सिनेमा

Submitted by रसप on 14 May, 2016 - 22:33

सिनेमा.
मी सिनेमा का बघतो ? किंबहुना 'आम्ही सिनेमा का बघतो ? तो बघितला काय आणि नाही बघितला काय, आमच्या आयुष्याचा रहाटगाडा आम्ही असाच ओढत राहणार असतो. मग काही शे रुपये खर्चून, तीन साडे तीन तास देऊन आम्हाला हशील काय होत असतं ?
हे प्रश्न सिनेमा न पाहाणाऱ्यांना पडत असतील. आम्हालाही क्वचित कधी तरी पडतात. रिकाम्या वेळेचा चाळा म्हणून आम्ही अश्या विषयांवर तथाकथित विचारमंथन करत असतो. ह्यातूनही हशील काहीच होत नाही, पण रिकाम्या वेळचा एकटेपणा जरा लौकर निघून जातो.
बाकी नाही.
एव्हढ्यासाठीच आम्ही विचार करतो.

माझ्यासारख्या अगणित सामान्य माणसांसाठी 'सिनेमा' ही एक देणगी आहे.
तिथं दिसणारं बरचसं आम्हाला नेहमीच हवं असतं, पण मिळणं दुरापास्त असतं. आम्हाला दहावीनंतर हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळण्याचंही भाग्य नसतं, पण सिनेमातला तो किंवा ती मात्र हवा तो कोर्स, हवी ती डिग्री उत्तमोत्तम गुणांनी अगदी सहजपणे मिळवतात. त्याला त्याच्यावर प्रेम करणारी हमखास मिळते आणि ती नाकी डोळी इतकी नीटस असते की अशी जी मुलगी आमच्या कॉलेजात असे, तिच्यापासून आम्हीच 'हे आपल्या लेव्हलचं नाही' हे उमजून सुरक्षित अंतर ठेवत असू. त्याची पिळदार देहयष्टी आणि आमची नुसतीच पिळलेली यष्टी. त्याचा दाढी वाढलेली असतानाही स्वच्छ दिसणारा चेहरा आणि आमचं अंघोळ करून बाहेर आल्या क्षणापासून चिकट, तेलकट वाटणारं थोबाड. त्याला जमीन, हवा व पाण्यातल्या सर्व प्रकारच्या गाड्या व्यवस्थित चालवता येत असणं आणि आम्ही बुलेटवर मागे बसतानाही सावरुन/ बावरुन बसणं.
- अश्या लहान-सहान अनेक गोष्टी ज्या पडद्यावर त्याला किंवा तिला मिळतात/ जमतात त्यांत आम्ही आपलाच पूर्ततेचा आनंद मानत असतो.
तिथले 'घर' नावाचे मोठमोठे महाल, गडगंज श्रीमंत कुटुंबं, जीवाला जीव देणारे मित्र सगळं सगळं आम्हाला आपलंच वाटतं.

काही सिनेमे जरा रिअलिस्टिक असतात. पण त्यातही आम्हाला अप्रूप असतं कारण पडद्यावर घडणारी कहाणी आमच्या सपक आयुष्यापेक्षा खूपच मसालेदार असते. आमची ष्टोरी आम्हाला स्वत:लाही ऐकावीशी कधी वाटत नाही. ती इतकी कंटाळवाणी असते की रात्री बिछान्यावर पहुडलं असताना, जर झोप येत नसेल तर आम्ही 'आज काय घडलं' ह्याची उजळणी करायचा प्रयत्न करतो. अर्धा दिवसही आठवून होत नाही आणि झोप लागते.
पडद्यावरच्या व्यक्तिरेखांच्या यातनासुद्धा आम्हाला खरं सांगायचं तर हव्याहव्याश्या वाटतात. त्यांच्या असामान्य दु:खाच्या बिलोरी आरश्यात आम्हाला आमच्या नीरस आयुष्याचं प्रतिबिंब क्षणभर उजळवून पाहावंसं वाटतं. कहाणी शोकांतिका असेल, तर 'हे असं घडू शकतं' म्हणून आम्ही चक्क देवाचं अस्तित्वही नाकारतो. मग थोड्या वेळाने जाणीव होते की 'आपलं असं घडणार नाहीय' आणि पुन्हा देवाच्या अस्तित्वावर विश्वास दृढ होतो.

