बिल्डींग रीडर्स

Submitted by विद्या भुतकर on 13 May, 2016 - 15:44

माझी एक इच्छा आहे, की मी शाळेत असेपर्यंत जसे वेड्यासारखी पुस्तके वाचलीत, दिवस रात्र वाचलीत तशी वाचनाची सवय माझ्या मुलांना लागावी. परीक्षा चालू असताना शेजारी पडलेले पुस्तक केंव्हा एकदा हातात घेईन असे व्हायचे. सुट्ट्या लागल्या की पुस्तकं एका मागे एक केवळ वाचत सुटायचे, हावऱ्यासारखे. बाकी मुलं बाहेर खेळत आहेत किंवा कधी टीव्ही बघत आहेत किंवा विडिओ गेम खेळत आहे असे चालू असले तरी मला काही फरक पडायचा नाही. गेल्या कित्येक वर्षात असं वाचन झालं नाहीये आणि ते पुन्हा सुरु करायलाही जमत नाहीये. पण आजही माझ्या विचारांवर, लिखाणावर नक्कीच माझ्या तेव्हांच्या वाचनाचा प्रभाव आहे. एखादी गोष्ट सुसंगत कशी सांगावी किंवा आपले मुद्दे ओळीने कसे मांडावेत आणि प्रत्येकाची डावी उजवी बाजू याची तुलना, किंवा एखादं व्यक्तिचित्र अशा अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या माझ्या वाचनातून. नवीन शब्द, त्यांचे अर्थ, त्यांचा वाक्यातला उपयोग हे ही आलंच. असं बरंच काही शिकले पुस्तकातून. असो.

आता जरा मूळ मुद्द्यावर येते. आज काल उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बऱ्याच पोस्ट वाचल्यात लोकांच्या आठवणीतल्या सुट्ट्यांच्या. काही कविता आणि काही चित्रही, त्यात चिंचेच्या गोळ्या, बर्फाचा गोळा किंवा रावळगावच्या गोळ्या असलेला. एकूण काय नोस्टल्जिया प्रत्येकाचा. आणि तो येतोच कधी तरी मलाही. पण म्हणून सध्याच्या मुलांच्या आयुष्यात किती काहीच मजा नाही असं वाटणं चुकीचं आहे. आजही सुट्टी मिळाली की मुलांच्या चेहरा खुलतोच. अजूनही मुले आजी आबा, मामा मावशी, काका काकू यांना पाहून खुश होतातच. पाण्यात खेळायला किंवा बिल्डींगच्या खाली घोळका करून खेळायलाही मागतातच. यासर्व गोष्टी आपण मोठे झालो तरी बदलल्या नाहीयेत. शिवाय मुले ही मुलेच असणार कुठेही असो कुठल्याही पिढीची असोत. पण एकूण पुस्तके वाचन मात्र कमी वाटले मला.

फोन, tablet आणि टीव्ही या माध्यमांमुळे मुलांना वाचनाचा वेळ कमी नक्कीच झाला आहे. शिवाय त्यात बाकी सर्व शिकवण्या, क्लासेस इत्यादी असतेच. त्यामुळे मुलांना फक्त पुस्तके किंवा पेपर वाचायला मिळणारा वेळ कमी झाला आहे असे मला वाटते. मी ज्या सुट्ट्या पहिल्या त्यात बालमित्र वाचणे, गोष्टींची पुस्तके, लायब्ररी मधून जुने दिवाळी अंक आणून वाचणे हे सर्व केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्या मुलानाही वाचनाची आवड कशी लागावी किंवा ती लागण्यासाठी आपण प्रयत्न करावेत हे सर्व आमचे चालूच आहे. त्याबाबत बाकी सर्वांशी ही बोलावे अशी इच्छा होती.

मुले लहान असल्यापासून आम्ही घरी करत असलेल्या गोष्टी:

१. आधी लायब्ररीची गाडी आमच्या बिल्डींग मध्ये येत असे, तिथून तिच्या वयाला योग्य पुस्तके घेऊन यायचो. रात्री काहीही झाले तरी निदान एक का होईना पुस्तक वाचायचो.

२. मुलं लहान असताना आम्ही पुस्तकं वाचायचो आता त्यांना वाचायला लावतो.

३. रात्री झोपायच्या आधी एक तरी पुस्तकं त्यांनी वाचावं असा आग्रह करतो. आमची भांडी धुवून, आवरून होईपर्यंत त्यांचे पुस्तक वाचून होते. आणि आमच्या सोबतही थोडे वाचले जाते.

४. सध्या लायब्ररी पुन्हा सुरु केली आहे. अमेरिकेत विविध वयोगटातील मुलांच्या आवडीची अनेक पुस्तके मिळतात. त्यामुळे सध्या काय वाचावे हा प्रश्न पडत नाहीये. त्यामुळे घरात कायम काही ना काही पुस्तके आहेतच.

५. बरेचदा मुलं कंटाळा करतात वाचायला घ्यायचा, आणि टीव्हीच बघायचा हट्ट करतात. अशा वेळी आधी वाचन पूर्ण करूनच टीव्ही सुरु करण्याचा नियम सांगतो.

६. लांबच्या प्रवासाला जाताना पुस्तके घेऊनच जातो. त्यामुळे थोडासा का होईना प्रवास पुस्तके वाचून होतो. कुणाकडे राहायला जातानाही एखादे पुस्तक सोबत ठेवतो. तिथे त्यांची करमणूक होते जरा वेळ.

७. वाढदिवसाला घेतलेल्या खेळण्यासोबत एक का होईना पुस्तक नक्की गिफ्ट म्हणून घेतो.

