पहिला वहिला परदेश प्रवास!!

Submitted by kulu on 15 May, 2016 - 23:22

( पुलंच अपुर्वाई कितीवेळा वाचलं आहे आता मोजता येणार नाही. पण हा लेख लिहिला तीन वर्षापुर्वी तेव्हा पण तेच वाचत होतो. तेव्हा त्याची छाप पडली आहे त्याबद्दल क्षमस्व! )

पहिला वहिला परदेश प्रवास!!

खरं सांगायचं तर परदेश प्रवास ही काही फार अपूर्वाईची गोष्ट राहिली नाही. हल्ली कोणाच्या तरी घरातील कोणीतरी तरी नक्कीच परदेशात जाऊन आलेला असतो! पटत नसेल तर कुठल्याही गृहिणीला विचारा, “आमच्या नणंदेच्या जावेचा मुलगा “, “सासूच्या बहिणीची धाकटी सून ” असे कोण कोण कुठे कुठे जाऊन आल्याची खबरबात मिळेल! मध्ये तर आमच्या एका ओळखीच्या गृहस्थाने त्याचा भाऊ, नकाशात नसणाऱ्या पण अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याशा ग्वांगटुंगमाला कि टांगटुंगमाला असं कुठेतरी जाऊन आल्याचा सांगितला! हे गृहस्थ वयाने (आणि अंगापिंडाने ) मोठे असल्याने मी हे गप्पपणे ऐकून घेतले!

तर सांगायची गोष्ट अशी कि डॉ. मार्को कुलन यांनी internship ऑफर केल्यामुळे Woods Hole Oceanographic Institution येथे चार महिने काम करण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे १५ डिसेंबर ला अमेरिकेला जायचा हे फ़िक्स झालं! खर तर अगदी अमेरिकेला जायच ठरल्यापासून ठरवलं होत कि रोजनिशी लिहायची (दैनंदिनी हा शब्द वापरणार होतो पण रोजनिशी मध्ये जो रंगेलपणा आहे तो दैनंदिनीमध्ये नाही!) पण ठरवून लक्ष्यात ठेवलेलं आधी विसरत या नियमाप्रमाणे ते राहून गेल. म्हटल निदान प्रवासाच वर्णन तरी जमतंय का बघू! अगदी लहानपणी पु. लं. चं “अपूर्वाई ” (अपूर्वाई हे एक भंगार पुस्तक आहे असा सांगणारे काही लोक मला भेटले, त्यांच्यासाठी हि सुचना कि माझ्या लहानपणी चेतन भगत वगैरे मंडळी होतकरू असल्याने पु. लं., ग. दि.मा., P. G. Wodehouse, Agatha Christie वगैरे टुकार साहित्य वाचावे लागले! ) वाचल्यापासून परदेशवारी करायची इच्छा मनात होती. खरं तर ट्रेन ने मिरजेला जायचा म्हणजे सुद्धा फार आव आणायची सवय मला! त्यामुळे अमेरिकेला जायचा म्हणजे “कित्ती लांब ” असे भाव! पण उत्सुकता मात्र खूप!

पण अमेरिकेला जाण हे मिरजेला जाण्याएवढं सोपं नाही याची जाणीव व्हिसा वाल्यानी तत्परतेने करून दिली! पत्ता शोधून काढून ज्या ठिकाणी गेलो तिथे फक्त व्हिसा नोंदणीकरण असून व्हिसा घेण्यासाठी दुसरीकडेच जाव लागत हे कळल! बर नोंदणीकर तरी सोपे असेल अस वाटल पण तिथे नावाची चौकशी! त्यानी माझे नाव नुसतेच कुलदीप, कि कुलदीप दिलीप (बाबांचे नाव ), कि कुलदीप निर्मला (आईचे नाव ) असं म्हणत सगळ्या नातेवाईकांची नावे माझ्या नावाला जोडून खात्री करून घेतली, शेवटी मलाच माझ्या नावाचा विसर पडला!वर तिथे काम करणारी सगळी माणसे देसीच होती पण वागण्या-बोलण्याची रीत अशी कि जणू ओबामा यांना विचारल्याशिवाय सकाळचा चहा देखील पीत नाही! व्हिसाची appointment सकाळी ७.३० ची होती त्यामुळे “एवढ्या सकाळी कोण मरायला येणार तिथे?” या अविर्भावात तिथे गेलो तर हि भली मोठी रेशन सारखी तीन पदरी रांग! पण व्हिसा मिळाला! पण ती रांग बघून राग आला, एवढ्या मोठ्या देशाच्या वकिलातीला रांगेत उभारलेल्या लोकांची सोय करता येऊ नये? आत मध्ये तर लोक अक्षरशः व्हिसा साठी गयावया करत होते. माझ्या कडेच्या माणसाला बिझनेस सुरु करायला तिकडे जायचे होते, पण त्याला नाही मिळाला व्हिसा, रडला बिचारा तिथे! खर तर अशा लाचारीचा पण राग येतो!

