बाईकवरचा एक उनाड दिवस !

Submitted by योगेश आहिरराव on 18 May, 2016 - 03:48

बाईकवरचा एक उनाड दिवस !

१८ मे २००२. आज बरोब्बर १४ वर्षे झाली. हरिश्चंद्रगडाशी ओळख होऊन. नुकत्याच परिक्षा संपलेल्या, डोक्यावरचा ताण ? हलका झाला होता. मे महिन्यातले कडक उन असुन सुध्दा मध्येच आकाशात चुकार ढगांची गर्दी अशातच कधीतरी वारा सुटायचा. सहाजिकच असे वाटत होते कधी एकदा पाऊस पडतोय..
काय ते दिवस, काय ते वातावरण. मैत्रीतल्या दुनियादारीचे भारावलेले दिवस. सह्याद्रीची खऱी ओळख या ट्रेक मुळे झाली. एक वेगळाच खजिना गवसला.
त्याच हरिश्चंद्रगडाच्या आठवणी जागवत मागे केलेल्या एका भटकंतीचा वृत्तांत....

यंदा गुढीपाडवा जोडून विकेंडला तीन दिवसाची सुट्टी होती, पाडव्याचा सण साजरा करून दोन दिवस हाताशी होते. सहाजिकच त्यातला एक दिवस तरी कुठेतरी बाहेर भटकून सत्कारणी लावावा, असा मनात विचार आला. बराच विचार केल्यावर एखादी दमदार बाईक राईड. तसेही बरेच महिने झाले होते बाईक राईड करून.
अर्थातच हे सर्व काही आदल्या रात्रीच (पाडव्याच्या रात्री) ठरले. त्यामुळे ऐनवेळेस कोणीही सोबत नसणार याची खात्री होतीच. हो - ना - हो, जाऊ कि नको का दुसरे काही तरी..या सर्व गोष्टीतच झोपायला रात्रीचा एक वाजला. परिणाम सकाळी उशिरा साडेसहा वाजता जाग आली, पण ठरवले कोणी नाहीतर नाही. एकला चलो रे ! बाईकवर आवरून तयारी करून निघायला पावणेआठ वाजले.
आता सर्वात महत्वाचा प्रश्न होता कि जायचे कुठे ? कल्याण- मुरबाड-माळशेज- ओतुर- कोतुळ-राजुर- घोटी- कसारा- शहापूर- कल्याण असा मार्ग डोक्यात आला. ठाणे पुणे नगर आणि नाशिक या चारही जिल्ह्यांच्या सीमेवरील, हरिश्चंद्रगड, भंडारदरा व कळसुबाई या भागातून जाणारा हा मार्ग. वाटेत पेट्रोलची टाकी फुल्ल भरून मुरबाड माळशेज रस्त्याला लागलो. मुरबाडच्या पुढे शिवळे गावात चहा नाश्ता साठी थांबलो, मिसळ तशी यथातथाच होती. पण गाडीची टाकी भरल्यावर, शरिराची टाकी सुध्दा भरणे आवश्यक होतेच की.
कल्याण मुरबाड माळशेज मार्ग तर मी कित्येकदा सर्व ऋतूत, दिवसा ढवळ्या, रात्री अपरात्री पार केला आहे. सध्या तर रस्ता हि चांगला असल्यामुळेच बाईक चालावायला एक वेगळीच मजा येते. खास करून वैशाखरे ते माळशेज एम टी डी सी हा रस्ता तर माझा अत्यंत आवडीचा. टोकावडे सोडल्यानंतर सह्याद्रीचे रूप इथे भलतेच मोहरते, पार सिध्दगड आहुपे ढाकोबा, जीवधन, नाणेघाट, भोरांड्याच्ये दार, डाईकवाला भैरवगड, माळशेजची भिंत, देवदांड्या ते पार हरिश्चंद्र -रतन ते आजोबा- अलंग मदन कुलंग पर्यंत. बेलाग कातळकडे असलेला हा सह्याद्रीचा जबरा पहाड मात्र कायम खुणावत असतो. दरवेळी त्या ओढीने मी वर्षातून चार पाच वेळा तरी जातोच.