कधी आम्हाला तिथे असं काही दिसतं, जे आम्ही आमच्याच मनापासून लपवून ठेवलेलं असतं. ते असं एखादं सत्य असतं, ज्याच्या नजरेत नजर टाकून पाहायला आम्हीच कचरत असतो. मनाच्या डायरीत नकळतपणे आम्ही एखादी नोंद करून ठेवलेली असते. ते पान फाडायचंही नसतं आणि उलटून पाहायचंही नसतं. एखाद्या अन्प्लेएबल चेंडूवर जेव्हा एखादा फलंदाज सपशेल फसून आउट होतो, तेव्हा त्याला जे वाटत असतं, तेच आम्हाला हे सिनेमे जाणवून देतात. आमची विकेट उडालेली असते. आमचा तथाकथित अभेद्य बचाव भेदला गेलेला असतो. पण तोंडावर आपटणारं अपयश झटकून पुन्हा पुढच्या इनिंगला जसा तोच फलंदाज गार्ड घेऊन स्टान्स घेतो, तसेच आम्हीही पुन्हा पुढच्या सिनेमासाठी तयार असतोच.

सिनेमा आम्हाला सफरी घडवतो. त्या विविध स्थळांच्याच नसतात, तर विविध काळांच्या, संस्कृतींच्या असतात. विविध व्यक्तिरेखांच्या जागी सिनेमा आम्हाला उभा करतो आणि त्यांच्या भावविश्वाच्या सफरी घडवतो. आयुष्याच्या नऊ रसांच्या सफरी सिनेमा आम्हाला घडवतो. पडद्यावर उधळल्या जाणाऱ्या त्या नवरसांपैकी सर्वच रसांचा आस्वाद आम्ही त्या पडद्यामुळेच घेत असतो, एरव्ही ह्यातले काही रस आम्ही ऑप्शनला टाकलेले असतात किंवा त्यांची चव आम्हाला आम्हीच सभोवताली व स्वत:च्या आतही निर्माण केलेल्या कल्लोळात, गडबडीत, धावपळीत, काल्यात समजूनच आलेली नसते किंवा येणार नसते.

डोळे भरभरून आम्ही तंत्रज्ञानाच्या करामती पाहतो. आम्हाला स्वत:ला एक पॉवर पॉइन्ट प्रेझेन्टेशनसुद्धा नीटनेटकं जमत नसलं, तरी स्पेशल इफेक्ट्सचे बारकावे मात्र आम्ही हेरून काढत असतो. कधी त्याला दाद देत असतो तर कधी हाणतही असतो. असंच पडद्यावरच्या कलाकारांबाबतही. शाळेच्या गॅदरिंगमधल्या किरकोळ नाटिकेत 'कोपऱ्यात उभं असलेलं झाड' वगैरेचे रोल केल्याचा अनुभव गाठीशी असलेले आम्ही सिनेमातल्या प्रोटोगॉनिस्टच्या अभिनयाचा खरपूस समाचारही घेत असतो. बाथरुमबाहेर कधी आम्ही गुणगुणत नसतो किंवा पुलंनी सांगितल्याप्रमाणे 'उगीच का' मधला 'उ' कुठे वाजतो, हेही आमच्या गावी नसतं, पण सिनेमाच्या संगीतावर विशेष टिप्पणी मात्र हक्काने करतो. हे सगळं वृथा आहे, आमच्या मताला काही एक किंमत नाहीय, हेही आम्हाला माहित असतं. पण आमच्या मताला किंमत नसल्याची सवय आम्हाला आमच्या रोजच्या आयुष्याने आधीच लावलेली असते. त्यामुळे आमचे शब्द नुसतेच हवेत उडाले, तरी त्याचं वैषम्य आम्हाला तरी वाटत नाही.

सिनेमा खोटा असतो. अगदी १००% खोटाच असतो. भले तो कितीही वास्तववादी असला, तरी खोटाच असतो. हे आम्हाला तो पाहण्याआधी आणि पाहिल्यानंतरही माहित असतं. पण तो पाहत असताना मात्र आमच्यासाठी खराच असतो. ते २-३ तास आम्ही आमच्या रोजच्या आयुष्यापेक्षा वेगळे असतो. कधी दु:खी असतो, कधी आनंदी. पण जे काही असतो, ते एरव्ही नसतोच. आम्ही आमच्या आयुष्याचे हिरो/ हिरोईन नेहमीच असतो. पण आम्ही हे २-३ तास अजून एका आयुष्याचेही हिरो/ हिरोईन होण्याचा प्रयत्न करत असतो. जो कधी जमतो, कधी नाही जमत. तरी सिनेमाने त्याचं काम केलेलं असतं. आम्हा सामान्य माणसांच्या सामान्य आयुष्याला आमच्याचपासून काही काळासाठी का होईना बाजूला ठेवलेलं असतं. विश्रांती म्हणून एखाद्याने डोक्यावरचं ओझं खाली ठेवून काही मोकळे श्वास घ्यावे आणि पाण्याचे चार-दोन घोट घ्यावेत अन् मग पुन्हा एकदा ते ओझं तसंच डोक्यावर घेऊन पायपीट सुरु करावी, तसे आम्ही सिनेमाला पाहतो आणि पुन्हा हमाली सुरु करतो.

