कबुलीजबाब

Submitted by satishb03 on 1 May, 2016 - 14:13

न लिहिल्या जाणाऱ्या आत्मकथनातले काही कबुलीजबाब

एसवायबीएचा विद्यार्थी होतो तेंव्हाची बात . अत्यंत प्रिय असलेल्या , इतिहास शिकविणाऱ्या मराठा जात धारक प्राध्यापकाने लव्हम्यारेज केले . त्यांची स्वस्त्री , म्हणजे आमच्या मैडम ब्राह्मण जातीच्या . सर मराठा असून देखील आणि मिलिंद महाविद्यालयातून आलेले असले तरी त्यांचा जातीबरोबरचा फासला तसा बऱ्यापैकी रुंदावलेला . उन्हाळी व दिवाळी सुट्टीत प्राची मैडम म्हणजे सरांच्या स्वस्त्री माहेरी जायच्या . व सर , अकेली डर लागे रात मोरी अम्मा हे वाशट विरहगीत गात तरसायचे . त्यांच्या जिभेला मटणाच्या चवीचा पान्हा फुटायचा . ते आम्हा प्रिय विद्यार्थ्यांना बोलवून रोकड तीनशे रुपये देऊन मटन आणाय , व आणल्यावर ते खाण्यायोग्य कराय आम्हासच सांगायचे . आम्ही दीड रुपये कटिंग चहास महाग असलेली भिकारचोट ग्यांग . पैसा हाती आल्याबरोबर तिचा नीट विनियोग करायचो .
म्हणजे तीस रुपये किलोचे मटन घरी घेऊन जायचो ..सात शिट्ट्या होस्तोवर गदगद शिजवायचो ..सोलापुरी येसुर टाकून सरांच्या नाकावर झ्न्नाटेदार घाम काढायचो ..प्रिय सर म्हणायचे अरे हे मटन जरा वेगळे लागते रे . आम्ही बोलायचो सर हे कवळं मटन आहे . अच्छा अच्छा म्हणून फुरका मारत ते रसा भाकरी भात काला आनंदाने ओरपायचे..
दिवस सरले , महिने सरले , आणि वर्षही सरली . आमचे प्रिय सर प्राध्यापक या पदाला त्यागून प्राचार्य झाले . आणि पुण्यात एका कार्यक्रमात आले . मला भेटले . भेटून अभिमानाने त्यांचा उर भरून आला . डोळ्यात कौतुकमिश्र पाणी आणत..म्हणाले छान वाटले रे. मोठा झालास..मी नुसताच विनम्र हसलो ..
आता हक्काने तुला काही मागू शकतो . मागू का ? मी म्हटले मागा सर ..माझ्या जवळ जे आहे ते तुमचेच तर आहे ..सरांच्या डोळ्यात पुन्हा कौतुकाच्या पाण्याचे पूर लोटले..
मला म्हटले , आता गात्रे साथ सोडायच्या बेतात आलीत मोठ्याचे मटन कधी खाल्ले नाही . चारू शकशील ?
मी हसलो ..व विचारले , माझ्यावर विश्वास , व माझ्यावर प्रेम आहे का सर ? सर म्हटले , कानफटीत देऊ का ? तू तर आमचा जीव की प्राण ! असे का विचारतोस ?
मी म्हटले सर ..मोठ्याचे मटन पंधरा वर्षामागेच तुम्हाला पोटभर चारलेय ..तुम्ही दिलेले बोकडाच्या मटणाचे पैसे चाट मारून , त्या पैशात बीफ आणून , त्याचा गाळ शिजवून , ते विलक्षण कोवळे म्हणून , तुम्हाला केंव्हाच परोसून मी तुमची शाबासकी घेऊन , तुमची तीव्र ढेकर देखील देऊन झालीय सर .. सरांनी पुटपुट पुटपुट केली व ओके ओके म्हणत नासिकला फोन लावला ..
नारायण नागबळी आणि त्रिपिंडीश्राद्धविषयक माहिती ते विचारत बसले . आता आणखी एक .

