प्रत्येक लक्षुमीची होईल एक झाशी ...

Submitted by बाळ पाटील on 5 May, 2016 - 02:19

दुष्काळ रोज आहे घेणार काय फाशी
आता करा गडयानो उलटी घडी सवाशी

आहे तसा बळीचा मुद्दा जरी कळीचा
उठली कधी कुणाच्या नाकावरील माशी

जो पोसतो जगाला तो राहीला उपाशी
गेला बळी बळी तर करणार काय काशी

गेले बळी तयांची विसरू नका कहाणी
प्रत्येक लक्षुमीची होईल एक झाशी

उलटाच न्याय आहे शापीत यंत्रणेचा
खातो कुणी तुपाशी , मरतो कुणी उपाशी

हा कास्तकार माझा मातीत राबलेला
जमले कधी न त्याला कातावणे नभाशी
-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टायलिश !! छान वाटले वाचून
ही वाचून मुटे सरांची आठवण होते हे खरे

जबरदस्त गझल!
अभिनंदन बाळ पाटिलजी!

अवांतर— एक-एक गांव,तिथल्या-तिथल्या लक्ष्मीसाठी झाशी होईल...असे म्हणायचे असावे!

सत्यजित,

होय! ते नंतर लक्षात आले आणि माझ्याच प्रतिसादाचे मला हसू आले. पण आता दोन ओळींच्या राबत्याचा प्रश्न मनात आला. असो.

अवांतर— एक-एक गांव,तिथल्या-तिथल्या लक्ष्मीसाठी झाशी होईल...असे म्हणायचे असावे! >>>>>>

.................. सत्यजीतजी, नेमके तसेच काही ! ...... किम्बहुना त्याहुन अधिक !!

ही वाचून मुटे सरांची आठवण होते हे खरे >>>>>...
............... वैभवजी ! काशी हा शब्द मी माझ्या एका कवीतेत यापुर्वी असाच हाताळला होता ...........

असेल हिम्मत तुझ्या अन्तरी हो मग सीता वनवासी
मथुरा, प्रयाग, कन्याकुमरी माझ्यासंगे कर काशी
(वेंधळा)

............ आता सध्याच्या रचनेत तो शब्द ( मी स्वतः शेतकर्‍याचा पोर असल्याने भलेही उच्च विद्याविभुषीत वगैरे असलो तरी कधी कधी काळानुरुप अवकातीवर यावे लागते ) मी अनुभवलेल्या सद्यस्थितीची उद्वीग्नता अधोरेखीत करतो, तरीही मर्यादेचे बांध ओलांडतो असे जाणवले नसल्याने उपयोगात आणला.

पण आता दोन ओळींच्या राबत्याचा प्रश्न मनात आला. असो. ............>>>>>
......... बेफिकीरजी, धन्यवाद !
गेले बळी तयांची विसरू नका कहाणी
प्रत्येक लक्षुमीची होईल एक झाशी
............. वरची ओळ माझ्या भावनेनुसार एक सज्जड दम भरते आहे, तसे न झाल्यास कदाचित उद्या ...... झाशी !
............. तरीही योग्य ,अयोग्य सुचवाल !

आज वाचली. स्वाभाविक आहे कारण बर्‍याच दिवसांनी माबोवर आलो.

एक उत्कृष्ट गझल. सर्वच शेर अप्रतिम आहेत. पण

दुष्काळ रोज आहे घेणार काय फाशी
आता करा गडयानो उलटी घडी सवाशी

हा कास्तकार माझा मातीत राबलेला
जमले कधी न त्याला कातावणे नभाशी

हे दोन शेर फारच भावलेत. इतके सहजसुंदर आणि प्रभावी शेर मला कधिही लिहिता आले नाहीत,

बाळ पाटलांना सलाम!

महेशजी, वैवकुजी माझी आठवण काढल्याबद्दल आभारी आहे.

एक उत्कृष्ट गझल. सर्वच शेर अप्रतिम आहेत. पण

दुष्काळ रोज आहे घेणार काय फाशी
आता करा गडयानो उलटी घडी सवाशी

हा कास्तकार माझा मातीत राबलेला
जमले कधी न त्याला कातावणे नभाशी

हे दोन शेर फारच भावलेत. इतके सहजसुंदर आणि प्रभावी शेर मला कधिही लिहिता आले नाहीत,

बाळ पाटलांना सलाम! >>>>>>>
................. अभयजी, धन्यवाद ! आपली प्रतिक्रीया हे एका मोठ्या मनाचे प्रतिबिम्ब होय ! मी भारावून गेलो खरेच !! पुनश्च धन्यवाद ! ...... बाळ पाटील