हे सर्व करणे सोपे नाहीये तेही सध्याच्या जगात जिथे त्यांना अनेक साधने आहेत मन रमवण्यासाठी. गेल्या वर्षभरात यातील बऱ्याच गोष्टी नियमित केल्यामुळे मुलांच्या वागण्यात बराच फरक पडलेला दिसतो. बरेचदा स्वनिक सकाळी उठून पुस्तक घेऊन बसतो किंवा दुपारी झोपायच्या वेळेला वाचाण्यसाठी एखादे पुस्तक घेऊन जातो. कधी आम्ही वाचताना त्यात एखादा शब्द गाळला तर सांगतो. सान्वी शाळेत जातानाही गाडीत पुस्तक वाचत बसते. कधी तीच स्वनिकला पुस्तक वाचून दाखवते. तिला सध्या एक पुस्तक आवडत आहे जे तिने शाळेतल्या लायब्ररी मध्ये शोधले. तिथेही मिळाले नाही म्हणून वाईट वाटून घेत होती. नुकतेच ते पुस्तक मी विकत घेतले. आता त्याची पारायणे चालू आहेत.

खरंतर दोघेही अजून लहान आहेत(४ आणि ७ वर्षे) पण मला वाटते की त्यांच्या वाचनाची ही केवळ सुरुवात आहे. अजून खूप पायऱ्या ओलांडायच्या आहेत. त्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही पण माझ्या अनेक मित्र मैत्रीणीना मी सांगू शकते की याच वयात मुलांना वाचनाची सवय लावण्याचा प्रयत्न नक्की करा. त्यांना गिफ्ट म्हणून पुस्तके द्या. मी सध्या बाकी लोकांच्या मुलानाही पुस्तकेच गिफ्ट म्हणून देत आहे. या वर्षीच्या सुट्टीत मुलांना लायब्ररी लावा, नवीन गोष्टींची पुस्तके आणून द्या. कधी जबरदस्ती का होईना त्यांना वाचायला बसवा. ती वाचली की त्यात काय आहे यावर बोला. रात्री झोपायच्या आधी एखादे पुस्तक नक्की वाचायला बसवा. आणि हो तुमच्याकडे काही अजून टीप्स असतील तर इथे नक्की शेअर करा. Happy We want to build readers for sure. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख ठिक आहे. पण शीर्षक प्रचंड खटकले. वाचू आनंदे, वाचनवेड जोपासताना ह्या सारखे एखादे छान मराठी शीर्षक शोभून दिसले असते. इंग्रजी शीर्षक द्यायचेच असेल तरी building readers योग्य वाटत नाही. You don't build someone. You build things or relationships. A person develops rather here he/she becomes.. So titles like becoming a bookworm or a bibliophile, becoming avid readers, a life full of books would sound more appropriate.
मायबोलीवर वाचन छंदाविषयी बरेच धागे आहेत. वाचू आनंदे ह्या ग्रुप मध्ये सहभागी झालात की तुम्हाला सापडतील.

माझा लेक पण आवडिने पुस्तक वाचतो / चाळतो . अजुन नीट वाचता येत नाही. पण पुस्तकं आवडतात.
मोठा होउन पण अशिच टिकावी आवड यासाठी तुमचे उपाय छान आहेत.

आई वडिल किंवा दोघांपैकी एक जण जरी पुस्तकं वाचत असेल तर मुलही ती सवय उचलते. हल्ली मी आयपॅड किंवा टॅबवर जास्तं वाचन करते तर लेकही टॅबवर वाचायचंय म्हणतो.

त्याला शाळेतुन दर आठवड्याला पुस्तकं मिळतात. रोज १५/२० मिनिटे वाचन मस्ट आहे, तेवढे करुन घेते. पण जाणिवपुर्वक टॅब , आयपॅड दुर ठेवुन , पुस्तकंच वाचायची सवय मलाही लावायला हवी नव्याने.

पुस्तकंच वाचायची सवय मलाही लावायला हवी नव्याने.>> मलाही.
ही पोस्ट जुनी आहे थोडी. आता मुलाना जास्त आवड निर्माण झाली आहे. एखादे पुस्तक हट्टाने लायब्ररीच्या साईट वर जाऊन बुक करायला लावतात आणि आम्हाला घेऊन जायला सान्गतात. मुलगा (५ वर्षे) शाळेत आवडलेले पुस्तक लायब्ररीत जाऊन शोधून घेतो. आम्हीही त्याला सानग्तो की 'तूच विचारुन ये' मग तोही आता थोडा हिम्मत करुन विचारतो सर्व घेऊन आले की जेवण सोडून वाचायलाच घेतात दोघेही. मी बरेच वर्षे अशीच होते. ढिगाने पुस्तके आणून जेवण झोप सोडून वाचत बसायचे. त्यामुळे हे सर्व पाहून खूप समाधान वाटते.

कमेन्टबद्दल धन्यवाद.:)

पुस्तक हाती पडल्यावर तहान भुक झोप विसरुन वाचणारी मी मला चांगलीच लक्षात आहे..
मला मारुन मुटकुन झोपायला लावायचे आई पप्पा...पण ते पुस्तक संपवल्याशिवाय चैन पडायची नाही..
आय रिअली वॉज अ बुक ड्रॅगन Wink .. आत्ता एवढ्यात एक वाईट सवय लागलीय...अट्लिस्ट माझ्याकरीता तरी वाईट आहे.. एकसाथ ४ ५ पुस्तक वाचतेय मी..त्यामुळे ना धड इकडे लक्ष लागत ना तिकडे.. पहिले पुस्तक जे हाती असेल तेच संपवायचं हा शिरस्ता होता... हळूहळू मुळ पदावर यायचा प्रयत्न करतेय मी..
तुम्ही तुमच्या मुलांना पुस्तक वाचायची गोडी निर्माण करत आहात हे छान्च आहे...