माळशेज घाटात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतुक पण गाड्यांची जास्त वर्दळ नसल्यामुळे विशेष त्रास झाला नाही. एमटीडीसीच्या पुढे पुणे जिल्ह्याची हद्द सुरू होते. साडेदहाच्या सुमारास मी खिरेश्वरकडे जाणार्या वळणावर थांबलो. उजवीकडे सिंदोळा आणि डावीकडे नितांतप्रिय हरिश्चंद्रगड. आत्ता पर्यंत पाच सहा वेळा हरिश्चंद्रगडावर जाणे झाले. पण मागच्या चार पाच वर्षातून वाढलेल्या पिकनिकछाप गर्दीमुळे इच्छा असुनही जावेसे वाटत नाही. हरिश्चंद्रगडाचे ट्रेकरच्या मनात एक वेगळेच स्थान असते, त्या बद्दल शंकाच नाही. ट्रेकरची पंढरी असा हा हरिश्चंद्रगड. हाच विचार करत मी धरणाच्या भिंतीवरच्या रस्त्याने खिरेश्वरला पोहचलो. अलीकडे खिरेश्वराच्या प्राचीन मंदिरात मंडप घातलेला दिसला.बहुतेक पाडवा ते रामनवमी सप्ताह असेल. गावातून टोलारखिंडीकडे एकटक पहात राहिलो.

मनात आले बाईक गावात उभी करून, जमेल तेवढे लवकर गडावर जाऊन कोकणकड्याला धावती का होईना भेट देऊन येऊ, किती दिवस झाले कोकणकड्यावर गेलोच नाहिये...
लगेच भानावर येत, पण माझा आजचा हेतू तर निव्वळ बाईकहून भटकंती आहे ट्रेक तर नाही. लगेच बाईक माघारी फिरवून पुन्हा मुख्य रस्त्याला लागलो. करंजाळे गावापुढची खिंड पार केल्यावर पलीकडे गणेशखिंडीचा रस्ता आणि उजवीकडे हडसर किल्ला दिसला.

पंधरा मिनिटात बनकर फाट्यावर घुंघरांच्या आवाजाने थांबलो, ऊसाचा ताजा रस पिऊन पुढच्या दहा मिनिटांत ओतुरला पोहचलो. एस टी स्थानकाच्या डावीकडे वळून ब्राम्हणवाडा, कोतुळ रस्ता पकडला.