पंधरा वीस वर्षामागे मी राहत होतो त्या वस्तीचं आपलं एक स्वतःच स्वतंत्र सांस्कृतिक वेळापत्रक असायचं . नवस फेडनं , कंदुरी करणं , लग्नं लावणं , वगैरे ..त्यात मार्च एप्रिलमध्ये वस्तीत परडी उजवायचे जंगी कार्यक्रम असायचे . आता फार होत नाहीत हे कार्यक्रम वस्तीत. पण पंधरा वीस वर्षामागे जबरदस्त रेलचेल असायची या कार्यक्रमांची. धोँड्याचा महिना म्हणजे तर क्या बात है ! याच टायपात मोडणारा. महिना भर नुस्ता धिंगाणा ! तीन वर्षातून येणारा आणि पावण्यारावळ्याला डलीडुली आणि पुरणपोळी सारख्याच मापात खाऊ घालणारा . परडी उजविण्याच्या काळात आराधी मंडळी फुल टाईम बिझी असायची ! ह्यांची अपाँईँटमेँट मिळणं , मिळवणं. म्हणजे जबरदस्त दिव्य ! एकवेळ मोदी परवडला पण हे नकोत . नवरा बायकोच्या भांडणात आरादी अपाँईँटमेँट हा कळीचा मुद्दा असायचा ! नवरा बायकोला तु काच गेली नाहीस ? किंवा बायको नवऱ्याला तू काच गेला नाहीस ? या टाईपचा कालवा वस्तीला नवा नसायचा. नामचीन आरादिन परडी उजवण्यासाठी लाभणे म्हणजे गुरुपुष्यामृत योगच म्हणावा अशी गत ! त्या टायमाला खूप घरी चढा ओढीने परड्या उजवल्या जायच्या. नव्या लग्न झालेल्या जोड्या मात्र परडी उजवण्याच्या काळात जाम खुष असायच्या . म्हातारा म्हातारी आराधी गाण्याला चटावून तिथेच व्यस्तं व्हायची आणि तरण्या जोडीला फुल्ल प्रायवसी असायची . वस्तीतल्या कित्येक पोरांच्या जन्मतारखी आठ दहा दिवसांच्या अंतरानी एकाच महिन्यातल्या. धोँड्याच्या महिन्याची कमालच ही . धोँड्याचा महिना सरला कि चार तरी नवतरण्या बायांची पाळी चुकणारच .या महिन्यात परड्यांचा धुमाकूळ अतीच. शाळेत मास्तरांनी शिकवलेलं "एक दो, एक दो, माळ परडी फेक दो" असा आम्ही केलेला कालवा आणि डोक्यात खाल्लेले खौंडे , आवाज बसवी बुक्क्या आजही आठवतात. परडी उजवणे हा अत्यंत जबरी मनोरंजनात्मक धार्मिक प्रकार , कुठलाही अघोरीपणा नसलेला. दोन तीन पिढ्या कुणीतरी परडी चालवलेली असते. मधेच कुणीतरी , कुठल्यातरी, कारणावरुन ती चालवत नाही. आता परडी चालवणे म्हणजे काय ? तर मंगळवारी, शुक्रवारी ( परडीधारकांच्या उच्चारी सुक्कीरवारी) जोगवा मागायचा, नवरात्रात उपास तापास करायचे. गावाकडची येडाई, जानाई, जोखाई, शितळाई टाईप देवीच्या जत्रेला (ती जेव्हा असेल तेव्हा) , किंवा चैत्रात तरी एकदा जाऊन यायचंच. आणि घरात नेमानं तिला हळदी कुंकू वहायचं. एवढं केलं कि परडी तुमच्यावर हँप्पी ! तिच्या कडून तुम्हाला नो प्रोब्लेम. अगदी ग्रीन सिग्नलच !
हे सगळं मधेच बंद केलं कि भयंकर जबरी लोचे होतात ही रुजलेली , व्यवस्थेनं ताकदीने रुजवलेली भयप्रद धारणा ! नवरा दारुडा होतो. पोरं घैराती होतात. सुन बदमाश होते.आणि शेजारी पाजारी करणी धरणी करणारे , तुमचं बरं न बघवणारे नंबर वन कडूडक दुष्मन लोक ठरतात ! असा परडीचा महिमा. मग धोँड्याच्या महिन्याची वाट न बघता कधीही परडी उजवावी लागते. ज्यांच्या घरी , त्यांच्या पुऱ्या खानदानात कधीच कुणी परडी चालवलेली नसते त्या घराला सुद्धा त्यांच्या घरगूती अडचणी वाचून आराधी लोकं एम.एल.