बाकी नाही.
एव्हढ्यासाठीच आम्हाला सिनेमा आवडतो.

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2016/05/blog-post.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The protagonist is the main character in the story you write about it. Continue reading... A novel, movie, or play might have many main characters, but it can really only have one protagonist — or maybe two in the case of, say, Romeo and Juliet.

नगरकर प्रोटगोनिस्ट म्हणजे सोप्या शब्दात अंटागोनिस्ट च्या विरुद्ध.
कठीण शब्दात व्हीरो म्हांजि पोरटया गोनिसट...भेटला का अर्थ

नाही, त्याचा उच्चार प्रोटोगोनिस्ट कसा होतो ते कळ्ळे नव्हते.

सध्यातरी तुम्ही सिनेमा पाहता तेव्हा मायबोलीवर किंवा इतर ठिकाणी त्या सिनेमाची चिरफाड कशी करता येईल अश्या दृष्टीकोनातून पहाता असं वाटतं.
एखादा प्रसंग लोकांना आवडला असेल तर तो कसा तद्दन भिक्कार आहे आणि एखादा प्रसंग कसा तुम्हालाच बरा वाटला हे लिहिण्यासाठी सिनेमा पहाता असं वाटतं.

पूर्वी तुमची परीक्षणे ७०टक्के पटायची, एक दोन परीक्षणे वाचून तो सिनेमा पहायची इच्छाही व्हायची.

कुठल्यातरी वर्तमानपत्रातही लिहिता म्हणे. तिथे कदाचित परीक्षण लिहिण्याबद्दल काही तनखाही मिळत असेल. म्हणूनही सिनेमे पहात असाल.

थोडक्यात 'आम्ही' म्हणून तुम्ही जो प्रेक्षकवर्ग लिहिलाय त्यांच्यापेक्षा सध्यातरी तुमची चित्रपट पहाण्याची कारणे वेगळी आहेत.

मीही बहुतेक वेळा सिनेमे मनोरंजन म्हणून पाहते. काही सिनेम्यानवर खूप काही लिहून येते जे वाचून ते प्रत्यक्ष पदडया वर पाहावेसे वाटते म्हणून पाहते जसे बाहुबली, फाईंडिंग फॅनी, लंचबॉक्स, सैराट इ. हे सिनेमे मी अन्यथा पाहिले नसते. काही सिनेमांबद्दल वाचल्यानंतर हे आपल्याला झेपणार नाही असे वाटते म्हणून पाहात नाही जसे पुणे 52, वासेपूर इ. कुठलाही चित्रपट थेटरमध्ये जसा बघितला जातो तसा तो टीव्हीवर किंवा कॉम्प्युटरवर बघितला जात नाही म्हणून जे बघावस वाटतात ते थेटरात जाऊन बघणेच बरे असे मला वाटते.

बहुतेक समीक्षा मी लिहिणार्याची वैयक्तिक मते म्हणून वाचते. आधी बघावासा वाटत असला तर समीक्षा वाचून तो निर्णय बदलला जात नाही कारण मुळात मला तो चित्रपट पाहायचा असतोच.

रसप जे काही लिहितात ते मला तरी आवडते, मी वाचते.

सिनेमा हे माध्यम लोकांना घडविणे किंवा बिघडवणे यासाठी फार सशक्त आहे.
आणि त्यामुळे सिनेमा बनविणारांची आणि तो पहाणारांची इच्छा असो वा नसो, तो (सिनेमा) लोकांवर आपला बरा / वाईट प्रभाव नक्कीच पाडत असतो.
आणि यामुळे सिनेमा बनविणारांची (इच्छा असो वा नसो) आपोआपच जबाबदारी असते की चांगल्या गोष्टींची / मुल्यांची जपणूक होईल असे बघणे आणि वाईट गोष्टींचा / मुल्यांचा प्रचार होणार नाही याची काळजी घेणे.

