सैराटलेले ईंग्रजी आणि झिंगाटलेले मराठी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 May, 2016 - 15:49

आजचाच किस्सा. कॉलेजगोईंग तरुण तरुणींचा एक समूह ट्रेनमधून प्रवास करत होता. म्हणजे मी आधी चढलेलो तेव्हा ट्रेन रिकामीच होती. ते पुढच्या स्टेशनला आले आणि मला घेरून टाकले. अश्यावेळी एकतर्फी बडबड ऐकायची मनाची तयारी ठेवावी लागते. तरी एखादा बोरींग ग्रूप निघाला तर फार्रच वैताग येतो. पण या ग्रूपची एक खासियत होती. ती म्हणजे त्या सहा-सात जणांमध्ये चार तर मुलीच होत्या. त्यापैकी एक सुंदर होती. दुसरी कमालीची सुंदर होती. तिसरी तर अगदी ओम शांती ओम होती. चौथीला जरा उन्नीस बीस म्हणू शकतो. अर्थात तिला जर ईतर ठिकाणी पाहिले असते तर तिच्यावरही लट्टू झालो असतो. मात्र इथे या तिघींशी तुलना झाल्याने जरा कमीच भासली. पण हा, तरीही ओवरऑल ग्रूपचा एवरेज कुठेही कमी करत नव्हती. तर थोडक्यात मी कुठल्या मोहमायाजालात फसलो होतो याची कल्पना आली असेलच..

तर सकाळची डोळ्यावर रेंगाळलेली झोप झटकली आणि कॉलर वगैरे ताठ करून सरसावून बसलो. हायफंडू पोरी असल्या की आपल्यालाही मॅचो किंवा डिसेंट दिसावे लागते हा आपला नाईलाज. पण इथेही ज्याची भिती होती तेच घडले. फाडफाड अन सुसाट, एकदम सैराट ईंग्रजी फाडू लागल्या. राष्ट्रभाषेत बोला, मातृभाषेत बोला, ती कोणती आहे ते निदान कळू तरी द्या. पण नाही. इंग्रजीशिवाय एक शब्द निघेल तोंडातून तर शप्पथ. अरे पेपर प्रेजेंटेशन करत आहात की कॅम्पस ईंटरव्यूच्या ग्रूप डिस्कशनला बसला आहात. लोकल ट्रेनमधील गप्पा तरी आपल्या भाषेत मारायचा आनंद उचला. पण नाही.

ईतक्यात सैराटचा विषय निघाला. वाह. अमराठी आणि ईंग्रजी बोलणारे लोकं सुद्धा याची चर्चा करताहेत हे बघून बरे वाटले. पण इतक्यात जुगाराच्या यंत्रातून खणखण आवाज करत नाणी पडल्यासारखे त्यांच्या तोंडून मराठी शब्द बाहेर पडू लागले. ते बघून मला स्वत:लाच धनलाभ झाल्यासारखे वाटू लागले. कारण चारपैकी ३ मुली मराठी होत्या. पण आनंद फार काळ काही टिकला नाही. कारण त्यांचे ईंग्रजी जेवढे सुसाट आणि सैराट होते तेवढेच त्यांचे मराठी झिंगाट होते. तो लगान मधील रसेल नाही का, "डूगना लगान डेना पडेगा" जसा ब्रिटीश अ‍ॅक्सेंटमध्ये बोलायचा. तसेच यांचेही मराठी यूएस अ‍ॅक्सेंटमध्ये होते. फरक ईतकाच की त्या रसेलची मातृभाषा ईंग्रजी होती तर यांची मराठी च होती. उगाचच मला संकोचल्यासारखे आणि अवघडल्यासारखे वाटू लागले. कुठे मी एमएनसीत काम करणारा पण कसेबसे मोडकेतोडके ईंग्रजी बोलून काम चालवणारा आणि कुठे हे मराठी सुद्धा उच्चभ्रू टच देत बोलणारे.

असो, पण विषय आवडीचा होता.

सैराट !

कॉलर खाली सरकली पण कान टवकारले गेले. त्यापैकी बहुतांश जणांचा चित्रपट पाहून झाल्यासारखे वाटत होते. तर ज्या एकदोन जणांनी तो पाहिला नसावा ते ईंग्रजी न्यूजपेपरमधील परीक्षण वाचून आल्यासारखे वाटत होते. कारण त्यापैकी एकाने झिंगाट गाण्याचा उल्लेख कौतुकाने ‘रिक्षावाला’ज सॉंग’ असा केला. कुठल्या रिक्षात ऐकून आलेला त्यालाच ठाऊक. कारण परवाच मी एका अमराठी मॉलमध्ये तब्बल पाऊण तास सैराटची गाणी ऐकून आलेलो.