एम. मार्केटिंगच्या कडक , फुल्ली ट्रेन बंद्यासारखं ताकदीने पटवून देतातच कि चार किंवा पाच पिढ्या मागं तुमच्या घरात अमकी तमकीच्या हातावर परडी होतीच ! हे सत्य पटवण्याकरिता तात्काळ अंगात आणून देवीची साक्ष काढली जाते. दुजोरा घेतला जातो. आणि तात्काळ परडी उजवण्याची डेट फिक्स होते. आराधी मेळा जमतो , पुरणपोळीनं डुलतो , डलीडुली बरोबर झुलतो , गांजानं खुलतो. झांजा, तुणतूणं, ढोलकी तासाभराच्या सरावात खंगाळली जाते. पाच सवाष्णीँना पान सुपारी दिली जाते. पुरणपोळीचा, डलीडुलीचा, आमटी भाताचा निवद ठेवला जातो. कपाळभर पुरुन उरेल एवढं कुंकू एकमेकींना लावलं जातं. आणि अंबाबाईच्या नावाची चिक्कार आळवणी व कानकिट्टी कौतुक करीत गाणी गायली जातात. ही गाणी स्वरचित आणि ऎकायला मस्त असतात. गाण्या बरोबर आराध्यांच्या गमतीजमती , म्हातारपणातील मोहब्बतीच्या टिंगल टवाळी गप्पा, चार लोकात लाज येणार नाही, असं खुलणं फुलणं . एकूण वातावरण जबराट सर्द ! भोवताली वस्तीचा गराडा आणि मग सावकाश पहाटे परडी उजवल्याची सांगता ..

या परड्या उजवण्याच्या कारणाला वस्तीतल्या पोरांची वर्तनं , वय सतरा झाले तरी पोरींची न जुळणारी लग्न ही कारणं अधिक बळकटी देत आणि मग घेतलेल्या परड्या उजवण्याच्या निर्णयावर आईबाप आनंदी होत पुढील आरादीलोकांच्या पुढील पाहूणचाराला सरसावत. एखाद्या धार्मिक माउलीनं , पोरगं ऑक्टोंबर मार्च , ऑक्टोंबर मार्च का बरं दहावीच्या वाऱ्या करतंय ? असं विचारलं की , या प्रश्नाला प्रश्नात्मक उत्तर मग उजवा की परडी ? कवर मी गप बसू ? असे अंगात आलेली अंबाबाई द्यायची आणि एखाद्या मंगळवारी रात्री साडे दहालाच बैठक बसायची . अशीच एक परडी बैठक चालू झाली . मेन मेल सिंगर आरादी बाप्याने छबिण्याला निघाली अंबा गवळण कडक सादर केलं . मेन फिमेल आरादी सिंगर इंदरुमायनं आयगं काळुबाई तुझ्या कानामदी झुबा ठेक्यात गायलं . रंग चढला बैठक खुलली . ढोलकी कडक आवाज करू लागली आणि तुणतुणं गुंगवू लागलं . तांब्या तांब्यातनं हातभट्टी गर गर गोल फिरू लागली . झांजा आनंदी आदळ आपट करु लागल्या .आणि वातावरण अंबाबाईमय झाले ..तास दोन तास उलटले .
गार डोंगराची हवा आळवून आळवून चालू असताना मधेच विटांच्या तुकड्याचा वर्षाव आराधी लोकांवर झाला . बारीक बारीक तुकडे ..फटाफट नाकातोंडावर कोपराढोपरावर पडू लागले . मायोss बाबोवss आता कशी करूsss या उत्स्फूर्त उद्गारां बरोबर म्हातारी कोतारी आरं का हाय , कोण हाय म्हणू लागली . पाचेक मिन्टाचा सटकारा पडला . आणि शांतता पसरली . मेन फिमेल आरादी सिंगर म्हणाली ..धोंड्याच्या महिन्यात पुनव बघितली नाही आन परडी उजवली म्हणून अशा न आसं झालं . घाई घाईत अंबाबाईची आरती झाली आणि परडीप्रोग्राम बंद झाला . दुसऱ्या दिवशी सकाळी धोंड्याच्या सटकाऱ्याची अद्भुत घटना वस्तीवस्तीतून जंगी दंतकथा म्हणून प्रसारित होऊ लागली ..अंबाबाईची दहशत वस्तीवर हडळी सारखी हुकुमत गाजवू लागली..पुढे हे बरेच वर्ष टिकले ..अगदीच नाईलाज झाला तर छबीण्याच्या गण्याआधी धोंड्या देवाची पूजा होऊ लागली ..