चित्रपट समीक्षा हा अत्यंत भिकार प्रकार आहे.पुस्तकाची एकवेळ ठीकठाक असू शकते. चित्रपटाच पीएम करण्याचा कुठल्याही व्यक्तीला हक्क् असत नाही. विशेषत: ज्याच्या हातात सर्व सामग्री दिली असता चित्रपट करता न यावा अशी व्यक्ति असेल तर.बहुतांश वेळा एखादी व्यक्ति चित्रपट निर्माण करते त्यामागे सर्वच गणित कधी बरोबर असतील वा चुकलेली देखील असू शकतात. ते प्रेक्षक आपोआपच ठरावतात.त्यासाठी चित्रपट समीक्षक नावाचा कोणी त्रयस्थ असावा अस कुणी ठरवल आहे का?

आम्ही अनेक चित्रपट पाहिलेले आहेत. त्या त्या वेळेनुसार कालखंडानुसार तो चित्रपट पहावा. ट्रांसपोर्टर सारखे चित्रपट तद्द्न अवास्तव असून सुद्धा मनोरंजना साठी पहायचे असतात.त्याची चीरफाड़ करून पाहिली तर बरच काय काय लिहता येईल.

तेव्हा आजकाल प्रेक्षक किती पाराखून घेतो एखादा चित्रपट याची जाण ठेऊन परिक्षण अनबायस्ड लिहावित अन्यथा उगाच माध्यम आहे म्हणून लिहू नयेत.स्वताची मते असतील तर त्याना प्रतिसादात मांडावे.

चित्रपट समीक्षा हा जाहितरीचाही एक प्रकार आहे. हा त्रयस्थ नसेल तर चित्रपटाचा विषय काय हे लोकांना कसे कळणार?

फॅन्ड्रीचा ट्रेलर पाहून ती प्रेमकथा आहे असा समज करून घेतला आणि थेटरात जाऊन निराशा झाली असेही प्रतिसाद वाचलेत मी.

चित्रपटाचे चांगले परिणाम फार थोडे होतात, वाईट जास्त. एक दुजे के लिये आल्यानंतर दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आणि पेपरात न चुकता त्या बातम्मीबरोबर सिनेमाचा उल्लेख असायचा.

>>चित्रपटाचे चांगले परिणाम फार थोडे होतात, वाईट जास्त. एक दुजे के लिये आल्यानंतर दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आणि पेपरात न चुकता त्या बातम्मीबरोबर सिनेमाचा उल्लेख असायचा.

अगदी अगदी, हेच आम्ही अनेकदा सांगत असतो, पण लक्षात कोण घेतो ? Sad

गेले अनेक दिवस कारनाविना एक दूजे के लिए च उदाहरण लोक देत आहेत. कारण समजले नाही...
शिक्षणाच्या... आणि ...इडियट्स बघुन मुलांच्या आत्महत्येत वाढ झाली की तशा बातम्या वर्तमानपत्रात येण्याची(देण्याची) संख्या वाढली.एक दूजे च्या आधी आत्महत्या होत नसतील का हो?

परिक्षणाला ना नाहिए. त्याची पद्धत मर्यादित असावी उगाच आवेश नको... गणेश मटकरींची परीक्षण वाचावित. रिव्ह्यू आणि क्रिटीसीझ करणे यात सूक्ष्म रेषा आहे.

फँड्री सारखे सिनेमा हे टिपिकल प्रेक्षकाच्या आवाक्या बाहेरचे असतात. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर अनेकजण प्रेमकथा न वाटल्याने शिव्या घालत होते. कुठल्यातरी लेखात असल्याप्रमाणे सैराटसारखे चित्रपट समजणे इथल्या समाजाच्या समजापलिकडले आहे.
पण हे समीक्षकाने सांगू नये. ते आपोआपच समजू लागते.

अगदी परवा नटसम्राट चा रेकॉर्ड ब्रेक केल्यावर काही वर्गाला फार कुठेतरी दुखावल्यागत झाले. नागराज च आडनाव कुठ आडव आल कुणास ठाउक

षिनेमे आवडतात.

समीक्षक आवडत नाहीत.

समीक्षक हे बोहारणीगत असतात. नवाकोरा शालु दिला तरी नाकं मुरडतात .... पुलं देशपांडे

आज बोहारणीनं बुट्टी बाजूला ठेवली आहे वाटतं

>>सैराटसारखे चित्रपट समजणे इथल्या समाजाच्या समजापलिकडले आहे.
इथल्या म्हणजे कोणत्या ?

>>कीर्तनानं माणूस सुधारत नाही आणि तमाशानं बिघडत नाही. निळू फुले
निळूभाऊ यांचे हे बोलणे काही ठराविक संदर्भाने असू शकेल.