असो, तर मायबोलीवर एवढे दिवस चालू असलेल्या सैराट चर्चेतील प्रमुख मुद्दे - म्हणजे जातीयवाद आणि बालवयातील लफडी - यांना जराही स्पर्श न करता भलत्याच गोष्टींवर त्यांची चर्चा चालू झाली. उदाहरणार्थ थोडा वेळ अंपायर बिली बौडेनवर चर्चा झाली. त्यानंतर प्रिन्स ऑफ कलकत्तावर चर्चा झाली. हैदराबाद बिर्याणीचा विषय निघाला. नशीब कसाबला मध्ये नाही आणला. आर्चीच्या बुलेटला घेत, स्लमडॉग मिलेनिअरची आठवण काढत चर्चा हळूहळू क्लायमॅक्सकडे वळली. आणि ईतक्यात आकाशवाणी व्हावी तसे एवढा वेळ शांत बसलेली मोस्ट ब्यूटीफुल गर्ल ऑफ द ग्रूप ओम शांती ओम बोलू लागली.....

स्पॉयलर अ‍ॅलर्ट .... स्पॉयलर अ‍ॅलर्ट ... स्पॉयलर अ‍ॅलर्ट ...

इथे मी तुम्हाला देतोय तरी, पण तिथे ती कोणालाही न देता बोलून गेली..

त्या डायरेक्टर (श्री नागराज मंजुळें) वर केस टाकायला हवी.. हाऊ क्र्यूएल, हाऊ इनसेन्सिटीव्ह, हाऊ रेडीक्यूलेस.. आणि बरेच काही... एवढ्या लहान मुलाकडून असला शॉट करून घेतात का?

आधी मला वाटले की बालकलाकारांकडून अभिनय करवून घेणे हे तिच्या मते चाईल्ड लेबरची केस असेल किंवा लहानग्याला भुमिकेची गरज म्हणून का होईना रडवणे तिला पसंद नसेल.

पण अगदीच तसे नव्हते. तिचे कन्सेप्ट गंडले होते. तिच्यामते शेवटच्या द्रुष्यात त्या लहान मुलाच्या समोरच त्याचे आईबाप कलाकार लाल रंगाच्या थारोळ्यात कोसळले होते. जे द्रुश्य बघून थिएटरमधील तमाम प्रेक्षकांचा थरकाप व्हावा ते द्रुश्य त्या लहान मुलाला प्रत्यक्ष दाखवले गेले... आणि तिच्या या कमालीच्या गैरसमजावर सारे जण माना डोलवू लागले तसे मग मला राहवले नाही आणि मी चर्चेत उतरलो..

अर्थातच मराठीत,

"अगं ए, तसं नसतं ते. दोन वेगळे शॉट चित्रित केले जातात. तुला ते सारे एकाच फ्रेममध्ये दिसले का.. नाही ना.. कारण लहान मुलाचा शॉट घेताना तिथे त्याच्यासमोर जमिनीवर तसले काही पडले नव्हते. म्हणून तर तो त्याच्या आईबापाजवळ घुटमळताना दाखवला नाही. त्यामुळे तू आधी केस मागे घे..."

स्पॉयलर अ‍ॅलर्ट ... संपला .. संपला .. संपला..

मी तिला नागराज मंजुळेंवरची केस मागे घ्यायला सांगितली होते. तिला वेगळा अर्थ लागला...
पण केस मागे घेतानाही कमालीची सुंदर भासली.

मग काय, आता सैराट सुटायची पाळी माझी होती. "सैराट बघायची दहा कारणे" - या माझ्याच लेखातील सात-आठ मुद्दे (जे मी स्वत:चा प्रत्येक लेख कौतुकाने दहा-बारा वेळा वाचत असल्याने) तोंडपाठ होते ते घडाघडा ओकलो. मग मायबोलीवर आलेल्या दोनतीन परीक्षणांमधील काही कौतुकाचे तर काही टिकेचे मुद्दे रटले. संगीत, पार्श्वसंगीत, कॅमेरावर्क, डायरेक्शन या तांत्रिक बाबींसोबत सामाजिक संदेश आणि चित्रपटांचा जनमाणसांवर होणार्‍या परिणामांबद्दल, नेहमीच्या व्हॉटस्सप मेसेजपेक्षा काहीतरी वेगळे आणि स्वत:चे असे बोलल्याने त्या सर्वांना मी अचानक मायबॉलीवूडचा हर्षा भोगले वाटायला लागलो.