मध्ये आरादी ग्यांग फलाट बघायचा म्हणून आमच्या घरी आलेल्या . मेन फिमेल आरादी सिंगर थकलेली इंदरूमाय कोरा चहा पीत होती .आता तिच्याच्याने गाणी म्हणणे होत नाही . आराध्यापेक्षा हिजड्यांची मागणी वाढल्याने हे दुय्यम स्थानावर गेलेत . स्पर्धेतून आपसूक बाहेर पडलेत . तिला सहज विचारले , काय म्हणतीय अंबाबाई ? ती म्हटली आता बोलवील तवा जायचं . मग विचारले धोंड्याच्या म्ह्यण्यात परडी उजीवताव का अजून ? तर म्हटली आता लयशी कोण उज्वीत नाही . आणि काय आक्रीतबी व्हत जात नाही ..मी म्हटले कसे ? तर काय नु ?
मग मी तिच्या पाया पडलो व तिची माफी मागितली . तिला वाटले आशीर्वाद मागतोय . मग तिने माझ्या तोंडावर हात फिरवून आकाळावर कडाकडा बोटे मोडली .का गं माय ? काय झालं म्हणून मला विचारलं .

तर तेंव्हा प्रकार असा झाला होता . मी टीवायबीए ह्या वर्षाला होतो व वस्तीतला कॉलेजकुमार म्हणून कौतुकास पात्र होतो ..दहावी बारावीच्या परीक्षेत फेल होऊन उंडगेगिरी करणाऱ्या पोरांसाठी मी तेंव्हा आदर्शाचा पुतळा होतो .सगळ्यांचे आईबाप जा दताकडं अभ्यासाला म्हणून ह्या नापास पोरांना माझ्याकडे धाडीत होती . आमचं घर टेकडावर . घरामागे अंगण . ही सगळी आठदहा पोरांची ग्यांग झोपायला आमच्या घरामागे . टेकडावर एकूण सहा घरं. आणि टेकडाच्या खाली पंचवीसेक गोलाकार घरं . त्या घरात एकमेकात नीट पुरेशी जागा . आमच्या वस्तीजवळ तेंव्हा नुकतेच सरकारी दवाखान्याचे बांधकाम चालू झालेले ..आणि ते बांधकाम पाहून वस्तीत बऱ्याच जणांनी आपापल्या घरच्या वट्याचे , मोरीचे बांधकाम काढलेले . गावठी गवंडी अल्पमजुरीत शासकीय वीट वाळू सिमेंट मध्ये या गोरगरिबांच्या वट्या न्हानीची कामे करत होती . आणि बऱ्याच जणांच्या घरासमोर विटा दगडाचा थोडा फार ढिगारा होता . अर्थात आमच्याही . दहावी नापास झाल्याचे टेन्शन आयता खातो म्हणून आयबापाची जहरी बोलणी याला कट्टाळून पोरे कधी मधी अभ्यासाला बसत तर त्यात आराधी गाण्यांचा धुमाकूळ . झाले त्यादिवशी परडी उजवायचा मुहूर्त आणि यांचा अभ्यासाचा मूड एकाच मुहूर्तावर आला . पोरे अभ्यास करू इच्छित होती आणि आरादी गाऊ इच्छित होते . मी त्यांच्या साठी भगवान क्रिष्णच असल्याने त्यांनी मला विचारले , कसं करायचं दादा ? आता त्या क्षणी ते पार्थलोक . मी त्यांना गीता सांगाय सुरुवात केली . म्हटले या आरादी ग्यांगला इटाच्या बारीक खड्याने नीट करू कुणाला दुखापत व्हायची नाही . थोडी फार टेंगळे येतील ती चालतील . दोघे तिघे म्हटले आयला तिथं लहान पोरे असतील कि , मग त्यातल्या एकाला टेहळनीसाठी पाठवून कोण कोण किती किती म्हातारे कुठल्या कुठल्या कोपऱ्यात जागा धरून बसलेत ते बघून ये म्हटले . तो राईट रिजल्ट घेऊन आला . आणि इंद्रा गांधी योजनेतून नुकतेच सिमेंट पत्रे लाभलेल्या दोन घरावर अल्लद चढून दोघा तिघांनी विटांच्या बारक्या तुकड्यांचा मारा केला ..सटासट सटकारे नाकातोंडावर , कोपराढोपरावर बसू लागले , पाच सात मिन्टाच्या सटकाऱ्याने आध्यात्मिक भय दाटून मंडळींनी अंबाबाईची शेवटची आरती घेतली आणि प्रोग्राम आटपला . पोरे निवांत अभ्यासाला बसली ..

