाश्चिमात्य देशात पण मानत असत...असा काय बदल घडला यावर भाष्य व्हावे.

स्त्रीचे सबळीकरण अगदी सोपे आहे.

स्त्री सत्ताक पद्धत आणणे... घरकाम करण्यास तयार असणारा नवरा घेऊन स्त्रीने तिच्या घरात त्याला नांदायला न्यावे. पुरुष पळुन जाउ नये म्हणुन थोडीफार वधुदक्षिणाही घ्यावी.

नोकरी करुन कुटुंब चालवणे स्त्रीची जबाबदारी राहील. यातून ती सबळ होइइल व पुरुषाला दोष देण्यास काही कारणच उरणार नाही

......

इछुक स्त्रीयानी संपर्क साधावा.

mugdhagode, पोस्टशी सहमत

नॉर्थ इस्ट मधे अशीप्रथा आहे अरुणाचल प्रदेश मधे बर्‍याच जमाती मधे नवरा मुलिकडे नांदायला जातो.

स्त्री सक्षमीकरणाबाबत -

रामचरित मानस के सुन्दरकांड में उल्लिखित "" ढोल, गंवार , शूद्र ,पशु ,नारी सकल ताड़ना के अधिकारी "" असे स्त्री बद्द्ल लिहिलेले जे ग्रंथ आहेत ते सामुहिकरित्या जाळायला पाहिजे कारणअशा ग्रंथाचा येथिल पुरुषांच्या मनावर खुप खोल परिणाम होतो.

अनंत उदाहरणे आहेत की स्त्रीने एक पाऊल पुढे टाकले तर जग तिच्या मदतीला मनापासून धावते.<<< हे ऎसे होणे जेव्हा बंद होईल स्त्री सक्षम झाली म्हणता येईल

बेफिकीरजी, छान मांडलंय.
दोन बाबींबद्दल मनात आलेले विचार -
१] << पण समस्या आहे हे उघडपणे मान्य करणे हे समस्या जटिल करण्यासारखे आहे.>> पिढ्यानपिढ्यांच्या दबावामुळे खेड्यातीलच नव्हे तर शहरातीलही कांहीं घरांत स्त्रीयांची मानसिकताही स्वतःकडे दुय्यम स्थान घेण्याचीच झालेली दिसते. << 'स्त्रीचे सक्षमीकरण व्हायला हवे आहे' >> हा नारा अशा स्त्रीयांमधे या स्थितीबाबत असंतोष निर्माण करण्याकरतां आवश्यक असावा. पुरुषानाही याची जाणीव करून देण्यासाठीही त्याचा उपयोग होतोच;
२] << 'मुलगी शिकली तर घर शिकेल' >> यामुळे खरंच << त्या स्त्रीवर एक भूमिका उगीचच लादली जात आहे. >> असं आहे का ? मुलगी शिकली तर घरात शिक्षणाचं वातावरण तयार होतं व घरातल्या मुलींसमोर घरातच आयती 'रोल मॉडेल्स' उभी रहातात, हें अधिक औचित्यपूर्ण नाही वाटत ?

समाजातील काही स्तरातील स्त्रिया खर्‍या अर्थाने सक्षम आहेत, पण त्यांची संख्या फार नाही.

दुर्दैवाने ज्या स्तरातील स्त्रिया ज्यांना या सक्षमीकरणाची गरज आहे, त्या समाजात, इतके बदल करायला हवेत आधी की त्याशिवाय एकदम स्त्रियांना सक्षम करणे कठीण. कारण अनेक पिढ्यांपासून प्रचलित असलेल्या गैरसमजुती, अज्ञानी पुरुष नि स्त्रिया, या दोन मोठ्या प्रचंड अडचणी आधी दूर करायला पाहिजेत.

वरील अडचणी दूर झाल्या तर स्त्री स्वतःचे मन न घाबरता, कुठलेहि सामाजिक व इतर दडपण न येता बोलू शकेल, मग जिथे जे योग्य ते तिथे आपोआप होईल.
मग स्त्री सत्ताक पद्धत आणणे... घरकाम करण्यास तयार असणारा नवरा घेऊन स्त्रीने तिच्या घरात त्याला नांदायला न्यावे. असे मुद्दाम करावे लागणार नाही.

होम मिनिस्टरच्या चालीवर वाचावे..

दार उघड बये
दार उघड
कोण आलंय बघ
कामाला उशीर झाला
फोडणी द्यायची राहिली
कोण आलंय बघ
रांधा वाढा उष्टी काढा
सबलीकरण
सबलीकरण
इस्त्री सक्षम झाली का?

पदरावरती जरतारीचा
टॉप लाजरा हवा
सक्षमीकरण करण्यासाठी
चौक शोधूया नवा

सबलीकरण
भाऊजी आले बघ