माझे विमान छान भरारी घेतच होते, पण माझे स्टेशन आल्याने मला एमर्जन्सी लॅंडींग करावी लागली. तरी निघता निघता क्रमांक दोन आणि तीनच्या सुंदर मुलींनी माझ्याकडे कौतुकाने पाहिले. आणि ईंग्रजी भाषा येत असेल तर त्या भाषेतील ज्ञान तेवढे मिळवता येते, पण अक्कल मात्र उपजतच असावी लागते या आनंदात मी ट्रेनमधून उतरलो Happy

- कुऋ

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुळलेली केमिस्ट्री आधी पाणी असते. .... लग्नानंतर सल्फ्युरिक अॅसीड होते.
...
नक्कीच ..आणि हे अॅसीड ईतरांची जळवते Happy

फारच मस्त प्रसंग.मी देखील जरा सावरून बसतो अशावेळी तर इतर तरूणांचं काय होत असेल ते तू छान मांडलंस आणि मायबोलीवर लिहिणाय्रांचं वय आटोक्यात ठेवतोस.

अय्या आणि तुला टाटाएंडकडून छानसं टक्कलही आहे?

जुळलेली केमिस्ट्री>>>> बरं बरं.
ते ना बाह्य सौंदर्य ना मनाचा चांगुलपणा असं म्हटल्यावर जरा कम्फुज झालं. आणि वर तिच्यात जे काही आहे ते दुसर्‍या कुठल्याही मुलीत नाही म्हण्ल्यावर म्हटलं असं काये ते तरी विचारावं.
बाकी प्रेमात पडल्यावर सगळ्यांना असंच वाटतं की उसमे जो बात है वि किसी औरमे नही. पण ह्याचं कारण तु म्हणल्याप्रमाणे जुळलेली केमिस्ट्रीच असतं नैतर तो / ती दोघेही चारचौघांप्रमाणे सामन्यच असतात. पण प्रेमात स्पेशल वाटु लागतात.

हा लेख आवडला.खूप साधी गोष्ट उलगडून दाखवली.हा सीन मी पाहिला होता पण 'हे कसं शूट केलं असेल' हा मुद्दा डोक्यात आला नव्हता.तू म्हणतोस तसंच असेल तर त्या गोडुल्याचं आईबाबांना स्पर्श केलेलं न दाखवणं,त्याचं फिरणं, रडणं सगळंच बरोबर आहे.इतक्या लहान मुलांना 'तू हे कर' सांगण्याइअवजी दिवस भर नजर ठेवून तो पाहिजे तसे भाव आणत असेल तेव्हा शूट करत असतील.

सस्मित, तेरे जैसा कोई और नही वाटणे ही प्रेमाची धुंदी असते. सुरुवातीला आपण चोवीस तास याच धुंदीत वावरत असल्याने सारे काही ठीक चालते. मग रूटीन दैनंदिन आयुष्य सुरू झाले की केमिस्ट्री वर्क करते. तुझ्यासारखी या जगात दुसरी कोणीच नाही ऐवजी माझ्यासारख्या मुलासाठी तुझ्यासारखी दुसरी मिळणार नाही असे वाटू लागणे म्हणजे जुळलेली केमिस्ट्री.

एक हाच किंवा हिच आहे जी आपल्याला झेलते असे जेव्हा दोघांनाही वाटते तिथे ते नाते अमर होऊन जाते Happy

मी अनू,
होय. दिवसभर नजर ठेवून किंवा अपेक्षित भाव यावेत अशी परिस्थिती निर्माण करून मुलाला फ्री सोडत असणार. अर्थात हा मुलगा तर याला काही सांगावे आणि याने ते समजावे यापेक्षा लहानच होता पण थोडे मोठे असलेल्या मुलांचेही नैसर्गिक भाव टिपायला क्लृप्त्या वापरत असावेत.
इथे प्रतिसादात एका विडिओची लिंक आली आहे. तांत्रिक कारणाने मी बघू शकत नाही. आपण बघा..

Srd, ओके.. तश्या अर्थाने होय.. बाकी मॅच्युअरड आणि डिसेंट लोकांना टक्कलही छान दिसते हे वैयक्तिक मत.
माझे केस घनदाट असल्याने मी याच्या नेमका उलट आहे ही त्याची सिद्धता.

मी तिला नागराज मंजुळेंवरची केस मागे घ्यायला सांगितली होते. तिला वेगळा अर्थ लागला...
पण केस मागे घेतानाही कमालीची सुंदर भासली.>> Happy

मस्त लिहिले आहे Happy

लग्न कधी आहे तुझे बादवे? आम्हाला बोलाव Happy अहेर आणि आंदण घेऊन येऊ Happy

प्रत्यक्ष जीवनात एक बायको, ड्युआयडीस एक गर्लफ्रेण्ड असताना सुंदर मुलींकडे पाहणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे काय ?