हे सर्व तिला तिच्या भाषेत संगीतले .. इटाचा सटकारा आम्हीच केल्ता ..मग ती म्हटली , कडूनू देवाची चेष्टा करून काय भेटलं ..मी म्हटलं जाव दे गं इंदरूमाय .मजा केली तुमची सगळ्यांची .पण तुझाच नातू माझ्यासोबत राहून पास झाला का न्हाय . तर म्हातारी केवळ हसली , आता आणखी एक गंमत दहाएक साला मागची

आठेक वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातल्या एका आडगावात असलेल्या कॉलेजवर मी काही काळ काम केले . निवड रीतसर विद्यापीठाकडून झालेली असल्याने मला काही अडचण येत नव्हती . कॉलेज नवीनच होते सात खोल्या एका लायनीत बांधून काढलेल्या . कुणी विद्यापीठाचे पावणे आले की आमदार व प्राचार्य डोंगराकडे हात दाखवून सहा माजली बिल्डींगचे बांधकाम चालू हाय म्हणायचे . विद्यापीठाचे पावणे गावरान कोंबडीवर खुश होऊन जायचे . पुन्हा सात खोल्यात कारभार चालू . अनुदानच पन्नास टक्के असल्यामुळे पगार कमी होता तो ही रीतसर निवड झालेल्या लोकांनाच मिळायचा. बाकीच्यांना फक्त गावात सर म्ह्नुन मिळणारा मान पुरेसा असायचा . सर व्हायची खाज त्यांना घरून जवारी डाळी डूळी माळवं टाळवं आणायला भाग पाडायची. हे थेरं फक्त सर्वण बांधवाना परवडायचे . हे लोक गावावरून आले कि एकमेकांना बोलायचे , मायीन डाळ दिलो . कुरड्या आणलो . येसुर हायका बे ? वगैरे.. आपल्याला ते जमत नव्हते . त्यामुळे मी कॉलेजकडून पगार दमदाटी करून वसूल करायचो . त्या पगारात खायाचे नाही पण पियाचे वांदे व्हायचे . मग मी कायम कातावलेला असायचो . पगाराच्या तारखेवर नीट नजर . आमचे अध्यक्ष म्हणजे एके काळचे दहा वर्ष आमदारकी गाजीवलेले आमदार . दिसायला हुबेहूब विलास रक्टे. कॉलेजपासून काही अंतरावरच त्यांचा भव्य बंगला. अध्यक्षाचा भाऊ मराठी सिनेमातला पुराना व्हिलन डुप्लिकेट राजशेखर..एकदम शीडशिडीत गोरा . त्याला सर्व तात्या म्हणायचे . त्याची सगळी नजर नेमलेल्या प्राध्यापक बायकांवरच . पण त्याला कसलेच इम्प्रेशन टाकणे जमायचे नाही . अध्यक्षाचा भाऊ , उपाध्यक्ष म्हणून त्याला लाडी गोडीनं काही कुणी सांगाय बोलाय गेलं कि हा समोरच्या माणसाला , बाई असो वा गडी , बाई माणसाच्या व गडी माणसाच्या सर्वसाधारणपणे माहित असलेल्या शारीरिक अवयवांची व माहित नसलेल्या त्यांच्या विविध खाजगी प्रक्षिप्त क्रियाप्रतिक्रियांची सार्वजनिक व उच्चरवात मांडणी करून प्रश्न सोडवायचे आश्वासन द्यायचा . जसे कि , त्याला एका जरा देखण्या बाईने . इथे पाण्याचे पिंप नाही . जरा कुणाला तरी सांगून त्याची सोय करता का ? असे विचारले तर यावर उपाध्यक्ष राजशेखर उर्फ तात्या म्हणाले , “ उद्याच सोय होईल काळजी करू नका बई कटक्याच्या आयचा दाणा नाही का वासायचो ?” यावर त्या देखण्या बाईंची तहान तत्काळ भागत असे . किंवा आपल्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आपण काळजी घेतो हे दाखविण्यापोटी , उसाच्या मळीच्या वासाने उलटी झालेल्या प्राध्यापक महिलेला , “कितवा महिना ताई ? काळजी घ्या . सुटी घ्या दोन दिवस . चौरे सराला मी सांगतो .” मग झाडलोटीचे काम करणाऱ्या मावशी सांगणार अहो तात्यासाहेब त्या बैचं अजून लग्नच झालेलं नाही . तात्या फक्त अं ? करून पुढे जाणार . असे खूप काही तिथे रोज घडायचे . या तात्याला घोड्यावर फिरायचा नाद . तो कॉलेजमध्ये घोड्यावरच यायचा . आणि पेटीक्याश कुठाय ? असे क्लार्कवर दरडावून ओरडत चाराठ दिवसाचा पाचपंचवीस हजाराचा गल्ला घेऊन घोड्यावर मांड टाकून धुम्म निघून जायचा . कॉलेजमध्ये कॉलेजच्या ऑफिसातच एक पतसंस्थेचे ऑफिसही थाटलेले . एका अशाच नियमित गल्ला वसुली रपेटीत आमचे प्राचार्य म्हटले पेटीक्याश इथे लागते तर उपाध्यक्ष राजशेखर तात्या म्हणाले उभ्यानं घोडा लावील . तेंव्हापासून राजशेखर तात्या आल्याची चाहूल लागल्याबरोबर त्याच्या घोड्याकडे भययुक्त आदराने पाहत प्राचार्य हागायला जाऊ लागले ..
