काळजातली तुझीच मूर्ती चिरते आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 May, 2016 - 04:13

दुखऱ्या जखमेवरची खपली निघते आहे
औषध काळाचे कुचकामी ठरते आहे

कटाक्ष त्याचा जणू असावा गंधित फाया
दुरूनसुध्दा अंतरंग दरवळते आहे

खुशाल देते स्वतःस झोकुन भोवऱ्यामधे
आणिक म्हणते भवती दुनिया फिरते आहे

चंद्र भामटा लांबुन बघतो नुसत्या गमजा
किरणांनीही कळी कळी मोहरते आहे

केवळ ऋतुचक्राचा महिमा अगम्य नाही
नात्याचेही रंगरूप पालटते आहे

आला धावत सूर्य विचारित मावळतीचा
कातरवेळी प्रवासास का निघते आहे ?

घाव घणाचे घाल हवे तर दगडावरती
काळजातली तुझीच मूर्ती चिरते आहे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन ओळी सरळ वाचल्या तर एक वाक्य ठरेल अश्या प्रकारचे शेर टाळले जायला हवेत असे माझे मत आहे. शेरांमध्ये वजन निर्माण होईपर्यंत गझल गझलकाराने आपल्याजवळ ठेवावी. अनेकदा आपलेच शेर आपल्याला नंतर भावत नाहीत असा अनुभव येऊ शकतो. हे सगळे मी परखडपणे लिहीत आहे. क्षमस्व!

धन्यवाद बेफीजी,

विचार करते मात्र या गझलेतील तसे शेर आपण सांगितलेत तर सुधारणा घडवून आणन्यास दिशा मिळेल !

आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाच्या अपेक्षेत..

सुप्रिया !

त्या शेराँवर काम करते आणि पुढील गझलेत अशी त्रुटी राहणार नाही हे पाहते !

अनेकानेक धन्यवाद !

सुप्रिया.

जमिन बदलून यथाशक्ती गझलेत सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करते जमला असावा !

धन्यवाद !

घाव घणाचे घाल हवे तर दगडावरती
काळजातली तुझीच मूर्ती चिरते आहे

ही द्विपदी खूप आवडली.
पण 'मूर्ती चिरणे' आणि घण हे काही जुळत नाही.
असो. पण ह्या द्विपदीमागचा विचार खूप आवडला आहे.

मी ढापणार!
Happy

>>>घाव घणाचे घाल हवे तर दगडावरती
काळजातली तुझीच मूर्ती चिरते आहे>>>सुरेख शेर!छान गझल!

>>>'मूर्ती चिरणे' आणि घण हे काही जुळत नाही.>>>माझ्या काळजाला दगड समजून नित्य प्रहार करतोस तर करत रहा...पण त्या दगडात,मी तुझीच मूर्ती जपली होती! ती तुझ्याच घावांनी आता चिरते आहे!
(या दगडी काळजातुन नक्षीदार मुर्ती घडवणारा मूर्तीकार,अशीच त्याची मूर्ती/प्रतिमा/ओळख जपली असावी! त्या प्रतिमेला तो स्वतःच आता तडा घालतो आहे!)