मायबोलीवरचा एक परिसंवाद आणि त्यावरचा एक पोल.

अरे फारेण्ड, ओम शांती ओम म्हणजे दिपिका पदुकोन नाही..
शाहरूखही नाही..
तर,
किसी जुबा मे भी
वोह लब्ज ही नही
के जिनमे तुम हो क्या तुमे बता सकू

मै अगर कहू
तुमसा हसी
कायनात मे
नही है कोई
तारीफ ये भी तो
सह है कुच भी नही...

या भावना थोडक्यात मांडायला ओम शांती ओम हा परवलीचा शब्द वापरला Happy

......... सुंदर मुलींकडे पाहणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे काय ?
>>>>>>>>>

सुंदर मुलीच मुली असतात का, ईतर मुली मुली नसतात?
सुंदर मुलींकडेच बघायचे की नाही हा प्रश्न आहे का, ईतर मुलींकडे बघा नका बघू काही फरक पडत नाही असे आहे का?
यात सुंदर हा शब्द वापरण्याचे नेमके प्रयोजन काय ही शंका क्लीअर करा, धागा मी स्वता काढतो Happy

कापोचे, बाकी आठ शब्दांचे अर्थ लागले पण एक शब्द उरलेल्या आठ शब्दांनी बनलेल्या वाक्याचा अर्थ पलटवू शकतो Happy

