अडगळ

Submitted by जव्हेरगंज on 3 May, 2016 - 09:46

'मोहरा' पिच्चर आणला तवाची गोष्ट. मोकळं मैदान गाठून, शंकराच्या दगडी देवळाच्या बाजूला टेबल मांडून, त्यावर टिवी ठेऊन पिच्चर दाखवायची व्यवस्था केली ती दाद्यानं. हा दाद्या उधळ्या माणूस. एक म्हणता तीन तीन पिच्चर आणणारा. गणपतीची वर्गणी पुरली नाय तर स्वताचे शे-पाचशे घालून हौसमौज करणारा.
तर त्या दिवशी त्यानं ग्यांगला सरप्राइज म्हणून एक दोन बीपी ची पण कॅसेटं आणलेली. रात्री ऐश करायची म्हणून गावठी दारुपण त्यानं तयार ठेवली होती. तर अशी सगळी व्यवस्था करुन दाद्या गुटख्याच्या पुड्या फोडत व्हीसीआर वर चित्र आणण्याची खटपट करणाऱ्या पोरांना उगाचच आयबहीनीवरनं शिव्या घालत होता. पण दाद्याच्या शिव्या म्हंजे अमृताचा शिडकावा मानून ओंजळीतून तिर्थप्रसाद पिऊन डोक्यावर हात फिरवून स्वताला कृतकृत्य म्हणतात का काय ते करवून घेऊन पोरं प्रोत्साहीत होऊन नेटानं वायरी हालवत होते.

तर हा प्रोग्रॅम होता म्हारवड्यात. तिथली सगळी चिलीपिली टिवीम्होरं ठाण मांडून बसलेली. स्क्रिनवर थोड्याजरी मुंग्या आल्या तरी "आलं, आलं, चित्तार आलं" म्हणून कालवा करायची.
शेवटी एकदाचं ते चित्तार आलं. आन सगळी गपगार झाली. पहिला शीन सुरु झाला. तुरुंगातल्या कुठल्याशा रेड्याला पोलीस पकडून नेत होते. त्याच्या उठ्याबैठका बघून पोरं गांगरुन गेली.
मग रविना टंडन आली. जेलमधून फिरायला लागली. जेलमधल्या सैपाकघरात जेव्हा चारजणं तिला पकडून बलात्कार करायला सज्ज झाली तेव्हा सगळ्यांच्या कपाळातच गेल्या.
पण जेव्हा इंटरनॅशनल म्युझिकवर अॅक्शन घेत सुनील शेट्टीनं एंट्री घेतली तवा सगळी "रेवन्या आला, रेवन्या आला " म्हणून गोंधळ घालायला लागली लागली. मला कळेना, की हा रेवन्या कोण?

रेपसीन बघण्यात गुतून गेलेल्या एका दोस्ताला विचारलं की हा रेवन्या कोण? त्यानं उठून हिकडंतिकडं नजर मारुन खाली बसत म्हणला, आल्यावर दाखवतो तुला.
मग पिच्चर पुढे सरकत गेला. सुनील शेट्टीच्या बहिणीवर जबरी रेप झाला. मग त्या चौघा रेपिस्टांची सुनील शेट्टीनं पार आयमाय झ** काढली. अक्षयनं एंट्री घेतली. नसिरनं एंट्री घेतली. पार पिच्चर मस्त मस्त चीजपर्यंत येऊन धडकला.

पोरं पेंगुळलेली. वातावरण गंभीर. दाद्या गावठी मारुन एका दुकानाच्या कठड्यावर आडवा पडलेला. डोळ्यात झोप घेऊन माणसं आलीया भोगासी म्हणत पिच्चर बघत होती. तेवढ्यात बनेल आन पँन्ट घातलेला एकजण ढेरीवरनं हात फिरवत सहज हवापालटाला आल्यासारखा तिथे हिंडत फिरत आला. मग आमचा दोस्त मला म्हणाला, "तो बग तो रेवन्या"
म्या त्याला नीट निरखून बघितला. चेहरा सुनील शेट्टीच्या सुजलेल्या तोंडासारखा दिसत होता. बस, एवढेच काय ते साम्य. बाकी ढेरीबिरी सुटलेला तो एक आळसावलेला सांड होता. नंतर दोस्तानं मला माहिती पुरवली की तो टिवीपण त्याचाच हाय.

म्हणजे एका रातीपुरता टिवी दिल्यामुळं आन चेहरापट्टी सुनील शेट्टीशी मिळतीजुळती असल्यानं सगळा प्रोग्रॅम दाद्यानं मॅनेज करुन पण आख्खं क्रेडीट रेवन्या घेऊन गेला होता.

त्यादिवशी रेवन्या मला दिसला तो पहिल्यांदाच आणि शेवटचापण. त्या रात्रीनं खरंतर रेवन्याच्या जिवनात होऊ घातलेल्या बऱ्याच घडामोडींची पायाभरणी केली होती. त्याच्या कडूझार आयुष्याची सुरुवात इथूनच तर झाली.

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येक नंबर...मस्तच जमलीये...टवाळ पोरांचे वर्णन अगदी डिक्टो