सांगायचे झाले तर आत्ता पर्यंत डावीकडे समांतर धावणारी हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांग ओलांडून कोतुळच्या दिशेने निघालो. छोटासा पण वळणावळणाचा याच डोंगररांगेतला घाट चढून मी एका ठिकाणी थांबलो. इथुन दोन रस्ते जात होते. खात्री करण्यासाठी तिथे उभे असलेल्या मुलांना विचारले, डावीकडचा रस्त्याने दहा बारा किमी कोतुळ असे सांगितले. तितक्यात त्या घोळक्याच्या पाठिमागून एक बाई आपल्या तान्हुल्या बाळाला घेऊन आल्या. " ओ दादा कोतुळ चाललात ना मला सोडा ना." अचानक समोरून असे विचारणे आल्यावर मी क्षणभर अवाक झालो. त्या बाई लागलीच गाडीच्या मागच्या सीट जवळ आल्या.
बाई : "अहो आत्ताच बस चुकली, आता पुढची बस कधी येईल नेम नाही. मला लवकर पोहचायच आहे.
मी : “तुम्हाला या गाडीवर बसायला जमेल ?”
बाई : “हो’’
एका हाथात ब्याग, लेडीज पर्स आणि तान्हुल्या बाळाला सांभाळत बाई पाठीमागे बसल्या. माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू झाले, हा सारा प्रकार एका मिनिटाच्या आत घडला.मला नकार ही देता आला नाही. कुठून इथे रस्ता विचारायला थांबलो, हि अनोळखी बाई सोबत लहान मुल, त्यात रस्ता खराब भलतीच जबाबदारी अंगावर येऊन पडली. भर उन्हात हळुहळु गाडी चालवु लागलो. काही मिनिटांतच बाई म्हणाली, "मला या गाडीवर भिती वाटतेय ओ".
बहुतेक बुलेटच्या व्हायब्रेशन्स आणि जर्क मुळे घाबरायला झाले असेल.
मी : "काय झाले ? परत तुम्हाला तिकडे सोडू का ?"
बाई : “नको’’
मी : "शांतपणे व्यवस्थित बसा". अक्षरश: पुढची दहा किमी, मी बाईक २०-३० च्या स्पीड ने चालवली. वळणावळणाचा रस्ता त्यात छोटे मोठे खड्डे चुकवत हळुहळु चढ उतार पार करत. कधी नव्हे तर प्रत्येक ठिकाणी मी कोतुळ ७ किमी, ५ किमी, २ किमी असे मैलाचे दगड पहात होते.शेवटी अर्ध्या तासात कोतुळ आले.बाईला त्यांच्या ओळखीच्या दुकानाजवळ उतरवले. बाईंनी व दुकानदाराने माझे आभार मानले. चला सुटलो एकदाचे अशीच भावना मनात आली, आता थेट राजूरला शेव भाजीचे जेवण करूया आणि आरामात घरी जाऊ. बाजुलाच एका छोट्या हॉटेलात गरमागरम पाववडे तयार होते. मी मुद्दाम पाववड्याचा मोह टाळला फक्त दोन ग्लास लिंबू सरबत घेतले. हॉटेलवाल्याशी बोलता बोलता हरिश्चंद्रगडाचा विषय निघाला, मी सहज म्हणून कोथळे पाचनई रस्त्याची चौकशी केली. रस्ता काय असाच तुम्ही आलात तसाच, असे मला उत्तर मिळाले. घड्याळात पाहिले तर एक वाजला होता. मी बाईकला किक मारून गावातल्या दत्त मंदिराकडून डावीकडे कोथळा रस्ता पकडला. वळणावळणाचा छोटासा घाट रस्ता पार करत एका छोट्या पठारावर आलो. पुढे दुरवर कोहणे गाव, त्यापुढे कोथळा हरिश्चंद्रगडाची वेताळधार नजरेस पडली.

वाटेतली सोमलवाडी गावातली हि अभयारण्याची कमान. विहीर, कोहणे गाव मागे टाकत कोथळा गावाच्या वळणावरच मला भैरोबा दुर्ग ची पाटी दिसली. गाडी थांबवून घड्याळात पाहिले तर दोन वाजत आले होते.

विचार केला, दिड दोन तासात वर जाऊन सहज परत येऊ शकतो. मग काय वाटेत झाडाखाली बाईक उभी करून, सोबत पाण्याची बाटली आणि बिस्किट सुकामेवा वगैरे घेऊन निघालो. पुढे वाटेत तीन शाळेतली मुले भेटली. मला विचारले, देवाला चाललात काय ? मी म्हणालो हो. मुले स्वत:हून सोबत आली.
भैरोबा दुर्ग च्या पायथ्याला बर्यापैकी चांगले जंगल आहे.

वनविभागाचे सुशोभिकरणाचे काम संथगतीने चालु दिसले. कातळमाथा सोडला तर सर्वत्र चांगलेच जंगल, उजवी कडचा मार्ग कोथळ्यातून टोलार खिंडीकडे जातो. काय भारी ना ! काही तासांपूर्वी मी टोलार खिंडीच्या पलीकडच्या बाजूला खिरेश्वरात म्हणजेच पुणे जिल्ह्यात होतो आणि आता इथे कोथळा नगर जिल्ह्यात.
मुख्य मळलेली पायवाट जंगलातून वळणे घेत छोट्या घळीत शिरली, याच घळीत काही कातळ कोरीव पावट्या आणि शिडी लावली आहे.

मोठ्या शिडीच्या अलीकडे डावीकडे पाण्याचे टाके तसेच वाटेत बसायला वनविभागाने ठेवलेले बाकडे.

वीस पंचवीस मिनिटातच वर पोहचलो. निसर्गातल्या त्या अनगड अशा भैरोबा देवाचे दर्शन घेतले.