अतुल, धन्यवाद Happy

सैराट-पुरुषसत्ताक स्त्रीदास्य मानसिकता उदवस्त करनारा किंवा सैराट रक्ताळलेली पावल अंर्तमुख करायला लावनारा -- श्रीमंत कोकाटे
किमान महाराष्ट्राच सामाजीक आणी सांस्कृतीक जिवन आज सैराटमय झालेल आहे .सोशल मिडीयावर तर सैराट, परशा,, आर्ची आणि झिंगाटचीच चर्चा आहे .सैराटने महाराष्ट्रातुन मोदी आणी कन्हैयाची हवाच काढुन टाकली आहे. मोबाईल तर सैराटमय झालेले आहेत. मराठी चित्रपटांना मिळालेली प्रसिध्दी हिंदी आणि दक्षीनात्य चित्रपटांना अवाक् करायला लावनारी आहे.
पुणेरी नव्हे तर गावाकडचा सिनेमा, नाकातुन बोलण्यापेक्षा तोंडातुन आईची (मातृभाषा) भाषा बोलनारे मातीतले कलाकार,, हे चित्रपटाचे खास वैशिष्टच आहे. चित्रपटातले कलाकार हे प्रमाण भाषा बोलनारे पांढरे शुभ्र., तुपकटच आसले पाहिजेत याला बहुतांशी छेद देनारा सैराट आहे. अभिनय म्हणजे केवळ हात पाय तोंड वाकडे करुन हँ हँ हँ करने नव्हे, तर एखाद पात्र सहज करणे म्हणजे अभिनय हे सैराटमधुन स्पष्ट होते,. केवळ आरडा ओरडा खँ खँ खँ हसने म्हणजे अभिनय नव्हे, ओढुन तानुन पात्र सादर करणे म्हणजे अभिनय नव्हे,. तर सहज बोलणे, सहज चालणे, सहज हसणे, सहज चिडणे, अकृत्रीमता हेच सैराटचे वेगळेपण आहे.परशा, आर्ची, प्रदीप आणि सलीम यांच्या भुमिका या सहज आणी अकृत्रीम आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना जवळच्या वाटतात.
सैराट मधील भाषा ही अस्सल आपली मराठी भाषा आहे. आजची लोकभाषा नागराज यांनी सैराट मध्ये आणलेली आहे. भाषा ही सदाशिव पेठीच (ब्राम्हणी) असली पाहीजे याला सैराटने छेद दिलेला आहे. या पुर्वीच्या चित्रपटात जरी काही गावरान शब्द असले तरी त्या मधील कलाकार शहरी होते. कृत्रीमता सैराट मध्ये नाही. उदा. कडुमुडद्या, झकमारली, उपट्या, आळपान, गधाळ, नरसाळ्या, लका, खवट इ.शब्द सैराट मध्ये कृत्रीम वाटत नाहीत, तर सहज वाटतात, ज्या प्रमाणे नेमाडे म्हटल्याप्रमाणे जनमानसाची मराठी प्रथमत: म. फुले यांनी मराठी साहीत्यात आणली. काही प्रमाणात अलीकडच्या काळात जनमाणसाची मराठी सैराटनी चित्रपटात आणली.
कलाकार हे गोरेपाण सरळ नाकाचे, प्रमाणभुत भाषेत बोलनारे असावेत, हे ब्राम्हणी निकष आहेत, अपवाद वगळता सैराटने अब्राम्हणी सौंदर्य शास्त्रााचे निकष आणले आहेत. भारतीय परीप्रेक्ष्यात चित्रपटाची वाटचाल कशी असायला हवी, हे काही प्रमाणात दक्षिनात्य चित्रपटात आसले तरी आता ते सैराटने महाराष्ट्रात आणले आहे.
सैराट मधील चित्रीकरणात गाव, शेत, विहीर, धरण, कॉलेज, रेल्वे स्टँड, घराची रचणा, हैद्राबाद मधील घर तेथील जिवन यामध्ये प्रचंड जिवंतपणा आहे.प्रेक्षकांना आपन येथेच कोठेतरी आहोत हे आपल्याशी संबंधित आहे असेच वाटते.
अत्यंत संवेदनशील बाब म्हणजे आर्ची आणी परशाचे प्रेम! प्रेम ही आशी बाब आहे की त्याला जात, धर्म,, पंथ, प्रांत, भाषा आणी देश याचे बंधन नसते. प्रेम हा मानवाचा कींबहुना सजिवांचा स्थायीभाव आसतो. सिग्मंड फ्राईड नावाचा नामवंत मानसशास्रन्य म्हणतो की वय वर्ष १२ त १८ हा मुला मलींच्या जिवनातील भाव भावनांचा वादळी काळ असतो. पण प्रेमाचा आणी आहाराचा संबंध जात -धर्माशी लावल्यामुळे जगभरात अनेक वादंग निर्माण झालेले आहेत-. भारतात ते अधिक प्रमाणात आहेत. गावगाड्यात मुलामुलिंचे कधी एक तर्फी तर कधी दुतर्फी प्रेम प्रकरणे होतात, पण सामाजीक दबाव, कौटुंबिक दबाव आणि दमन या मुळे बदडणे, दडपणे अशी प्रकरणे असंख्य आहेत.