जायचा दिवस जवळ आला तसे काय काय न्यायचे याची चर्चा सुरु झाली, “थंडी असते बंडी न्या “, हे नसते ते न्या वगैरे अनेक गोष्टी! ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या नेल्या असत्या तर बोस्टन च्या कुठल्याशा जोन्सन गल्ली किवा म्याकमिलन आळीत “मोरे किराणा स्टोअर्स” सुरु करून गल्ला जमवता आला असता! पण किराणा या शब्दाला चपखल इंग्लिश शब्द सापडणे मुश्कील, शिवाय “त्यासाठी व्यापाऱ्याचा पिंड लागतो येरागबाळ्याचे काम नोहे ” असा शेरा मिळाल्याने, तो प्रसंग काही गुदरला नाही! मला सोडायला कोण कोण येणार यावरून घरात भांडणे; तेव्हा सोडायला येणाऱ्यांची एक टीम आणि परत न्यायला येणाऱ्यांची एक टीम, आणि आईला दोन्ही टीम मध्ये कॉमन ठेऊन भांडण सोडवले! १५ डिसेंबर ला टीम नं १ घेऊन पुणे विमानतळावर हजर झालो ते वेळेच्या पाच तास आधी! मी चेक इन करताना घरच्यांनी रड रड रडून राडा घातला! विरहाच दु:ख आणि कालपरवा पर्यंत लहान वाटणार पोर आज भरारी घेताय याचा आनंद, सगळा एकदम त्यांच्या डोळ्यातून बाहेर पडत होता. आई फार रडली नाही, पण तिचे डोळे सगळं सांगून गेले! आपल्या डोळ्यातले अश्रू मुलाच्या मार्गाआड नको यायला असा विचार आईच करू जाणे!

खरं तर पुण्याहून विमान घ्यायच कारण एकच कि कोल्हापूर पासून पुणे जवळ! पुण्यातून विमान direct Amsterdam ला थांबणार हा माझा अडाणी गैरसमज पुण्यातल्या विमानबाईने लगेच दूर केला!! पुण्याहून विमान उडतय न उडतय तोपर्यंत मुंबई आल पण! फुस्स प्रवास! विमान हे एस. टी सारखे जाता जाता पकडता येत नाही हे नमूद करतो!

अखेर बोस्टन ला जाणारे विमान फलाटाला लागले (सेम यष्टीसारखे)! किती प्रचंड होता तो प्रकार! अस काहीस एकदम बघितला कि आपल्या प्रगतीचा कौतुक वाटत. खर तर अगदी रोजच्या वापरातील इस्त्री, टी.व्ही. वगैरे बघून अप्रूप नाही वाटत! त्यासाठी अस काहीस धक्का देणार पहाव लागतं! अतिपरिचयात् अवज्ञा! दुसरं काय. आपल्यासोबत नेहमी असणाऱ्या माणसांची किमत पण एखाद्या धक्क्यानंतरच कळते की! माझ्झा पासपोर्ट वरचा फोटो अस्सल अतिरेक्यासारखा दिसत होता, त्यामुळे अमेरिके ऐवजी तालिबान च्या विमानात बसवतात कि काय अशी धास्ती लागून राहिली होती पण …………. मला बाहेरून, मग आतून (आणि मग आणखी आतून….) चेक केल्यानंतर मी अतिरेकी नाही हि खात्री सुरक्षा रक्षकांना पटली आणि मी विमानात प्रवेश करता झालो! पहिला वाहिला परदेस प्रवास सुरु झाला! मनात आनंद, उत्सुकता, भीती आणि त्याहूनही जास्त विरहाचे दु:ख होतंच! खिडकीला (खिडकी म्हणजे भिंतीला पाडलेल अन्डगोल छिद्र , त्यातून ढग सोडल्यास इतर काही नीट दिसत नाही आणि यष्टी सारखी उघडता पण येत नाही!) डोकं टेकवून अंधारात शांतस रडून घेतल! आणि तिकडे सूचना सुरु असताना तसाच झोपून गेलो!