देवासमोरच कातळात खोदलेली पाण्याची टाकं आणि दिपमाळ आहे.

हा गड ऊंचीने जरी कमी असला तरी टेहळणीच्या दृष्टीने खुप महत्वाचा असावा.

कारण कोथळे लव्हाळी पाचनई मार्ग, कोहणे आणि विहीर गावजवळचा कुंजरगड, मुख्य म्हणजे वेताळधार टोलार खिंडीचा बराचसा भाग सहज नजरेत येतो. काही फोटो घेतो, तेवढ्यात सोबत आलेली मुले फरार. आवाज दिला तर मला लांबूनच "आम्ही जातोय काम हाय घरी." मला हे जरा विचित्रच वाटले.

छोटीशी आटोपशीर माथ्यावर गडफेरी करून काही फोटो घेऊन, उन्हाचे चटके बसु लागल्यावर मी भानावर आलो. वेळ पाहिली तर तीन वाजले होते. एकटाच आरामात खाली उतरायला सुरूवात केली. वाटेतल्या टाक्यातले पाणी तोंडावर मारून खुप बरं वाटले. काही मिनिटे त्या बाकड्यावर निसर्गातली शांतता अनुभवत बसलो, खऱच एकांतात स्वत:शी झालेला मुक्त संवाद खुप काही देऊन जातो. फक्त निसर्ग आणि आपण...... या दहा मिनिटाच्या ब्रेक मध्ये मी इथला ग्रीन ऑक्सिजन पुरेपुर घेऊन फुल्ल फ्रेश होऊन खाली आलो.

खालच्या झापावर आजोबा निवांत बसलेले दिसले, राम राम शाम शाम झाल्यावर सोबतचे पाणी त्यांना प्यायला दिले. " आमी बी गडावर जातोय कधी मधी पाणी आणाया’’. इति आजोबा.
खाली आल्यावर बाईकवर पुन्हा व्यवस्थित सामान अडकवून कोथळ्याहून काही अंतर जाताच मला पाचनई ७ किमी हरिश्चंद्रगड पायथा ८ किमी अशी पाटी दिसली.