परशाच्या स्वप्नात आर्ची येणे, हा तर प्रेमात मनाचा स्थायीभावच आहे. फ्राईड म्हणतो की मनाच्या विवेकावस्था, बोधावस्था आणी सुप्तावस्था अशा तिन अवस्था असतात. जागेपणी मनावर विवेकावस्थेचे अधिराज्य असल्याने इच्छांचे दमन केले जाते. पण झोपल्यानंतर विवेकावस्थेचे राज्य संपते आणी सुप्तावस्थेचे राज्य मनावर सुरु होते. मग गावगावड्यातील आर्चीच काय प्रत्यक्ष कधी न पाहीलेल्या ,बोललेल्या करीना, कँतरीना, सोनम देखील स्वप्नात येतात. स्वप्नांची चिकीत्सा करणारा 'स्वप्नमिमांसा' नावाचा ग्रंथ फ्राईडने लिहलेला आहे.
*सैराट आणी मुस्लीम-
हिदू महासभा आणी राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या स्थापने पासुन शेतकरी जातीत विशेषत: गावगाड्यातील बलुतेदारात मुस्लीमद्वेश ठासुन भरला जात आहे. त्यासाठी इतिहासाची मोठ्याप्रमाणत मोडतोड करण्यात आलेली आहे. आर एस एस चे अनेक प्रच्यारक बहुजनांत मुस्लीमद्वेश पेरतात ,अशा पाश्वभुमिवर सैराटने सलिम आणी शाहीद यांची पात्र अत्यंत महत्वपुर्ण पध्दतीने मांडलेली आहेत .जिवाला जिव देणारा सलिम आहे. त्याची आई बांगड्या वालीभाभी म्हणजे सर्वांना बांगड्या- चुडा देणारी गावगाड्यातील अविभाज्य घटक आहे .गावगाड्यात मुस्लीमा बद्दल परकेपणाची भावना कधीही नव्हती. पण ब्राम्हणी संघटनांनी वातावरण कलुशीत केलेले आहे. त्याला शह देण्याचे काम सैराटने केलेले आहे. जेव्हा आर्ची, परशा, सलीम आणि प्रदीप (लंगड्या)पळुन शाहीद कडे जातात, तेव्हा तो प्रेम आणी वास्तव याची कल्पणा त्यांना देतो. सबुरीचा सल्ला देतो आणी मी तुमचा विश्वासघात करनार नाही पण माझे ऐका, असे कळकळीने सांगतो. या वरुन मुस्लीम हे विश्वासघातकी नाहीत तर विश्वासु आहेत, हे सैराटने रेखाटलेले आहे, तसेच गावगाड्यातील मुस्लीमांची आर्थीक स्थिती, सामाजिक स्थिती त्यांची उदरनिर्वाहची घडपड, त्यांचे रहाणीमान, त्यांच्या घरांची स्थिती हे देखील सैराटने नकळत चित्रीत केलेले आहे.
*सैराट मधील स्रीवाद-
स्री ही आई, वडील, भाऊ, पती, मुलगा आणी समाज यांच्या अंकीत /नियंत्रणात आसली पाहीजे, तीने आपल्या भावना व्यक्त करणे म्हणजे अधर्म ,असंस्कृतपणा -उर्मटपणा! तीने नाकासमोर पाहून चालणे, चाकोरीतीलच कामे करणे हे आहेत ब्राम्हणी निकष. स्रि ही गुलामच आसली पाहीजे, आसे ब्राम्हणी धर्मान सांगीतलेले पण जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्यातन्य कॉ.शरद पाटील म्हणतात की सिंध्दू पुर्व काळात स्रिसत्ताक-मातृसत्ताक राज्यव्यवस्था होती .आर्यआक्रमनानंतरच ब्राम्हणीपुरुषसत्ताकस्रिदास्य व्यवस्था आपल्याकडे आली, की जी मोडण्यासाठी महावीर -बुध्दाने प्रयत्न केले .
नागराज यांच्या सैराट मध्ये स्रियांची पात्र अत्यंत प्रभावी पणे मांडलेली आहेत. क्रीकेट च्या मैदानावर हातात काठी घेऊन आपल्या मुलाला पिटळणारी सगुणा आत्या ! पारंपारीक मराठी चित्रपटांऩी आत्या ही कजागज दाखवलेलील आहेे .पण सैराट मधील आत्याचे नावच सगुना आसे सकारात्मक आहे.
आर्चीची खिलाडू वृत्ती, तीचा सहजपणा, तिची भाषा, तिने बुलेट चालविणे, ट्रँक्ट्रर चालविणे, सरांणा मारल्या बद्दल भावाला खडसावणे, मंगेशला दमबाजी करणे, गुटखा खाऊ नका ,आसे मुलांना सांगणे ,पोलीस स्टेशन मधील निर्भीडपणा ,परशाला दिलेली साथ ,हैद्राबादला जाऊन दाखवलेली हींमत ,कष्ट करण्याची तयारी ,प्रतिकुल परिस्थिती लढाऊ वृत्ती ,पतीच्या बरोबरीने काम करण्याची तयारी ,पतीला मागे बसवुन स्वत्ता चालवलेली गाडी ,या बाबी स्रियांचा सनमान करणार्या आहेत .
पारंपारिक चित्रपटातील रडणारी आणी मंदीरात जाऊन नवस बोलनारी आर्ची नाही .आता प्रश्न येतो आर्चीने प्रेमाची सुरवात कशी काय केली?प्रेमाची सुरवात पुरुषांनीच करणे हा सुध्दा पुरुषसत्ताकस्रिदास्य मानसिंकतेचाच नियम आहे .हैद्राबाद शहरातुन आर्ची स्वता गाडी चालविते आणी परशा मागे बाळाला घेऊन बसलेला आहे ,ही बाब स्रियांचा सन्मान करणारी आहे, स्रियांचा,/ मुलिंचा अपमान करणारी नाही.
