लोटला अनंत काळ ओलसर जखम तरी (तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 11 May, 2016 - 05:23

योजले उपाय लाख लिंंपले मलम तरी
लोटला अनंत काळ ओलसर जखम तरी

तू मला नि मी तुला अखेर भेटलो कसे ?
घात होत राहतात पाळले नियम तरी

भोवती अनेक रंग पोत वेगवेगळे
नेसते तुझेच दुःख भरजरी-तलम तरी

काळजातुनी खुशाल हद्दपार कर मला
पालवी नवी फुटेल छाटले कलम तरी

वेड लावतो मला तिच्यातला तुझेपणा
यातनेस कवळतेय दाटते शरम तरी

मैफलीतल्या स्वरांत प्राण फुंकतोस तू
ज्यात मी ठरेन वर्ज्य....गाठशील सम तरी !

माणसास माणसे हवीच ना सभोवती ?
विस्कटेल ताळतंत्र बसवलास जम तरी

ठरवते कितीकदा तुझ्याविना जगायचे
तथ्य कोणते न त्यात कोणता न दम तरी

जन्म घेतल्याक्षणीच लग्न लागते तुझे
हात देत जीवनास म्हण बळेच मम तरी

अधिर होउनी तुझ्या कलेवरास चुंबिले
संपले जिवंत श्वास संपले न भ्रम तरी

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भोवती अनेक रंग पोत वेगवेगळे
नेसते तुझेच दुःख भरजरी-तलम तरी

>>

खास स्त्रीत्वाचा स्पर्श असलेला शेर.. खूप आवडला !

वाह! सुताई अफाट आहे गझल. मला खूप आवडला अर्थ.
इतका अभाळाइतका अर्थ दोन ओळित सामावून लिहिणं, प्रचंड सामर्थ्य.

भारी ..

दक्षिणा !

एखाद्या लहान मुलाच्या निरागस हास्यात जे सौंदर्य जाणवते ना तशी गझलियत आहे तुझ्या प्रतिक्रियेत !

धन्यवाद सखे !

डॉक थेंक्स...सुन्दर जमिन कसायला दिल्याबद्दल !

वैभव, शशांक आभार !

सुप्रिया