फोटो काढून मी उजवीकडे राजूरच्या रस्त्याला लागलो. पण काय माहित अचानक माझ्या मनात प्रचंड घालमेल सुरू झाली. एक मन सांगते चल पाचनई, तर दुसरे सांगते नको सरळ राजूर आणि लवकरात लवकर आपल्या घरी. मला ती लव्हाळीची खडी चढण, पाचनईचा मुळा मुठा काठचा छोटा घाट रस्ता ती दरी आजुबाजूचे जंगल आणि खाली नदिचे पात्र हे दृश्य सारखे साद घालत आहे. मी थांबलो, पुन्हा गाडी यु टर्न घेऊन ३ किमी माघारी येऊन त्या पाटीला मागे टाकून लव्हाळी, पुढचा चढणीचा खराब रस्ता पार करून पाचनईच्या वाटेला लागलो. हळूहळू वळणदार चढ घेत काही मिनिटांतच मला ऊंच तारामती आणि कलाडगड नजरेत आले. पाचनई गावाच्या अलीकडे मला अगदी जवळून हरिण पळताना दिसले, चक्क एवढ्या जवळून वन्य प्राण्याचे दर्शन. वाह !आज माझे नशीब खऱच जोरदार. गाव जसे जवळ आले तसा रस्ता फारच खराब. सावकाश चालवत मी बाईक थेट विठ्ठल भारमल यांच्या घराच्या अंगणात उभी केली. मला पाहून भारमल आजी बाहेर आल्या.
आजी : “बाकीचे जोडीदार कुठाय ?”
मी : “नाही ओ, मी एकटाच आहे.”
आजी : “अरं देवा काय र तू, एवढ्या उन्हात, अशा रस्त्यान एकटा कशापाई फिरतोस ?”
मी : “आजी, अचानक तुमची या आपल्या गडाची, या जागेची फारच आठवण येत होती. ऐन वेळेस कुणी सोबत नाही मग काय एकटाच आलो.”
पाचनई बद्दल काय बोलावे, पहिल्यांदा पाचनईशी गाठ पडली होती ती आठ वर्षापूर्वी केलेल्या हरिश्चंद्रगड रतनगड ट्रेक च्या वेळेस मी माझा लहान भाऊ विशाल, आणि माझे मित्र हेमंत व संकेत. आमच्या चौकडीने पाच दिवस अक्षरश: हा परिसर पिंजुन काढला होता. पेठेची वाडी मुळा नदी ओलांडून कुमशेत पुढे कात्राबाई पार करून रतनगडमार्गे डेहण्यात हा तर या भागातला लाजवाब ट्रेक.
परत माझी नजर हाथातल्या घड्याळावर जाते, बरोब्बर सव्वाचार वाजलेले असतात. माझ्या मनातला ट्रेकर पुन्हा जागा होतो आणि मला भैरोबा दुर्ग नंतर आता हरिश्चंद्रगडाचे वेध लागतात. मनाची अवस्था तर 'ये दिल मांगे मोअर'
किती वर्षे लोटली गडावर जाऊन कोकणकडा पाहून. मन म्हणते चल तासाभरात वर जाऊ, फक्त कोकणकडा पाहून येऊ. तेवढ्यात आजीने माझ्यासमोर चहा आणून ठेवला. चहा घेत आजीला म्हणालो, “आजी आज वर गर्दी असेल ना ?”
आजी : “नाय आज नाय, फक्त चार पाच पोरं गेलीत. उद्याच्या रविवारला येतील बरेच लोकं.”
मी : “काय ? आज गर्दी नाही. मी जर तासा दोन तासा आधी आलो असतो. तर मी पण अडीच तीन तासात महादेवाचे दर्शन घेऊन कोकणकडा पाहून परत आलो असतो. मग आत्ता जाऊ का ?”
आजी : “आता नको र. आज थांब हव तर सकाळी जा, आता गेलास तर परतायला रात होईल आण तू एकटा.”
मनातल्या भावनेला आवर घालून मी आजीचे बोलणे ऐकतो तसेही मला आजच घरी परतायचे आहे.
आजी बरोबर गप्पा मारत असताना, पुन्हा पुन्हा गडावर, पाचनईचा कोंबडा कलाडगड या भागात फिरून मनं मात्र कोकणकड्यावर.....
आजी पोहे खाण्यासाठी आग्रह करतात, मी नम्रपणे नकार देऊन त्यांचा आशिर्वाद घेतला.
पुढच्या येळेला दोन चार दिवस सवड काढून ये असं मला निघते वेळी म्हणाल्या. खऱच ओढ लावणारा हा सह्याद्री आणि त्याच्या अंगणातली हि प्रेमळ मायाळु माणसं. थोडासा भावुक होऊन निघालो. पुन्हा तो खराब पण रमणीय अशा रस्त्याने मी पंधरा मिनिटात लव्हाळीला पोहचून राजूरच्या वाटेला लागलो. वाटेत बहुतेक शिसवद? फाट्यावर एक मामा गाडी समोर आले. “राजूर चाललात ना, मला सोडा ना लई अर्जंट काम हाय.”
मी : “ठिक आहे पण सांभाळून बसा.”
माझे बोलणे पूर्ण व्हायच्या आत माना पटकन टांग मारून बसले सुध्दा.
मी मनातल्या मनात, काय चाललय काय शहरात चुकूनही कुणालाही लिफ्ट न देणारा आज चक्क दोन जणांना लिफ्ट काय देतो. पुढे आंबित माणिकओझरच्या अलीकडे छोट्याश्या चढाच्या वळणावर एक जीपवाला आमची काही चुक नसताना आम्हाला विचित्र कट मारून गेला. अक्षरश: आम्ही दोघे पडता पडता वाचलो, गाडीचा वेग तसा कमीच आणि नियंत्रणातच होता. स्वत: ला सावरतो तो पर्यंत जीपवाला खाली उतरून निघूनही गेला. माझ्यापेक्षा जास्त ते मामा भडकले.
मामा : “अरे एवढी जागा असताना, इथं कशापायी xxx xxx’’
मी : “मुर्ख आहे, त्याला साईड समजत नाही का”
मामा : “इकड सगळी अशीच बेकार ड्रायवर आहेत, यांचाकडे कुठ लायसन्स नी कसली कागदपत्र. तुमच्या माझ्या गाडीवर बसायच, चार दिवसांनी मंग झाला ड्रायवर, लय बेकार आहेत.”
मी : “काय बोलणार आता.”
मामा : “बाळा, आमच्याकडे तसा धोका नाही. तशी लोकं चांगली आहेत, तू फक्त गाडी चालिवताना कॉर्नरला हॉर्न वाजवीत जा.”
थोडक्यात या वळणावळणाच्या रस्त्यावर प्रत्येक टर्न वर हॉर्न देत जा हेच त्यांना सांगायचे होते. अर्थात ते बरोबरच होते, अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात १००-२०० मीटर ही सरळ रस्ता मिळाला तर नशीब, भौगोलिकदृष्ट्या सर्वच रस्ते वळणावळणाचे आणि छोट्या मोठ्या चढ उताराचे. पुढे राजूरच्या अलीकडचा छोटा घाट उतरून मामांना राजूरच्या पेट्रोल पंपाजवळ सोडले. मामांनी आग्रहाने चहा पाजला. चहा नाश्ता करून मामांचा निरोप घेऊन, राजूर घोटी रस्ता पकडला.