जाग आली ते हवाईसुन्दरीच्या उठवण्यानेच! हवाईसुंदरी…..कमनीय बांधा, ऐटबाज चाल, भूरभूरणारे सोनेरी केस….वगैरे! पण आमच्या वाट्याला हवाईसुंदरी न येत हवाईउंदरी आली! एकतर ती अजून एक महिन्याने पेन्शनीत निघणार होती! वय दिसू नये म्हणून मेक अप चा भडीमार! त्यात तिने झोपेतून उठवल्याने मला राग आला होता! असो….तिने शाकाहारी जेवण दिले! त्यात गोल दिसणारा आणि इडली पासून टेनिसबॉल पर्यंत कुठल्याही नावाखाली चपखल बसणारा एक पदार्थ होता. त्याची चव वर्णन न करता येण्यासारखी……………म्हणजे अवर्णनीय नव्हे!! रडल्यामुळे भूक लागली होती (असंच काही नाही, हसल्यावर पण लागते, खोट कशाला बोला?) लोकांना गैरसमज असतो कि विमानात जेवण व शीतपेये फुकट देतात! मग तिकिटासाठी पाच अंकी संख्येएव्हढे पैसे मोजलेले असतात ते काय त्या हवाईसुंदरी च्या लिपस्टीकसाठी? विमानातून दूरवर ची युरोपातली लखलखती शहरे दिसत होती. काटकोनात छेदणारे रस्ते वगैरे शाळेत शिकवलेल अगदीच काही खोट नव्हत! विमान अॅमस्टरडॅम ला थांबल थोडावेळ! (हे स्वतःच्या समाधानासाठी म्हणायचं, चांगला ६ तास उभ होत धूड तिथे!) बोस्टन चा प्रवास सुरु झाला. अॅटलाण्टिक समुद्रावरून जाताना उगीचच अभिमान वाटला! निळसर हिरवी झाक असलेला गूढ समुद्र! पुढचा प्रवास म्हणजे समाधी अवस्था जिला काही अज्ञानी लोक “झोप ” म्हणून हिणवतात!

खर सांगायचं तर बोस्टन च्या लोगन एअरपोर्ट ने घोर निराशा केली! नुसते चौकोनी ठोकळे! अॅमस्टरडॅम च शिपॉल काय सुरेख होता! युरोपात आलो हे नुसत बघून कळाव! नाताळ मुळे पूर्ण एअरपोर्ट सजवला होता! पण हा लोगन एअरपोर्ट पाहून शंका आली कि नाताळ खरच डिसेंबर मध्ये असतो? (पुढे अमेरिकेत २५ डिसेंबरलाच नाताळ साजरे करतात हे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसला!) बहुतेक इथे यायला अजून व्हिसा मिळाला नाही सॅण्टाक्लॉज ला! तरी श्रीयुत ओबामा यांनी इकडे लक्ष द्यावे!

स्वागत कक्षात आल्यावर आधी आईला फोन केला, आपला मुलगा कोलंबिया यानातून मंगळावर पोहोचल्याच्या अविर्भावात तिने निश्वास टाकला! विमानतळा बाहेर आल्या आल्या अमेरिकन थंडी आणि खुली संस्कृती यांचा झटका बसला! लांबच्या प्रवासातून आलेल्या प्रियकराला प्रेयसीने दिलेले गाढ आलिंगन आणि त्याहूनही गाढ…….सुज्ञास सांगणे न लगे! त्या दृश्याकडे जास्त लक्ष न देता वूड्स होल ला जाणारी बस पकडली! आत पाय पसरायला पुरेशी जागा, मोठ्याशा खिडक्या, स्वच्छता वगैरे सगळ होता! आपली यस्टी असले लाड पुरवत नाही! कधीकधी वाटते कि आपल्याकडे गैरसोयी मुद्दाम ठेवल्यात, जेणेकरून आपल्याला परदेशातील सोयींचे अप्रूप वाटावे. आपल्याकडे पण तशा सोयी असत्या तर परदेशवारीचे कौतुक ते काय राहिलेच नसते…..सचिन, केसरी, वगैरेंच्या पोटावर पाय! भारत सरकार सगळ्यांचा विचार करते म्हणतात ते हे असे!

दीड तासांच्या प्रवासानंतर गाव आले, स्वागताला मार्को होताच! पहिल्या वहिल्या परदेश प्रवासाचा पहिला टप्पा तब्बल ३६ तासांनी संपला!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळंच रिलेट झालं Happy
सोडवायला येणार्‍यांचा ग्रूप सोडून Happy मला सोडवायला फक्त माझा मित्र आलेला. आता न्यायला आई बाबा पण येतील (पण त्याला बरेच महिने आहेत Sad )

मस्त लिहलसं ..
व्हिसा ऑफिसमधल्या लोकांबद्द्ल कमेंट तर अगदी अगदीच!
सगळंच रिलेट झालं +१ Happy

तुम्ही एअर इंडियाने गेलात का? हवाई उंदरी हा शब्द प्रयोग विनोद निर्मिती साठी पण फार डेस्परेट वाट्तो. एतिहाद च्या होस्टेसेस फार प्रिटी व प्रोफेशनल. दीपचे सामोसे खाल्ले का?