बड्या घराण्यातील स्रियांचे घुसमट कशा प्रकारे होते ही आर्चीच्या आई वरुन लक्षत येते तीची घालमेल याठीकाणी दाखवलेली आहे परशाच्या आईच्या चेहर्यावरील भाव तीचा साधेपणा भाबडेपणा अप्रुप कष्टाळु वृत्ती अत्यंत प्रभावी पणे मांडलेली आहे.
आर्ची परशा हैद्राबादला गेल्या नंतर त्या ठीकाणी आधार देणारी मावशी अत्यंत हीम्मतवान दाखवलेली आहे पती परागंदा झाल्यानंतर नाउमेद न होता प्रतिकुल परिस्थीतीला हींमतीने तोंड देते कष्ट करुन मुलांना शिकवते आर्ची परशाला गुंडाच्या तावडीतुन वाचवते हातात दांडक घेऊन पुरुष गुंडाना पळवुन लावते त्यातुन स्रि ही पलायन वादी नाही तर हिंमतवादी आहे हे सैराटने प्रभावी पणे मांडले आहे आर्ची परशाला आधार देते आधार देणार्या केवळ पुरुषच आसतो आसे नाही तर स्रि देखील आसते हे नागराजने उत्तम प्रकारे मांडले आहे प्रेम विवाहाचा मार्ग सोपा नसतो तर खडतर आसतो तो पार करण्याची तयारी ठेवली पाहीजे हे देखील सैराटने उत्यंय प्रभावीपणे दाखवितो.
सैराट मधील आभिनेता अभिनेत्री पारंपारीक चित्रपटाप्रमाणे अडचणीत असताना भटजी किंवा देवालयात जात नाहीत कोठेही देव मंदीर भटजी जप तप तंत्र मंत्र दाखललेली नाही टाईमपास मधील दगडु देखील म्हऩतो की आई बाप आणी साई बाबा सैराट मध्ये मात्र बुवा बापु अम्मा टम्मा यांना थारा नाही
*सास्कृतिक दहशत वाद --
एका बाजुला प्रेम विवाह करणार्या आर्ची परशाला पळुन जावे लागते तर दुसर्या बाजुला ब्राम्हण वादी संघटना व्हलेंटाईन डे साजरा करणार्यांच्या मित्र मैत्रीनींना बळ जबरीने विवाह करायला भाग पाडतात हे न कळत सैराट मध्ये दाखविलेले आहे कोणी काय खावे काय प्यावे काय बोलावे कोणता ड्रेस घालावा कोणा बरोबर लग्न करावे हे ठरविणे हा अभिव्यक्ती स्वातंत्रावरिल हल्ला आहे हे देखिल सैराट ने ओझरते दर्शण घडवले आहे
*भाषिक अनुबंध -----
आता पर्यंत पारंपारीक चित्रपटातील बहुतांश ( मराठी-हिंदी)नायक नायिका पुणे मुंबईला पळुन जातात आसे दाखले गेले सैराट मधील आर्ची परशा हैद्राबादला जातात तेथे राहतात तेलगु भाषा शिकतात यातुन मराठी जणानध्ये दक्षीणात्य भाषाबद्दल आपुलकी निर्माण होईल महर्षि वि.रा.शिंदे यांनी देखील मराठी भाषेचा अनुबंध उत्तरे कडील भाषांशी नसुन कन्नड भाषेशी आहे या बाबत प्रदीर्घ थेसीस लिहलेला आहे नागराज यांना मराठी भाषा अनुबंध दक्षीणात्यांशी दाखवायचा आहे काय?
*आता चित्रपटांच्या अत्यंत समवेदन शिल भाग म्हणजे पाटलाच्या मुलीने बलुते दाराबरोबर प्रेम विवाह करणे की बाब काही नविन नाही महाराष्ट्राच्या इतिहासात समता वादा़चा पाया संत नानदेव चक्रधर संत तुकाराम छ. शिवाजमहाराज फुले शाहु आंबेडकरांनी घातला कॉ. शरद पाटील म्हणतात शिवरायांचे संभाजी राजेंचा खरे मोठे पणा त्यांच्या समतावादी जात्यन्तक शाक्त हौतात्म्यात आहे शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक करुन विषमते विरुध्द लढाई सुरु केली शाक्त संस्कार संप्पने भेदाभेद न कारयते असे शाक्तांचे सुत्र आहे शाक्त संस्कार संपन्न व्यक्ती खाजगी आणी सार्वजणीक जिवनात भेदाभेद पाळत नसते हे नागराज यांना जात वास्तव मांडताना शिवरायांचा संदर्भ न कळत मांडता आले आसते (काऱण त्यांनी बुलेटला शिवरायांचा झेंडा त्यांच्या पाठीमागे राज्याभिषेकाची प्रतीमा आणी लायब्ररीतील शिव चरीत्र हाताळणे हे प्रसंग दाखवलेले आहेत )शाहु महाराजांनी आपली बहीण इंदुरच्या होळकर या धनगर राज्याला दिलेली होती (प्रेम विवाह नव्हे नियोजित विवाह)त्याचा ही उल्लेख करता आला आसता