रंधा धबधब्याच्या पुढे रतनगडाने दर्शन दिले.

बारीला कळसुबाईची सोबत होतीच. बारीच्या पुढचा घाट उतरताना सुर्यास्ताच्या सुमारास नैऋत्येला अलंग मदन कुलंग तर वायव्येला औंढा पट्टा खासच उठून दिसत होते.

घोटी हायवेवर छोटासा ब्रेक घेतला, तितक्यात एक बुलेटचा ग्रुप आला. मला विचारले कुठून आलात, कुठे चालतात ? मी त्यांना माझा दिवसभराचा रूट सांगितला. पण त्यांच्या चेहरा वरचे भाव पाहून त्यांना ते समजले नाही हे स्पष्ट दिसत होते. मी सुध्दा त्यांना खोलात समजवून न सांगता. बाईकला किक मारून सरळ न थांबता रात्री सव्वानऊच्या सुमारास कल्याणला पोहचलो.

एका दिवसाची सह्याद्रीतल्या सहवासातली प्रचंड सकारात्मक उर्जेने एक दमदार राईड करूनच......

योगेश चंद्रकांत आहिरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे म्हणजे भटकंती चा crash course केल्या सारखं आहे, फोटू पण मस्तच.
एका दिवसात इतक्या गडांचा निकाल लावला पण कोंकण कडा राहिला ह्याची खंत आहे. बाकी आता तिकडे सारस बाग भरते त्यामुळे न जाण्यातच समाधान .

पुढील भटकंतीस शुभेच्छा
तोफखाना

धन्यवाद रोहित , हिमांशु आणि पंकज.

इंद्रा .. काही अंशी बरोबर टिका केलीस. माझ्या शाळेतल्या जुन्या मित्रांचा ग्रुप आहे. ते तर मला गरीबांचा मिलिंद गुणाजी म्हणतात. माझा तर माबो आयडी पण तोच ठेवायचा विचार आहे....... Lol Lol :

वाह !!! इगतपुरि घोटी म्हनजे माझ गाव... आम्हि पन गेलो होतो पाचनइ वरुन या रविवारि... कोकन कडा पाहायला... ८व्यादा...

खरं सांगायचं तर कधी कधी भक्कम ट्रेकर दोस्तांच्या सोबतीपेक्षा हे एकांतातले निवांत क्षण खूप काही देऊन जातात…पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. स्वत:शी एक सकारात्मक संवाद साधला जातो तोही आपल्याच नकळत. त्यात हरिश्चंद्राचा परिसर म्हणजे शब्दांच्या आणि भावनांच्या पलिकडचाच !! तुझ्याबरोबर मीही हा दिवस जगलो !!

जियो !!