कीर्तनानं माणूस सुधारेलच, आणि तमाशानं बिघडेलच असे नाही

महेश | 15 May, 2016 - 10:51 नवीन
रसप, तुम्ही सडेतोड समिक्षा लिहित रहा. कोणाला आवडो न आवडो.

>>
काळजी नसावी. मी कुणाचंही मनावर न घेण्याइतका हेकेखोर व निर्लज्ज आहे ! Lol

आणि

ज्या लोकांना स्वत:चं खरं नावही सांगता येत नाही, त्यांच्या प्रतिसादांना तर मी केवळ मनोरंजन म्हणूनच वाचतो. गेल्या ४ वर्षांत माबोने मला शिकवलेल्या अनेक धड्यांपैकी हा एक महत्वाचा धडा !!
दिवा वगैरे अजिबात घेऊ नये !
Lol

इथल्या म्हणजे कोणत्या<<<
समझने वाले समझ गए है ना समझे वो...है(माबो नव्हे....माबोवरचा समाज अतिपर्गत आणि व्यासासंगी हाय राव)

कीर्तनाने माणूस सुधारेलच आणि....<<<हेच आम्हीही म्हणतोय.
कीर्तन आणि तमाशा समीक्षक आणि चित्रपटकर्ता दोघेही करतात... लोक त्यांच्या बुद्धि आवर्तापरमाने कीर्तनकार आणि तमासगिराची निवड करतात... आणि वागायचे तसे वागतात च शेवटी... चित्रपट बघावा आणि बदल घडवावा.

ज्या लोकांना स्वत:चं खरं नावही सांगता येत नाही<<< त्याचा काय सम्बन्ध राव...काहीही युक्तिवाद करता...

>>ज्या लोकांना स्वत:चं खरं नावही सांगता येत नाही, त्यांच्या प्रतिसादांना तर मी केवळ मनोरंजन म्हणूनच वाचतो.

खरंच सर्वांना अशी साधना जमली तर मझा आ जाएगा ! (त्यात अस्मादिक पण आले) Happy

अनंत कनेकारांसारखे जेव्हा नाव लपवून लिहितात किंवा ब्रिटिश नंदी नावन लिहिणारे असे एक ना अनेक त्यांची नाव लपवून चुकच झाली म्हणायची

त्यांचे नाव टोपण असले तरी लिहिणारे कोण आहेत हे सर्वांना माहित असते.
ते आपली ओळख लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करत नाहीत.
आणि ते जे लिहितात ते गमतीने लिहिलेले असते, इथल्या सारखे युद्ध नाही. (हे जनरल आहे या धाग्याबद्दल नाही)

या देशात चित्रपट फक्त तीन कारणांमुळे चालतो आणि बघितला जातो ..

1) एंटरटेनमेंट

2) सेक्स

आणि

3) शाहरूख

बाकी सगळ्या गप्पा आहेत ..

महेश तुमच्या प्रतिसादांवर हसू यायचे ते येतेच्...
मी निव्वळ चित्रपटावर आणि समीक्षाकाच्या भूमिकेवर टिका केली.
तुम्ही महाभारता सारख वैयक्तिक टिप्पण्या चालू केल्या हो.

बरेच लेखक ज्यानी टोपण नावाने लिहिले असे आपण म्हणता त्यांची ओळख कित्येकाना ते लिहिताना नवती हे माहीत असावे.ती नंतर समजली.

आम्ही युद्ध बिद्ध काही पुकारले नाहिए...फक्त उगाच एखादा व्यक्ति चित्रपटाचे परीक्षण म्हणजे मला कसे जमते चीरफाड़ करायला असे लिहित असेल तर ?? वर कुणीतरी म्हणाले तसे रसप यांची फार पूर्वीची परीक्षण चांगली होती...आता उगाचच एकांगी ते लिहित आहेत.

महेश.

कारणं आवडली.
यापलिकडे जाउन काही लोक फक्त 'जास्तीत जास्त लोकांना आवडणारी आणि कोणी शक्यतो यायला नकार न देणारी ग्रुप एक्टिव्हिटी' म्हणूनही चित्रपट बघत असावेत.
तुमची परिक्षणे आवडतात, कधीकधी एक नि:पक्षपाती समीक्षक या स्वत:च्या व्रताला जागण्यासाठी तुम्ही चांगल्याची जास्त स्तुति करतानाही हात आखडता घेता असं वाटतं, पण समीक्षकाच्या चपलात शिरल्यावर हे सर्वांचच होत असावं.
एरवी मी थिएटरात चित्रपट बघण्याचा योग वर्षातून एकदा वगैरे येत असल्याने परिक्षणे वाचून बरेच चित्रपट पाहिल्याची अनुभूति घेता येते.