अशात कॉलेजमध्ये पदार्पण झाले देसले सरांचे . यांचा विषय इतिहास ..हे दिसायला बुटके आणि जरा गोरे . एडोहोक म्हणजे तात्पुरत्या पदावर त्यांना घेतलेले . यांना भारतीय संसदेने अमेरिकेच्या इराकवरील आक्रमणाचा निषेध केल्याच्या ठरावावर काही बोला . वा दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा महिला संघ विजेता झाला हे बोला ते विषय फिरवून आणायचे महाराजांवर . जसे कि ..अमेरिकेचं चुकलंच परराष्ट्र धोरणात असा हल्ला म्हणजे काय ? कसली नैतिकता ? महाराजांचे परराष्ट्रधोरण संपूर्ण जगाने नव्याने अभ्यासायची गरज आहे . (जुन्याने कुणी कधी अभ्यासले ? हे विचारले कि ते एखादे खंग्री पुस्तक तिथेच लेखकाचे नाव प्रकाशकाचे नाव क्रियेट करून सांगायचे . आपल्या तोकड्या ज्ञानाची आपल्याला जहरी लाज !) आफ्रिकेतला विजय यावर बोलले कि गड चढलेली हिरकणी आणि महाराजांनी केलेली साडी चोळी यावर तासंनतास बोलून समोरच्याला गारद करायचे . तर साहजिकच ते अध्यक्ष प्राचार्य वगैरे लोकात त्वरित प्यारे झाले.. त्यांना सचिवाची पोरगीच द्यायची हे सचिवासह अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे घाटू लागले . ते शिपाया करवी आमच्या पर्यंत येऊ लागले . आणि देसले सर बेताल होऊ लागले. त्यांना पगार वगैरे काही दिला जायचा नाही . पण गावातल्या सचिवाच्या पावण्याच्या वाड्यातली एक खोली फुकट राह्यला . जेवणाची सोयही सचिवाच्या पावण्याकडेच त्यात कुठून तरी त्यांचा धागा दोरा सूत्र गोत्र सांगलीच्या पाटील मंडळीशी जुळले . आणि विलक्षण आनंदी आनंद होऊन देसले सर फौंडर मेंबर्सच्या अधिकाराने कॉलेजमध्ये वावरू लागले . कोण कधी येतो , कोण कधी जातो . कोण विद्यार्थ्यांवर गुरकावतो .लिपस्टिक कोणी लावली , बेंबीच्या खाली साडी कुणाची , काखा दाखवीत कोण आली या सर्व प्रश्नांच्या उत्तराचे गठूडे घेऊन ते दिसाआड आमदार साहेबाच्या बंगल्यावर जाऊ लागले ..पितळी कड्यांच्या झोक्यावर पान खात बसलेले आमदार , सरांचे सर्व कान देऊन ऐकायचे आणि येऊन प्राचार्याला हाग्या दम द्यायचे . काय उपटता काय निस्ती ? मास्तर लोकांना आणि बाईंना नीट वळण लागलं पायजे ..कॉलेजची पोरं जिल्ह्यात गाजली पायजे..ढाली आल्या पायजेत . आमेरिकेला पोरी खेळाय गेल्या पायजेत पैश्याची काळजी नको.. वगैरे वगैरे ..एकूण देसले सर म्हणजे डोक्याला जहरी पिडा होऊन बसली . त्यातल्या त्यात एका दुपारी डुप्लिकेट राजशेखरने पंगा होऊन कॉलेजमध्ये राडा केला. प्राचार्याची स्टाफसमोर आयबहिण काढली. आणि मग प्राचार्यांनी पुढच्या चार दिवसात तात्या वसुली रपेटला येण्याआत पेटीक्याश ताब्यात घेऊन . शिराळा टू सांगली . आणि सांगली टू महाराष्ट्राचा कुठला तरी कोना गाठला ..आणि कॉलेजमधले वातावरण भयंकर गदबाळले..देसले सरांकडे चार्ज दिला गेला आणि देसले सर सबंध कॉलेजवर , स्टाफवर सुलतानासारखे राज्य करू लागले . आम्ही विचारात पडलो का बुवा तात्या बरेच दिवस कसे काय आले नाहीत ? तर कटके शिपायाने सांगितले दर आठ दिवसाला हीच क्याश घेऊन घरी जातोय आन तात्याला देतोय..
एकूण देसले कॉलेजमध्ये इज्जत सांभाळून राहू वावरू लागले ..भयंकर काच वाढला . एट्रोसिटी वगैरे प्रकार माहित असल्याने आणि एके दिवशी घडलेल्या आम्हा दोघांमधील गमती गमतीच्या संवादात , घरात घुसून बोच्यावर वार करीन सर या माझ्या डायलोगने प्रचंड खुश होऊन पुढे मला ते विलक्षण प्रेमाने वागवू लागले .