पण नागराज यांनी सैराट च्या निमित्ताने जात वास्तवाला हात घातलेला आहे अशा घटना अनेक ठीकाणी घडलेल्या आहेत (त्याची मोठी यादी देता येईल) पण नागराज यांनी जातीय तेढ की जात्यन्तकाच्या मार्गाने जायचे आहे ? हे ठरवावे लागेल आपल्याकडे जाती व्यवस्थेच्या प्रश्नाबाबत परिणामावर चर्चा केली जाते पण कारणमिमांसा शोधली जात नाही आपल्या देशात जातीव्यवस्था आहे ऑनरकिलिंगच्या घटणा अनेक घडतात यातुन मार्ग काढण्याचा उपाय कलाकृतीच्या माध्यमातुन नागराज यांना द्यावा लागेल हा प्रश्न आर्ध्यावर सोडता येणार नाही या बाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१६ साली लिहलेला caste in india या ग्रथात चर्चा केलेली आहे विशेषत: त्याच्या Annihilation of caste या ग्रथात डॉ आंबेडकर सांगतात अस्पृश्यतेचे मुळ जाती व्यवस्थेत आहे जातिव्यवस्थेचे मुळ वर्णव्यवस्थेत आहे आणि वर्ण व्यवस्थेचे मुळ धर्म व्यवस्थेत आर्थात ब्राम्हणी धर्मव्यवस्थेत आहे ब्राम्हणी धर्मव्यवस्थेचा पगडा केवळ आर्चीच्या वडील भावातच नाही तर तो परशाच्या वडील भावा बंधात देखिल आहे ब्राम्हणी धर्म व्यवस्थेमध्ये अडकलेल्या ब्राम्हणी प्रबोदनावर अवलंबुन आसलेल्या शेतकरी जाती कडुन (मराठा,माळी,धनगर,वंजारी,आग्री,लेवापाटील,सुतार,कुंभार,नाव्ही,शिंपी,जाठ,पटेल,यादव,कुर्मी,इ.)क्रांतीची आपेक्षा करणे आन्याायकारक ठरेल प्रबोदन न करता जात्यन्त होणार कसा हे डॉ आंबेडकरांनी अचुक हेरले होते ते त्यांनी जातीनिर्मुलन या पुस्ककात मांडलेले आहे पाटील जातीचे लोक (मराठा,धनगर,माळी,आग्री,वंजारी,लेवापाटील इ.)यांचा परीपेक्ष जागतीक नसुन गावगाड्यातील आहे अब्राम्हणी प्रबोधनापासुन तो कोसो मैल दुर आहे उदरनिर्वाहाची साधन गावगाड्यातील शेतीशी संबधीत आहे ही बंधन ब्राम्हण उच्चभ्रु शेतकरी नवबौध्द यांनी तोडली त्यांना जागतीक परीप्रेक्ष्य द्यानाचेभाडार आणी अर्थ व्यवस्था गावगाड्या बाहेरची मिळाली त्या मुळे ना.शरद पवार अँड.प्रकाश अांबेडकर,विलासराव देशमुख,मदनभाऊ पाटील,सुनिल देशमुख,रामराजे निबाळकर,यशवंतराव गडाख-पाटील,विजयसिंह मोहीते पाटील इ.यांच्या कुटुंबात अंतर जातीय अंतरधर्मिय विवाह सहज झाले/होतात.
नागराज यानी अत्यंत महत्वाचा प्रश्नाला हात घातलेला आहे.पण प्रबोधना शिवाय परीवर्तन अश्यक्य आहे आज तर असंख्य ब्राम्हण वादी संघटना/माध्यम शेतकरी वर्गाचे कुप्रबोधन करत आहेत नागराज केवळ फांद्या तोडुन विषारी झाड मरनार नाही विषारी ब्राम्हणी व्यवस्था मोडायची आसेल तर मुळावरच घाव घालावा लागेल ती क्षमता नागराज यांच्यात आहे पण केवळ पाटलांना शत्रु समजले तर विषमता वादी व्यवस्था आधीकच बळकट होइल पाटलांन बाबत इतकेही नकारात्मक मांडणी वस्तुस्थीतीला धरुन होनार नाही कारण क्रांतासिंह नाना पाटील कर्मवीर भाऊराव पाटील उत्तमराव पाटील इ़़.गावगाड्यातील बहुजनांन साठी कष्ट खालेल्या आहेत आलिकडच्या काळात अनेक पाटलांकडे अंतर जातीविवाह होत आहेत पण केवळ पाटलींना आरोपिच्या पिंजर्यात उभे करने म्हणजे सामाजीक प्रबोधना पेक्षा या मागील काही राजकारण आहे काय?
विवाह संबंधात caste आणी class यांचा विचार केला जातो स्वजातीय गरीबाशी देखील विवाह अपवादीनेच होतात फुले शाहु आंबेडकरांच्या विश्लेषनानुसार ब्राम्हणी व्यवस्था ही समते पुढची अडचन आहे या बाबत सर्वांना अतर्मुख व्हायला हवे
सैराटच्या समारोप प्रसंगी बाळाचे रक्तान माखलेली पावल सांगतात की विषमतावादी व्यवस्था मोडुन समतेचा मार्ग स्विकारा या रक्ताने माखलेल्या पावलांचा आपण सर्वानी विचार करावा ही विनंती.

आपला विश्वासू
!!श्रीमंत कोकाटे !!

Pages