मग असेच सर्व काही महिनाभर सुरळीत चालले . आणि एक दिवस डुप्लिकेट राजशेखर उर्फ तात्यासाहेब घोड्यावर कॉलेजमध्ये आले . थेट प्राचार्य म्हणून बसलेल्या देसलेंच्या खोलीत गेले . देसलेंना सनासन कानाखाली वढल्या. आणि कटकेला देसलेंचे सामान आणायला पिटाळले . वर्ग सुटल्याने पोरे बर्यापैकी आपापल्या घरी गेलेली . आम्ही सर्व शिक्षक वर्ग मात्र हा तमाशा बघत राहिलो . तात्यासाहेब शिवीगाळ करीत होते आणि देसलेसर आईशपथ तात्या मी माळकरी आहे . मटन दारूला हात लावीत नाही . म्हणून गळ्यातली माळ दाखवीत होते . चोप भाड्खाव खाल्ल्या ताटात थुकतो ? फोट हिथून तुझ्या आयचा.. उद्या हितं दिसला तर गुड्ग्यातनं पाय काढतो .वगैरे वगैरे जोरदार धिंगाणा...देसले सर त्याच दिवशी संध्याकाळी गाव कॉलेज सोडून गेले . तसे ते क्वालिफाईड नसल्याने त्यांची निवड विद्यापीठाने केली नसतीच ..पुढे सहा महिन्यांनी मीही कॉलेज सोडले ..सातआठ वर्षानंतर काही दिवसांपूर्वी देसले पुण्यात भेटले . चला मटन चारतो म्हणाले . मी ही म्हटले चला.. मी विचारले , मटनाआधी मी थोडीशी घेईन हा सर . चालेल ना ?, ते म्हटले चालेल. मग आम्ही बारमध्ये निवांत बसलो . पुण्यात कधी आलात ? कॉलेज कधी सोडले ? वगैरे चौकशा केल्या . मी उत्तरे दिली .
माझा एक लार्ज पेग झाला व मी त्यांची माफी मागितली . एक कबुली जबाब दिला ..आणि त्यांना मला थ्यांक्स म्हणायला देखील भाग पाडले .
तर तेंव्हा प्रकार असा झालेला . संस्थेने दोन महिन्याचा पगार तुंबवून एक दिवस शेवटी पगार केलाच . मी थेटच सांगली गाठली . मला खूप पुण्याची याद यायला लागली कि मी सांगली गाठायचो ..जरा गर्दीत फिरायचो ..कॉलेजच्या लायब्रीत खांडेकर फडके श्रीमान योगी आणि पोटभर अण्णा भाऊ आणि शिवखेरा एक पुस्तक हातात घ्यावे वाटायचे नाही . मग सांगलीतली गर्दी बरी वाटायची . स्वस्त दारूचे एक हाटेल शोधून ठेवलेले . तिथे जाऊन कार्यक्रम करायचा आणि तिखट जाळ डाळफ्राय कधी भडंग खाऊन माघारा येऊन खोलीवर पुणे आठवीत पडायचे . पगार झाला की चार आठ दिवसाचा असा माझा कार्यक्रम ठरलेला असायचा . डिसेंबरच्या थंडीचे दिवस . मी सहा वाजेस्तोर रम पीत बसलो . संध्याकाळ झालेली आणि अंधारून आलेलं . एक रिक्षा केला . आणि शिराळा रोडला सोड म्हटले . जरा फिरून जाऊ . चांगली वांगी घेऊ . वगैरे सांगून बसलो ..रिक्षा निघाली . आणि पाच मिनिटात रिक्षावाला एका बुलेटला ओवरटेक करायची धडपड करू लागला . मी म्हटले , “भौ जीव घेतो का माझा ? हाळू चालीव .” तर तो म्हटला दादा हायेत बुलेटवर . मी म्हटले कोण दादा . आवो हितले आमदार व्हते . मला वळखत्यात चांगले . त्यांला नमस्कार केला असता . त्यांचे भाऊ तात्या दिसाड येत्यात दुकानावर . त्याला गप बस म्हटले ..तो गप बसला. आणि माझ्या डोक्यात किडा वळवळला ..“आवाजाला जास्त नाशिले करत मी त्याला माझा परिचय करून दिला . सांग तुझ्या तात्याला , पोपट देसले सर बसले होते म्हणावं रिक्षात , आईघाले लोक जातीच्या माणसाला बी सोडत न्हायीत . ह्यांचा आयचा किडा . मी भेत नसतो कुणाला . आरं त्यांच्या कॉलीजमधीच शिकीवतो मी . महाराजांनी आशी कॉलीजं चालवाय सांगितली व्हती काय ? आपल्याच लोकाला लुटायचं ? हि बेनं कॉलीजवर येतयं आनं पयशे घेऊन जात्ये..आयचा किडा . भावड्या नाव विसरू नकू ह्या वागाचं ..पोपट देसले . हां देसले सर भेटले व्हते म्हणून सांग ..आयचा किडा ..”
तिसऱ्या दिवशी देसले सरांची गच्छंती झाली .
माझे तीन पेग संपले . देसले म्हटले , “हिथं भेट्लाव वर भेटू नका ..” मग मी म्हटले , “तुमच्या आयुष्याचं सोनं झालं राव माझ्यामुळ ते का विसरता ? कॉलेज सुटलं आणि तुमी सेट नेट झालाव . डी वाय पाटीलमध्ये ज्वाइंट झालाव . तिथे राह्यला अस्ताव तर झाले असते हे ?”
मग आम्ही नॉर्मल गप्पा मारीत आवारे खानावळीत मटन भाकरी खाल्ली ..

@सतीश वाघमारे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी !

वातावरणनिर्मिती करण्यात कुणी तुमचा हात धरेल असं वाटत नाही. सिनेमाच पाहतो आहोत असं वाटलं. अण्णाभाऊंचा वसा चालवताय तुम्ही. अस्सल बोलीतल्या अस्सल कथा. ही बोली जिवंत ठेवायला ठिकठिकाणी असे सतीश वाघमारे निर्माण व्हायला पाहीजेत. नाहीतर बोलीभाषा विसरल्या जातील.

यातल्या कित्येक गोष्टी माहीत नव्हत्या. छबिना ऐकून माहीत होता. पण परडी उजवणे या प्रकाराबद्दल काहीही माहिती नव्हतं. विस्ताराने लिहील्याने माहीत झालं. तुम्ही मराठीत महत्वाचे लेखक म्हणून स्थान निर्माण कराल यात शंका वाटत नाही.

छान Happy

परडी मलाही माहिती आहे.

आमच्या गल्लीतच मरीआईचे देऊळ होते. तिथे असे अनेक प्रकार नेहमीच बघितलेत. काही आठवनी माझ्याही आहेत. Happy

अंगात येण्यावरून - ते खोटे असते हे दाखविन्यासाठी मरीआईच्या एका कार्यक्रमात अंगात आलेल्या एका बाईला मी असेच पेटलेली उदबत्तीच लावली होती.

आणि ते दगड येणे पण. आमच्या गल्लीत एका जणाच्या घरावर असेच दगड पडले होते. पुढे पोलिस केस करायला माझ्या काकांनी उद्युक्त केल्यावर दगड येणे बंद झाले.